अमेरिकेचे ‘चीफ डेटा सायंटिस्ट’ या पदावर अध्यक्ष बराक ओबामा यांनी गेल्याच आठवडय़ात धनुर्जय पाटील यांची नेमणूक केली. ‘डेटा सायंटिस्ट’ हा शब्दप्रयोग इंग्रजीतही तसा नवीनच, २००८ पासून प्रचलित झालेला. त्याला मराठीत ‘माहिती विश्लेषण व संरक्षण शास्त्रज्ञ’ असे म्हणता येईल. इंटरनेटवरून डेटा कसा जमा करायचा, त्याचे विश्लेषण कोणत्या हेतूंसाठी कसे करायचे आणि त्याच वेळी या माहितीचा कोणताही गैरवापर कसा रोखायचा, याबाबत नवनवीन संशोधन करून ते उपयोगात येईल असे पाहणे, हे या शास्त्रज्ञाचे काम. अशा पद्धतीचे काम धनुर्जय वयाने तिशीत होते, तेव्हापासून करीत आहेत आणि सध्या ते ४५ वर्षांचे आहेत.
धनुर्जय हे अमेरिकेतच जन्मले आणि वाढले.  उद्योजकतेचे बाळकडू त्यांना घरीच मिळाले. गणितात धनुर्जय यांना लहानपणापासूनच गती असल्याने त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून गणिताचीच पदवी घेतली. पुढे १९९६ ते २००१ अशी पाच वर्षे, मेरिलॅण्ड विद्यापीठाच्या उपयोजित गणित विभागात ते पीएच.डी. करीत होते. डॉक्टरेटसाठी गणिताच्या ज्या उपयोजनाबद्दल धनुर्जय यांनी संशोधन केले, ते अर्थातच संगणकीय- महाजालीय माहितीच्या विश्लेषण- पद्धतींसंदर्भात होते. नेमका हाच काळ, पुढे ‘सोशल मीडिया’ म्हणून परिचित झालेल्या अनेकानेक संकेतस्थळांच्या विकासाचा. धनुर्जय यांच्या ज्ञानाचा वापर ‘लिंक्डइन’मध्ये डेटा सायंटिस्ट या पदावर असताना भरपूर प्रमाणात झाला. आजही ‘लिंक्डइन.कॉम’ हे संकेतस्थळ कोणत्याही व्यक्तीची खरी माहिती देणारे, असे मानले जाते. हा लौकिक वाढवण्यात धनुर्जय यांचा मोठा वाटा आहे. लिंक्डइनची सांधेजोड फेसबुक, गुगल, ट्विटर आदी अनेक संकेतस्थळांशी त्यांनीच केली आणि या स्थळांतून अधिकाधिक माहिती मिळवून, कोणीही ‘लिंक्डइन’ला फसवू शकणार नाही अशी पद्धती त्यांनी विकसित केली. याचा लाभ अर्थातच, माहितीचा सहभाग देणाऱ्या अन्य स्थळांनाही झाला आणि त्यामुळेच, ‘हॅकर’ मंडळींपासून या सर्वच स्थळांच्या संरक्षणाचे कार्यही पुढे जाऊ शकले. सरकारी कामेही धनुर्जय यांनी स्वीकारली, त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेच्याच पुढाकाराने २००६ साली  इराकमधील सर्व विद्यापीठांतील सर्व वैज्ञानिक संशोधनाचे आंतरजाल तयार करण्याचा प्रकल्प.
 ‘फोर्बज्’ नियतकालिकाने जगातील (म्हणजे पाश्चात्त्यच देशांतील) सात अव्वल डेटा सायंटिस्टांची जी यादी गेल्या वर्षी केली, त्यात धनुर्जय यांचे स्थान तिसरे होते!