अमेरिकेत  गाजत असलेल्या वायर फ्रॉड्सच्या अनेक प्रकरणांत अमेरिकी-भारतीयांनाच गोवले गेले आहे. रजत गुप्ता, मॅथ्यू मारतोमा, अमित कनोडिया, इफ्तिकार अहमद ते आता आशीष अगरवाल आणि निकेश अरोरा येथपर्यंतची नामावली म्हणजे विदेशात चमकणारे भारतीय मेहनती व प्रामाणिक नसल्याकडे अंगुलीनिर्देश करते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विदेशी भूमीत  यश कमवायचे तर त्या देशाच्या रीतिभाती लवकर आत्मसात करणे स्वाभाविकच आवश्यक; याहीपेक्षा महत्त्वाचे त्या देशाला तुमच्याकडून काय हवे त्या अनुरूप तुम्ही स्वत:ला घडवावे.. पेप्सिकोच्या अध्यक्षा इंद्रा नुयी मागे एकदा असे म्हणाल्या होत्या. भारतीयांचे अमेरिकेत विविध उद्योगक्षेत्रांवरील वाढत्या वरचष्म्याचे रहस्य हेच की, ते अधिकाधिक अमेरिकन आहेत, असेच त्या सुचवू पाहतात. एक महासत्ता म्हणून अमेरिकी महत्त्वाकांक्षेचे हमवतन नसतानाही ते पक्के पाईक आहेत. नुयींपासून अजय बांगा, शंतनू नारायण, अजित जैन, मनोज भार्गव ते सत्या नाडेला आणि सुंदर पिचाई वगरेपर्यंतचा लांबच लांब पंथ व प्रस्थ हेच सूचित करतो. या मंडळींची भारताशी जुळलेली नाळ म्हणून आपण त्यांचा उदोउदो करीत असलो तरी माध्यमांमध्ये त्यांच्या या वतनी नसण्याचा अभावानेच उल्लेख होत असतो.
अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली नामक सर्जक स्रोतातून प्रसृत नवनवीन तंत्रज्ञानात्मक नवीनतेचे जगाला विलक्षण आकर्षण व उत्सुकता आहे. तेथून नव्याचे सारखे सुरू असलेल्या सर्जनात भारतीयांचाच मेंदू व श्रम कामी येत असतो हे आता सर्वश्रुत आहेच. पण जगाची तंत्रज्ञानात्मक नावीन्याची कास खरोखरच अस्सल आíथक प्रवर्तनही घडवते काय? अर्थशास्त्राचे नोबेल विजेते रॉबर्ट सोलो ते जोसेफ स्टिग्लिट्झपर्यंत अनेक जण याबाबत साशंक आहेत. अर्थवृद्धीत सकल राष्ट्रीय उत्पादन- जीडीपीचे आकडे जर सर्वात महत्त्वाचे असतील, तर त्यात तंत्रज्ञानात्मक नावीन्यतेतून साधलेल्या वाढीचे नेमके योगदान मापणे अवघड असल्याचे या नोबेल विजेत्या द्वयींना वाटते. लेहमन ब्रदर्सचा डोलारा कोसळून हादरे बसण्याआधी अमेरिकी वित्तजगतालाही त्याच्या तंत्रज्ञानात्मक नावीन्यतेचा खूपच अभिमान होता. बारकाईने निरीक्षण केल्यास, तंत्रज्ञानावरील ही मदार बेमालूम बनवाबनवीचे, पकडले न जाता हेराफेरी करण्याचे, नसíगक बाजारशक्तींना वाकवण्याचे सोयीस्कर साधनही हळूहळू बनल्याचे आढळून येते. आíथक योगदानाचे सोडा, पण तंत्रज्ञानात्मक नावीन्याचे सामाजिक योगदान हे असे नकारात्मक निश्चितच आहे. उच्चशिक्षित भारतीयांनी ही साधने घडविली आणि त्यांचा फांदेबाजीसाठी वापर करणारे, किंबहुना पकडले गेले ते उच्चपदस्थ व विद्याविभूषित भारतीयच असा हा दैवदुर्वलिास आहे.
अमेरिकेच्या भांडवली जगतात सध्या गाजत असलेल्या वायर फ्रॉड्सच्या अनेक प्रकरणांत अमेरिकी-भारतीयांनाच गोवले गेले आहे. गोल्डमन सॅक्सचे माजी प्रमुख रजत गुप्ता, मॅथ्यू मारतोमा, अमित कनोडिया, इफ्तिकार अहमद ते आता आशीष अगरवाल आणि निकेश अरोरा येथपर्यंतची नामावली म्हणजे विदेशात चमकणारे सर्वच भारतीय मेहनती व प्रामाणिक नसल्याकडे अंगुलीनिर्देश करते. या साऱ्यांवर ते घरभेदी असल्याचा आरोप आहे. कोणत्याही कंपनीकडून उद्योगविषयक संवेदनशील निर्णयाची माहिती तो जगजाहीर होण्याआधी अंतस्थांना हाताशी धरून मिळवायची आणि त्या आधारे समभागांचे व्यवहार करून मोठा आíथक लाभ पदरी पाडून घ्यायचा. इनसाइडर ट्रेिडग नावाने ही कुप्रवृत्ती ओळखली जाते. जगात सर्वत्रच बाजार नियामकांचे याबाबत कडवे धोरण राहिले आहे. अमेरिकेत तर त्या विरोधात आजीवन कारावासापर्यंत दोषींना शासन करणारा कडक कायदा आहे.
अमेरिकेच्या बर्कले विद्यापीठातील पदवीधर, २७ वर्षीय आशीष अगरवाल दोन वष्रे जे पी मॉर्गन या जागतिक गुंतवणूक पेढीचा सॅनफ्रान्सिकोस्थित बँकिंग विश्लेषक म्हणून जून २०१३ पर्यंत कार्यरत होता. त्याला आपल्या जुन्या सहकाऱ्यांमार्फत हाताळल्या जात असलेल्या काही कंपन्यांच्या ताबा व विलीनीकरण व्यवहारांची कुणकुण लागली. आशीषने ही माहिती मग शहरियार बोलान्दियन आणि केवन सादिग या आपल्या साथीदारांपर्यंत पोहचविली. या माहितीचा खुबीने वापर करून या तिघांनी मग, संबंधित कंपन्यांच्या बाजारात सूचिबद्ध समभागांचे सौदे करून तब्बल सहा लाख डॉलरची माया कमावली. अमेरिकेची बाजार नियामक संस्था एसईसीने त्यांना ३० गुन्ह्य़ांखाली आरोपी बनविले आहे आणि या प्रत्येक गुन्ह्य़ासाठी कमाल २० वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
भारताच्या अपोलो टायर्स या कंपनीने अलीकडेच अमेरिकेतील कूपर टायर या कंपनीचे अधिग्रहण केले. एप्रिल २०१३ पासून म्हणजे दोन वष्रे आधीपासून या संबंधाने गंभीर स्वरूपाच्या वाटाघाटी उभय कंपन्यांत सुरू होत्या. अमित कनोडियाला याची खबर  वकील असलेल्या पत्नीकडून मिळाली. वाटाघाटीत अपोलो टायरची बाजू त्या पाहत होत्या. कनोडियाने ती त्याचा मित्र इफ्तिकार अहमदपर्यंत पोहचविली आणि त्यातून घडलेल्या व्यवहारातून ११ लाख डॉलर इतकी लबाडीची कमाई केली. लक्षणीय भाग म्हणजे कनोडियाला यातून मिळालेला हिस्सा त्याने िलकन चॅरिटेबल फाऊंडेशन या धर्मादाय संस्थेला हस्तांतरित केला. ही धर्मादाय संस्था म्हणजे कनोडियाच्या लबाडीच्या पशांना चढविलेला मुखवटाच असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.
मंदी ही अनेकांसाठी लबाडीची संधी असते. दिवाळखोरीच्या तोंडावर उभ्या असलेल्या कमजोर, गलितगात्र ग्रीसचे उरलेसुरले लचके तोडण्याची संधी साहजिकच अनेक लांडग्यांनी साधली. तेथील राजकीय अस्थिरता व परिणामी आíथक आघाडीवरील धसमुसळेपणाची बळी ठरलेल्या एका कंपनीचे दिवाळे काढून तिला गिळंकृत करण्याचा आरोप सॉफ्ट बँकेच्या निकेश अरोरावर आहे. या प्रकरणात पांढरपेशा गुन्ह्य़ाच्या अनेक सुरस क्लृप्त्या पुढे येत आहेत. हे निकेश अरोरा म्हणजे पूर्वाश्रमीचे गुगलचे मुख्य व्यवसाय अधिकारी होत. त्यांचे त्या वेळी वेतनमान म्हणे मायक्रोसॉफ्टच्या सत्या नाडेला यांना आज मिळत असलेल्या वेतनमानापेक्षाही खूप अधिक होते. सध्या ते जपानच्या सॉफ्ट बँकेचे उपाध्यक्ष आणि तिचे संस्थापक मासायोशी सन यांचे उत्तराधिकारी म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. दोन महिन्यांपूर्वी भारताच्या दौऱ्यात या दोहोंनी विविध ठिकाणी अब्जावधी गुंतवणुकीचे करार-मदार सरकारी मंत्रिगणांच्या उपस्थितीत केले आहेत. इतका सुस्थित प्रवास सुरू असताना त्यांना या अवदसेने घेरले आहे. आंशू जैन यांचे जर्मनीच्या सर्वात मोठय़ा डॉइशे बँकेच्या प्रमुखपदी आरोहण आणि त्यांना आता अकस्मात पायउतार व्हावे लागणे, यामागे सतानी लोभाची किनार आहे. युरोपाच्या वित्तीय आसमंतात ज्याला लायबोर घोटाळा म्हटले त्या विदेशी चलन विनिमय दरातील गरव्यवहाराच्या प्रकरणात अनेक बँका- वित्तसंस्था सामील आहेत. जैन यांच्या नेतृत्वाखालील डॉइशे बँकेतील विभागच या बँकांची मोट बांधून संगनमताने ही लबाडी करीत होता. अनेक युरोपीय व अमेरिकी बँकांनी दोषारोप कबूल करून मोठा आíथक दंड यातून सोसला आहे.
आजच्या क्लाऊड कॉम्प्युटिंगच्या युगात परंपरेला नव्हे तर नित-नवीनता, नवप्रवर्तनालाच मुजरा केला जातो; अमाप संधी निर्माण करणारा हा मार्ग आहे. पण जे आपल्या ध्येयावर कटाक्ष ठेवून पण निरंतर कात टाकत वेगाने पुढे सरकत राहतील तेच या संधींचे सोने करू शकतील.. बिल गेट्स, स्टीव्ह बामर यांच्या पंक्तीत महाकाय मायक्रोसॉफ्टची धुरा सांभाळताना सत्या नाडेला यांनी व्यक्त केलेले हे मनोगत. पण सत्याचे हे बोल नेमक्या विरुद्ध अर्थाने खरे ठरविणारा प्रत्यय वरील पांढरपेशा गुन्हेगारीच्या नमुन्यांतून पुढे आला आहे.
निष्कलंक, स्वयंप्रभ ज्योती, विशुद्ध चतन्याचा, भारतीय नेतृत्वाच्या मोठय़ा प्रासादिक पंथाचे जसे आज अमेरिकेवर गारूड आहे, तसेच सतानी प्रज्ञेच्या हॅकर्स, फिशर्स, स्कॅमर्सच्या प्रवाहाने भीतीही घातली आहे. आज कोणते पारडे जास्त झुकेल सोवळ्याचे की ओवळ्याचे- हा प्रश्न हा अमेरिकी व्यवस्थेसाठीच नव्हे तर अधिकाधिक खुल्या व बहुमुखी होत असलेल्या भारताच्या वित्तीय व्यवस्थेच्या दृष्टीने कळीचाच आहे.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indians charged with wire fraud in us
First published on: 29-08-2015 at 06:06 IST