अलीकडच्या काळात इंग्रजीत लेखन करणाऱ्या लेखकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे, पण तरीही स्त्रियांचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमीच  भरेल, असं विधान दहाएक वर्षांपूर्वी करता आलं असतं. पण आता तसं म्हणता येत नाही, हे प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांवरून साधी नजर टाकली तरी लक्षात येईल. पण तरीही कथा, कविता आणि कादंबरी हेच साहित्यप्रकार हाताळणाऱ्या स्त्रीलेखिकांची संख्या जास्त दिसेल. गूढकथा, भयकथा, रहस्यकथा, मृत्युकथा अशा थरारक साहित्यप्रकाराला हात घालण्याची मक्तेदारी पुरुषांचीच राहिली आहे. मराठीतच नव्हे तर एकंदर भारतीय साहित्यातच या प्रकारचं लेखन करणाऱ्या स्त्रीलेखिकांची संख्या केवळ नियमाला अपवाद ठरावी इतकी अल्पस्वल्प आहे.
अगास्था ख्रिस्ती, पॅट्रिशिया कॉर्नवेल, रूथ रेंडल ही इंग्रजी साहित्यातील नावे सर्वपरिचित आहेत. त्यांची लोकप्रियताही सर्वदूर आहे. त्यांची पुस्तके वर्षांनुवर्षे जगभर वाचली जात आहेत. पण असेच साहित्य आता भारतीय वाचकांना खास देशी वातावरण, घटना-प्रसंगांसह वाचायला मिळत आहे. कारण कल्पना स्वामीनाथन, मधुलिका लिडल आणि स्वाती कौसल या तीन भारतीय स्त्रीलेखिका अगास्था ख्रिस्ती, पॅट्रिशिया कॉर्नवेल, रूथ रेंडल यांच्या ‘भारतीय लेकी’ बनू पाहत आहेत. लिडल यांच्या ‘द इंग्लिशमन्स केमो’, ‘द एट गेस्ट अँड अदर मुझ्झफर जंग मिस्ट्रिज’ या कादंबऱ्या, स्वामीनाथन यांच्या ‘मोनोक्रोम मॅडोना’, ‘द गार्डनर्स साँग’ या कथा-कादंबऱ्या आणि कौसल यांच्या ‘अ पिस ऑफ केक’, ‘ड्रॉप डेड’ कादंबऱ्या वाचल्या की, भारतीय स्त्रियाही रहस्यप्रधान, मृत्युकथा, भयकथा हे साहित्यप्रकार चांगल्याप्रकारे हाताळू शकतात, याची खात्री पटते.

पेपरबॅक
‘मध्यमवर्गीय’ खुसखुशीतपणा..
औद्योगिक समाजशास्त्र या विषयाच्या अभ्यासक असल्यामुळे माणिक खेर यांना उद्योगजगत, कंपन्या, त्यांची कार्यालयं आणि या सर्व ठिकाणांवरचे ताणेबाणे अगदी जवळून पाहायला मिळाले आणि त्यातून ‘स्क्रिबल अँड क्विबल इन मॅनेजमेंट’ या  ४५ छोटेखानी लेखांच्या पुस्तकाचा जन्म झाला. व्यवस्थापनासारख्या विषयावर या देशातल्या आणि या कार्यसंस्कृतीतल्या खाचाखोचा लक्षात घेऊन नर्मविनोदी लिहिण्याचा मार्ग अन्य लेखकांनीही याआधी स्वीकारला, त्या परंपरेतल्या खेर या लेखिका आहेत. अर्थात, या पुस्तकाचं वेगळेपण असं की, पुस्तकाच्या नावात ‘मॅनेजमेंट’ असलं, तरी नर्मविनोदी ललितलेख शोभावेत असेही अनेक लेख इथे आहेत. खेर ज्या मॅनेजमेंटबद्दल बोलतात ती अद्यापही ‘टायपिस्ट’ वगैरे संस्कृतीत घोटाळणारी आहे; परंतु अन्य विषयांवरचे लेख अधिक खुसखुशीत वाटतात! एतद्देशीय, मध्यमवर्गीय मूल्यं मानणाऱ्या समाजाच्या विनोदाचा परीघ खेर यांनी जाणला आहे..त्यामुळे ‘ज्योतिषी हे उत्तम मानसोपचारतज्ज्ञ’ यासारखी विधानं तिरकस असली तरी अवमानकारक नाहीत, हे समजणं वाचकाला अवघड जात नाही. पुस्तकाच्या नावातल्या ‘क्विबल’ या शब्दाचा मराठी अर्थ ‘शब्दच्छल’ असा होतो! तो खेर यांनी केलेला नाही, परंतु अगदी छोटे, एरवी बिनमहत्त्वाचे मुद्दे बरोब्बर चिमटीत पकडून दाखवले आहेत. इंग्रजी रोजची, सोपी असल्यानं हे पुस्तक इंग्रजी वाचण्याची नुकतीच सुरुवात करणाऱ्या कोणत्याही वयाच्या लोकांसाठी साजेसं आहे.  

फ्रंट शेल्फ
टॉप  ५ फिक्शन
इन्फेर्नो : डॅन ब्राऊन, पाने : ५२८७५० रुपये.
अँड द माउंटेन्स एकोड : खालिद हुसैनी, पाने : ४१६५९९ रुपये.
वेडिंग नाइट : सोफी किन्सेला, पाने : ४००५९९ रुपये.
कन्फेशन्स ऑफ अ पेज ३ रिपोर्टर : मेघा मल्होत्रा, पाने : १२८१०० रुपये.
मुंबईस्तान : पियूश झा, पाने : २४८१९५ रुपये.

टॉप  ५ नॉन-फिक्शन
लॉस्ट अँड फाउंड इन इंडिया : ब्रजा सोरेन्सन, पाने : २३२२९९ रुपये.
व्हॉट यू आर रिअली मींट टू डू – अ रोड मॅप फॉर रिचिंग युवर
युनिक पोटेंशिअल : रॉबर्ट स्टीव्हन काप्लान, पाने : २१९७९५ रुपये.
प्लेइंग टू वीन : सायना नेहवाल, पाने : १५२१९९ रुपये.
मॅनेजर्स हू मेक अ डिफरन्स – शार्पनिंग यूवर मॅनेजमेंट स्कील्स :
टी. व्ही. राव, पाने : ३२८/२९९ रुपये.
टेकिंग द ताज : शिवजित कुलर, पाने : ३७७३२५ रुपये.

सौजन्य : फ्लिपकार्ट डॉट कॉम