‘लोकमानस’ मधील ‘सचिनला देवत्व का देताय?’ (शुभा परांजपे, १२ ऑक्टो.) आणि ‘तरीही सचिन सामान्यच’ (देवयानी पवार, १४ ऑक्टो ) ही पत्रे वाचली. ती समजा कुणाला पटली, तरीही त्यांनी १२ ऑक्टोबरच्या इंडियन एक्स्प्रेसमधील ‘सचिन इंडिया तेंडुलकर’ हे आर्टकिल वाचावे.
तरीही तुम्हाला हा प्रश्न विचारावाच वाटला तर माजी पंतप्रधान अटलजींना विचारावा, ज्यांनी नीरज कुमार यांना सचिन आणि कपिलदेव यांची मॅचफिक्सिंगप्रकरणी चौकशी करण्यापासून रोखले.
तुम्ही तो प्रश्न ओबामांना विचारावा, ज्यांच्या अमेरिकेचे ‘आऊटपुट’ सचिन खेळत असताना पाच टक्क्यांनी घसरते.
तरीही क्रिकेट तुमचा धर्मच नसेल, तर सचिनला तुम्ही देव मानायचे कारणच नाही.
– तुषार तुकाराम कसावी, चाकण

यंत्रणेने मनावर घेतले तर!
सरकारी यंत्रणेने खरेच मनावर घेतले तर निसर्गाशी पण जबरदस्त लढा आपण यशस्वीपणे देऊ शकतो याचे आशादायक उदाहरण ओडिशा सरकार आणि संबंधित संस्थांनी ‘पायलीन’बाबत आज संपूर्ण जगासमोर ठेवले आहे. त्यामुळेच त्या सर्वाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. भारतामधील आजवरच्या पदोपदी आलेल्या निराशाजनक अनुभवामुळे सरकारी अकार्यक्षमतेवर असणारा आमचा प्रगाढ विश्वास या चक्रीवादळाने आज संपूर्णपणे चक्क धुळीस मिळवला. आम्हा सामान्यांचा असा ‘विश्वासघात’ सरकारकडून नेहमी व्हावा!
संजय खानझोडे, ठाणे.
बळी कुणामुळे?

आपत्कालीन यंत्रणेने महाभयानक चक्रीवादळापासून लाखो लोकांना वाचवले, यात विज्ञानाची भूमिका महत्त्वाची ठरली. त्याच वेळी बुद्धी गहाण ठेवून मंदिरात जाण्याच्या ओढीने, लहान मुलांसह गर्दीच्या ठिकाणी जाणारे लोक चेंगराचेंगरीने मृत पावल्याची बातमी आली.
शासनाचे धोरण जनतेमध्ये धार्मिकता, भाबडेपणा कमी होऊन लोक सुज्ञ-सुशिक्षित व्हावेत असे नाही हेच आजही दिसते. निष्पाप लोक अशिक्षितपणामुळे बळी पडतात, याची अप्रत्यक्ष जबाबदारी सरकारची नाही काय? मागे आपल्याकडे मांढरादेवीच्या यात्रेत काय झाले? शिक्षणाची पुरती वाट लावणाऱ्यांनी हे परिणाम लक्षात घ्यावेत.
अभिजित प. महाले, वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)

जोशींची मानहानी,  शिवसेनेची हानी
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात जे घडले, ते सेनापतीपेक्षा सनिक वरचढ झाले की काय होते त्याचेच उदाहरण आहे. पक्षातून काढून टाकणे, एखाद्या पदाचा राजीनामा मागणे हे ठीक आहे, पण कोणत्याही ज्येष्ठ नेत्याची अशी जाहीर अवहेलना कोणत्याही पक्षाच्या दृष्टीने हानिकारक आहे. शिवसनिकांच्या घोषणांना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी विरोध केला पाहिजे होता. मनोहर जोशींचे काय करायचे ते मी करीन, त्यात तुम्हाला पडायचे कारण नाही, असे त्या वेळी त्या शिवसनिकांना ठणकावले पाहिजे होते. कारण शिवसेनेच्या इतिहासात असे कधी घडले नव्हते.
त्यामुळे मनोहरपंतांच्या डोळ्यांत अश्रू अवतरणे साहजिकच आहे. आता असे घडले, कारण उद्धव ठाकरे हे कणखर नाहीत असे म्हणावेसे वाटते.
पक्षशिस्त मोडली म्हणून ते कोणाला पक्षातून काढून टाकण्याची हिम्मत करत नाहीत आणि कुणाला खडसावूशकत  नाहीत, कारण कुणाला त्यांचा दराराच वाटत नाही. सरांबाबत म्हणायचे झाल्यास राजकारणात राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणे गुन्हा नाही. उद्या याच शिवसनिकांनी ‘उद्धव ठाकरे चले जाव’ असे म्हटल्यास काय करणार? त्यामुळे ही सरांच्या मानहानीपेक्षा शिवसेनेची हानी मोठी आहे!
अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण (पश्चिम)

आता कोण ऐकणार?
शिवाजी पार्कवरील मेळाव्यात, सभा सोडून न जाता आपली भूमिका स्वपक्षाच्याच व्यासपीठावरून सर्वासमोर जाहीरपणे रोखठोकपणे मांडण्याची संधी मनोहर जोशी यांनी दवडली असे वाटते. किंबहुना तसे करत असताना सभेत गोंधळ होऊन भाषण थांबवावे लागले असते, तर त्याची जबाबदारी सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्वीकारावी लागून त्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागले असते. ‘झालेला प्रकार गरसमजुतीमुळे झाला’ या जोशी सरांच्या प्रतिक्रियेची दखल आता कोणीही घेणार नाही.
प्रदीप व पम्मी खांडेकर, माहीम

विश्वासार्हता विज्ञानाकडेच
भारताच्या पूर्व किनाऱ्यावर पायलीन वादळ धडकले गोपाळपूर (ओडिशा), श्रीकाकुलम (आंध्र) अशा अनेक ठिकाणी प्रचंड हानी झाली. या आपत्तीचे भाकीत देशातील एकाही भविष्यवेत्त्याने केले नाही. मेदनीय भविष्यज्ञानाच्या थापा मारणाऱ्या एकाही ज्योतिषाला या महाचक्रीवाताचा थांगपत्ता लागला नाही. सगळे चिडीचूप होते. मात्र अशा वादळांचा अभ्यास करणारे वैज्ञानिक सतत कार्यरत होते. हा चक्री प्रभंजन उपसागरात आता कोठे आहे. किती वेगाने, कोणत्या दिशेने अग्रगामी आहे, त्याचे भूपतन (लँड फॉल) पूर्व किनाऱ्यावर कुठे, केव्हा होईल, त्याची तीव्रता किती असेल, परिणाम कोणते होतील.. याचे पूर्वानुमान करण्यासाठी वैज्ञानिक अविरत निरीक्षणे आणि गणिते करण्यात मग्न होते. संभाव्य घटनेच्या आधी चार दिवस त्यांनी ही माहिती शासनाला कळविली. यंत्रणेने नियोजनबद्ध काम करून अनेक संभाव्य आपत्तिग्रस्तांचे सुरक्षित जागी वेळीच स्थलांतर केले. वैज्ञानिकांच्या अनुमानानुसार उत्पात घडले. पण फार मोठी जीवितहानी टळली. विश्वासार्ह विज्ञानाचे आणि कार्यक्षम शासकीय यंत्रणेचे हे यश आहे.
या वेळी धार्मिकांनी संकट विमोचनार्थ यज्ञ-यागांचे आयोजन केले नाही. आध्यात्मिक गुरूंनी, ‘ॐ’ मंत्राच्या सामूहिक गुंजनातून प्रकट होणाऱ्या प्रचंड पॉझिटिव्ह ऊर्जेने चक्रीवादळातील निगेटिव्ह ऊर्जेचे निवारण करता येईल’ असे तारे तोडले नाहीत की ‘वादळाच्या शमनार्थ शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक ईशप्रार्थना करावी’ असा आदेश कुणा राज्यपालांनी काढला नाही.
भ्रामक अलौकिक शक्तीच्या परिणामांची प्रत्यक्ष प्रचिती दाखविण्याचा प्रसंग येतो तेव्हा या अज्ञानाच्या उपासकांना गप्प बसण्याचे शहाणपण सुचते. ‘हात दाखवून अवलक्षण नको’ एवढे समजते, हेही नसे थोडके!
प्रा. य. ना. वालावलकर

थांबावे कधी.. !
‘सरांना दादर दाखवले’ हे वृत्त (लोकसत्ता, १४ ऑक्टो.) वाचले. आपण कोठे आणि कधी थांबावे हे ज्याला कळत नाही, त्याचे सचिन तेंडुलकर अथवा मनोहर जोशी होतात.
अभय दातार, ऑपेरा हाऊस (मुंबई)

जरब आहे कुठे?
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ पुढारी मनोहर जोशी यांना शिवसनिकांच्या घोषणाबाजीमुळे व्यासपीठ सोडून निघून जावे लागले ही गोष्ट मनाला क्लेश देणारी आहे. या प्रसंगाच्या वेळी बाळासाहेबांची आठवण झाली. ते नुसते उभे राहिले तरी सभेला जमलेल्या लोकांवर त्यांचा किती वचक आहे हे जाणवत असे. त्यांच्या सभेत गोंधळ घालण्याची कोणाची हिंमत होत नसे.
ती जरब उद्धव ठाकरेंच्या बोलण्यात जाणवत नव्हती. एकंदर ज्या तऱ्हेने जोशीसरांना निघून जावे लागले त्यावरून काही वरिष्ठ शिवसेनेच्या नेत्यांचे हे ठरवून केलेले राजकारण आहे की काय, अशी शंका आली.
यापुढे तरी ज्या नेत्यांनी शिवसेना मोठी केली त्यांना सनिकांनी योग्य तो मान दिलाच पाहिजे.
– प्रकाश गोडसे, विलेपाल्रे (पूर्व)

कळवळा आहे, तो जातीचाच कसा?
मराठा आरक्षणावरील प्रा. ज. वि. पवार यांचा लेख वाचला, त्याचबरोबर त्यावरील अनेक प्रतिक्रियादेखील लोकमानस या सदरातून वाचल्या. या सर्व प्रतिक्रिया अगदी अपेक्षितपणे या लेखाला विरोध करणाऱ्या होत्या. प्रा. पवार यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत असलेली सत्यता या लेखातून मांडलेली आहे. परंतु मराठा समाज राजकारण्यांच्या भूलथापांना बळी पडत आहे. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ही घटनाविरोधी आहे हे सर्व राजकारण्यांना माहीत असूनदेखील केवळ मराठा समाजाची मते आकर्षति करण्यासाठी हे राजकारण केले जात आहे. जर का मराठा समाजास आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या लोकांचा एवढाच कळवळा आहे तर त्यांनी केवळ मराठा आरक्षणाची मागणी न करता, आरक्षण सामाजिक निकषावर न देता आíथक निकषावर देण्यात यावे, अशी मागणी करावी व तशी दुरुस्ती राज्यघटनेत करण्यासाठी लढा द्यावा.
 केवळ मराठा समाजातच आर्थिकदृष्टय़ा मागास लोक नाहीत तर सर्वच समाजांत आíथक मागासलेपण आहे. मराठा समाज महाराष्ट्रातील सत्ताधारी समाज आहे,महाराष्ट्राचे नेतृत्व या समाजच्या हातात आहे, तेव्हा नेतृत्वाने सर्वाचा विचार केला पाहिजे. ‘मला आणि माझ्या समाजाला मिळालं, इतरांचं जे व्हायचं ते होऊ देत’ ही आत्मकेंद्री वृत्ती सोडावी.
– प्रा. दिनेश जोशी