29 February 2020

News Flash

लौंदासी भिडवावा..

दिवाळीपासून ऑनलाइन व्यवहारांना आपल्याकडे मोठीच गती आली असून वेबसाइट्सच्या भव्य सवलत विक्रीस प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे.

| December 8, 2014 12:46 pm

दिवाळीपासून ऑनलाइन व्यवहारांना आपल्याकडे मोठीच गती आली असून वेबसाइट्सच्या भव्य सवलत विक्रीस प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे.  आता संघटित किराणा क्षेत्राने या नव्या क्षेत्राच्या विरोधात हवा तापवण्यास सुरुवात केली आहे. मात्र आपले भले होत असेल तर जनतेने अशा रडगाण्यांना किंमत देऊ नये आणि स्पध्रेची भलामण करावी.  
संसदीय आणि विधानसभीय कारणांनी गेला आठवडा गाजत असल्यामुळे एका महत्त्वाच्या घटनेकडे सार्वत्रिक दुर्लक्ष झाले. ती म्हणजे किराणा क्षेत्रात उतरलेल्या बडय़ा उद्योगसमूहांचे सार्वत्रिक अरण्यरुदन. रिलायन्स, बिर्ला, भारती, बिग बझार चालवणारा फ्यूचर ग्रुप, शॉपर्स स्टॉप आदी उद्योगसमूहांच्या रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने केंद्र सरकारला एक निवेदन सादर केले असून त्याद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून व्यापारउदीम करणाऱ्या नव्या कंपन्यांच्या विरोधात तक्रार केली आहे. त्यांचे म्हणणे असे की अशा माध्यमांद्वारे विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या कंपन्या ग्राहकांना अवाच्या सव्वा सवलती देतात आणि त्यामुळे आमच्या दुकानांवर परिणाम होतो. या बडय़ा कंपन्यांचा रोख आहे तो अ‍ॅमेझॉन, फ्लिप कार्ट, स्नॅप डील आदींतर्फे इंटरनेटीय माध्यमातून होणाऱ्या ऑनलाइन विक्री व्यवहारांवर. गेले तीन महिने, विशेषत: दिवाळीपासून, अशा ऑनलाइन व्यवहारांना आपल्याकडे मोठीच गती आली असून या वेबसाइट्सच्या भव्य सवलत विक्रीस प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. यामुळे आतापर्यंत अशा सवलतीने विक्री व्यवहार करणाऱ्या दुकानांचे आकर्षण मोठय़ा प्रमाणावर कमी होताना दिसते. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे आत्मचरित्र आगामी काळात प्रसिद्ध होणार असून त्याची विक्री सुरुवातीच्या काळात अशा पद्धतीच्या फक्त माहिती महाजालीय विक्री केंद्रांद्वारेच होणार आहे. याचा अर्थ हे पुस्तक पहिले काही आठवडे पुस्तकांच्या पारंपरिक दुकानांतून उपलब्धच होणार नाही. यामुळे पारंपरिक ग्रंथविक्रेते संतप्त झाले आहेत. परिणामी हे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या प्रकाशन संस्थेवर बहिष्कार घालावा किंवा काय याची चाचपणी त्यांच्याकडून होत असून वर उल्लेखलेल्या बडय़ा दुकानांच्या अरण्यरुदनात या ग्रंथविक्रेत्यांनीदेखील आपला सूर मिसळलेला आहे. या दुकानदारांचे म्हणणे असे की हे महाजालीय विक्रेते छापील किमतीपेक्षाही कमी किमतीला आपापली उत्पादने विकतात. खेरीज त्यांना दुकानांना द्यावा लागतो तो कोणताही कर आदी द्यावा लागत नाही. परिणामी त्यांना सर्व उत्पादने अति स्वस्तात देणे परवडते. तेव्हा सरकारनेच आता या महाजालीय महादुकानांवर स्वतंत्र करआकारणी करावी म्हणजे ते आमच्या तुलनेत स्वस्त माल विकू शकणार नाहीत.
शुद्ध मराठीत बडय़ा दुकानदारांच्या या रडगाण्यास चोरांच्या उलटय़ा.. म्हणावे लागेल. याचे कारण असे की जेव्हा या किरकोळ विक्री क्षेत्रात बडे उद्योगसमूह उतरले तेव्हा गावागावांतील कोपऱ्यावरच्या किराणा दुकानदारांनी या बडय़ांच्या विरोधात असेच रडगाणे गायले होते. या बडय़ा उद्योगसमूहांना भांडवलाची कमी नाही. त्यामुळे ते अतोनात सवलती देऊन उत्पादने विकतात, असा या पारंपरिक दुकानदारांचा आक्षेप होता. त्याकडे या बडय़ा उद्योगसमूही किराणा दुकानांनी दुर्लक्ष केले. आता या बडय़ांना महाजालीय दुकानांमुळे आव्हान मिळू लागल्यानंतर त्यांच्या तोंडी इतके दिवस छोटे पारंपरिक दुकानदार जी भाषा बोलत होते, ती भाषा आली आहे. हा काळाचा महिमा. तो प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर आपणास अनुभवास येतो. जेव्हा रस्त्यावर किरकोळ प्रवासासाठी घोडागाडय़ा वा टांगे होते तेव्हा यंत्रचलित रिक्षा आल्यावर या टांगेवाल्यांनी रडगाणी गायली होती. पुढे जेव्हा चारचाकी टॅक्सीज आल्या तेव्हा आमच्या पोटावर पाय आला म्हणून रिक्षावाल्यांनी बोंब ठोकली आणि आता जेव्हा मोठे भांडवल गुंतवून संघटितपणे कंपन्यांतर्फे जेव्हा टॅक्सीसेवा सुरू झाली तेव्हा पारंपरिक आणि हे नवे टॅक्सीवाले यांच्यात मतभेद निर्माण झाले. या प्रत्येक टप्प्यावर आमच्या पोटावर या नव्यांनी गदा आणली अशीच तक्रार आधीच्यांकडून झाली. आताही तेच होत आहे. फरक असलाच तर इतकाच की ही तक्रार करणारे हे देशातील काही दांडगे उद्योगसमूह असून तुलनेने, आíथक ताकदीत अगदीच नगण्य असणाऱ्यांकडून आपणास धोका आहे, असे त्यांना वाटू लागले आहे. या पाश्र्वभूमीवर देशातील किराणा क्षेत्राचे वास्तव जाणून घ्यावयास हवे. आपल्या देशात संपूर्ण किराणा क्षेत्राची उलाढाल जवळपास ३६ हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. यातील मोठा वाटा हा असंघटित क्षेत्राचा असून गावागावांतील साधी दुकाने त्यात मोडतात. या तुलनेत माहिती महाजालीय बाजारपेठेतून यंदाच्या वर्षांत झालेला व्यापारउदीम साधारण २४०० कोटी रुपये इतका आहे. याचा अर्थ या ऑनलाइनी व्यवहारांचा संपूर्ण किराणा व्यवहारातील वाटा दहा टक्केइतकाही नाही. या नव्या काळातील ऑनलाइनी व्यापार क्षेत्रात आगामी काळात मोठी वाढ अपेक्षित असून यंदाच्याच वर्षांत या क्षेत्रात तब्बल २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. गतवर्षांच्या तुलनेत ही गुंतवणूक चौपट ठरते. तेव्हा आगामी काळात या नव्या संगणकीय व्यापारप्रणालीस मोठीच मागणी येईल असा सर्वाचा होरा आहे. त्यामुळे पारंपरिक दुकानदार धास्तावले असून आपले काय होणार अशी भीती त्यांच्या मनात दाटू लागलेली दिसते. हे झाले भविष्याचे भाकीत. परंतु वास्तव हे आहे की या सर्व ऑनलाइनी कंपन्या सध्या मोठा तोटा सहन करीत असून यात अ‍ॅमेझॉन वा फ्लिप कार्ट यांचाही समावेश आहे. अ‍ॅमेझॉनची अमेरिकी शाखा वगळता भारतात या कंपनीस अद्याप नफा मिळण्यास सुरुवात झालेली नाही. परंतु तरीही संघटित किराणा क्षेत्राने या नव्या क्षेत्राच्या विरोधात हवा तापवण्यास सुरुवात केली आहे.
ही खास भारतीय लबाडी झाली. आपापल्या बाजारपेठा, नफे सुरक्षित करावयाचे आणि इतरांना ते मिळू नयेत यासाठी मोच्रेबांधणी करावयाची ही बनिया मानसिकता ही भारतीय उद्योग क्षेत्राचा महत्त्वाचा घटक राहिलेली आहे. या संदर्भात एक दाखला देणे आवश्यक ठरते. १९९१ साली उदारीकरणाच्या धोरणानंतर जेव्हा परकीय भांडवलास भारतात गुंतवणुकीची मुभा मिळाली त्या वेळी तोपर्यंत मुक्त बाजारपेठेचा पुरस्कार करणाऱ्यांनी बाजारपेठेवर नियंत्रणाची मागणी केली. या लबाडीचे कारण म्हणजे मुक्त बाजारपेठ धोरण अवलंबले गेल्यास आपल्याला आपल्याच क्षेत्रात स्पध्रेस तोंड द्यावे लागेल अशी भीती आपल्याकडील उद्योगी ढुढ्ढाचार्याना वाटू लागली. अशा लबाडांनी त्या वेळी एकत्र येऊन सरसकट मुक्त बाजाराच्या विरोधात बॉम्बे क्लब स्थापन केला होता. म्हणजे स्पर्धा हवी असे म्हणायचे, पण ती आपण सोडून इतरांच्या क्षेत्रात यावी असे प्रयत्न करावयाचे असे हे आपले धोरण.
आता जे काही घडत आहे त्यातून याच मानसिकतेचा प्रत्यय येतो. सतत सुरक्षित वातावरणात राहावे, या सुरक्षिततेतून आलेल्या आíथक ताकदीचा वापर करीत सरकारदरबारी आपणास हवी ती धोरणे पदरात पाडून घ्यावीत आणि त्याद्वारे आपली आíथक मक्तेदारी स्थापन करीत नव्यांच्या विरोधात मोच्रेबांधणी करीत राहावे हे उद्योग आपले उद्योगपती वारंवार करीत आले आहेत. आíथक साक्षरता बेतास बात असलेल्या आपल्या देशात हे असे कांगावे खरे मानले जातात आणि जनता ते करणाऱ्यांच्या मतास भुलते. तेव्हा आपले भले होत असेल तर जनतेने या अशा रडगाण्यांना किंमत देऊ नये आणि स्पध्रेची भलामण करावी.  
नव्या व्यापार पद्धतींमुळे काही काळ का होईना ग्राहकांचा फायदा होत असेल तर तो करून घ्यावा आणि त्याही पद्धतीस आव्हान देईल अशी व्यवस्था दिसू लागल्यास तिची कास धरावी. ठकासी व्हावे ठक आणि लौंदासी आणून भिडवावा दुसरा लौंद असे करण्यातच हित असते.

First Published on December 8, 2014 12:46 pm

Web Title: indian organized retail market louds voice against e commerce
टॅग E Commerce
Next Stories
1 ‘वाटण्या’च्या अक्षता!
2 स्वाभिमानाची डुलकी
3 निरंजनाची काजळी
X
Just Now!
X