ओरिसाला तडाखा देणारे १९९९ चे महावादळ – सुपर सायक्लोन- संहारक ठरले. तब्बल १४ जिल्ह्यंमध्ये त्या वादळाने हाहाकार माजविला. तेवढय़ाच तडाखेबाज ताकदीने थडकलेले २०१३ सालचे ‘फायलीन’ हे महावादळ मात्र संहारक ठरू नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले होते. विविध यंत्रणांचा समन्वय आणि आगाऊ सूचना मिळाल्याने परिस्थितीचा पूर्ण अंदाज, हे या मुकाबल्यासाठी प्रशासनाचे सूत्र होते..
ओरिसा सरकारच्या नैसर्गिक आपदा प्रबंधन विभागातल्या एका अधिकाऱ्याने नेहमीसारखी भारतीय हवामान विभाग आणि अमेरिकन नौदलाची वेबसाइट उघडली होती. त्याला अस्वस्थ करणारी एक सूचना दिसली-  चार ऑक्टोबरला गल्फ ऑफ थायलंडमध्ये ‘ट्रॉपिकल डिप्रेशन’ आणि त्यानंतर येणाऱ्या महावादळाची सुरुवात होती. सरकारी खाक्याप्रमाणे होणाऱ्या हालचाली संथ असतात असं मानलं जातं, पण १९९९ च्या सुपर सायक्लोनने पोळलेल्या ओरिसा शासनाने, या अधिकाऱ्याला दिसलेल्या त्या इशाऱ्यानंतर तातडीने युद्धपातळीवरची कारवाई सुरू केली. ऑक्टोबरमध्ये ओरिसामध्ये काली उत्सवाच्या सुटय़ा असतात. बहुतांशी अधिकारी या सुटय़ांवर होते. या सगळ्यांच्या सुटय़ा रद्द करण्यात आल्या. सगळ्या अधिकारी-कर्मचारी यांना कामावर रुजू करण्यात आलं. भारत सरकारच्या राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) आणि कॅबिनेट सचिव तसेच भारतीय सेना, नौदल आणि हवाईसेना याचबरोबर ओरिसा आणि आंध्रच्या सरकारांसोबतच्या तयारीची नांदी झाली.
ओरिसामध्ये १९९९ मध्ये आलेल्या सुपर सायक्लोनची आठवण शहारे आणणारी होती आणि त्यामुळे या वेळेची तयारी युद्धस्तरावर होती. १९९९ मध्ये २९ ऑक्टोबरला ओरिसाच्या १४ जिल्ह्य़ांमध्ये या महावादळाने ताशी ३०० कि.मी.च्या प्रचंड वेगाने धडकी मारली होती. यामध्ये जवळजवळ दहा हजार रहिवाशांना प्राणाला मुकावं लागलं होतं. यावेळी या जिल्ह्य़ामध्ये या लाटांचा जमिनीवर आदळण्याचा वेग प्रचंड होता आणि त्यांची उंची जवळजवळ सात ते दहा मीटर इतकी होती. या लाटांनी आणि यानंतर येणाऱ्या प्रचंड पावसाने ३० ते ४० किलोमीटर किनाऱ्यापासून आतपर्यंतच्या जमिनीवरच्या प्राणी, मनुष्य आणि वृक्ष यांबरोबर बांधकामांचीही प्रचंड हानी केली.एकटय़ा केंद्रपाडा आणि जगतसिंगपूर जिल्ह्य़ांमध्ये साडेतीन लाख घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती तर एकूण २.५ लाख घरांना हानी पोहोचली होती. एकूण राज्यामध्ये १४ जिल्ह्य़ांच्या १२० ब्लॉक्समध्ये १९ लाख घरांची हानी झाली होती. एकटय़ा जगतसिंगपूर जिल्ह्य़ामध्ये मृतांची संख्या ८००० इतकी होती. या जिल्ह्य़ातल्या इरसमा ब्लॉकमध्ये आठ गावे पूर्णपणे वाहून गेली होती आणि १९ गावांची मोठी हानी झाली होती. त्या महावादळाची व्याप्ती यासाठी मोठी होती की, यामुळे वाहतुकीची पूर्ण साधनं संपुष्टात आली. दळणवळणाची व्याप्ती संपली होती. दूरसंचाराची साधनं तुटली. त्या वेळी ओरिसामध्ये फक्त कलेक्टरकडेच सॅटेलाइट फोन देण्यात आले होते, जे पर्याप्त नव्हते. रेल्वेचा संपर्क तुटला होता आणि सडका वाहून गेल्या होत्या. या सुपर सायक्लोनचा तडाखाच इतका मोठा होता की, पारादीप बंदरावर हवामान खात्याने लावलेल्या सायक्लोन डिटेक्शन रडार-सीडीआरची देखील हानी झाली होती.मनुष्यहानी आणि वित्तहानीबरोबर जी पुनर्वसनाची सुरुवात करायला हवी होती ती झाली नाही. कारण वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनाबरोबरच प्रशासनाची पूर्णपणे तयारी नव्हती, या स्थलांतरित लोकांना राहायची, जेवणाची सोयही पूर्णपणे करण्यात आली नव्हती. त्याचबरोबर या सायक्लोननंतर प्रचंड पाऊस सुरू होतो आणि त्यामुळेसुद्धा या पुनर्वसनाच्या कामामध्ये अडथळे येत होते. त्यानंतरच्या चार दिवसांमध्ये जवळपास ४०० ते ९५५ एमएम पावसाची नोंद झाली. संयुक्त राष्ट्रांच्या अभ्यासानुसार वित्तहानी जवळपास २.९ बिलियन डॉलर्स इतकी होती. ओरिसा सरकारला पुनर्वसन आणि पुन्हा सगळ्या गोष्टी सुरळीत आणायला २-३ वर्षे लागली.
२०१३ मध्ये आलेल्या फायलिनचा वेग ताशी ४०० कि.मी. ने सुरू झाला आणि त्याचा जमिनीवर आदळण्याचा वेग ताशी २६० कि.मी. होता. अमेरिकन नेव्हीने तर आतापर्यंतचा सगळ्यात मोठा वादळाचा प्रकोप असं भविष्य वर्तवलं होतं. पण हवामानाच्या अंदाजांमध्ये नेहमी चुकण्याची सवय असणाऱ्या भारतीय हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरला. ताशी २६० कि.मी.च्या जमिनीवर थडकण्याच्या वेगाने हे फायलिन ओरिसाच्या तटवर्ती १४ जिल्ह्य़ांमध्ये थडकलं. याचा जोर बेरामपूरला थडकलं तेव्हा २०० कि.मी./तासाचा झाला. प्रचंड वेग आणि जवळपास ७ मीटरच्या लाटांनी ओरिसाच्या तटवर्ती भागात फायलिनचं स्वागत केलं. पण या समुद्रलाटांना आणि त्या प्रचंड वादळाला जी भूक मनुष्यबळीची होती, ती मात्र फक्त ४४ लोकांची झाली.असं काय घडलं की तितक्याच वेगाच्या आणि तितक्याच कॅपॅसिटीच्या वादळामध्ये होणाऱ्या हानीमध्ये इतका फरक पडला?
याचं उत्तर आहे ‘तयारी’.
यावेळी सरकारने प्रचंड तयारी केली होती. सगळ्या सुटय़ा रद्द करण्यात आल्या. यावेळी तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांपर्यंतच्या सगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत सॅटेलाइट फोन देण्यात आले होते. किनाऱ्यापासून दूरच्या भागामध्ये, जिथे वादळाची आणि पुराची शक्यता कमी आहे अशा ठिकाणी राहत निवारे बनवण्यात आले होते. एकटय़ा गंजाम जिल्ह्य़ामध्ये पाच लाखांवर लोकांना काळजीपूर्वक स्थलांतरित करण्यात आले. ‘अर्ली वॉर्निग सिस्टम’ सगळ्या जिल्ह्य़ांमध्ये लावण्यात आली होती. राज्यभरच्या एकूण ११.५ लाखांवर लोकांना स्थलांतरित करण्यात आलं. ३०० ते ४०० एमएम पावसामध्येसुद्धा स्थलांतराची कारवाई चालू होती.ओरिसाच्या तशा मागास राज्याने जो चमत्कार घडवून दाखवला तो संयुक्त राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनीसुद्धा डोक्यावर घेतला.
प्रशासन, राज्य सरकार, एनडीएनए, सेना, नौदल आणि हवाई दल तसेच केंद्रांच्या रेल्वे, हवाई वाहतूक आणि दळणवळण आणि दूरसंचार विभागाच्या समन्वयाचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण होतं :  फायलिन आणि त्यानंतरचं व्यवस्थापन! १९९९ च्या वादळात सापडलेल्या जनतेला आणि सरकारला फक्त दोन दिवसांची अ‍ॅडव्हान्स वॉर्निग मिळाली होती. यावेळी मात्र जवळजवळ एक आठवडा आधी सूचना प्राप्त झाली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांना या वादळाची आणि त्यामुळे होणाऱ्या मनुष्य आणि वित्तहानीची फारशी कल्पना नव्हती. मात्र २०१३ मध्ये याची व्याप्ती आणि या वादळाच्या परिणामाची पूर्ण कल्पना आजच्या अधिकाऱ्यांना होती. प्रत्येक गावामध्ये जाऊन पोलीस आणि सामाजिक संस्थांना बरोबर घेऊन महसूल खात्याने दिवसरात्र काम केलं. वादळाच्या आधी या वेळी १० लाखांहून जास्त अन्नपाकिटे तयार होती. १९९९ मध्ये बऱ्याच लोकांवर उपाशी मरण्याची वेळ आली होती. लाइफ जॅकेटे आणि जीवरक्षक होडय़ा तयार होत्या. भारतीय वायुसेनेची हेलिकॉप्टर्स बंगालमध्ये तैनात करण्यात आली होती. १९९९चं सुपर सायक्लॉन हा ओरिसासाठी आणि एकूणच भारतीय आपदा व्यवस्थापनासाठी ‘वेक-अप कॉल’ होता. त्या वेळी भारतीय आपदा प्रबंधनासाठीची कोणतीही नोडल एजन्सी अस्तित्वात नव्हती. भारतीय हवामान खात्यामध्येसुद्धा तंत्रज्ञानाची तेवढी जोड नव्हती. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा आणि राज्य पातळीवर सर्व विभागांचं इतकं चांगलं नियोजन आणि त्याची अंमलबजावणीदेखील कधी झाली नव्हती. ओरिसासारख्या राज्याने सगळ्या भारताला आणि प्रशासनाला गर्वाने उभं राहण्याची संधी दिली.
अशा गंभीर विषयापासून दूरच्या, वेगळ्या विषयावर जरा बोलू. या वादळांची नावं कोण देतं हा एक प्रश्न आपल्या सर्वाना पडलेला असतो. ही नावं वल्र्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन देते. १९५३ पासून अशी नावं देण्याची संकल्पना अस्तित्वात आली. साधारणत: ७४ किमी/ ताशीपेक्षा जास्त वेग असणाऱ्या वादळांसाठी ही नावं आहेत. वादळांच्या नावांचे सहा स्तंभ असतात आणि ती नावं दर सहा वर्षांनंतर स्तंभानुसार पुन्हा वापरली जातात. एकूण पाच ट्रॉपिकल सायक्लोन रीजनल बॉडीज अस्तित्वात आहेत. कुठल्या भागातून सायक्लोनचा उदय होतो, त्यानुसार ही नावं ठरवली जातात. उदाहरणार्थ- फायलिन हे नाव थाय भाषेतलं आहे आणि या वादळाचा उगम थायलंडच्या खाडीमध्ये झाला आहे. ही नावं कुठल्याही माणसावर, शास्त्रज्ञांवर आधारित नाहीत तर त्या त्या देशातल्या लोकांना ज्ञात असणाऱ्या नावांवर आहेत. १९७३ पर्यंत या वादळांना फक्त स्त्रियांची नावे दिली जात आणि अशा नावांच्या चार याद्या, चक्रनेमिक्रमाने वापरल्या जात. पण १९७९ नंतर सहा याद्यांतून वादळांची नावे निवडली जातात आणि ती पुरुषांची देखील असतात. या नावांमध्ये बदल तेव्हाच केला जातो, जेव्हा एखाद्या वादळामुळे प्रचंड वित्त आणि मनुष्यहानी होते. भारताने सुचवलेली नावं आहेत, वायु, सागर, मेघ, बिजली, लहर, आकाश आणि अग्नी!
भारतासारख्या देशामध्ये नैसर्गिक आपदा इतक्या येतात की त्यातून सावरण्यासाठी आणि त्याची तीव्रता कमी करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे त्यासाठी आपली पूर्ण तयारी असणे. ओरिसातल्या या उदाहरणापासून शिकलो तर उत्तराखंडसारखी स्थिती येणार नाही.
* लेखक  भारतीय प्रशासकीय सेवेतील सनदी अधिकारी आहेत.    त्यांचा ई-मेल  joshiajit2003@gmail.com
* अपरिहार्य कारणांमुळे ‘अन्वयार्थ’ आजच्या अंकात नाही.