ठळक आणि मोक्याच्या जागी जे बसले आहेत त्यांना निरखणेही अवघड नाही, सहजासहजी त्यांच्यावर कटाक्ष पडतोच पण ज्यांचा आवाजच आपल्यापर्यंत पोहोचत नाही असेही खूप लोक असतात. हा बाजार जर कलकलाटाचा असेल आणि या बाजारात माणसाचे अस्तित्वच हरवणारे असेल तर मग अशा वेळी या बाजार न झेपणाऱ्या, बाजाराच्या आडोशाला उभे राहणाऱ्यांकडे लक्ष देण्याची गरजच असते.
‘हे मला सांगितलेच पाहिजे’ असे तीव्रतेने वाटणे ही खरे तर एक जीवघेणी निकडच असते. या सांगण्याच्या बुडाशी सततचे असमाधान असते. आपण सगळे काही सांगून बसलो आहोत किंवा आता काहीही सांगायचे नाही अशी निरिच्छ वृत्ती असली तर मग व्यक्त होण्याची प्रबळ अशी ऊर्मीच राहत नाही. हे व्यक्त होणे जर वर्षांनुवष्रे साचलेले-साठलेले असेल तर ते एका आवेगाने बाहेर येते. एखादी जमीन जर खूप वष्रे पडीक राहिली असेल तर वहितीत आणल्यानंतर ती उफाणते, पीक एकदमच भरात येते. अनुभवाच्या आधारे व्यक्त होतानाही मग अनेकांच्या बाबतीत असेच होते. अशा वेळी हे व्यक्त होणे एकटय़ाचे असले तरीही ते सगळ्यांचे होते. उघडय़ा डोळ्यांनी टिपलेले सारे काही एखाद्या गोष्टीत जुळून येते तेव्हा मग ती गोष्ट सांगणाऱ्या एकटय़ाचीच राहत नाही. ती सगळ्यांचीच होते. लिहिताना आपण एकटेच असतो, ती एकटय़ाचीच निर्मितीही असते पण ती जेव्हा अनेकांच्या जगण्याला स्पर्श करते तेव्हा ती लिहिणाऱ्याच्या सावलीभोवतीच घुटमळते असे नाही. ती मनातून थेट माणसांपर्यंत जाऊन पोहोचते. असाच अनुभव एखाद्या कवितेतूनही येतो. ती कविताही फक्त कवीची राहत नाही. सोसणे एकटय़ाचे असते, सोसतानाची घालमेल एकटय़ाची असते पण हा एकटय़ापासून सुरू झालेला प्रवास समूहापर्यंत जाऊन पोहोचतो. एखाद्याच्या वाटय़ाला आलेले भोगही जेव्हा शब्दरूप धारण करतात तेव्हा त्यातून रचनेचे एक असाधारण असे शिल्प साकारते. आयुष्याची वाताहत झाल्यानंतरही असे शब्दरूप ज्यांनी दिले त्यांनी अक्षर अशा कलाकृती निर्माण केल्या असा जगातल्या श्रेष्ठ वाङ्मयाचा इतिहास सांगतो.
..एक धागाच असतो आपल्यात आणि समाजात. समाजात काही तरी घडते आणि त्याची कंपने आपल्यापर्यंत पोहोचतात. लिहिणारा सदैवच लिहीत असतो असे नाही, तो जेव्हा लिहीत नाही तेव्हाही त्याच्या पटलावर असंख्य गोष्टींच्या नोंदी तो करीतच असतो. या नोंदी मऊ मातीवर उमटणाऱ्या पावलांसारख्या खोलवर आपला ठसा उमटवतात. ही एक निरंतर अशी प्रक्रियाच असते. पाहिलेले न पाहिलेले असंख्य तपशील अशा वेळी सरमिसळ होऊन येतात. लिहिणाऱ्याच्याही जगात अनेक अज्ञात आणि लपलेल्या जागा असतात, त्याचा लिहिणाऱ्यालाही पत्ता नसतो. लिहिताना या साऱ्या अज्ञाताचेही कोपरे उजळतात. ध्यानीमनी नसलेल्याही अनेक गोष्टी एखाद्या कपारीतून बाहेर आल्यासारख्या समोर येतात. आपल्याच अज्ञातातून काय काय बाहेर येते याबाबतचे मोठे कुतूहल हे लिहिणाऱ्याच्याही मनात असतेच. कधी कधी लिहिणाऱ्यालाच चमकायला लावणाऱ्या, चक्रावून टाकणाऱ्या या अज्ञाताचे अनेक कोपरे पुढे वाचणाऱ्यांनाही उजळून टाकतात. या व्यक्त होण्यात जर अकृत्रिम अशी विश्वसनीयता आली तर वाचणाऱ्या प्रत्येकालाच हे आपले आहे असे वाटू लागते.
..आता प्रश्न असा आहे की, जे डोळ्यांना दिसते आणि नजरेच्या टप्प्यात असते तेवढेच फक्त आपल्यावर येऊन आदळते असे आहे का? तर नाही हेच त्याचे उत्तर आहे. प्रत्यक्ष डोळ्यांना न दिसणाऱ्या अनेक गोष्टी असतात. डोळ्यांना दिसते तेवढीच दुनिया असे मानले तर अनेक गोष्टी आपल्या नजरेच्या टप्प्याबाहेर असतात त्यांचे काय करायचे. आपली  नजर तिथवर पोहोचतच नाही. आपल्याला अपरिचित असलेले जगही खूप लांबवर पसरलेले असते. आपली नजर तिथपर्यंत पोहोचेलच असे नाही पण ‘दृष्टी’ असेल तर तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करता येईल. ज्यांचा आवाज ऐकू येईल त्यांच्यापर्यंत जाणे सोपे आहे. ज्यांचा आवाज ओळखीचा आहे त्यांना समजून घेणेही सोपे आहे. ठळक आणि मोक्याच्या जागी जे बसले आहेत त्यांना निरखणेही अवघड नाही, सहजासहजी त्यांच्यावर कटाक्ष पडतोच पण ज्यांचा आवाजच आपल्यापर्यंत पोहोचत नाही असेही खूप लोक असतात. त्यांना काही सांगायचे आहे पण त्यांच्याकडे कोणाचे लक्षच जात नाही. त्यांचे हातवारेही आपल्याला दिसत नाहीत. असे खूप समूह आहेत की त्यांच्या हाका आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत. थोडक्यात त्यांना बाजार माहीत नाही. बावरतात ते बाजारात आल्यानंतर. आठवडी बाजारात जशी सगळीकडून गर्दी झालेली असते आणि या कोलाहलात सगळेच आवाज एकमेकांत मिसळतात तसे होते. कोणी भोंग्यावर ओरडतो, कोणी जरा उंचवटय़ावर दुकान मांडतो. कोणी चित्रविचित्र हालचाली करून लक्ष वेधतो, काही थेट बाजाराच्या तोंडाशीच आपले बस्तान मांडतात. काहींना मात्र जागा मिळत नाही, ते कुठे तरी उभे राहतात. एखादा माठ विकणारा कुंभार असेल, एखादा कुठली तरी सहजासहजी न मिळणारी पालेभाजी घेऊन आलेला असेल किंवा शेतीधंद्यातली अवजारे करणारा कुणी असेल. या सर्वानाच आपल्याजवळचे साहित्य विकून घरी परतायचे असते. त्यांच्या वस्तूचे मोल कुणी जाणले तरच त्यांना आवश्यक ते संसारासाठी लागणारे किडुकमिडुक खरेदी करता येते. ..अर्थात बाजारात लक्ष वेधून घेण्यासाठीच्या कलेत माहीर झालेले अनेक जण असतात, बाजार त्यांना सवयीचा झालेला असतो. बाजारात उभे राहून मोठमोठय़ाने ओरडून लक्ष वेधले जाते. सतत बाजाराच्या केंद्रस्थानी राहिल्याने येणारा सराईतपणा त्यांच्या देहबोलीत दिसतो.
..शेवटी ‘झोत’ कुणावर पडतो हे महत्त्वाचे. हा झोत पडणारे उजळून जातात. लखलखाटात ते सर्वानाच दिसतात. ज्यांच्यावर असा झोत पडत नाही ते कुठे तरी आपले आडोशाला दुकान लावतात. दिवस मावळल्यानंतर दुकानाची आवराआवर करून घराचा रस्ता धरतात. बाजार झेपत नाही त्यांना. विकण्याचे तंत्र त्यांनी आत्मसात केलेले नसते. त्यांच्यावर कोणाची नजरही पडत नाही. हा बाजार जर कलकलाटाचा असेल आणि या बाजारात माणसाचे अस्तित्वच हरवणारे असेल तर मग अशा वेळी या बाजार न झेपणाऱ्या, बाजाराच्या आडोशाला उभे राहणाऱ्यांकडे लक्ष देण्याची गरजच असते. बाजारातल्या चकचकीत, गुळगुळीत आणि आकर्षक गोष्टींकडे सर्वाचे लक्ष जाते. ज्याचा आवाज मोठा त्याचे मोल अधिक हेच जर बाजाराचे सूत्र असेल आणि हा बाजार माणसाच्या विवेकशक्तीलाही नष्ट करणारा असेल तर मग या बाजारातला झगमगाट आपल्या डोळ्यावर पडू नये याची खबरदारी घ्यावीच लागते. बऱ्याचदा होते असे की डोळे दिपवून टाकणारा झगमगाट असेल आणि उजेडाचे लोळ जर समोर असतील तर सर्व काही स्वच्छपणे दिसण्यापेक्षा डोळ्यासमोर अंधारी येण्याचीच शक्यता असते. अशा वेळी झोत टाळून पाहणे किंवा जिकडे झोत नाही तिकडे लक्ष देणे केव्हाही चांगले. या झोताबाहेर एक मोठे जग तिष्ठत बसलेले असते. या जगाचा शोध सुरू झाला की समूहापर्यंत जाण्याचा प्रवास सुरू होतो. दिसणाऱ्या पृष्ठस्तराखाली जे अंत:स्तर असतात त्यांचा शोध घेण्यासाठी जमिनीला कान लावल्याशिवाय पर्याय नाही.