हिरोशिमा शहर अणुबॉम्बने बेचिराख करून, अश्रापांचे बळी घेऊन दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटाची सुरुवात झाली, ती ६ ऑगस्ट १९४५ रोजी. या घटनेची सत्तरी पाळली जात असताना वारंवार, अस्त्रांच्या मालकीचा अहंगंड त्याआधी आणि नंतरही पोकळ ठरला आहे. तरीही, अण्वस्त्रधारी होण्याची स्पर्धा संपलेली नाही. उलट तालिबान, इसिस यांसारख्या राज्यबाहय़ दहशतवादय़ांकडे हे संहारतंत्र गेले तर काय, ही भीती कायम आहे..

मानवाच्या प्रगतीचा इतिहास हा बव्हंशी माणसे मारण्याच्या ‘कलेतील’ नैपुण्याचा इतिहास आहे. काळाच्या ओघात एका बाजूला आजार, व्याधी आदींचे निर्मूलन करणारी औषधे वा उपचारपद्धती विकसित होत गेल्या आणि त्याच वेळी दुसरीकडे मानवी संहाराच्या नवनव्या तऱ्हाही प्रगत होत गेल्या. सत्तर वर्षांपूर्वी आजच्या दिवशी अशा सामूहिक शिरकाणाचा सरकारमान्य पाया रचला गेला. जपानमधील हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला, त्याचा आज ७० वा ‘वर्धापन’ दिन. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या बाजूने उतरणाऱ्या जपानला धडा शिकवणे अमेरिकेला आवश्यक वाटत होते. तसा तो शिकविला नाही तर जपान शरण येणार नाही आणि दोस्त राष्ट्रांना आव्हान देत राहील, हे उघड होते. कोणत्याही देशातील सरकारसाठी त्या देशातील अश्रापांचा जीव घेणे हा मोठा धडा असतो. जेवढे जास्त जीव जातील, तेवढा धडा मोठा. या धडय़ाने राष्ट्रे नामोहरम होतात आणि अखेर नांगी टाकतात. जपानचा गाढवपणा इतकाच की हिरोशिमातील नृशंस नरसंहार पाहूनही आपण माघार घ्यावी असे त्या देशास वाटले नाही. परिणामी तीन दिवसांनी अमेरिकेस हा धडा पुन्हा गिरवावा लागला. नागासाकी या दुसऱ्या शहरावरही असाच, इतकाच नृशंस हल्ला झाला. हिरोशिमाप्रमाणे ते शहरदेखील असेच बेचिराख झाले, लक्षावधी माणसे किडामुंगीसारखी मेली, जे बॉम्बच्या जवळपास होते ते एखाद्या वणव्यात जंगलातील पाखरे भाजून मरावीत, तसे मेले. जे दूर होते ते यथावकाश मेले. पण मेले. लाखो अश्रापांच्या पाíथवांच्या महिरपीत दुसऱ्या महायुद्धाची सांगता झाली. त्या सांगता अध्यायास ज्या घटनेने सुरुवात झाली त्या घटनेचा आज ७० वा वर्ष दिन. यानिमित्ताने मानवाच्या हाती पहिल्यांदाच असे इतके विनाशक अस्त्र लाभले. या अस्त्राची ताकद पाहून त्याचे निर्माते सुखावले आणि त्याच वेळी चिंतितही झाले. सुखावले यासाठी की या अस्त्राच्या निमित्ताने जगातील सुष्टांच्या हाती दुष्टांच्या विरोधात लढण्यासाठी एक निर्णायक पूर्णविराम मिळाला. आणि हे समीकरण उलटले तर काय, या प्रश्नाच्या उत्तराने ते चिंतावले. त्या क्षणापासून जग किमान तीन वेळा तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचले. पण विवेकाने आततायीपणास आटोक्यात ठेवत हे संभाव्य युद्ध रोखले. या जालीम अस्त्राच्या उपयोगाचा ७० वा स्मृतिदिन आज साजरा होत असताना सारे विश्व पुन्हा याच प्रश्नाने पछाडलेले दिसते. तेव्हा प्रश्न असा की अणुबॉम्बने आपल्याला कितपत सुरक्षित केले?
या महायुद्धात आणि नंतरही अणुबॉम्बइतकी समूहसंहारक नाहीत, पण भयानक क्रूर म्हणता येतील अशी अनेक रासायनिक अस्त्रे विकसित झाली. हायड्रोजन बॉम्ब तयार झाले. तो तर अणुबॉम्बपेक्षाही भयंकर. त्यामुळे वित्तहानी काहीही होत नाही, असे सांगितले जाते. म्हणजे ज्या परिसरांत तो पडतो, त्या परिसरातील इमारती आदी स्थावर जंगम मालमत्ता आहे तशीच राहते. फक्त सजीव मात्र मारतात. आपल्या अद्यापपर्यंत शाबूत असलेल्या सुदैवाने हा बॉम्ब वापरून पाहावयाची वेळ अजून आलेली नाही. तरीही अन्य नवनवीन अस्त्रे विकसित होतच गेली. काही अस्त्रांत माणसांस जिवंत ठेवून होरपळून टाकण्याची क्षमता होती तर काही अस्त्रांशी संपर्क आल्यावर डोळ्यांत शंभर सुया टोचल्याच्या वेदना होत. यातील काही अस्त्रांचे मूळ तर पहिल्या महायुद्धातील. अशाच अनतिक अस्त्रांमुळे तात्पुरते, प्रचंड वेदनादायी अंधत्व सहन कराव्या लागणाऱ्या जर्मन लष्करी अधिकाऱ्याच्या मनांतील सूडाग्नी सुमारे तीन दशके जिवंत राहिला आणि अखेर दुसऱ्या महायुद्धाच्या रूपाने त्याचा भडका उडाला. असे रसायनास्त्री आंधळेपण स्वीकारावे लागलेल्या जर्मन अधिकाऱ्याचे नाव अ‍ॅडॉल्फ हिटलर. पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांनी विकसित केलेल्या रासायनिक अस्त्रांनी दिलेल्या वेदना तो विसरू शकला नाही आणि अखेर त्याने स्वत:ची याहीपेक्षा जालीम अशी अस्त्रे विकसित केली. तरीही अंतिम परिणाम काही तो टाळू शकला नाही. पुढे या आणि अशा अस्त्रांच्या मालकीचा दंभ व्हिएतनाम युद्धाने फोडला. प्रचंड शक्तिशाली असलेल्या अमेरिकेला व्हिएतनाम युद्धाने जायबंदी केले. त्या युद्धात नापामसारख्या अत्यंत वेदनादायी अस्त्रांचा वापर करूनही अमेरिकेस या आशियाई देशाने नाक घासावयास लावले. या नापाम बॉम्बचा ना आवाज होतो ना फुटल्याचे कळते. जाणवते ती फक्त होरपळ. या बॉम्बच्या परिसरातील नागरिक भट्टीत चणे भाजले जावे तसे भाजले जाऊन मरतात. काहीही करता येत नाही. तरीही, असे बॉम्ब असूनही अमेरिका हरली. पुढे दुसरी महासत्ता असलेल्या सोव्हिएत रशियावरही हीच वेळ आली. साध्या भासणाऱ्या व्हिएतनामींनी अमेरिकेचे नाक कापले तर आडदांड अफगाणींनी साम्यवादी रशियास धूळ चारली. त्या सर्व शीतयुद्धाच्या काळात जगभरात विविध देशांत मिळून साधारण ५० हजार इतके अणुबॉम्ब तयार झाले. त्यांची विल्हेवाट कशी लावायची आणि बेजबाबदाराच्या हाती त्याचे नियंत्रण जाण्यापासून कसे रोखायचे या विवंचनेने जगास या काळात ग्रासले होते. त्यातूनच विविध अण्वस्त्र बंदी वा नियंत्रण करार जन्माला आले. जग दोन गटांत विभागले गेले- अण्वस्त्र असलेले आणि नसलेले. यातील तणावांतून आणखी एक नवा संकरित गट जन्माला आला. अण्वस्त्रधारी गटांत नसलेला आणि तरीही अण्वस्त्रे असणारा. इस्रायल, दक्षिण आफ्रिका आणि खुद्द आपण- आणि आपण आहोत म्हणून पाकिस्तान- हे या गटांत मोडतो. तेव्हा या देशांचे करायचे काय, असा प्रश्न अण्वस्त्रे असलेल्या आणि नसलेल्या दोघांनाही पडला. त्याचे उत्तर बराच काळ न मिळाल्यामुळे या तिसऱ्या गटांतील सदस्यांची संख्या हळूहळू वाढत गेली.
अणुबॉम्बची सत्तरी पाळली जात असताना जगास भेडसावत आहे तो हाच प्रश्न. या तिसऱ्या गटातील देशांचे काय करायचे? याचे कारण दरम्यानच्या काळात या तिसऱ्या गटातील देशांची संख्या वाढत गेली. उत्तर कोरिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि ताजा इराण या देशांनी अणुविद्या हस्तगत केली आणि स्वत:ला अण्वस्त्रसज्ज बनवण्याचा प्रयत्न केला. याच्या जोडीला आणखी एक चिंता आहे. ती म्हणजे देशविहीन अण्वस्त्रधारी शक्तींचे काय करायचे? म्हणजे इराण, उत्तर कोरिया, सौदी अरेबिया आदी निदान देश तरी आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधता येऊ शकतो. देश म्हणून काही किमान व्यवस्था तेथे आहेत. शिवाय पेच असा की आमच्याकडे अणुबॉम्ब आहेत, पण तुम्ही मात्र ते बनवायचे नाहीत असे कोण कोणाला कसे सांगणार? आणि तसे ते कोणी सांगितले तरी ते कोण आणि का ऐकणार? इराण या सार्वभौम देशास तसे सांगून पाहण्याचा प्रयत्न अमेरिका आणि संबंधितांनी करून पाहिला. परंतु इराणने ऐकले नाही. अखेरीस जगात पहिला आणि एकमेव अणुबॉम्बचा वापर करणाऱ्या अमेरिका या महासत्तेस नमते घ्यावे लागले आणि इराणशी करार करावा लागला. त्याही पलीकडे खरा गंभीर प्रश्न हा की तालिबान, अल कईदा वा इसिस या व्यवस्थाशून्य दहशतवादी संघटनांच्या हाती अणुबॉम्ब पडल्यास त्यांना कोण आणि कसे आवरणार?
तेव्हा या सगळ्याचा अर्थ लक्षात घेतल्यानंतरही वर उरणारे मुद्दे इतकेच की अणुबॉम्बच्या निर्मितीने जग होते त्यापेक्षा अधिक सुरक्षित झाले का? एखाद्या अस्त्राने प्रचंड संहार करण्याची क्षमता मिळते म्हणून केवळ कोणी स्वत:ला व देशाला अधिक सुरक्षित मानावे का? जगातील या ऐतिहासिक संहारसोहळ्याचे श्राद्ध घातले जात असताना हे प्रश्न अनेकांसाठी अस्वस्थ करणारे ठरतील.