‘गेले ते कावळे, राहिले ते मावळे’, ‘कोरडा पाटा अन् चटणी वाटा’, ‘औताला आम्ही अन् गवताला तुम्ही’, ‘काही शिंतोडे पडतेत का नाही, का उगंच खडकाला धडका देत बसायचं’  यासारख्या फटकाऱ्यांतून  राज्यातील राजकारणाला रंग चढतो. ही भाषा  पुस्तकातल्या भाषेहून सर्वस्वी निराळी असते आणि आपापल्या प्रदेशानुसार तिच्यात वृत्ती-प्रवृत्तींचे रंग मिसळलेले असतात..
निवडणुकीच्या आखाडय़ात जसजसा जोर वाढेल तसतशी गावपातळीवरच्या भाषेला वेगळीच धार येते. ही भाषा कुठे ना कुठे लोकांच्या समज, गरसमज, नीतिकल्पना, संकेत, रूढी यामधून विकसित झालेली असते. जे लांबलचक भाषणातून साध्य होणार नाही ते एखाद-दोन शब्दांच्या फटकाऱ्यातून सहज सांगितले जाते. बदलत्या काळानुसार जसे राजकारण बदलले तसे राजकारणाची भाषाही बदलली. मात्र राजकारणाला रंग चढतो आणि सर्वसामान्य माणूस या भोवऱ्यात ओढला जातो तो या भाषेमुळेच.
या भाषेला इतिहासाचे मोठे आकर्षण. अजूनही इतिहासातली प्रतीके निवडणूक आणि सत्ताकारणाच्या डावपेचात वापरली जातात. वर्षांनुवष्रे असलेली सत्ता ‘बालेकिल्ला’ म्हणून ओळखला जातो. हा बालेकिल्ला राखणारे कार्यकत्रे मग ‘छातीचा कोट’ करून लढत असतात. त्यातही राबणाऱ्या कार्यकर्त्यांना मग मावळे असे संबोधित केले जाते. जो त्यातून बाहेर पडतो त्याचा लगेच ‘सूर्याजी पिसाळ’ असा उल्लेख होतो. फितूर होऊन काही बाहेर पडतात तेव्हा ‘िखडार’ थोपविण्यासाठी, राबणाऱ्या कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी ‘गेले ते कावळे, राहिले ते मावळे,’ असे म्हणून त्यांना थोपवले जाते. कधी काळी निष्ठा नावाची गोष्ट समाजकारणात होती, तेव्हा कार्यकर्त्यांनी हाती घेतलेले काम म्हणजे ‘सतीचे वाण’ होते. आता हा शब्द जवळपास बाद झाला आहे. लाभाविना लोभ नकोच असाच आता बहुतेक कार्यकर्त्यांच्या मनातला भाव असतो. त्यात त्यांचीही चूक नसते. ज्याच्यासाठी आपण झटतोय तो तरी कुठे जनतेची सेवा करायला निघालाय, त्यामुळे आपण तरी कशाला ‘फुकट पाणी भरायचे,’ असे कार्यकत्रे बोलतात. ज्याच्याकडे राबूनही काही मिळत नाही त्यामागची व्यर्थता ‘कोरडा पाटा अन् चटणी वाटा’ या शब्दांतून व्यक्त होते.
राजकारणातील माणसे एकाच ठिकाणी दीर्घकाळ टिकून राहतात असेही नाही. एखाद्या राजकीय पक्षात काम करणाऱ्याचे हितसंबंध दुखावल्यानंतर पक्ष सोडून तो जेव्हा दुसऱ्या कळपात दाखल होतो, तेव्हा तो आधीच्या कार्यकर्त्यांसाठी ‘टिचरी गोटी’ असतो. आपल्यात दाखल झालेल्या या नव्याचा तसा आपसात उल्लेख केला जातो. लहान मुले ज्या गोटय़ा खेळतात त्यात चांगल्याच गोटय़ा डावात घेतल्या जातात. कुठेही खोच पडलेली, चरा गेलेली गोटी लगेचच डावातून बाद केली जाते. ती डावात घेतली जात नाही. दुसऱ्या पक्षातून आलेला कार्यकर्ता म्हणजे अशी ‘टिचरी गोटी.’ शिवाय अशा कार्यकर्त्यांला जर नवीन दाखल झालेल्या ठिकाणी फार महत्त्व मिळत असेल तर मग जुने कार्यकत्रे अस्वस्थ होतात. ‘आमच्या साहेबांना कळत नाही. आता ते एकदा उकळून झालेल्या पत्तीचा पुन्हा चहा करायला निघालेत’ अशी त्यांची नाराजी बाहेर पडते. कोणत्याही पक्षात लाभाची पदे मिळविणाऱ्यांचा, सत्तेच्या मागेपुढे राहून फायदे मिळविणाऱ्यांचा एक वर्ग असतो. नेत्यासाठी झटणारे कार्यकत्रे राबत राहतात, पण त्यांना काही मिळत नाही तेव्हा त्यांची नाराजीही उमटतेच. ‘औताला आम्ही अन् गवताला तुम्ही’ अशा शब्दांत ती असते. म्हणजे औताचे जू मानेवर असणारे तसेच राहणार आणि हिरव्यागार गवताचा लाभ मात्र दुसऱ्यांनाच. यात बलासारखी राबणूक असा अनुषंग.
निवडणुकीच्या काळात अधिक सावधगिरी बाळगली जाते. शेवटच्या टप्प्यात तर डोळ्यांत तेल घालून राखण केली जाते. एखादा उमेदवार कितीही परिश्रम घेत असेल आणि प्रत्यक्षात मतदान दुसरीकडे वळत असेल तर ‘तुम्ही मोप उधळीत बसले, पण रास कोण भरून न्यायलंय याच्याकडं लक्षच नाही तुमचं’ अशी जाणीव त्या उमेदवाराला करून दिली जाते. कधी कधी महामूर खर्च करणारा उमेदवार पराभूत होतो आणि बेतास बेत खर्च करणारा निवडून येतो. तेव्हा निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या समर्थकांचा युक्तिवाद असतो, ‘तुमचं पाणी दांडानं गेलं वाहात पण आमचं ठिबकनं, त्यामुळं थेट पिकाच्या मुळापर्यंत.’  पसा याच्यात्याच्या हाती जाण्यापेक्षा तो थेट मतदारांपर्यंत पोहोचला असा याचा अर्थ. बऱ्याचदा उमेदवाराचा हात जेव्हा खर्चासाठी सल सुटलेला असतो, तेव्हा त्याला ‘चाडय़ावरची मूठ’ असे म्हटले जाते. पेरणीच्या वेळी जो तिफणीच्या चाडय़ावरचा हात असतो त्याची मूठ बंद करून चालत नाही. मुठीतले धान्य थांबले तर पेरणीच खंडित होते. त्यामुळे ही मूठ झाकली असली तरीही ती सुरूच असते.
एकदा एक चळवळीतले कार्यकत्रे म्हणाले, लोकांना आम्ही कामासाठी पाहिजे असतो. काही काम पडलं की लोक आमच्याकडे अध्र्या रात्री येतात, पण मतदान मात्र दुसरीकडे. नेमकी मतदानाची वेळ आली की, यांचा हात आमच्यासाठी आखडता. त्यांनी उदाहरण दिले कंदुरीचे. (नवसाला बोकड कापून जे जेवण दिले जाते त्याला कंदुरी म्हणतात.) या कंदुरीतले जे वाढपे असतात ते मोठे तरबेज. एखाद्या भांडय़ात वाढण्यासाठी मटन घेतल्यानंतर जेवणाऱ्याच्या ताटात रस्सा ओतला जातो. भांडय़ाच्या तोंडाशी आलेले मटनाचे तुकडे ताटात पडणार तेवढय़ात वाढणारा पुन्हा हातातले भांडे मागे घेतो. वाढणाऱ्याच्या हातातल्या भांडय़ाच्या तोंडाशी आलेले तुकडे मागे जातात, पुन्हा जेवणाऱ्याच्या ताटात पडतो तो तिखटजाळ रस्सा. नेमकं मतदान करण्याची पाळी आली की लोक आमच्याशी असे वागतात, असे या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे म्हणणे.
प्रत्यक्ष निवडणुकीत एखादा निसटत्या मताने विजयी झाला तर ‘त्याच्या कानाजवळून गोळी गेली’ असे म्हटले जाते. ‘गेम’ होता होता वाचला असा त्याचा अर्थ. एखादा अटीतटीच्या निवडणुकीत विजयी झाला, फारच चुरशीत त्याने विजय मिळवला तर ‘त्यानं वाहटुळीत दिवा लावला’ या शब्दांत त्याचा गौरव होतो. प्रचारादरम्यान कार्यकत्रे घसा ओला होण्यासाठी आसुसलेले असतात. तो जर होत नसेल तर मग त्यांची बेचनी वाढते. ‘काही िशतोडे पडतेत का नाही, का उगंच खडकाला धडका देत बसायचं’ म्हणजे काही शिडकावा होतो की नाही आपल्यावर, असा त्यांचा प्रश्न. प्रतिस्पध्र्याला धमकावताना, इशारे देताना मात्र ही अजिजीची भाषा बदलते, जरा वरच्या पट्टीत येते. ‘आहातच मूठभर पुन्हा चिमूटभरही शिल्लक राहणार नाहीत’ अशी ती चढी होते. ‘देव्हारा इचकून टाकीन’, ‘भरलं ताट उतानं करीन’, ‘दिवसाढवळ्या चांदण्या दाखवीन’ अशी या इशाऱ्यांची भाषा असते.
विरोधकाला दुबळं दाखवण्यासाठी, आपली बाजू भक्कम आहे असे सांगण्यासाठी, मतदान मागण्यासाठी, प्रचारात रंग भरण्यासाठी, प्रतिस्पध्र्यावर टीका करण्यासाठी अशी ही खास भाषा वापरली जाते. भाषेच्या लकबींसह ती व्यक्त होते. पुस्तकातल्या भाषेहून ती सर्वस्वी निराळी असते आणि आपापल्या प्रदेशानुसार तिच्यात वृत्ती-प्रवृत्तींचे रंग मिसळलेले असतात. सध्या निवडणुकांचे फड गावोगाव रंगत आहेत ते या भाषेमुळेच. कुस्तीचे फड, वारकऱ्यांचे फड, तमाशाचे फड आणि आता हे निवडणुकांचे. प्रत्येक फडाची भाषा मात्र वेगळी.