16 February 2019

News Flash

मानसाचा रे कानूस

भारतीय चित्रकलेचा गेल्या ५० वर्षांचा इतिहास ज्यांना मोठं मानतो, असे काही चित्रकार आज ‘सामान्य प्रेक्षका’पासून मात्र दुरावलेले का आहेत?.. ‘माणसासारखा दिसणारा नीट माणूस काढा बघू’

| February 4, 2013 12:22 pm

भारतीय चित्रकलेचा गेल्या ५० वर्षांचा इतिहास ज्यांना मोठं मानतो, असे काही चित्रकार आज ‘सामान्य प्रेक्षका’पासून मात्र दुरावलेले का आहेत?.. ‘माणसासारखा दिसणारा नीट माणूस काढा बघू’ ही प्रेक्षकांची अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाहीत, म्हणून? चित्रकाराची किंवा कोणत्याही कलाकाराची भाषा आपल्यापेक्षा वेगळी असू शकते की!
‘आम्ही माणूस काढायला गेलो तर माकड होतं’ असं एक वाक्य अनेक मराठीभाषकांनी ऐकलेलं असेल, कधीतरी. जे तरुण-तरुणी चित्रकलेच्या उच्च शिक्षणासाठी जातात, त्यांचे नातेवाईक हे वाक्य उच्चारतात, तेव्हा त्यात कौतुकाचा सूर असतो म्हणून आपण अशी वाक्यं सोडून देतो. पण अशा कौतुकातून हे नातेवाईक त्यांच्या घरांतल्या तरुणांना, ‘तू मात्र माकडासारखा माणूस काढू नकोस’ अशी सूचनाच देत असतात की नाही एकप्रकारे? बरं, जर ही प्रेमळ सूचना एखाद्यानं/एखादीनं मानली नाही तर हेच नातेवाईक ‘तुमचं ते मॉडर्न आर्ट वगैरे आम्हाला नाही कळत’ असं म्हणायला तयार!
आजची तीन चित्रं खास अशा नातेवाईकांसाठी. चित्रं खूप छापता आली असती, पण आपल्याला चित्रातल्या माणसांचे चेहरेही पाहायचेत आणि चित्रंही पाहायचीत. चेहरे ‘नीट नाहीत’ अशी एक पहिली प्रतिक्रिया असलीच तरी हरकत नाही, पुढलं फार महत्त्वाचं आहे : हे तिघेही चित्रकार एफ. एन. सूझा, मनजीत बावा आणि के. जी. सुब्रमणियन.. हे तिघेही भारतीय कलेच्या १९५० नंतरच्या इतिहासात महत्त्वाचे मानले जातात. सूझा हे ‘प्रोग्रेसिव्ह ग्रूप’चे संस्थापक, केजी हे बडोदे व शांतिनिकेतन इथल्या कलासंस्थांतून तीन पिढय़ा घडवणारे ‘कलागुरू’ आणि बावा हे भोपाळच्या भारत भवनाचे प्रमुग होते. यापैकी सूझा व बावा दिवंगत, तर केजी हयात आहेत. हे सारं विसरून आपण त्यांनी चित्रकलेत काय केलं आणि या चित्रांमध्ये काय केलं हेच फक्त पाहिलं, तर मात्र ‘चित्रकार मोठा म्हणून चित्र चांगलं’ असा जो भंपक आव चित्रबाजारात अनेकजण आणतात, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करता येईल.
भन्नाट वेग, फटकारे आणि रेषांत जोर अशी ‘एक्स्प्रेशनिस्ट’ शैली (ही युरोपात उगवली, सूझांच्या चित्रांहून ४० र्वष जुनी!) सूझांनी आपलीशी केली. पण १९९० च्या दशकात त्यांनी एक नवीच पद्धत शोधली होती. तयार, छापील मासिकं वगैरेंत छापलेल्या चित्रांवर सूझा एक द्रावण फिरवायचे. छापील शाई विरघळवणारा द्राव. मग त्यावर रंगही मारायचे. मग बेमालूम चित्रं तयार व्हायची. या पुढल्या चित्रांची जणूकाही चुणूकच ठरलेलं हे १९५६ सालचं सूझा-चित्र. त्यात नाकाच्या जागी जो झावळीसारखा आकार दिसतो, तिथं नीट पाहा. आकारांमध्येच विचार करणं, आकारांतून आकार सुचणं यांतला सूझांनाच शोभणारा भन्नाटपणा म्हणजे काय, याची कल्पना करण्यास त्यानं मदत होईल.
दुसरं चित्र मनजीत बावांचं आहे. गुबगुबीत माणसं. कुठून आली? बहुधा अगदी अमृता शेरगिल पासूनची परंपरा.. पण शेरगिलदेखील १९२५च्या नंतरचीच.. त्याहून जुनी, अजिंठय़ाची भित्तिचित्रं जशी गोलसर असतात, त्याच्याशी फार अप्रत्यक्ष संबंध बावा यांच्या चित्रांचा. अजिंठा फारच जुनं, पण त्यानंतरची- गेल्या सहासातशे वर्षांतली लघुचित्रं आणि त्यांनी दाखवलेला ‘मधली जागा अगदी सपाट मोकळी सोडा.. फक्त अंतर नव्हे, काळसुद्धा दिसेल’ असा दृश्यमार्ग, लघुचित्रांपैकी कांगडा शैलीच्या मानवाकृती-चित्रण शैलीचे थोडे संस्कार, असं सारं घेत घेत बावांनी स्वत:ला घडवलं. कलेत इतिहास पचवून तुम्ही काय करता हे महत्त्वाचं ठरतं, ते बावांनी बऱ्याच प्रमाणात केलं. त्यांची चित्रं आज भले रंजनवादी वाटतील, पण त्यांनी आधी आपली- स्वतची अशी खास मानवाकृती-चित्रण शैली घडवली, हे नक्की. ती शैली घडवून ते थांबले नाहीत. पुढे याच ठरीव आकारांची थोडीशी मोडतोड करून ते खेळले. हे जे सोबतचं चित्र आहे, त्यात बावांची ही सारी वैशिष्टय़ं आहेत. आकार सूझांसारखे वाभरट, कर्कश वाटत नाहीत हे तर खरंच, पण मोडतोड (उदा. अगदी वरची मानवाकृती पाहा) लक्षातही कमी येते. चित्राचा तोल कुठं न सोडता त्यात कायकाय भरलंय बावांनी!
तिसरं के. जी. सुब्रमणियन यांचं चित्र, त्यात एवढय़ा संख्येनं मानवाकृती नाहीत. तरीही अख्खा चित्रावकाश भरून, निरनिराळय़ा आकारांतल्या या आकृती आहेत त्यामुळे चित्राची रचना (बांधणी – कन्स्ट्रक्शन) आणि त्यातून  साधला गेलेला तोल यांकडे लक्ष जावं, असं हे चित्र आहे. केजींची खास पद्धत म्हणजे, आपल्या पणज्या किंवा आज्ज्या कसं बोलतात.. ‘अप्पा देवभक्त हो- दोन घरं सोडून ऱ्हायचा- पाच मुली- धाकटी कमळी- बाकीच्या गावाबाहेर दिलेल्या- नि मुलगा एक तो शिकला नाही..’ असं काहीतरी.. तशा आठवणी, गोष्टी.. असं तुटकपणे सांगण्याची ही चित्रातली पद्धत आहे. सर्वात उंच जी मानवाकृती (स्त्री) आहे, तिच्या वस्त्रांवरले नाग आणि तिच्या कुठेतरी मागे शंकराची आराधना करणारा तो पुरुष यांच्यात नाग, शंकर असं काहीही आठवत असेल केजींना.         
तिघं मोठे झाले ते, ही जी (खूपच त्रोटकपणे इथं सांगितलेली) वैशिष्टय़ं आहेत, त्यांमुळे. माणसासारखा माणूस काढता येतो का, यापेक्षाही चित्रं पूर्णत अमूर्त, काहीच न सांगणारी झाल्यावरसुद्धा मला माणूस का चितारावासा वाटतोय, कसा काढावासा वाटतोय, याचा विचार या तिघांनी आणि आणखी अनेकांनी केला, ते मोठे झाले.
ज्यांनी आपापली भाषा शोधली, तेच मोठे होणार, असा एक काळ भारतीयच काय, जागतिक चित्रकलेत होता. साधारण १९८०च्या आसपास तो काळ संपायला सुरुवात झाली. पण भाषेचं वेगळेपण आपण समजून घेतल्याखेरीज चित्राचा आनंदच येईनासा झाला. कलासमीक्षा, घडता कलेतिहास आणि सामान्य माणूस यांत दरी पडत गेली.
बहिणाबाई चौधरींनी माणसाबद्दल, लोभासाठी ‘मानसाचा रे कानूस’ होतो, असं म्हटलं होतं. ते अहिराणीत होतं, त्याला ‘कानूस’ या शब्दाचा अर्थ (ज्वारीचं तयार होण्याआधीच करपलेलं वगैरे, टाकाऊ कणीस) माहीत नसूनही कविता मराठीत समजते. चित्रकलेत अशा निराळय़ा भाषा खूपच असतात, एवढं लक्षात ठेवायलाच हवं.

First Published on February 4, 2013 12:22 pm

Web Title: indian drawing art