15 August 2020

News Flash

वास्तवाचा आभास..

‘बाय वे ऑफ डिसेप्शन’ या व्हिक्टर ऑस्ट्रोव्हस्की यांच्या पहिल्या पुस्तकात मोसादची एक बाजू आहे..

| July 27, 2013 01:07 am

‘बाय वे ऑफ डिसेप्शन’ या व्हिक्टर ऑस्ट्रोव्हस्की यांच्या पहिल्या पुस्तकात मोसादची एक बाजू आहे. लोकप्रिय. लोकांना आवडेल अशी. ‘द अदर साइड ऑफ डिसेप्शन’ यात बरोबर दुसरी बाजू आहे. सर्वसामान्यांना माहीत नसलेली. ती माहीत नसते कारण बऱ्याचदा ती माहीत करून घ्यायची इच्छा नसते. तेव्हा अशा मंडळींनी हे दुसरंही पुस्तक वाचायला हवं.

गेल्या.. ‘आभासाचं वास्तव..’ या शीर्षकाच्या बुकअपमध्ये व्हिक्टर ऑस्ट्रोव्हस्की याच्या ‘बाय वे ऑफ डिसेप्शन’ या पुस्तकाविषयी लिहिलं होतं. व्हिक्टर हा इस्रायलच्या मोसाद या कराल म्हणता येईल अशा गुप्तहेर यंत्रणेसाठी काम करायचा. तेव्हा ते पुस्तक त्याच्या त्यातील अनुभवांवर, प्रशिक्षणावर आधारित असणं साहजिकच. त्या पुस्तक परिचयाच्या ओघात इस्रायल आणि त्याचं राजकारण याविषयी काही निरीक्षणं नोंदली होती.
त्यावर बरोबर अपेक्षेप्रमाणे प्रतिक्रिया आल्या. त्यातल्या बऱ्याचशा प्रतिक्रिया.. इस्रायल हा किती साधासुधा देश आहे.. सर्व बाजूंनी शत्रूंनी वेढलेलं असतानाही तो सगळ्यांना पुरून कसा उरलाय.. त्याला किती दहशतवादाचा सामना करावा लागलाय.. इस्लामी दहशतवादाचा तो कायमच कसा बळी ठरलेला आहे.. अशा इस्रायलचं बिच्चारीकरण करणाऱ्याच होत्या.
यात त्या व्यक्त करणाऱ्यांचा दोष नक्कीच नाही. इतिहासाची एकच बाजू सतत समोर येत राहिली तर काही काळानंतर तीच खरी वाटू लागते. त्यातून आपल्यासारख्या भावनेनं विचार करणाऱ्या देशात एकदा का एक समज रूढ झाला की तो जाता जात नाही. म्हणजे आपल्यासाठी चर्चिल हा नायक म्हणजे नायक. वास्तवात नायक हे बऱ्याचदा खलनायकही असतात हे चर्चिलचा समग्र इतिहास पाहिला तर कळेल. पण तो आपल्याला पाहायचा नसतो. आपल्याला नायक मनोमन हवे असतात. ती आपल्यासारख्या देशाची गरज असते. त्यामुळे दुसऱ्या बाजूकडे आपलं लक्षच जात नाही. त्यात इस्रायलच्या उदात्तीकरणाला एक भलं मोठं धार्मिक अंग आहे आणि धर्म वगैरे आला की सगळंच अतार्किक होऊन जातं. तेव्हा अशा वेळी व्हिक्टरचंच दुसरं पुस्तक वाचणं आवश्यक ठरतं.
त्याचं नाव ‘द अदर साइड ऑफ डिसेप्शन’.
पहिल्या पुस्तकात मोसादची एक बाजू आहे. लोकप्रिय. लोकांना आवडेल अशी. यात बरोबर दुसरी बाजू आहे. सर्वसामान्यांना माहीत नसलेली. ती माहीत नसते कारण बऱ्याचदा ती माहीत करून घ्यायची इच्छा नसते. तेव्हा अशा मंडळींनी हे दुसरंही पुस्तक वाचायला हवं.
व्हिक्टरनं काही काळानंतर मोसाद सोडलं. म्हणजे तसा तो फुटलाच. मग तो अन्य देशांच्या गुप्तहेर यंत्रणांसाठी काम करायचा आणि वर मोसादमधल्या अनेकांच्या संपर्कातही असायचा. एका अर्थानं डबल एजंट असा. त्यामुळे दोन्ही बाजू त्याला माहीत असायच्या. त्यामुळे त्याच्या लिखाणाला एक प्रकारची अधिकृतता आहे. मोसाद म्हणून ज्यांना कुतूहल आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांना एकूणच पश्चिम आशियाच्या इतिहासात रस आहे त्यांच्यासाठीही. त्यामुळे हे पुस्तक हे महत्त्वाचा दस्तावेज ठरतं. यातली अनेक प्रकरणं महत्त्वाची म्हणून आपल्याला माहीत असतात. पण त्यातला मोसादचा सहभाग हा तितकासा माहीत नसतो.
म्हणजे १९८० ते १९९० असं दशकभर चाललेल्या इराण आणि इराक युद्धात इस्रायलनं इराणला चोरून शस्त्रच नाही तर घसघशीत रसदही पाठवली. त्याचा तपशील आपल्याला माहीत नसतो. अयातोल्ला खोमेनी यांच्या वहाणेनं इराकच्या सद्दाम हुसेन याचा विंचू मारण्याचा जंग जंग प्रयत्न मोसादनं केला. अमेरिकेचे त्या काळातले अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी इराणला चोरून शस्त्रास्त्रविक्री केली आणि त्या विक्रीतनं आलेला पैसा बगलेतल्या निकाराग्वा देशातल्या बंडखोरांना पोसण्यासाठी वापरला. हे सगळं पुढे उघड झालं. या युद्धात मोसादला मदत केली ती बार्शेल नावाच्या जर्मन राजकारण्यानं. हा मोसादच्या पैशावर होता. पुढे त्याचे संबंध फाटले. तेव्हा त्यानं इराण युद्धात आपण काय काय उद्योग केले ते उघड करायची तयारी सुरू केली.
आणि मग तो अचानक घरातल्या न्हाणीघरात मेलेला आढळला. अंगावर पूर्ण कपडे आणि त्याचा देह तरंगतोय आंघोळीच्या भांडय़ात. तो पाहून अनेकांना वाटलं आत्महत्या केली बार्शेलनं. पण प्रत्यक्षात मोसादनं घडवून आणलेली हत्या होती ती. त्याची साद्यंत कहाणी व्हिक्टर आपल्यासमोर मांडतो. परंतु तेवढंच करून इस्रायल थांबलं नाही. तर प. आशियाच्या वाळवंटात सहिष्णू आणि कडव्या मुसलमानांत तीव्र मतभेद कसे निर्माण होतील यासाठी त्या देशानं सातत्यानं प्रयत्न केले. परत अरब आणि अरबेतर मुसलमानांमध्येही मोसादनं ठरवून कलागती लावल्या. आता अनेकांना त्यात काही गैर वाटणार नाही.
पण मोसादचा विध्वंसक उद्योग सुरू होता तो पॅलेस्टिनींबाबत. मुळात यहुदी आणि पॅलेस्टिनी यांच्यात भूप्रदेशावरून मोठा वाद आहे. तो अजून मिटलेला नाही. जेव्हा या वादात पॅलेस्टिनींचं नेतृत्व यासर अराफात यांच्याकडे होतं तेव्हा यातली मोठी चाल मोसादनं खेळली. ती म्हणजे अराफात यांच्या पॅलेस्टाइन लिबरेशन ऑर्गनायझेशन, म्हणजे पीएलओ, या संघटनेच्या विरोधात आणखी एका संघटनेला पोसायला सुरुवात केली.
ही संघटना म्हणजे हमास. ही संघटना पूर्णपणे मोसादकडून चालवली जात होती. त्यामागचा विचार हा की अराफात यांची पॅलेस्टिनी मुक्ती संघटना आणि हमास यांच्यात सतत संघर्ष राहावा. तसा तो खरोखरच राहिला आणि नंतर अराफात यांच्या निधनानंतर त्यांच्या संघटनेची बाजू अपंगच झाली. पण हा खेळ मोसादच्या अंगाशी आला. कारण दरम्यान हमास इतकी मजबूत झाली की इस्रायलींच्या विरोधातच या संघटनेने दहशतवादाचा अवलंब करायला सुरुवात केली. या संघटनेचा प्रभाव इतका वाढला की पॅलेस्टाइन प्रदेशातल्या निवडणुकांत या संघटनेला सत्तेवर येण्याची संधी मिळाली. आजही पॅलेस्टाइनमध्ये हमासचं सरकार आहे आणि इस्रायलशी तिचा उभा दावा आहे. प्रत्येक बाबतीत मोसादनं असे उद्योग केलेत.
जॉर्डनसारख्या तुलनेनं कमी कटकटय़ा देशात मोठय़ा प्रमाणावर अशांतता तयार होईल यासाठी वेगवेगळ्या बंडखोर संघटनांना मोसादनं पाणी घातलं. पीएलओमधल्याच अनेकांना हाताशी धरून दहशतवादी कारवाया केल्या. या संघटनेची विध्वंसाची ताकद किती असावी? एकोतिल अ‍ॅडम याच्या हत्येवरून ते कळून येईल. अ‍ॅडम हा इस्रायली लष्करातलाच बडा अधिकारी. म्हणजे प्रमुखच. उमदा आणि बराचसा सहिष्णू. म्हणजे यहुदींना न शोभेलसा सहिष्णू. त्याची मोसादचा प्रमुख म्हणून निवड झाली. पण तो उदारमतवादी असल्यानं मोसादमधल्या कडव्या उजव्या मंडळींना काही तो तितकासा रुचायचा नाही. तर तो लेबनॉनच्या दौऱ्यावर गेला असता पॅलेस्टिनी बंडखोरांकडून मारला गेला. वरकरणी ही पॅलेस्टिनींनी इस्रायली अधिकाऱ्याची केलेली हत्या होती. पण प्रत्यक्षात अ‍ॅडमला गोळ्या घालणारा पॅलेस्टिनी हा मोसादसाठी काम करणारा होता.
हे सगळंच भयंकर आहे. पण या भयंकरतेचा परमोच्च बिंदू आहे जॉर्ज बुश यांच्या संदर्भातला. थोरले बुश अमेरिकेचे अध्यक्ष असतानाच्या काळात त्यांच्या सरकारनं इस्रायलची आर्थिक मदत कमी करण्याचा आणि काही काळ तर थांबवण्याचाच निर्णय घेतला. इस्रायली सरकारच्या गळी काही गोष्टी उतरवण्याचा मार्ग म्हणून त्यांनी मदतकपात करायचं ठरवलं. ताबडतोब ते इस्रायलसाठी शत्रू ठरले आणि एकदा का कोणी मोसादचा शत्रू ठरला की त्याच्यासमोर एकच पर्याय उरतो.. त्याला या पृथ्वीतलावरनं गायब व्हावंच लागतं.
म्हणजे साक्षात अमेरिकेच्या अध्यक्षाला हात लावण्याइतका हुच्चपणा मोसादनं खरोखरच केला?
ते मुळातनंच वाचायला हवं.
अनेक प्रसंगांचे तपशील यात आहेत. व्हिक्टरनं पुस्तकात म्हटल्याप्रमाणे पुढे इतिहासानं तसंच वळण घेतलं.
ते वास्तव आपल्याला माहीत आहे.
हे पुस्तक वाचल्यावर कळतं की ते वास्तव हाही एक आभासच आहे.

द अदर साइड ऑफ डिसेप्शन :
 व्हिक्टर ऑस्ट्रोव्हस्की,
प्रकाशक : हार्पर कॉलिन्स,
पाने : ३१५, किंमत : २४ डॉलर्स.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2013 1:07 am

Web Title: illusion facts
Next Stories
1 आभासाचं वास्तव
2 काही अपमान आठवावे असे!
3 संघमार्गदर्शकप्रदीप!
Just Now!
X