बिहारमधील धमारा घाट रेल्वे स्थानकात लोहमार्गावर उभे असलेले प्रवासी वेगाने येणाऱ्या ‘राज्यराणी एक्स्प्रेस’खाली सापडून ३७ जण ठार तर २५ जखमी झाले. यानंतर संतप्त जमावाने इंजिनचालकाला बेदम मारहाण करून दोन गाडय़ांच्या काही डब्यांना आग लावली. परंतु लोहमार्ग ओलांडणे किंवा त्यावरून चालणे हा रेल्वेच्या नियमांनुसार दंडनीय अपराध आहे. असे असताना इतक्या मोठय़ा संख्येने लोक (कांवडिया व अन्य रहिवासी) लोहमार्गावर आलेच कसे? वेगाने येणारी ‘राज्यराणी’ धमारा स्थानकावर थांबणार नसल्याने स्थानकावरील रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या लोकांना रुळांवरून दूर का नाही केले? गाडी स्थानकाजवळ आली तरी लोक रुळांवरून दूर होत नाहीत हे पाहून इंजिनचालकाने ती थांबविण्याचा आटोकाट प्रयत्न केला असणार; पण जागच्याजागी थांबायला ते काही रस्त्यावरील वाहन नाही. शेवटी व्हायचे तेच झाले.
लोहमार्गावर आले हा लोकांचा गुन्हा, तर लोहमार्ग ओलांडण्यासाठी पूल नाहीत ही रेल्वेची बेपर्वाई. दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पात नव्या गाडय़ांची भर पडत असते पण प्रवाशांच्या सोयींचे काय?         
-अनिल रा. तोरणे ,तळेगाव दाभाडे

रावांची ‘फजिती’ झाली; पण..  
कामगार नेते शरद राव यांची कशी फजिती झाली याची वर्णने दिनांक २१ ऑगस्टच्या सर्व दैनिकांतून आली आहेत. संप मागे घेतला नाही तर अटक करू अशी धमकी सरकारने दिली. शरद राव मुंबईतील गरीब रिक्षावाल्यांना भाववाढ मिळावी म्हणून संपावर जाणार होते. रिक्षावाल्यांच्या आíथक परिस्थितीकडे कुणाचे लक्ष आहे? त्यांची कुटुंबे कोणत्या हलाखीत आहेत याकडे कोण लक्ष देते? त्यांनी भाववाढ मागताच समाज जागा होतो.
याच समाजात डॉक्टर केवळ कन्सल्टिंगचे ५०० रुपये घेतात, बिल्डर रोज दर वाढवतात, दलाल मनाप्रमाणे कांद्याचे भाव ठरवतात, वकील पाहिजे ती फी मागतात. शाळा, क्लासेस हजारो रुपये उकळतात तेव्हा समाज व सरकार कुठे असतात? गरिबांनी आवाज केला की त्यांना दाबायला सगळे धनिक व त्यांचे चेले एकवटतात. मुंबई उच्च न्यायालयाने शरद राव यांना दम भरला, परंतु समिती नेमून रिक्षावाल्यांना न्याय द्यावयास हवा होता.
जनतेच्या हितासाठी कायदेभंगाची चळवळ गांधींनी केली व ब्रिटिश सरकारला न घाबरता तुरुंगातही गेले. शरद राव आणि त्यांच्या मागे हजारो रिक्षाचालक तुरुंगात गेले असते, तर चित्र निराळे दिसले असते. सरकारलाही गरिबांचा धाक हवा.
मार्कुस डाबरे, पापडी, वसई

ठणकावण्याला किंमत नाही..
पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करतो आणि आपण त्यांना ‘आमच्या सहनशीलतेला नाकत्रेपणा समजू नका’; ‘आमच्या सीमांचे रक्षण करणे आम्ही जाणतो’ वगरे तेच-ते ठेवणीतले शब्द उच्चारून ‘ठणकावतो’ हे आता हास्यास्पद झाले आहे. यात ठणकावणीपेक्षा असहायतेचाच सूर अधिक जाणवतो. त्यामुळे या वरून पाक काय समजायचे ते केव्हाच समजला असावा, म्हणूनच तीच तीच आगळीक न घाबरता परत परत करायला धजावतो आहे. सर्वात कडी म्हणजे संरक्षण मंत्र्यांचे ताजे वक्तव्य ‘अशामुळे उभय देशांच्या संबंधांवर (?) विपरीत परिणाम होईल’ हे! उभय देशांत उभा दावा आहे हे शेंबडे पोरही सांगेल. हेच नाते पाक इमाने-इतबारे निभावत आहे. आपणच मत्रीची ढाल पुढे करून आपला नाकत्रेपणा उघडा करीत अहोत. आपल्या हद्दीत घुसून आपल्या शूर जवानांचे शिरकाण करून परतणे आणि आपण फक्त तोंडानेच तोफा डागणे हे किती लांच्छनास्पद आहे! आपल्या कोणत्याही ‘ठणकावण्याला’ पाक काडी इतकीही किंमत देत नाही हे आपल्याला अजूनही कळले नाही का?
सुप्रिया तडकोड, बोरिवली (पूर्व)

‘विचारांची लढाई विचारानेच लढण्या’ची आठवण अलीकडेच झालेल्यांसाठी..
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या  हत्येनंतर, त्यांच्या ‘वैचारिक’ विरोधकांचे ‘विचार’ वाचून माझ्या मनात उपस्थित झालेले काही प्रश्न :
१) जर दाभोलकर हे खरेच धर्माच्या विरोधात काम करत होते, तर मग धर्माच्या नियमाप्रमाणे देवानेच त्यांना शिक्षा द्यायला हवी होती, कारण जेव्हा अधर्माचं प्रमाण वाढतं तेव्हा देव अवतार घेऊन अधर्मीयांचा नाश करतो. मग दाभोलकर यांचा खून करणारे ते दोघे देवावतार मानावेत का?
२) जर कर्मकांड , धागे-दोरे,लिंबू-मिरची, सुया टोचलेली बाहुली यामध्ये एवढी ताकद असते तर मग दाभोळकरांच्या नावची एक बाहुली तयार करून तिला सुया टोचून , लिंबू-मिरची ओवाळून, मूठकरणी करून हे कार्य साधायचं होतं! .. म्हणजे त्याद्वारे धर्माच्या आणि बुवाबाजीच्या शक्तीची प्रचीतीही आली असती आणि त्यांचे ईप्सितही साध्य झालं असतं.
३) विचारांची लढाई विचाराने लढण्याची गुळगुळीत ‘राजकीय’ धाटणीची वाक्ये सर्व जण उच्चारत आहेत, पण समोरची माणसे अविचारी असतील तर मग ही लढाई कशी लढायची? की मग असंच मरायचं शांतपणे?
– कपिल इंगोले,  मुंबई

दंतकथांना इतिहास समजू नयेच
‘संशोधनाला विरोध नाही, पण प्रसिद्धी कशाला द्यावी?’ हे माजी मंत्री आणि खासदार शालिनीताई पाटील यांचे पत्र (लोकमानस, २० ऑगस्ट ) वाचले. ‘लक्षावधी लोकांच्या भावनांना ठेच पोहोचेल’ म्हणून ‘लोकसत्ता’ने ज्येष्ठ इतिहास संशोधक रा. चिं. ढेरे यांची मुलाखत घेतली, त्याचे वृत्तांकन करताना सिंहगडाच्या नामकरणाविषयीच्या संशोधनाला महत्त्व देऊन ते छापायला नको होते, असे त्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र सध्या अशा अनिवार भावनाशील मंडळींनी व्यापलेला आहे आणि अधोगामी बनू लागला आहे. आपला एखादा अवयव दुखरा झाला तर आपण त्याच्यावर उपचार करतो की, तो ज्या ज्या गोष्टींनी दुखावतो, त्या गोष्टी नष्ट करतो?
शालिनीताई स्वत:लाही इतिहासाच्या अभ्यासक म्हणवतात. इतिहास हा वेळोवेळी प्रकाशात येणाऱ्या नवनवीन साधनांनी रचला जातो, तो सतत मोडावा आणि जोडावा लागतो, ही प्राथमिक गोष्ट आहे. इतिहासातल्या सगळ्या प्रसिद्ध स्त्री-पुरुषांच्या आणि घटनांच्या भोवती अविश्वसनीय दंतकथांचे जाळे पसरलेले असते. भाबडी मने त्या दंतकथांनाच इतिहास समजतात आणि लबाड लोक त्यातून खोटय़ा अस्मिता घडवतात. त्या जळमटांमधून इतिहासाला मुक्त करायचे की, या पंगू मानसिकतेच्या लोकांच्या, ते संख्येने लक्षावधी आहेत म्हणून, भावना कुरवाळत बसायचे?
 शालिनीताईंचे पत्र वाचून लक्षावधी सुबुद्ध माणसांच्याही भावना दुखावल्या असतील, पण म्हणून ‘लोकसत्ता’ने त्यांचे पत्र छापायला नको होते, असे ते म्हणणार नाहीत.
रमाकांत नाडगौडा, नाहूर

व्यक्तिगत गोष्टींना किती महत्त्व देणार?
आपण सर्वानीच एक समाज म्हणून कुठं चाललोय हे तपासून बघितलं पाहिजे, एक समाज म्हणून आपण किती परिपक्व आहोत याची चिकित्सा केली पाहिजे. कोटय़वधी रुपये कमावणारे भंपक चित्रपट, बाजारू मूल्ये दाखवणाऱ्या सीरियल्सचा वाढता टीआरपी ही उदाहरणे आपल्या ‘अडाणी’ मानसिकतेचे लक्षण नव्हे का? अगदी नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर वृत्तवाहिन्यांवर खडे, विविध दैवी यंत्रे विकणारे कार्यक्रम (आपल्यासाठीच!) सुरू झाले. हे दुटप्पी वागणं आपण कधी थांबवणार आहोत की नाही?
चर्चा, गप्पा एक आणि वर्तणूक दुसरीच या सवयी आपण कधी सोडणार आहोत, जात-धर्म या व्यक्तिगत गोष्टींना आपण किती दिवस नको ते महत्त्व देणार आहोत? मोठ-मोठी वृत्तपत्रं विवाहेच्छुक लोकांच्या जाहिरातीत ‘त्या’ लोकांच्या गरजेनुसार ‘एससी/ एसटी क्षमस्व’ असं छापतात म्हणजे हा जातिभेदाचा किडा आपण असाच वळवळत ठेवणार आहोत काय?
आता इथं तालिबानप्रमाणे काही लोक इतरांना ‘धर्मद्रोही’ वैगेरे ठरवायला लागलेत. म्हणजे आपण पुन्हा जुनाच काळा इतिहास उगाळणार आहोत की काय?
इतक्या वर्षांची धडपड, त्यासाठी गमवावे लागलेले प्राण हे सारं पाहूनही िहदूरक्षक (?) नेते म्हणताहेत की, ‘वाईट झालं पण कायदा हा विचाराअंती पारित व्हायला हवा’ म्हणजे हे कायद्यासोबत आहेत की धर्माध शक्तींसोबत ?
– डॉ. प्रज्ञावंत देवळेकर, पुणे</strong>