News Flash

मराठी मातीतून उगवलेले साहित्य

‘भावार्थ रामायण’च्या रूपाने रामकथा मराठीत उतरवताना एकनाथांनी महाराष्ट्राला अन्यायाविरुद्ध उभे राहण्याच्या वीरवृत्तीचीही आठवण करून दिली.

| August 29, 2014 01:04 am

‘भावार्थ रामायण’च्या रूपाने रामकथा मराठीत उतरवताना एकनाथांनी महाराष्ट्राला अन्यायाविरुद्ध उभे राहण्याच्या वीरवृत्तीचीही आठवण करून दिली. नंतर शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा प्रारंभकाळ तुकोबांच्या उत्तरकालाशी जुळून येतो तसा महाराजांच्या कर्तृत्वाचा उत्तरकाळ रामदासांच्या वाङ्मयीन कारकिर्दीशी जुळतो. छत्रपतींना आपल्या कार्यात यश आलेले रामदासांना प्रत्यक्ष पाहता आले. त्यातून त्याच्या मनात उमटलेले भावकल्लोळ त्यांनी आपल्या रचनांमधून व्यक्त केले.

समाजात चांगल्या साहित्याची निर्मिती दोन प्रकारांनी होऊ शकते. तो समाज आणि विशिष्ट कालीन परिस्थिती यांच्यातील आंतरक्रियेतून संवेदनशील व अभिव्यक्तीक्षम व्यक्तीची म्हणजेच लेखकाची प्रतिभा स्पंदित होते. या स्पंदांचे शाब्दिक स्वरूप म्हणजेच साहित्य; परंतु हा झाला एक प्रकार. दुसऱ्या प्रकारात एका समाजाची दुसऱ्या एखाद्या समाजाशी गाठ पडते. हे समाज जर समान पातळीवर असतील, तर त्यांच्यात देवघेव होऊ शकते. या देवघेवीत एकाचा प्रभाव दुसऱ्यावर पडून तो दुसरा समाज पहिल्या समाजाचे अनुकरण करतो.
त्याचप्रमाणे दुसऱ्याचा प्रभाव साहित्यावर पडून पहिला समाज दुसऱ्याचे अनुकरण करतो. या दोन्ही अनुकरण प्रक्रियांमध्ये साहित्य क्षेत्राचा अंतर्भाव असतोच असतो.
परंतु या दोन समाजांपैकी एक समाज कोणत्या ना कोणत्या बाबतीत दुसऱ्यापेक्षा कमी प्रतीचा असेल, तर अनुकरण एकतर्फीच होते. विशेषत: त्या दोघांतील संबंध जीत आणि जेता असा असेल तर जिताकडून जेत्यांचे अनुकरण होणे स्वाभाविक असते. एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रामधील मराठी समाज हा जीत होता आणि इंग्रज अर्थातच जेते होते. त्यामुळे मराठी साहित्यिकांनी इंग्रजी साहित्याचे अनुकरण करणे इतिहासाला धरून होते असे म्हणावे लागते.
लागवड शास्त्रातील उदाहरण घेऊन सांगायचे झाल्यास साहित्य जसे भूमीतून उगवून येऊ शकते तसेच त्याचे कलमही करता येते. इंग्रजी राजवटीतील मराठी साहित्य असे कलम करून सिद्ध झालेले साहित्य होते. त्यापूर्वीचे मराठी साहित्य हे येथील मातीतून उगवणारे म्हणजेच समाज आणि परिस्थिती यांच्यातील आंतरक्रियेतून उद्भवलेले साहित्य होते. या काळातसुद्धा दीर्घकाळ टिकलेली इस्लामी राजवट होती. म्हणजेच तेव्हाही मराठी समाज जीतच होता; पण तेव्हा या समाजातील साहित्यिकांनी उदाहरणार्थ पर्शियन किंवा अरबी भाषेतून गजला किंवा रुबाया आयात केल्या नाहीत. याचा अर्थ असा होतो की, राजकीयदृष्टय़ा पराभूत असलेल्या मराठी समाजाने कलम करायचे टाळले.
येथे मुद्दा फक्त साहित्याची प्रत्यक्ष निर्मिती करणाऱ्या लेखकांचा नसून संपूर्ण समाजाचा आहे, हे लक्षात घ्यायला हवे. भले, लेखकांनी गजला, रुबाया लिहिल्या असत्या तरी समाजाने त्या स्वीकारल्या नसत्या. इंग्रजी काळातील वातावरण खूपच बदलले होते. इंग्रज हे फक्त राजकीयदृष्टय़ा जेते व सत्ताधारी एवढय़ापुरता हा प्रकार मर्यादित न राहता ज्ञान, विज्ञान, कला, साहित्य अशा बहुतेक सर्व क्षेत्रांत इंग्रज आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत अशी समाजाची भावना होऊन इंग्रजांचे अनुकरण सर्वच क्षेत्रांमध्ये करणे इष्ट ठरेल, अशी समजूतही बनली होती. त्यामुळे पूर्वी गजल, रु बायांच्या वाटेला न गेलेले मराठी साहित्यिक आता कादंबरी, सुनीत अशा गोष्टी हाताळू लागले. साहित्यिकांची अशी कृती वाचकांनाही पसंत पडली. हेच कलम करणे होय.
मुसलमानी राजवट संपुष्टात झाल्यापासून इंग्रजांचा अंमल प्रस्थापित होईपर्यंतचा कालखंड हा मराठय़ांच्या स्वत:च्या सत्तेचा कालखंड होता. या कालखंडाच्या पहिल्या चरणात शिवाजी महाराजांनी मराठय़ांच्या स्वराज्याची स्थापना केली. महाराजांनंतरच्या संभाजी, राजाराम व ताराबाई यांचा काळ म्हणजे दुसरे चरण होय. या चरणात मराठय़ांची शक्ती शिवाजीराजांनी उभे केलेले साम्राज्य राखण्यात खर्ची पडली. हा स्वातंत्र्ययुद्धाचा काळ होय. या कालानंतर म्हणजे शाहू महाराजांपासून सवाई माधवराव पेशव्यांपर्यंतचा काळ स्वराज्याच्या विस्ताराचे- साम्राज्याचे- चरण होय.
          मराठेशाहीच्या या तिन्ही चरणांमधील मराठी साहित्य हे उगवून आलेले साहित्य होते. समाज आणि परिस्थिती यांच्यातील घुसळणीचे ते कविमनात पडलेले प्रतिबिंब होते.
शिवाजीराजांनी तारुण्यात पदार्पण करता करताच स्वराज्याची साधना सुरू केली होती. त्याच्या एक अर्धशतक अगोदर संत एकनाथ होऊन गेले. एकनाथांच्या काळात एकीकडे महाराष्ट्रात इस्लामी सत्ता दृढमूल झाली होती, तर दुसरीकडे ही सत्ता आपल्याच पराक्रमावर उभी आहे, असा आत्मप्रत्यय स्थानिक मराठा सरदार सेनानींना येऊ लागला होता. एकनाथांनी समतेचा पुरस्कार करणाऱ्या भागवत धर्माच्या गाभ्याचा परिचय करून देणारा ग्रंथ म्हणजेच भागवत पुराणाच्या एकादश स्कंधावरील मराठी भाष्य लिहिले. हाच समतेचा विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जावा म्हणून त्यांनी भारुडे लिहिली. विनोदाची झालर असलेला हा खेळकर वाङ्मय प्रकार पथनाटय़ाशी नाते सांगणारा नाटय़ प्रकारही आहे. समाजातील धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली करण्यात येणारा भेदभाव थांबवणे हे एकनाथांचे उद्दिष्ट होते. त्यासाठी त्यांनी आपल्या भारुडांमधून हिंदू धर्मातील उच्च जातींवर आणि राजसत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या मुसलमान कट्टरांवर टीकेचे प्रहार करण्यास मागे-पुढे पाहिले नाही. वेगवेगळ्या धर्माची आणि एकूणच धर्मसंस्थेची परखड समीक्षा करणारे विचारवंत भारतात फारच थोडे झाले. त्यांच्यात एकनाथांचे स्थान वरचे आहे. ‘भावार्थ रामायण’च्या रूपाने रामकथा मराठीत उतरवताना एकनाथांनी महाराष्ट्राला अन्यायाविरुद्ध उभे राहण्याच्या वीरवृत्तीचीही आठवण करून दिली, असे म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही. एकनाथांनी दाखवलेल्या रामकथेच्या वाटेनेच नंतर रामदास आणि मुक्तेश्वर चालत गेले. थोडक्यात सांगायचे म्हणजे हे साहित्य मराठी मातीतून उगवलेले साहित्य होते.
तुकाराम महाराजांच्या वाङ्मयीन कारकिर्दीचा अखेरचा काळ आणि शिवाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ काळ एकमेकांत गुंतलेले आहेत. एकनाथांनी जे साधण्यासाठी साहित्यातील विनोद आणि उपहास या हत्यारांचा वापर केला, तेच तुकोबांनी स्पष्टोक्तीच्या उपयोगाने साधले. एकनाथांनी जागृत केलेल्या सामाजिक व राजकीय जाणिवांना फळे येऊ लागण्यास प्रारंभकाळ तुकोबांनी शिवरायांच्या प्रारंभिक उपक्रमांच्या रूपात प्रत्यक्ष अनुभवला. त्यांच्या गाथेत ‘पाइकांचे अभंग’ या नावाखाली अभंगांचा एक गट आहे. हे अभंग म्हणजे दुसरेतिसरे काही नसून मावळातील होतकरू सैनिकांशी साधलेला संवाद व त्यांना केलेला उपदेश आहे. या उपदेशात महाराजांनी चक्क गनिमी काव्याच्या युद्धाची सूत्रे सांगितली आहेत व स्वामिनिष्ठेचा उपदेशदेखील केला आहे. तुकोबा तसेच त्यांच्या शिष्या बहिणाबाई यांनी समकालीन दुर्वृत्त व दांभिक साधूंवर प्रखर टीका केली. विशेषत: शाक्त धर्माच्या नावाखाली स्त्रियांचे लैंगिक शोषण करणाऱ्या गुरूंचे पितळ उघडे पाडले. बौद्ध महाकवी अश्वघोषा यांनी जन्माधिष्ठित ब्राह्मण्यावर टीका प्रहार करणारी ‘वज्रसूची’ नावाची संस्कृत कृती रचली होती. तिला वैदिक धर्मातील पुरोगामी प्रवाहाने उपनिषद म्हणून अंगीकारून आत्मसात केले. संत बहिणाबाई यांनी या उपनिषदाचा मराठीत अभंगात्मक अनुवाद केला. या अनुवादाचा उपयोग एकोणिसाव्या शतकातील महात्मा फुले आणि त्यांच्याच प्रभावळीतील समाजसुधारकांनी करून घेतला. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा प्रारंभकाळ तुकोबांच्या उत्तरकालाशी जुळून येतो तसा महाराजांच्या कर्तृत्वाचा उत्तरकाळ रामदासांच्या वाङ्मयीन कारकिर्दीशी जुळतो. छत्रपतींना आपल्या कार्यात यश आलेले रामदासांना प्रत्यक्ष पाहता आले. त्यातून त्यांच्या मनात उमटलेले भावकल्लोळ त्यांनी आपल्या रचनांमधून व्यक्त केले.
तत्कालीन हिंदू-मुसलमानांमधील संघर्ष व समन्वय, दोन्ही धर्मातील पंडितांचा व गुरूंचा आडमुठेपणा संत शेख महंमद श्रीगोंदेकर यांच्या कवितेत कवीच्या प्रतिक्रियांसह उमटला.
मुद्दा एवढाच आहे, की संतांचे अभंग ओव्यांच्या माध्यमातून लिहिले गेलेले हे साहित्य मराठी समाजाच्या स्थिती-गतीतून उद्भवलेले आहे. ते कलम नसून पीक आहे.

* लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असून संतसाहित्याचे व्यासंगी व विचारवंत आहेत. त्यांचा ई-मेल – sadanand.more@rediff.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:04 am

Web Title: importance of marathi literature
Next Stories
1 राजनाथ सिंह यांचा शत्रू कोण?
2 १७०. योग-युक्त
3 फोटो नकोत, विचार हवे!
Just Now!
X