भारतातल्या गोंडवनात मूलत: सापडलेले जीवाश्म दाखवतात की आपली भारतभूमी एके काळी दक्षिण गोलार्धातल्या एका विशाल गोंडवन खंडाचा अंश होती..
मायभूमीचे स्तवन करताना माधव जूलियन म्हणतात, ‘‘महाराष्ट्र हा कृष्णपाषाणदेही, तरी लोहपणीही अंगात या!’’ केवळ महाराष्ट्रभरच नाही, तर शेजारच्या राज्यांतही पसरलेला कृष्णपाषाण हा जगाच्या इतिहासातल्या एका खाशा घटनेचा परिपाक आहे. हा उपजण्याच्या वेळी भारतखंड दक्षिण गोलार्धात हिंद महासागरातून आशिया खंडाच्या दिशेने सरकत होते. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचे कवच अगदी पातळ असलेल्या भागाला या सरकत्या भूखंडाचा धक्का पोहोचून कवच फुटून न भूतो न भविष्यति असा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यातून उफाळलेल्या लाव्हारसातून महाराष्ट्राचा कृष्णपाषाणदेह साकारला. हा पृथ्वीचा चित्तवेधक इतिहास आपल्याला अगदी अलीकडेच, गेल्या पन्नास वर्षांत नीट उलगडला आहे. आधुनिक विज्ञान ज्या युरोपात भरभराटीला आले तिथे पंधराव्या शतकापर्यंत पृथ्वी विश्वाचा केंद्रिबदू, वयाने केवळ काही हजारो वर्षांची आणि न बदलणाऱ्या चराचर सृष्टीने नटलेली असा घट्ट समज होता. पृथ्वी सूर्याभोवती फिरणारा एक छोटासा ग्रह असे दाखवून देऊन कोपíनकसने या समजाला हादरवले आणि नव्या विचारांना चालना दिली. मग भूशास्त्रज्ञ दाखवू लागले की, पृथ्वी बदलत राहते, तिच्यावरच्या पर्वतांचा चुरा होतो, समुद्र गाळाने भरून जातो, भूमी वर उचलली जाते आणि हे सगळे अशा संथ गतीने होते की, पृथ्वीचे वय सहस्रावधी नाही, तर कोटय़वधी, कदाचित अब्जावधी वर्षांचे असणार. यातून प्रेरणा घेऊन एकोणिसाव्या शतकात डार्वनिने आणखी एक विचारक्रांती घडवत दाखवून दिले की, केवळ भूमी व सागर नाही, तर जीवसृष्टीही परिवर्तनशील आहे. डार्वनिच्या कामातून जीवाश्म हे पुरातन जीवांचे अवशेष हे आकलन होऊन त्यांचा अर्थ लागू लागला; पण जीवाश्मांबद्दल अजूनही काही कोडी होती. मूळ मध्य भारतातल्या गोंडवनात सापडलेल्या ग्लॉसॉप्टेरिस या नेच्याचे अवशेष ऑस्ट्रेलिया, अंटाíक्टका, भारत, आफ्रिका व दक्षिण अमेरिका या पाचही खंडांवर सापडत होते, तर लिस्ट्रोसॉरस ‘ाा सरीसृपाचे अवशेष अंटाíक्टका, भारत व आफ्रिका खंडांवर सापडत होते. हे कसे घडते? आल्फ्रेड वेगेनेर या हवामानशास्त्रज्ञाने भूशास्त्राकडे नव्या दृष्टीने बघत समजावून दिले की, पृथ्वीवरचे भूखंड चंचल आहेत, ते आधी समजत होते त्याप्रमाणे केवळ झिजले किंवा उचलले जात नाहीत, तर त्यांची भ्रमंती चालू असते. ते तुटत असतात, जोडले जात असतात. आता सर्वमान्य झाले आहे की, जेव्हा पंचेचाळीस कोटी वर्षांपूर्वी जीवसृष्टीने समुद्रातून डोके वर काढले, तेव्हा दक्षिण गोलार्धात भारत, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका व अंटाíक्टका खंडे एकमेकांना चिकटून एक भले मोठे गोंडवनलँड खंड बनलेले होते; उत्तर गोलार्धातही लॉरेशिया हे प्रचंड खंड होते. या जमिनीवर पदार्पण केलेली जीवसृष्टी हळूहळू विकसित होत राहिली. प्रथम नेच्यांच्या भाईबंदांची, मग सूचिपर्णी वृक्षांची वने फोफावली आणि म्हणूनच ग्लॉसॉप्टेरिसचे अश्मीभूत अवशेष पंचखंडांवर सापडू शकतात. या अन्नाचा फडशा पाडायला कीटक अवतरले. किडय़ांना खायला बेडकांचे पूर्वज उद्भवले; पण निसर्गाचे रहाटगाडगे हळूहळू फिरते. त्यामुळे बेडकांचे पूर्वज अवतरायला तब्बल दहा कोटी वष्रे लागली. आणखी पाच कोटी वर्षांनी बेडकांना फस्त करणारे सापांचे पूर्वज उत्क्रांत झाले. नंतर दहा कोटी वर्षांनी चिचुंद्रीसारखे कीटकभक्षक छोटे छोटे सस्तन पशू अवतरले. या वीस कोटी वर्षांपूर्वीच्या काळात परागीकरणासाठी वनस्पती वाऱ्या-पाण्यावरच अवलंबून होत्या. रंगीत फुलांचे, फुलपाखरांचे युग अजून भविष्यात होते.  या परिस्थितीत पंधरा कोटी वर्षांपूर्वी भारत गोंडवनलँडपासून फुटून हळूहळू उत्तरेकडे सरकू लागला. हे उत्तरायण तब्बल दहा कोटी वष्रे चालले. तुटताना जमीन उचलली जाऊन पश्चिम घाट आणि किनारपट्टी तयार झाली. या प्रवासाच्या मध्यावधीत सपुष्प वनस्पती पृथ्वीवरच्या इतर खंडप्राय भूभागांवर फोफावल्या. त्याचबरोबर या खंडांवर डायनोसॉरांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी मोठी उलथापालथ झाली. भारतभूमी सरकत सरकत पृथ्वीचे कवच अगदी पातळ असलेल्या भागात आल्याने ज्वालामुखीचा उद्रेक झाला. नेमकी याच वेळी एक अतिप्रचंड उल्का पृथ्वीवर आदळली. धुळीने, राखेने वातावरण काळवंडले आणि पृथ्वी गारठली. या हाहाकारात डायनोसॉरांचा नायनाट झाला. त्याचा फायदा मिळून सस्तन पशूंची, पक्ष्यांची भरभराट झाली.
पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचा असा कायापालट होत असताना भारत एक महासागरातले बेट होते. या परावर्तनापासून दुरावलेले होते. क्रमेण पाच कोटी वर्षांपूर्वी आपला भूभाग आशियाला येऊन धडकला. या टकरीतून हळूहळू हिमालय उंचावला. भूमाग्रे इतरत्र उत्क्रांत झालेल्या सपुष्प वनस्पती, फुलपाखरे, पक्षी, पशू भारतावर बस्तान बसवू लागले. इथेही त्यांच्या नव्या जातींची उत्क्रांती होऊ लागली. नव्याने साकारलेल्या भारताच्या तीन प्रदेशांत भरपूर पाऊस पडायला लागून जीवसृष्टीला खास बहर आला. ते तीन प्रदेश होते- अंदमान-निकोबार बेटे, पश्चिम घाट आणि पूर्व हिमालय. यातला पश्चिम घाटसुद्धा सदाहरित अरण्याचे बेटच आहे. उलट पूर्व हिमालय आग्नेय आशियातल्या विस्तृत वनप्रदेशाला जोडून आहे. त्यामुळे आग्नेय आशियाच्या जीवसृष्टीचे वैभव पूर्व हिमालयालापण लाभले आहे. केवळ व्हिएटनामपर्यंतच्या आग्नेय आशियाचा विचार केला, तरी या प्रदेशात सपुष्प वनस्पतींच्या जाती पश्चिम घाटाच्या तिपटीने, तर सस्तन पशूंच्या, पक्ष्यांच्या जाती दुपटीहून जास्त आहेत. भारताच्या दृष्टीने हे तीनही गट अर्वाचीन आहेत; गेल्या पाच कोटी वर्षांत भारतात पोहोचलेले. उलट साप-सरडे, बेडूक प्राचीन गट आहेत. त्यांचे पूर्वज भारत दक्षिण गोलार्धात असल्यापासून, पंधरा कोटी वर्षांहूनही जास्त काल आपल्या भूमीवर वास्तव्य करून आहेत. म्हणून या गटांच्याही जास्त जाती पूर्व हिमालयात असल्या तरी पश्चिम घाटाच्या सव्वा-दीडपटच आहेत.
पश्चिम घाटावर आढळणाऱ्या वृक्षमंडूकांच्या पस्तीस जातींपकी एकोणतीस निव्वळ सह्य़वासी आहेत. देवगांडुळे नावाचे बेडकांचे हात-पाय नसलेले भाईबंद आहेत, त्यांच्या बावीस जातींपकी वीस आपल्याच आहेत. मातीत पुरून राहणाऱ्या बांडा सर्पकुलातील सर्वच्या सर्व पंचेचाळीस जाती फक्त पश्चिम घाट व लंकावासी आहेत आणि त्यातल्या चौतीस केवळ सह्य़ाद्रीत सापडतात. अर्वाचीनांपकी सपुष्प वनस्पतींतील तेरडय़ांच्या शहाऐंशीपकी शहात्तर जाती पूर्णत: सह्य़वासी आहेत.
सह्य़ाद्रीचे ऐश्वर्य हिमालयाच्या तुलनेने कमी. तरीही इथल्या हजारो जीवजाती केवळ भारतात सापडणाऱ्या आहेत. उलट हिमालयात अशा निखळ भारतीय जीवजाती जवळजवळ नाहीतच, कारण आपला हिमालय पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, चीन, ब्रह्मदेश यांना जोडून आहे. थोडय़ाच पक्षिजाती, त्रेपन्न, केवळ भारतापुरत्या मर्यादित आहेत. यातल्या सतरा अंदमान-निकोबारात आहेत; चौदा पश्चिम घाटापुरत्या सीमित आहेत, तुलनेने त्रेपन्नपकी केवळ चार जाती भारतातील हिमालयापुरत्या मर्यादित आहेत. वसंत बापट म्हणतात : भव्य हिमालय तुमचा-अमुचा, केवळ माझा सह्य़कडा. भारताची जीवसृष्टीही वसंत बापटांच्या सुरात सूर निश्चितच मिळवेल.
*लेखक  ज्येष्ठ परिसर्ग-अभ्यासक आहेत.