जैवविविधता ही निसर्गाच्या दृष्टीनेच महत्त्वाची असते असे नाही तर माणसाच्या अस्तित्वासाठीही गरजेची असते. जैवविविधता राखली गेली नाही तर अनेक प्राणी, वनस्पती यांच्या प्रजाती धोक्यात येतात. शिवाय पर्यावरणाच्या हानीने दुर्घटनाही घडतात. जैवविविधता हीच जीवनाची आस व ध्यास असलेले भारतीय वैज्ञानिक कमल बावा यांना मिडोरी पुरस्कार जाहीर झाला आहे. जैवविविधता विषयात हा पुरस्कार जपानच्या एऑन एनव्हायर्नमेंट फाऊंडेशनच्या वतीने दिला जातो व तो एक लाख अमेरिकी डॉलरचा आहे. साठ देशांची नामांकने त्यासाठी आली होती, त्यातून त्यांची निवड करण्यात आली आहे.
बावा हे सध्या अमेरिकेतील बोस्टन येथे मॅसॅच्युसेट्स विद्यापीठात (एमआयटी) जीवशास्त्राचे मानद प्राध्यापक आहेत. त्यांनी ‘अशोका ट्रस्ट फॉर रीसर्च इन इकॉलॉजी अँड एन्व्हायर्नमेंट’ (अत्री) ही संस्था बंगळुरू येथे स्थापन केली व त्या माध्यमातून जैवविविधता क्षेत्रात मोठे कार्य केले.  संयुक्त राष्ट्रांनी २०११ ते २०२० हा काळ संयुक्त राष्ट्रांचा जैवविविधता दशक म्हणून जाहीर केलेला असताना एका भारतीय वैज्ञानिकाला त्याच विषयातील सर्वोच्च पुरस्कार मिळावा ही अभिमानाची बाब आहे.
 बावा यांचा जन्म पंजाबमध्ये ७ एप्रिल १९३९ रोजी झाला. त्यांनी बीएस व एमएस या पदव्या घेतल्यानंतर पंजाब विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. त्यानंतर १९६७ मध्ये ते अमेरिकेत आले व वॉशिंग्टन विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले. त्यांना त्या वेळी मारिया मूर्स कॅबॉट व चार्ल्स बुलार्ड संशोधन विद्यावृत्ती मिळाली होती. त्यांचे नंतरचे शिक्षण हार्वर्ड विद्यापीठात झाले. नंतर ते एमआयटी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांचे एकूण १८० शोधनिबंध प्रसिद्ध असून त्यात ‘सहय़ाद्रीज- इंडियाज वेस्टर्न घाट्स- अ व्हॅनिशिंग हेरिटेज’ हा त्यांनी लिहिलेला लेख तेथील पर्यावरण समस्येवर प्रकाश टाकणारा आहे. ‘कॉन्झर्वेशन अँड सोसायटी’ या नियतकालिकाचे ते प्रमुख संपादक आहेत, तर ‘इकॉलॉजी अँड सोसायटी’चे सहायक संपादक आहेत. त्यांचे संशोधन हे प्रामुख्याने पूर्व हिमालयातील हवामान बदलांविषयी आहे. प्रादेशिक पातळीवर हवामानाचे प्रारूप तयार करणे, हवामान बदलाचे कृषी व जैवविविधतेवर होणारे परिणाम नोंदवणे. स्थानिक ज्ञानावर आधारित पर्यावरण धोरणे तयार करणे यासंदर्भात आहे. विज्ञानाने सामाजिक गरजांना प्रतिसाद दिला पाहिजे असे ते म्हणतात. त्यासाठीच त्यांनी पश्चिम घाटातील जैवविविधतेवर संशोधन केले असून कृषी क्षेत्रातील जैवविविधतेला महत्त्व दिले आहे. मानवाने नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर बेदरकारपणे करणे टाळले तर जैवविविधता टिकेल, त्याचबरोबर त्याचाच घटक असलेला माणूस संकटात सापडणार नाही असे त्यांचे मत आहे.