अफगाणिस्तानातील तालिबान्यांनी २००१ साली बामियानच्या बुद्धमूर्ती उद्ध्वस्त केल्या, त्यानंतर त्यांचे पुनरुज्जीवन करावे काय हा वाद गेली चार वर्षे चिघळतो आहे. हा संपूर्ण परिसर संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) ‘जागतिक वारसा’ म्हणून घोषित केलेला असल्याने हा वारसा जपायचा कसा, याचे आंतरराष्ट्रीय नियम पाळूनच त्याच्या संधारणाचे काम झाले पाहिजे आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी कोणतेही नवे बांधकाम नको, असा नियम आहे. पण बामियान बुद्धमूर्तीचा प्रश्न निराळा आहे.. किमान १५०० वर्षांपूर्वी ५५ मीटर उंच बुद्धमूर्ती दगडात खोदून, त्याच्या आसपास अनेक बुद्धमूर्ती, लेणी आणि भित्तिचित्रांच्या गुंफा असा वारसा गांधारदेशात उभारला गेला, तो केवळ कुणा मुल्ला उमरचे ऐकणाऱ्या टोळय़ांनी उद्ध्वस्त केला म्हणून आपण ती हानी सहन करायची का? हे गतकालीन वैभव काय होते, याची कल्पना यावी यासाठी अत्याधुनिक तंत्राचा आधार घेऊन सहीसही पुनर्बाधणी करता येईल.. तशी का नाही करायची? फ्रेंचांनी अमेरिकेसाठी बनवलेल्या स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळय़ापेक्षाही उंच बुद्धमूर्ती दीड हजार वर्षांपूर्वीच्या मानवी प्रयत्नांतून उभारली गेली होती, तिच्याऐवजी इथे येऊन लोकांनी केवळ तालिबान्यांनी पाडलेली भगदाडेच का पाहावीत? असे प्रश्न. त्यांची उत्तरे वाटतात तितकी सोपी नाहीत, कारण जगभरचे नावाजलेले वास्तुवारसातज्ज्ञ यावर विचार करीत आहेत, त्यांपैकी अनेकांचे पुनरुज्जीवनाऐवजी फार तर संधारण करावे, असे मत आहे. युनेस्कोने अशा संधारणासाठी ‘आयकोमोस’ (इंटरनॅशनल कौन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स) या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ-संस्थेचे माजी प्रमुख मायकल पेट्झेट यांची नेमणूक तीन वर्षांपूर्वी केली; त्यांनी या दोन्ही मतप्रवाहांच्या मधला मार्ग काढावयाचे ठरवून, मोठय़ा बुद्धमूर्तीच्या जागचे भगदाड अधिक मजबूत करण्यासाठी दोन खांब उभारले.. हे खांब मूळ उंच बुद्धमूर्तीच्या भग्न पायांसारखेच दिसत होते.. आणि अशी हुबेहूब प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न तर १९७०च्या दशकात भारतीय पथकानेही केला होता. हे काम या प्रकारे केले जात असल्याची माहिती फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात उघडकीला येताच युनेस्कोने ते तातडीने थांबवले. त्या वेळी अशा बातम्या आल्या होत्या की, मूर्तिपूजा नाकारणाऱ्यांचा युनेस्कोवर दबाव आहे! अखेर गेल्या महिन्याभरात याविषयीचे मतभेद नेमके कोणाकोणात आहेत आणि ते कोणते, हेही स्पष्ट होत गेले. याचा सविस्तर वृत्तान्त न्यूयॉर्क टाइम्सने रविवारी (२३ मार्च) दिला, त्यातून हेही स्पष्ट होते की या बुद्धमूर्ती पुन्हा उभारल्यास पर्यटनाचे उत्पन्न वाढेल, असे अफगाण सरकारला वाटते. याउलट, दक्षिण कोरियासारख्या देशाने ३२ कोटी रुपये खर्चून याच परिसरात संग्रहालय बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे. जपानलाही संग्रहालय उभारायचे आहे, पण प्रस्ताव दक्षिण कोरियापेक्षा निराळा. युनेस्कोने १२ वर्षांपूर्वीपासून जे प्रकल्प येथे ठरवले, त्यात केवळ ‘पुढील पडझडीपासून संरक्षण’ यावरच भर होता. परंतु मधल्या काळात अफगाण पर्यटनवाद्यांची मागणी वाढत गेली, तिला जर्मनीसारख्या देशांतून प्रतिसादही मिळत गेला आणि रोमच्या रोमन फोरमची पुन्हा उभारणी करताना मूळ दगडच वापरले, तसे काम बामियानमध्ये करण्याचा विचार जर्मन पथकाने केला. एवढे मूळ साहित्य इथे उपलब्धच नाही, जे होते त्याच्या १० टक्के भग्न दगड शिल्लक आहेत, असा युनेस्कोतील काही तज्ज्ञांचा निर्वाळा आहे, तर जर्मन पथकाच्या मोजणीनुसार ३० टक्के अवशेष आजही येथेच आहेत. इतका फरक कसा, संधारणाच्या तंत्रावर हुकमत असलेले जगभरचे तज्ज्ञ १० वर्षांनंतरही बामियान जपायचे कसे हे का ठरवू शकत नाहीत, हा अफगाण स्थानिकांचा सवाल मात्र अनुत्तरितच आहे.