गेल्या ६० वर्षांत भारतीय राजकारणात टिकून राहिलेली एकच गोष्ट असेल, ती म्हणजे मंत्र्यांच्या दिमतीला असलेली अ‍ॅम्बॅसिडर मोटार. गेल्या दशकभरात या मोटारीकडे मंत्र्यांनीही पाठ फिरवायला सुरुवात केली. एकाच वेळी सत्ताधीश आणि सर्वात गरीब असलेला टॅक्सीचालक अशा दोघांनाही आवडणारी ही मोटार. भारतातील सगळ्या शहरांमध्ये पिवळा रंग धारण करून टॅक्सी म्हणून धावणाऱ्या या मोटारीची जागा आता कमीतकमी इंधनात अधिक किलोमीटर धावणाऱ्या नव्या चकचकीत मोटारींनी घेतली. जागतिकीकरणाच्या आधीपासूनच भारतात आलेल्या मारुती या मोटारीने अ‍ॅम्बॅसिडरचा तोरा काही कमी झाला नाही. शुभ्र पांढऱ्या रंगातील मोटारीत ऐसपैस जागा असलेल्या गुबगुबीत गाद्यांवर बसलेले मंत्री हीच त्या मोटारीची शान होती. परदेशी बनावटीच्या हिल्मनसारख्या मोटारी ब्रिटिशांच्या गमनानंतरही त्यांची आठवण काढत रस्त्यांवर धावत होत्या. पण त्या कशातही अ‍ॅम्बॅसिडरचा बाज नव्हता. जागतिकीकरणाच्या रेटय़ाने भारतात नव्याने वाढू लागलेल्या नवश्रीमंतांना नवनव्या मोटारींची पडू लागलेली स्वप्ने हिंदुस्थान मोटर्स या अ‍ॅम्बॅसिडर मोटारीच्या निर्मात्यांच्या लक्षात आली नाहीत. दिल्लीतल्या रस्त्यांवर आपला दिमाख मिरवणाऱ्या अ‍ॅम्बॅसिडर मोटारीच्या याच प्रतिष्ठेचा फायदा घेऊन २००१ मध्ये संसदेवरील हल्ल्यासाठीही हल्लेखोरांनी याच मोटारीचा आधार घेतला. आधुनिकीकरणाने देशातील मोटारींची बाजारपेठ गजबजलेली असताना अ‍ॅम्बॅसिडरने मात्र आपल्या प्रदीर्घ परंपरेच्या आधारावरच वाटचाल करत राहणे परवडणारे नव्हतेच. त्यामुळे १९८० मध्ये वर्षांकाठी २४ हजार वाहनांची होत असलेली विक्री २००० मध्ये अवघ्या सहा हजारांवर आली. गेल्या वर्षभरातील भारतातील एकूण मोटारींचा खप सुमारे १८ लाख असताना अ‍ॅम्बॅसिडर मोटारीचा खप केवळ २२०० एवढा होता. मारुती, ह्य़ुन्दाई, टोयोटा, होंडा, एवढेच काय भारतीय बनावटीच्या मर्सिडीससारख्या मोटारींशी स्पर्धा करताना अ‍ॅम्बॅसिडरने आपला ‘डीएनए’ बदलण्याची आवश्यकता होती. तसे झाले नाही, म्हणूनच हिंदुस्थान मोटर्सला बंगालमधील उत्तरपारा येथील कारखाना बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. एके काळी भारताची ‘रोल्स राइस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अ‍ॅम्बॅसिडरला बीबीसीने गेल्याच वर्षी जगातील सवरेत्कृष्ट टॅक्सी म्हणून जाहीर केले होते. १९४८ मध्ये सी. के. बिर्ला उद्योग समूहाने या मोटारीचे उत्पादन उत्तरपारा येथे सुरू केले, तेव्हापासून ऐंशीच्या दशकापर्यंत भारतातील प्रतिष्ठित वाहन म्हणून या मोटारीचा मान टिकून राहिला. वाढता तोटा आणि बाजारात नसलेली पत यामुळे हिंदुस्थान मोटर्सने कारखाना बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. काळाबरोबर न राहण्याचे धोरण आणि बदलत्या जीवनशैलीने निर्माण झालेले आव्हान न पेलण्याची क्षमता एखादा उद्योग कसा क्षीण करू शकते, याचे हे एक उदाहरण आहे. केवळ प्रतिष्ठा आहे, म्हणून व्यवसाय होत नाही आणि जोवर या प्रतिष्ठेचीही नव्याने ओळख करून दिली जात नाही, तोवर तीही फारशी उपयोगाला येत नाही हे अ‍ॅम्बॅसिडरच्या उदाहरणावरून स्पष्ट होते आहे. गेल्या २५ वर्षांत जगातील उत्पादकांनी भारतीय बाजारपेठेत ज्या जोमदारपणे व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे, त्याने भारतीय उद्योगांनाही धोरणे बदलण्यास भाग पाडले आहे. देशातल्या महानगरांतील टॅक्सीमध्ये अ‍ॅम्बॅसिडर दिसेनाशी झाली, तरीही उत्पादकांनी त्याकडे लक्ष दिले नाही आणि आपले वैशिष्टय़ टिकवण्यासाठी विशिष्ट व्यक्तींसाठी बनवलेले वाहन म्हणून आपली ओळखही टिकवता आली नाही. अ‍ॅम्बॅसिडर हे एकेकाळचे स्वप्न होते. आताच्या युवकांच्या स्वप्नातूनही ही मोटार हद्दपार झाली आहे. कंपनीच्या निर्णयाने तर ती कायमचीच विसरली जाणार आहे.

different move in alliance has increased uneasiness in the Shinde Sena
मित्रपक्षाच्या ‘रसदी’मुळे शिंदे सेनेत अस्वस्थता
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Iran Israel Attack Updates in Marathi
जप्त केलेल्या जहाजावरील १७ कर्मचारी भारतीय अधिकाऱ्यांना भेटणार, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलं स्पष्ट
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर