अमेरिकेच्या एडवर्ड स्नोडेन याने तेथील एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) देश-परदेशातील लोकांची माहिती कशी चोरते याचा पर्दाफाश केला होता, त्याबद्दल त्याला देश सोडून पळ काढावा लागला पण त्याने ओबामा प्रशासनाला चांगलेच हादरवले हे खरे. आता नुकतीच भारतातील काळ्या पसेवाल्या खातेदारांची एक यादी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने ‘इंटरनॅशनल कन्सॉर्शियम ऑफ इन्वेस्टिगेटिव्ह जर्नालिझम’ या संस्थेच्या हवाल्याने दिली आहे. त्यामागे जो जागल्या (व्हिसलब्लोअर) आहे व ज्याने गुप्तहेरासारखे काम करून एचएसबीसीच्या स्विस बँकेतील धनिक मंडळींची माहिती उघड केली आहे त्याचे नाव आहे हर्वे फाल्चिआनी. अनेक धोके पत्करून एचएसबीसीतील किमान १ लाख तीस हजार खातेदारांची माहिती त्याने बाहेर काढली.
हर्वेचा जन्म मोनॅको या कुणाला माहीत नसलेल्या देशातील माँटे कार्लो येथे ९ जानेवारी १९७२ रोजी झाला. स्वित्र्झलडमध्ये असताना त्याला डिसेंबर २०१४ मध्ये बँक माहिती चोरीच्या प्रकरणात महाधिवक्त्यांनी अडकवले. त्याने १८० अब्ज युरोची करचुकवेगिरी आतापर्यंत उघडकीस आणली आहे. जीनिव्हा येथे २००६ मध्ये तो एचएसबीसी या खासगी बँकेत कामाला होता. २००८ मध्ये तो लेबनॉनला गेला व एचएसबीसीमध्ये सहकारी असलेल्या जॉर्जनिा मिखाएल हिच्याशी त्याचे प्रेमसंबंध होते, नंतर तीच त्याच्यावर उलटली. तिने हर्वेवर बदनामीचे अनेक खटले टाकले. २००७ मध्ये इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संघटनेने हर्वेची मदत घेण्याचे ठरवले व दहशतवादी संघटनांचे किती पसे कुठे आहेत, ही माहिती गोळा करण्याची कामगिरी त्याला दिली. तो परत जीनिव्हात आला तेव्हा २२ डिसेंबर २००८ मध्ये त्याला अटक करण्यात आली, पण त्याने तेथे नंतर पत्नी व मुलीसह फ्रान्सला पलायन केले. फ्रान्सने काळ्या पशाची त्याने मिळवलेली माहिती इतर देशांमध्ये तिळगूळ वाटावा तशी वाटली. नंतर एचएसबीसीला १.९ अब्ज डॉलरचा दंडही झाला. ‘ल माँद’ या वृत्तपत्राने ही माहिती प्रथम २०१४च्या जानेवारीत खातेदारांच्या नावाशिवाय छापली. मेक्सिकोतील अमली पदार्थ माफियांचे लाखो डॉलर या बँकेत आहेत, असे यात निष्पन्न झाले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख असलेल्या ख्रिस्तीन लगार्द यांनी अनेकदा हर्वे याने दिलेली माहितीच वापरली होती. त्या यादीला ‘लगार्द लिस्ट’ असे नावच आहे.  हर्वे चोर की साव, याबाबत सध्या मतभेद आहेत. काळ्या पैशाबाबत माहिती बाहेर काढण्यासाठी त्याने व्यक्तिगत सुरक्षा पणाला लावली, हे मात्र निर्विवाद!