08 August 2020

News Flash

कळता भुई थोडी..

सजावट मनाला आनंद देते, पण कलेचा इतिहास सजावटींची नोंद ठेवत नाही. ‘भुईकला’ या पाश्चात्त्य कलाप्रवाहाचं भारतीय रूप सजावटवजा आहे, असं कुण्या समीक्षकांनी

| November 25, 2013 01:07 am

सजावट मनाला आनंद देते, पण कलेचा इतिहास सजावटींची नोंद ठेवत नाही. ‘भुईकला’ या पाश्चात्त्य कलाप्रवाहाचं भारतीय रूप सजावटवजा आहे, असं कुण्या समीक्षकांनी म्हटलं, तर भारतीयांनी एक तर राग न मानता आपण काय करतो आहोत याची निराळी शाब्दिक मांडणी करावी; किंवा मग भुईकलेच्या इतिहासाची समज वाढवावी.
ज्याला आपण मराठीत निसर्गचित्र म्हणतो, त्याला इंग्रजीत लँडस्केप म्हणतात आणि हिंदी भाषेत भूदृश्य म्हणतात. मग हे ‘भूदृश्य’वाले हिंदी भाषक लोक, लँड आर्टला काय म्हणतील? आपल्या मराठीत ‘निसर्गचित्र म्हणजे लँडस्केप’ आणि ‘भुईकला म्हणजे लँड आर्ट’ असा सरळ हिशेब आहे. पण जमिनीच्या एखाद्या (बहुतेकदा विस्तीर्ण) तुकडय़ाचं दृश्य पालटून टाकणाऱ्या रॉबर्ट स्मिथसनच्या ‘स्पायरल जेटी’ला किंवा वॉल्टर डि मारिया यांच्या ‘लायटनिंग फील्ड’ला हिंदीत भूदृश्य का नाही म्हणायचं?
हा झाला शाब्दिक किंवा प्रतिशब्दांतला गोंधळ. त्याच्या पुढे ‘भुईकले’बाबतचा वैचारिक गोंधळ असू शकतो आणि आपल्या मराठीतही तो आहेच. मराठी छान बोलू शकणारे एखादे फार यशस्वी चित्रकार समुद्रकिनारे सजवतात, रात्री त्या सजावटीमध्ये लाइट लावले जातात, मग अख्खा किनारा छान दिसतो. असंच काही तरी आपल्या महाराष्ट्रातल्या एका प्रमुख शहरात, चतु:शृंगीच्या टेकडीवर ‘पुणे बायएनिअल’ किंवा ‘पुणे बिएनाल’च्या वेळी झालं होतं म्हणे. त्याबद्दल फारशी माहिती कुणाला नाही. मात्र ‘लँड आर्ट’ किंवा मराठीत ज्याला ‘भुईकला’ असं म्हणता येतं, तो कलाप्रवाह जमिनीच्या/परिसराच्या सजावटीशी निगडित आहे का, हा प्रश्न कायम आहे. ‘लँड आर्ट’ आपल्यालाही करता येईल, असं कितीही (कितीही देशांतल्या, कितीही जणांना, कितीही वेळा, कितीही यशस्वीपणे) वाटलं, तरी लँड आर्ट म्हणजे आपल्याकडे जे काही यशस्वीबिशस्वी होतंय ते की काय? हे प्रश्न अतिशय थंड डोक्यानं विचारता येतात. ते कायमही राहणार आहेत. कारण, आपल्याकडे लँड आर्टचं फक्त ‘बाह्य़रूप’ पाहिलं गेलं. खरं तर या कलाप्रवाहात जमिनीचं रूप दीर्घकाळाकरिता पालटण्यासाठीचा रूपव्यूह लोकांवर काय परिणाम घडवतो आहे हे पाहणं मनोज्ञ असतं. तितकंच महत्त्वाचं म्हणजे त्या भुईकला कृतीच्या मागचा हेतू किंवा संबंधित कलाकाराच्या अन्य कामांमधून आलेली एक सुसंगती पाहिली जायला हवी. ती आपण पाहतोच, असं नाही.
कलेच्या इतिहासानं लँड आर्ट किंवा भुईकलेची दोन भरभक्कम उदाहरणं आपल्यापुढे ठेवली आहेत : रॉबर्ट स्मिथसनची ‘स्पायरल जेटी’ (१९७०) आणि वॉल्टर डि मारिया यांचं ‘लायटनिंग फील्ड’ (१९७७). या दोन्ही कलाकृतींबद्दलची भरपूर-खरोखरच भरपूर माहिती इंटरनेटवर इंग्रजीत उपलब्ध आहे. विकिपीडियाचं कुणी भाषांतर केलं तर ती माहिती मराठीतही यायला वेळ लागणार नाही. त्या उपलब्ध इंग्रजी माहितीच्या पलीकडे पाहण्याचा आपण प्रयत्न करू शकतो, ते केवळ एकाच भांडवलाच्या बळावर. ते भांडवल म्हणजे, आपल्याकडल्या ‘लँड आर्ट’चे आपले (अगदीच तोकडे) अनुभव.
आपली भारतीय किंवा महाराष्ट्रीय लँड आर्ट ही जर तोकडा आणि ‘सजावटीचा’ अनुभव देणारीच असते, तर मग तिला लँड आर्ट तरी म्हणू नये. तो शब्दच बाद केला की मग भारतीय/ महाराष्ट्रीय तथाकथित लँड आर्टला ‘सजावट’ म्हणणाऱ्यांवर ‘तुम्ही नेहमी पाश्चात्त्यांचीच तळी उचलता’ असा आक्षेप घेणं बंद होईल, हा एक उप-फायदा. पण मुख्य फायदा असा की, कलेच्या ग्रथित इतिहासाचं विडंबन तरी होणार नाही. किंवा विडंबन करायचंच असं जर ठरवलेलं असेल तर त्याला निराळं छानसं नाव मिळून, तो नवा (निराळ्या नावाचा) कलाप्रवाह इतिहासात स्थान मिळवण्याचं स्वप्न तरी राजरोस पाहू शकेल. पण नाही. हे होत नाही. आपण अनेकदा जमिनीची सजावट करून त्याला लँड आर्ट म्हणतो.
रॉबर्ट स्मिथसननं अमेरिकेत ऊटा राज्यातल्या ग्रेट साल्ट लेकच्या काठचा दहा एकर भूभाग खरेदी करून त्या प्रचंड खाऱ्या सरोवराच्या काठाशी ६००० टन (म्हणजे साठ लाख किलो) दगड आणि माती टाकून एकंदर १५०० फूट (४५७.२ मीटर) लांबीची भेंडोळ्यासारखी ‘स्पायरल जेटी’ तयार केली किंवा मजुरांकडून करवून घेतली.
वॉल्टर डि मारिया या संकल्पनावादी कलावंतानं अमेरिकेतच न्यू मेक्सिको राज्यातल्या एका पठारावर १.६० किलोमीटर लांब आणि एक किलोमीटर रुंद (म्हणजे किमान २५८ मीटर क्षेत्रफळावर) स्टेनलेस स्टीलचे, प्रत्येकी २० फूट साडेसात इंच (६.२८६५ मीटर) उंचीचे तब्बल ४०० खांब एकमेकांपासून समान अंतरावर रोवले. ज्या ज्या वेळी या पठारावर विजा कडाडटात, तेव्हा हे खांब एखादी वीज आभाळातून आकर्षून घेतात आणि जमिनीवर ‘आणतात’. हे दृश्य अर्थातच लांबून पाहावं लागतं, त्यासाठी रात्री त्या पठारावर राहावं लागतं. वॉल्टर यांना अर्थसाह्य़ देणारी ‘डिआ आर्ट फाऊंडेशन’ ही संस्था आजदेखील ही सारी व्यवस्था पाहतेच, पण वॉल्टरचं आता (२५ जुलै २०१३ रोजी) निधन झालंय आणि त्यानंतर चार लाख अमेरिकी डॉलर (सुमारे अडीच कोटी रुपये) खर्चून या पठाराचं आणि त्यावरल्या त्या स्टीलच्या खांबांचं संधारण करण्यासाठी त्याच फाऊंडेशननं पुढाकार घेतला आहे.
ही माहिती, त्यातले आकडे मुद्दाम दिलेले आहेत. एवढय़ा पातळीवर काम करणारा एक तरी भारतीय चित्रकार (चंदिगढचं ‘रॉक गार्डन’ उभारणारे नेकचंद हे एकमेवाद्वितीय अपवाद आहेत, ते सोडून) आठवतो आहे का?
आता रॉबर्ट स्मिथसन आणि वॉल्टर डि मारिया यांना काय कळत होतं, त्यांच्या कामांत सुसंगती होती का, आदी मुद्दय़ांकडे वळू.
स्मिथसनला त्या प्रचंड सरोवरापाशी गोगलगायी आणि शंखांचे वेटोळेदार आकार दिसले होतेच, पण त्याहीपेक्षा त्याला इथं फिरताना कसली तरी अटळता जाणवत होती. भूकंपाची अटळता, चक्रीवादळाची अटळता, आणि या नैसर्गिक आपत्तींचं रूपही असंच, भेंडोळ्यासारखं. चक्रीवादळाचं उपग्रह-छायाचित्र स्मिथसननं १९७०च्या आधी पाहिलं होतं की नाही ते माहीत नाही, पण त्याला भूकंपाच्या परिणामाचं रूपसुद्धा असंच दिसलं, हे विशेष. हे सारं तळ्याच्या त्या तुकडय़ामध्ये त्यानं दगडामातीचं भेंडोळं उभारून साकार केलं.
वॉल्टर डि मारिया हे १९६०च्या दशकातल्या व्यावसायिकताविरोधी कला-चळवळींनी प्रेरित झाले होते. अखेर ‘मिनिमलिस्ट’ म्हणजे माफकतावादी किंवा नगण्यतावादी किंवा यत्नसूक्ष्मतावादी दृश्यकलावंत म्हणून ते ओळखले जाऊ लागले. पण मानवी यत्न जितका सूक्ष्म तितका तो अधिक अर्थगर्भ, असं मानणाऱ्या या कलावंताला खरी प्रसिद्धी मिळाली ती जमिनीवर खडूनं ‘एक मैल लांबीची रेघ’ काढण्याचं काम त्यांनी १९६८ मध्ये केलं, तेव्हा. त्यानंतर १९६९ ते १९७५ पर्यंत पितळी खांबांच्या साह्य़ानं त्यांनी ‘द ब्रोकन किलोमीटर’सारखी कलाकृती केली. हे पितळी खांब गॅलरीच्या फरशीवर ठेवण्याऐवजी ‘खऱ्या’ जमिनीवर एकमेकांना जोडून रेघ तयार केल्यास त्या पितळी रेघेची लांबी एक किलोमीटर भरेल, अशी कल्पना. रेघ आपण तोडू शकतो, पण किलोमीटर ‘अशा प्रकारे’ तोडू शकत नाही, अशी त्या कल्पनेच्या मागची संकल्पना. वॉल्टर हे अख्खी अमेरिका मैल आणि फुटांच्या भाषेत बोलत असताना किलोमीटर आणि मीटरच्या भाषेला पुढे आणू लागले होते, त्यातूनच त्या न्यू मेक्सिकोच्या पठारावर त्यांनी एक मैल बाय एक कि.मी. असा आयताकृती तुकडा ‘लायटनिंग फील्ड’ निवडला. इथल्या निसर्गासाठीच काही तरी करायचं, हे ठरवून त्यांनी विजांना आकर्षित करणाऱ्या त्या खांबांची रचना केली. तोवर वॉल्टर हे यत्नसूक्ष्मतावादी आणि संकल्पनावादी (कन्सेप्च्युअल) दृश्यकलावंत म्हणून ओळखले जात. १९७७ च्या ‘लायटनिंग फील्ड’नंतर त्यांचा उल्लेख ‘इकॉलॉजिकल आर्टिस्ट’ या बिरुदानंदेखील होऊ लागला.
या नोंदी अर्थातच इंटरनेटवरल्या पन्नास-साठ संकेतस्थळांवरून इथं आल्या आहेत. पण कलेच्या संकल्पनांचा इतिहास हा असा (खरोखरच प्रत्यक्षात) घडलेला असताना आपण इतके संथ कसे काय चालू शकतो? ‘संथ चालायचं नाही’ मग काय करायचं? पळायचं?.. कदाचित हो!
भारतात आणि महाराष्ट्रातही ‘लँड आर्ट’साठी पैसा आणि संस्थात्मक आधार सोडून अन्य साधनांची कमतरता नाही. आपली आत्ता दिसणारी ‘लँड आर्ट’ ही सहसा सजावटखोर आहे, परंतु आपल्याला कलेच्या इतिहासात पुढे जायचं असेल तर आधी तो इतिहास ‘पादाक्रांत’ करायला हवा, त्याखेरीज ‘पुढे’ कसं जाणार? हे जे पादाक्रांत करणं आहे, त्यासाठी आपल्याला पळावं लागेलच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2013 1:07 am

Web Title: indian floor art land art
Next Stories
1 निर्हेतुक, सहेतुक
2 प्रकाशाचे डोही, प्रकाशतरंग..
3 प्रकाशरचनांचे अनुभव
Just Now!
X