नॅशनल सायन्स फाऊंडेशनतर्फे सन्मानित करण्यात येणाऱ्या पुरस्कारावर यंदा भारतीय अमेरिकन वैज्ञानिक गुरप्रीत सिंग यांनी नाव कोरले. पाच लाख अमेरिकन डॉलरचा हा पुरस्कार त्यांनी केलेल्या नॅनोशीट्समधील संशोधनासाठी मिळाला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराच्या रकमेतून शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्याच्या त्यांच्या कामाला  तसेच संशोधनाला चालना मिळणार आहे.
मोबाइलपासून अनेक उपकरणे वापरण्यासाठी उपयोगात येत असलेल्या बॅटरीची क्षमता वाढविण्यासाठी देशभरात संशोधने सुरू आहेत. यातील संशोधनाचाच भाग म्हणून सिंग यांनी अतिपातळ धातू पत्रा तयार केला आहे. ज्याच्यापासून जास्त क्षमतेच्या रिचार्जेबल बॅटरीज, सुपरकपॅसिटर्स आणि फोटोइलेक्ट्रोकेमिकल हायड्रोजनच्या निर्मितीसाठी आवश्यक उत्प्रेरक तयार करणे शक्य होणार आहे. त्यांच्या या संशोधनांमुळे धातू विज्ञानातील त्याचबरोबरीने नॅनो तंत्रज्ञानातील अनेक पैलू जगासमोर येण्यास मदत होणार आहे. ऊर्जेच्या वापरासाठी नॅनोशीट्सची निर्मिती मोठय़ा प्रमाणावर होणे गरजेचे आहे. यामध्ये रिचार्जेबल बॅटरीचाही समावेश आहे. ही निर्मिती करण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांचा फारसा उपयोग होऊ शकत नाही. यामुळे सिंग यांनी मांडलेला सिद्धांत याचबरोबर त्यांनी केलेल्या संशोधनावरून हे शक्य असल्याचे उघड झाले आहे. ज्या वेळेस आपण ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांकडे पाहतो त्या वेळेस त्यातून निर्माण होणारी ऊर्जा साठवून त्याचे वितरण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा असणे गरजेचे आहे. हे करण्यासाठी नॅनोशीट्सचे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते असे सिंग यांनी स्पष्ट केले. सिंग यांना नॅनोतंत्रज्ञानात विशेष रस असून त्यांनी पदवी शिक्षणानंतर या क्षेत्राकडेच आपला मोर्चा वळविला.  सिंग हे मूळचे भारतीय असून त्यांचे पदवी शिक्षण पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात झाले. तेथे त्यांनी मॅकॅनिकल शाखेतून २००३मध्ये अभियांत्रिकी पदवी मिळवली. यानंतर २००६मध्ये कोलोरॉडो विद्यापीठातून त्यांनी एमएसचे शिक्षण पूर्ण केले व पुढे २००७ मध्ये त्याच विद्यापीठातून पीएच.डी.ही केली. यानंतर त्यांनी वर्जिनिया तंत्रनिकेतन विद्यापीठात अध्यापनास सुरुवात केली. त्यांचा अध्यापनाचा प्रवास अद्याप सुरू असून सध्या ते कन्सास स्टेट विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयात मॅकॅनिकल आणि अणू अभियांत्रिकी शाखेत सहप्राध्यापक म्हणून काम करतात. त्यांचे आत्तापर्यंत २५ हून अधिक प्रबंध सादर झाले असून त्यांनी तीन पुस्तकेही लिहिली आहेत.