‘सय इथली संपत नाही..’ हा गिरीश कुबेर यांचा लेख (अन्यथा, १५ नोव्हेंबर) वाचला. तंत्रज्ञानातील आणि विशेषत: माहिती तंत्रज्ञानातील, बदलांच्या अफाट वेगात किती कंपन्या आणि त्यांची उत्पादने नामशेष झाली याचा मांडलेला लेखाजोखा मागे वळून पाहताना अविश्वसनीय असाच वाटतो. इतक्या वेगवान बदलांमध्येही काही ‘जुने ते सोने’ कसे खंबीरपणे टिकून आहे (आणि ज्याचा वापर आपण सर्व नकळत आजही दैनंदिन जीवनात करत आहोत) ते अधोरेखित करण्याकरिता हे पत्र.
१९९८ साली कॉम्पॅक नावाची बलाढय़ संगणक कंपनी ह्यूलेट पॅकार्ड (एचपी) ने विकत घेतल्यामुळे दिसेनाशी झाली, असा त्या लेखात उल्लेख आहे. त्याच्या फक्त एक वर्ष आधी ‘टँडम कॉम्प्युटर्स’ ही सत्तरीच्या दशकापासूनची अत्यंत नावाजलेली आणि सिलिकॉन व्हॅलीमध्ये ‘अ‍ॅपल’च्या अगदी समोर वसलेली कंपनी कॉम्पॅकने विकत घेतली होती. त्या कंपनीचे महाकाय संगणक जिथे जिथे प्रचंड संख्येने व्यवहार  होतात तिथे तिथे वापरले जात होते. (उदा. क्रेडिट कार्ड किंवा एटीएम कार्ड प्रणाली, शेअर बाजार, बँकांचे आपापसातील व्यवहार इत्यादी). ‘टँडम कॉम्प्युटर्स’ आणि तिला विकत घेणारी कॉम्पॅक या दोन्ही कंपन्या आज नाहीत; पण एचपीतर्फेही ‘टँडम कॉम्प्युटर्स’चे तेच महाकाय संगणक तुमचे-आमचे किती तरी दैनंदिन आíथक व्यवहार आपल्या नकळत आजही तसेच तडीस नेत आहेत. आयबीएम या जगप्रसिद्ध कंपनीचेही असेच अनेक महाकाय संगणक गेली कित्येक दशके अनेक उद्योगधंद्यांचा, बँकांचा आणि आíथक संस्थांचा अदृश्य कणा आहेत. आजकाल दर सहा महिन्यांत किंवा एखाद्या वर्षांत आपण नवे मोबाइल फोन, स्मार्टफोन किंवा इतर ‘गॅजेट्स’ खरेदी करतो आणि त्यावरून आपले आíथक व्यवहार करतो. असे करताना तंत्रज्ञानाच्या गतीशी जुळवून घेतल्याचे समाधान (की िझग?) आपण अनुभवतो; पण हे सर्व व्यवहार तडीस नेणारा तंत्रज्ञानाचा खराखुरा गाभा आजही अनेक दशकांनंतर जवळजवळ तसाच आहे. वेगाने बदलत आहेत फक्त त्या गाभ्यापर्यंत तुम्हा-आम्हाला घेऊन जाणाऱ्या वाटा. त्यामुळे या चक्रावून टाकणाऱ्या, झपाटय़ाने होणाऱ्या बदलातही ‘जुने ते सोने’ आहे आणि ते तसेच टिकून आहे, असे दिसून येते.
प्रसाद दीक्षित, ठाणे

आरक्षणावरून दोन्ही समाजाची थट्टाच..!
मराठा आणि मुस्लीम आरक्षणाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याची बातमी (१५ नोव्हें.) वाचली. यातून एक प्रकारे तत्कालीन आघाडी सरकारने या दोन्ही समाजाची कशी थट्टा केली आहे हे स्पष्ट होते.
आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेणारे तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी यासंबंधी म्हटले होते की, ‘कोणत्याही न्यायालयात हा निर्णय रद्दबातल ठरू नये म्हणून अभ्यासपूर्ण अहवाल सादर करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आहे.’ तर मग या निर्णयाला स्थगिती कशी मिळाली? मराठा समाजाला केवळ भुलविण्यासाठीच हे आरक्षणाचे गाजर त्यांना दाखविण्यात आले. कारण उच्च न्यायालयाने या निकालात स्पष्ट असे म्हटले आहे की, ‘मराठा समाज हा मागासलेला नाही. राज्य आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात मराठा समाजाला मागास म्हणून नमूद केलेले नाही.’  ज्या राणे समितीच्या शिफारशीनुसार हे आरक्षण देण्यात आले त्या अहवालाला राजकीय पाश्र्वभूमी होती, असेही मत न्यायालयाने नोंदवले आहे. ही एक राजकीय खेळी होती हेही यातून उघड होते. कारण हे आरक्षण न्यायालयाच्या कसोटीवर टिकणार नाही याची त्यांना पण जाणीव असावी.  आपली सत्ता जाणारच आहे याचीही खात्री असल्यामुळे पुढे जे कुणाचे सरकार उद्या सत्तेवर येईल त्या सरकारला या प्रश्नावरून वेठीस धरता येईल, अशीच राणे यांची व्यूहरचना होती, असे वाटते.
 – अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण</strong>

दर वर्षी पसे वाटून शेतीप्रश्न सुटेल?
दर वर्षीप्रमाणे या वर्षीही महाराष्ट्रातील अनेक भागांत भीषण पाणीटंचाई या महिन्यापासूनच जाणवू लागली आहे. त्या दुष्काळाच्या झळा आता प्रसारमाध्यमांतून महाराष्ट्राच्या राजकारणात पसरू लागल्या आहेत. दुष्काळ निवारण्यापेक्षा या वर्षीही अशा तापलेल्या तव्यावर पक्षीय राजकारणाची पोळी भाजून घेणे सुरू होईल. नेत्यांचे दौरे आणि नक्राश्रूंना आता पूर येईल आणि परत शेतकऱ्यांना निरनिराळ्या पद्धतीने पशांचे वाटप सुरू होईल. दुधाची तहान ताकावर भागविणे शक्य आहे, पण पाण्याची तहान पशांनी कशी काय भागवते येते? त्याचे कोडे मात्र नेतेमंडळींनाच सोडविता येत असावे. मुख्य म्हणजे पाणीप्रश्न सोडविण्याचा मुद्दा पक्षीय राजकारण, भ्रष्टाचार आणि कायद्याच्या जंजाळात अडकलेला आहे. या कोरडवाहू जमिनीतील शेती ही लहरी हवामानामुळे म्हणजे, अवकाळी पाऊस, अवर्षण, गारपीट या संकटांना तोंड देत फायदेशीर कशी ठरेल, याचे निश्चित उत्तर कोणाकडेच नाही. शेती उत्पन्नास हमी भाव, त्याचबरोबर किरकोळ ग्राहकाला स्वस्त दरात धान्यपुरवठा याचा ताळमेळ बसविणे ही जादू यशस्वी करणारा जादूगारच निर्माण व्हायला हवा आहे. मुळात शेती हा विषय शेतकऱ्यांच्या, शेतीतज्ज्ञांच्या हातून कधीच निसटून गेला आहे. आता तो सर्वस्वी नेते, पुढारी आणि सत्ता मिळविण्यासाठी आणि सत्ता घालविण्यासाठी जास्त उपयुक्त ठरत आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही त्याचीच पुनरावृत्ती होणार, अशी लक्षणे दिसू लागली आहेत.
मोहन गद्रे, कांदिवल

आधी टपाल वेळेवर पोहोचवा!
‘टपाल विभागाला पुन्हा बँकेचे वेध’ ही बातमी (१४ नोव्हें.) वाचली. बँकेचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी  टपाल वेळेवर पोहोचविण्याचे आपले मूलभूत काम त्यांनी चोख करावे. अनेकदा वाटप न करताच टपाल कचराकुंडीत फेकून दिलेले आढळले आहे.  काही दिवसांपूर्वीच शेकडो आधार कार्ड्स ठाणे जिल्ह्य़ात सापडली होती. तेथील कामचुकार कर्मचाऱ्यांमुळेच कुरियर कंपन्याचे फावले. विविध बचत योजनांचे काम करणाऱ्या महिलांना  कशी वागणूक मिळते हे टपाल कार्यालयात गेल्यास कळून येते. त्यामुळे टपाल खात्याने आपला कारभार सुधारला पाहिजे.
– अविनाश टाकळकर, नालासोपारा

.. तर या अभियानाचे ‘खेळणे’ होईल
‘‘झाडू’न पवार सारे..’ ही बातमी (१५ नोव्हें.) वाचली. गेले काही दिवस राजकारण, सिनेसृष्टी, खेळ, उद्योग अशा अनेक क्षेत्रांतील नामवंत हाती झाडू घेऊन साफसफाई करीत असतानाचे फोटो वर्तमानपत्रांमधून झळकत आहेत.  जिन्स, महागडे गॉगल आणि बाजूला खासगी बॉडीगार्ड्स  पाहून वाचकांवर ‘अस्वच्छता शोध अभियान’ सुरूकरण्याची वेळ येते आहे. कारण त्या फोटोंमध्ये कचरा औषधालासुद्धा दिसत नाही.  प्रतीकात्मकतेचेही स्वत:चे असे एक महत्त्व असते, हे मान्य करूनही हे अति होत आहे असे वाटते. लोकसहभागातून शहरे, नद्या हाताने स्वच्छ करतानाच ती मुळात घाण का होतात आणि त्यावर आपण काही इलाज करणार आहोत का, हा प्रश्न आहे. देश अस्वच्छ होऊ न देण्याची जबाबदारी ज्या शासकीय यंत्रणांची आहे त्यांना आधी कामाला लावले तर या लोकसहभागाला काही अर्थ आहे. नाही तर लहान मुलांचे मन कशात तरी गुंतवून ठेवायला जसे खेळणे हातात देतात तसे स्वरूप या योजनेला येईल की काय, असे वाटते.
– विनिता दीक्षित

अपघात टाळण्याचे बक्षीस ३०० रुपये?
 ‘कोकणकन्ये’चा होणारा अपघात टाळणाऱ्या सचिन पाडावे यास कोकण रेल्वेने जुन्या कायद्याचे निमित्त करून ३०० रु. बक्षीस देऊन दारिद्रय़ दाखविले. दुर्दैवाने अपघात झाला असता तर लाखोंची नुकसानभरपाई  द्यावी लागली असती; पण आपल्या जिवाची तमा न बाळगता पाडावेंनी गाडी थांबवून होणारा अनर्थ तर टाळलाच व रेल्वेचे पैसेही वाचविले. मात्र त्याचे रेल्वेला काही वाटत नाही. बक्षिसी जर जुन्या कायद्याप्रमाणे मग तिकिटाचे दर नवे का? आता या गाडीतील प्रवाशांनीच माणशी १०० रु.प्रमाणे पैसे काढून आपले प्राण वाचविणाऱ्या या देवदूताला देऊन कृतज्ञता व्यक्त करावी.
मीनल माधव