सनदी अधिकाऱ्यांचे मुख्य प्रशिक्षण सुरू होण्याआधी दीड महिना सर्वाना देशाच्या विविध प्रांतांमध्ये जावे लागते. या भारतदर्शनमध्ये वेगवेगळ्या राज्यांतल्या नानाविध विषयांमधल्या प्रकल्पांचा अनुभव घेता येतो. भारतीय सेना, ग्रामीण विकास, शहरी विकास, आदिवासी भाग, अंतर्गत अशांत प्रदेश, राजस्व किंवा प्रशासनिक सुधारांमधले अनुभव आणि देशासाठी अभिमानास्पद असणाऱ्या संस्थांना भेटी अशा स्वरूपाची मांडणी या भेटीत असते.
प्रशिक्षण आणि ग्रामदर्शनाच्या नंतर आणि प्रत्यक्ष नियुक्तीदरम्यान मसुरीच्या ट्रेनिंगमधल्या काही चांगल्या तर काही रटाळवाण्या लेक्चर्सना सोडून सगळ्या अधिकाऱ्यांना लक्षात राहण्यायोग्य गोष्ट कुठली असते ती म्हणजे ‘भारतदर्शन’. आपल्या ‘प्रशासनयोगा’तल्या ट्रेनिंग आणि माहितीपर लेखांचा शेवट आपण भारतदर्शनाने करणार आहोत.Foundation Course  नंतर आणि मुख्य प्रशिक्षणाआधी साधारणत: ४५ दिवसांच्या भारतदर्शनाचा कार्यक्रम असतो. प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन तिथल्या चांगल्या-वाईट अनुभवांची देवाणघेवाण यामध्ये असते.
मागच्या दोन दशकांपासून या दर्शनाची सुरुवात लष्कराच्या ट्रेनिंग आणि मुक्कामाने होते. माझ्या गटाला त्यांनी ऊरी सेक्टरमध्ये पाठवले होते. उरीमधल्या आर्मीच्या ऑफिसमध्ये आम्ही सात अधिकारी डिसेंबरच्या महिन्यात पोहोचलो. नुकतीच थंडीला सुरुवात झालेली होती. आम्हाला प्राथमिक माहिती देऊन तीन वेगळ्या गटांमध्ये विभागण्यात आले. आम्हाला त्यानंतर प्रत्यक्ष सीमारेषेवर रवाना करण्यात आले. माझी नेमणूक जाट रेजिमेंट आणि १५ ग्रेनेडन्सबरोबर होती. अधिकाऱ्यांना जवान किती कठीण परिस्थितीत राहतात आणि त्यांच्या काय गरजा आहेत, तसेच जवान युद्धभूमीवर असताना त्यांच्या गावी राहणाऱ्या त्यांच्या परिवाराला काय अडचणी येऊ शकतात, याबाबत संवेदनशील बनवण्यासाठी ही भेट असते. अत्यंत दुर्गम ठिकाणी राहून देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या समस्यांना समजावून घेऊन त्यांच्या सैन्य-तथा पारिवारिक प्रश्नांना सोडवताना लाल फितीचा अडसर दूर व्हावा इतकीच माफक अपेक्षा या प्रशिक्षणामध्ये अपेक्षित असते. चार दिवसांच्या या भेटीनंतर जेव्हा उरीमध्ये त्यांच्या डिव्हिजनच्या मेसमध्ये शिरलो तेव्हा माणसात आल्यासारखे वाटले. सतत बर्फाच्या टापूमध्ये राहून अन्नपाण्याची इच्छा संपून जाते, पण आपल्या घरच्या सग्यासोयऱ्यांना सोडून देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या सैनिकांसाठी माझ्या प्रत्येक पोस्टिंगमध्ये मी त्यांच्या समस्यांना सोडवण्यासाठीचा एक वेगळा सेल बनवला होता. आज झज्जर जिल्हाधिकारी म्हणून काम करताना मी आजी-माजी सैनिकांसाठी एक संपूर्ण भारतातल्या झज्जरच्या सैनिकांसाठी वेगळा टोल-फ्री नंबरसुद्धा सुरू केला आहे. झज्जर जिल्ह्य़ामध्ये आजच्या घडीला किमान ३५,००० सैनिक आहेत, जे या टोल-फ्री नंबरचा लाभ घेत आहेत. ट्रेनिंगच्या दरम्यान मिळालेल्या ‘आर्मी अ‍ॅटॅचमेंटचा’ हा परिपाक आहे हे मात्र खरे. चार-पाच दिवस बर्फामध्ये राहून जेवणाची इच्छाही कमी झाली होती. पण उरीच्या ऑफिसर्स मेसमध्ये बीड जिल्ह्य़ातल्या आष्टीच्या पाटलांनी, जे मेसचे मुख्य कुक होते त्यांनी, माझ्यासाठी बनवलेली खास शेंगदाण्याच्या चटणीची चव मी आजही विसरू शकत नाही. भारतीय सेनेच्या जवानांच्या मग ते चटणी खाऊ घालणारे पाटील असतील किंवा सीमारेषेवरच्या जाट रेजिमेंटमधले जवान असोत, जे माझ्यासाठी तडका मारून केलेली दाल खाऊ घालत असतील, या सगळ्यांच्या आपुलकीने आपण भारावून जातो. विभिन्न राज्ये आणि जातीनिहाय भरतीप्रक्रिया असणाऱ्या भारतीय सेनेची देशाप्रती असणाऱ्या बांधीलकीला नतमस्तक होऊन आम्ही उत्तर प्रदेशातील औष्णिक विद्युत प्रकल्पाला रवाना झालो.
या भारतदर्शनमध्ये वेगवेगळ्या राज्यांतल्या वेगवेगळ्या विषयांमधल्या प्रकल्पांचा अनुभव घेता येतो. यामध्ये भारतीय सेना, ग्रामीण विकास, शहरी विकास, आदिवासी भाग, अंतर्गत अशांत प्रदेश, राजस्व किंवा प्रशासनिक सुधारांमधले अनुभव आणि देशाला अभिमानास्पद असणाऱ्या संस्थांना भेटी अशा स्वरूपाची मांडणी असते. त्यातून शिकायला मिळावे, तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करता यावी, संपूर्ण भारतामध्ये तुमच्या ओळखी वाढाव्यात अशी यामागची अपेक्षा असते.
अंतर्गत अशांततेचा अनुभव घेण्यासाठी आसाममध्ये जाण्याची संधी मिळाली. आसाममधल्या कार्बी-आँगलाँग या जिल्ह्य़ामध्ये दोन आदिवासी जातींमध्ये हिंसक संघर्ष चालला होता. तिथल्या तत्कालीन जिल्हाधिकारी अनुराग गोयल यांनी आम्हाला हिंसाग्रस्त गावांमध्ये रात्री भेटी घडवून आणल्या. आपल्या भाषा, आपले संस्कार यांना प्रचंड मानणाऱ्या डिफूच्या या टोळ्यांनी आपली Film Industry सुद्धा उभी केलेली आहे. अशांत टापूमध्ये सेना, अर्धसैनिक तुकडय़ा आणि स्थानिक पोलिसांना घेऊन शांतता प्रस्थापित करणे आणि त्याचबरोबर विकासाची कामे सुरू ठेवणे ही तारेवरची कसरत राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन कशी करते याचा सुकृद्दर्शनी अनुभव मिळाला. आयजक-मुविया ग्रुपच्या दिमापूरमधल्या हॉटेलमध्ये बसून ‘तुम्ही भारतीय’ या हेटाळणीचाही अनुभव आला. भारताच्या ईशान्येकडील राज्यांना सरसकट भरघोस निधी देऊन भारत सरकार आपल्या योजना चालवते, पण त्याचा कितवा हिस्सा सामान्य माणसापर्यंत पोहोचतो आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आजही चीन आणि इतर देशांचा पगडा या राज्यांवर दिसतो आहे. बांगलादेशातून होणारे अतिक्रमण हाही तितकाच चिंतेचा प्रश्न दिसतो.
पण प्रश्न असा पडतो की, आपण त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करतो? हाच प्रश्न या भेटींमध्ये प्रकर्षांने जाणवला. आपल्याला तमीळ, कन्नड किंवा गुजराती माणसांमधला फरक लगेच ओळखता येतो, पण ईशान्येतल्या राज्यांमधल्या बहुतांशी लोकांमधला फरक आपण ओळखू तर शकतच नाही, पण त्याचबरोबर आपण त्यांचा लागलीच ‘चिनी’ म्हणून उल्लेख सर्वसामान्यपणे करतो. आजच्या घडीला मणिपूरच्या मुख्यमंत्री कोण विचारले तर ९० टक्के लोकांना माहिती असण्याचे कारण नाही. हाच प्रकार प्रसारमाध्यमांमध्येदेखील आहे. ईशान्येमधल्या किती बातम्या आपण मुख्य प्रवाहातच प्रसारमाध्यमांमध्ये पाहतो? तिथल्या कार्बी फिल्म इंडस्ट्रीमधल्या एका कलाकाराशी चर्चा करताना तो म्हणाला की, आमचे किती कलाकार हिंदी चित्रपट उद्योगात आहेत? एकटा डॅनी सोडला आणि तोही खलनायक! त्यामुळे आम्हाला तो तुमचा देश, तुमची फिल्म्स वाटतात!!
कर्नाटकामधल्या मंडय़ा जिल्ह्य़ामध्ये भारतामधल्या पहिल्या काही प्रयोगांपर्यंत महसूल कार्याचे संगणकीकरण झाले. या संगणकीकरणाच्या प्रयोगांची माहिती घेण्यासाठी आम्ही मंडय़ा आणि आसपासच्या गावांमध्ये भेटी दिल्या. तलाठी आणि तहसील कार्यालयांमधल्या वाऱ्या कमी व्हाव्यात आणि गावच्या लोकांना गावातच सातबारा, जमिनीशी निगडित व्यवहारांची कार्यवाही करता यावी म्हणून ग्रामीण स्तरावर संगणकीकृत कार्यालये उघडली गेली. महसूल तलाठी किंवा खात्याच्या काही कर्मचाऱ्यांच्या हाती असणारी ही सत्ता संगणकीकरणामुळे गावपातळीवर पोहोचली, लोकांना मामलेदाराच्या कचेरीमध्ये जाण्याचा त्रास वाचला. पण अजूनही या प्रयोगाची संपूर्ण देशभर पुनरावृत्ती झाली नाही. महसूल विभाग हा राज्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत असल्याने आणि प्रत्येक राज्याचे आपले वेगळे महसूल तंत्र असल्यामुळे यामध्ये क्लिष्टता आहे. पण महसुलातला भ्रष्टाचार संपवायचा असेल तर संगणकीकरण आणि त्याच्या जोडीला गाव स्तरावर ‘नागरिक सुविधा केंद्र’ स्थापित होण्याची गरज आहे.
भारताच्या वाढत्या नागरीकरणाच्या पाश्र्वभूमीवर आम्हाला विजयवाडा महानगरपालिका आणि वायझकची भेट घडवण्यात आली. नागरीकरणाच्या रेटय़ामुळे आपण पुढे जात असलो तरी त्याचे नियोजन भारतामध्ये नीटसे होत नाही. आजच्या घडीला आपल्याकडे कुठलेही शहर नाही, ज्यांनी पन्नास वर्षे पुढचे नियोजन केले आहे. चंदिगड आणि भुवनेश्वर ही खरे तर एकाच वेळी उभारलेली नियोजनबद्ध शहरे आहेत. पण शहरीकरणामध्ये नुसते नियोजन नाही तर त्याचे अनुपालन हे फार महत्त्वाचे आहे. हाच नियोजनाच्या अंमलबजावणीचा फरक चंदिगड आणि भुवनेश्वर यांच्या दरम्यान दिसतो. शहरीकरणाच्या अनुभवाचा आणि तिथल्या प्रयोगांचा उपयोग पुढच्या वाटचालीमधल्या काळामध्ये होणार होता.
या भारतदर्शनामध्ये आदिवासी भागाच्या अभ्यासासाठी आम्ही ओडिशामध्ये गेलो. सुंदरगड जिल्ह्य़ातल्या बोनाई नावाच्या ग्राममंडलामध्ये आम्हाला आदिवासींच्या वेगवेगळ्या योजनांचा अभ्यास करायचा होता. संबळपूर ते रुरकेला हा एल. अ‍ॅण्ड टी. कंपनीने भारतातल्या काही निवडक पहिल्या ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ तत्त्वावर तयार केलेल्या रस्त्यावर जायला मिळाले. विशेष म्हणजे आजही हा रस्ता ठीक आहे. बोनाईमध्ये पोहोचलो तेव्हा तिथले गटविकास अधिकारी फकीर मोहन पांडा यांनी आम्हाला गावांची भेट घडवली. छोटय़ा वस्त्यांची गावे आणि त्यांच्या ग्रुप पंचायती असा प्रशासकीय आराखडा होता. त्या वेळी बोनाई नक्षलवाद्यांनी ग्रस्त नव्हता, पण आज नक्षलग्रस्त भाग आहे. शेजारून वाहणारी नदी आणि त्यामधून गावी जाणारे आदिवासी हे दृश्य आमच्या सर्किट हाऊसमधून नेहमी दिसायचे. भारत सरकारचे आदिवासी विकास मंत्रालय, राज्य सरकारचा विभाग, आरोग्य विभाग, अंगणवाडी इतक्या वेगवेगळ्या योजना असूनही आदिवासींची आरोग्य, शिक्षण, संचार आदी क्षेत्रांत अत्यंत मागास अशी स्थिती होती. इतका प्रचंड विकास निधी देऊनदेखील गाव स्तरावर त्याचा मागमूस दिसत नव्हता. ज्या आदिवासींसाठी या सगळ्या योजना होत्या, त्याला या सगळ्यांमध्ये कुठलाच रस नव्हता. बोनाईचा एक राजादेखील होता. त्याने आम्हाला चहापाण्याला बोलावले होते. गरीब रियासतीचा आणि स्वराज्यानंतर सगळ्या सवलतींना मुकलेला तो राजा होता. राजाच्या घरामध्ये मोडकळीला आलेल्या सामानांचा भरणा होता. दोन्ही भिंतींवर पानाच्या पिंका पडलेल्या होत्या. त्याने आपल्या पूर्वजांच्या पराक्रमगाथा सांगितल्या. वाडय़ाच्या पाठीमागे असणाऱ्या छोटय़ा शिवमंदिरावर आम्हाला घेऊन गेला. मग त्याचे डोळे पाण्याने तरळले. कुठल्याशा छोटय़ा युद्धातल्या विजयानंतर त्याच्या पूर्वजांनी बांधलेलं हे मंदिर. मंदिराच्या गर्भगृहात मात्र, राजराजेश्वरांनी किंवा मोठय़ा राजांनी मामल्लेश्वर मंदिराची पराक्रमानंतर बांधणी केल्यावर जो आनंद त्यांना झाला असेल तसाच काहीसा अनुभव याही राजाच्या मनात दिसत होता!!
* लेखक भारतीय प्रशासकीय सेवेत सनदी अधिकारी आहेत.    त्यांचा ई-मेल joshiajit2003@gmail.com

E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
gadchiroli naxalite marathi news
दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग
BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”