खरे तर ज्ञानेश्वर व इतर संतांचे थोरपण एवढे स्पष्ट होते की, त्यांच्या नावाशी काहीही ‘चमत्कार’ जोडण्याची जरूर नव्हती. पण त्यांचे भक्त म्हणविणाऱ्यांनी तेही केले. ज्ञानेश्वरांनी निर्जीव भिंत चालविली व रेडय़ाच्या तोंडून वेद वदविले असे सांगितले जाते. तर तसे करायला ते काय कुणी जादूगार होते काय? पण ज्यांना त्यांचे थोरपण कशात होते ते कळत नाही  असे लोक अशा थापा मारतात..
शास्त्री पंडितांच्या वादविवादात गुंतून पडलेला व संस्कृत पोथ्यांत गुंडाळला गेलेला ‘गीतोपदेश’, समाजातील सर्वसामान्य माणसाच्या मनात व जिभेवर आणण्याचे महान कृत्य ज्या ‘भावार्थदीपिका’ किंवा ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाने केले तो ज्ञानदेवरचित ग्रंथ हा मराठी भाषेचे लेणे आहे. ज्ञानेश्वरी हे ‘संस्कृत गीतेचे मराठी भाषांतर’ नसून, तसेच तो स्वतंत्र ग्रंथही नसून ते गीतेवरील (तेराव्या शतकाच्या अखेरीस केलेले) साध्यासोप्या मराठीतील अतिसुंदर भाष्य आहे. गीतेवरील या ‘आद्य प्राकृत भाष्याने’ जनमनावर शतकानुशतके टिकला असा प्रभाव पाडलेला आहे.
असेच काहीसे पंधराव्या व सोळाव्या शतकात युरोपमध्ये घडून गेलेले आहे, त्याला ‘रिनेसन्स’ म्हणजे ‘पुनरुत्थान’ किंवा ‘प्रबोधन’ असे म्हणतात. या चळवळीने प्रथमत: लॅटिन भाषेतील बंदिस्त ज्ञान स्थानिक भाषांमध्ये आणण्याचे महत्कार्य केले. ‘बायबल’चे पहिले जर्मन भाषांतर मार्टिन ल्यूथरने केले. त्यानंतर इतर युरोपीय लोक-भाषांमध्ये बायबलची भाषांतरे झाली. त्यामुळे मार्टिन ल्यूथरच्या धर्मसुधारणेच्या कल्पनांचा युरोपभर प्रसार होऊ शकला. युरोपातील प्रबोधनाचा परिणाम केवळ धार्मिक विचारांवरच नव्हे तर वैज्ञानिकांनी त्याच सुमारास लावलेल्या इतर शोधांमुळे (उदाहरणार्थ, सूर्यकेंद्रित ग्रहभ्रमण, नवीन समुद्रमार्ग, जगाचे नवीन भूभाग, होकायंत्र, कागद, मुद्रणकला, बंदुकीची दारू इत्यादी) आणि प्रबोधनांतील बुद्धिप्रामाण्यानुसार, तर्कशुद्ध विचारसरणी व वस्तुनिष्ठ निरीक्षणाची आवश्यकता अशा कल्पनांना ‘निसर्गाचा व निसर्गशक्तींचा उपयोग, मानवी हितासाठी करणे योग्य आहे’ या शिकवणुकीची जोड मिळाल्यामुळे, चौकस वृत्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्याला व विकसित होण्याला मोठी प्रेरणा मिळाली. अशाप्रकारे प्रबोधनाच्या विचारसरणीमुळे पुढील काळात युरोपीय राष्ट्रे, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती करू लागली व त्यामुळे जग बदलू लागले.
ज्ञानेश्वरांचा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहून झालेला आहे. म्हणजे त्याचा प्रभाव काळ चौदाव्या शतकापासूनचा म्हणजे रिनेसन्सच्या काहीसा आधीचाच आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे संन्यास घेऊन नंतर गुरूच्या आज्ञेने गृहस्थाश्रमात परतलेले होते व त्यानंतर त्यांना निवृत्ती, ज्ञानेश्वर व सोपान हे तीन मुलगे आणि मुक्ताबाई ही मुलगी अशी चार मुले झालेली होती. त्यामुळे त्या काळी ‘दक्षिणकाशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘पैठण’च्या धर्मपीठाने त्यांचे ब्राह्मणत्व नाकारले व त्यांच्या आई-वडिलांना देहदंडाची शिक्षा ठोठावली. त्याप्रमाणे आईवडिलांनी स्वत: देहत्याग करूनसुद्धा आणि मुलांनी धर्मपीठात आपले पांडित्य दाखवूनसुद्धा धर्मपीठाने मुलांचा ब्राह्मण म्हणून स्वीकार केला नाही. त्यामुळे त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीत जगावे लागले. त्या सुमारास त्यांच्यात ज्येष्ठ असलेल्या निवृत्तीने ‘नाथपंथीय गुरू गहिनीनाथ’ यांचे शिष्यत्व स्वीकारले व ते निवृत्तीनाथ बनले. नाथसंप्रदाय हा मूळचा पंजाबमधला, गोरखनाथांनी स्थापन केलेला, हटयोगाची कठीण साधना करणारा ‘शैव पंथ’ होता व तो ‘बुद्धपरंपरासुद्धा’ मानणारा पंथ होता. एकेकाळी भारताच्या अनेक भागांत हा नाथपंथ पसरलेला होता. ज्या चार भावंडांना ‘संन्याशाची पोरे’ म्हणून हिंदू धर्मपीठाने आसरा नाकारला त्यांना नाथपंथाने मात्र आपल्यात सामावून घेतले. निवृत्तीनाथ या त्यांच्या वडील भावालाच ज्ञानेश्वरांनी स्वत:चा गुरू मानलेला आहे. त्यामुळे किंवा कशामुळेही असेल पण ज्ञानेश्वरी या ग्रंथावर केवळ शैवपंथाचाच नव्हे, तर ‘बुद्धविचारांचाही’ प्रभाव आहे असे नक्की म्हणता येते. (उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरांचे अहिंसा व शांतरसाविषयींचे प्रेम). निवृत्तीनाथांच्याच आज्ञेवरून ज्ञानेश्वरांनी अत्यंत सुंदर काव्यरचनेद्वारे कर्मकांड, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा आदींच्या विरोधात लोकशिक्षण देऊन, परिस्थितीने हतबल झालेल्या सामान्य जनतेला, भक्तिमार्गाकडे वळविण्याचे महान कार्य सुरू केले, जे त्यांच्यानंतरची चार शतके इतर अनेक संतांनी चालू ठेवले व वाढविले.
व्यवहारात नसली तरी निदान अध्यात्मात तरी सर्वामध्ये ‘समता’ असावी म्हणून संतांनी त्यांचा भक्तिमार्ग सर्वासाठी खुला ठेवला. नामस्मरण करण्याचा, अभंग रचण्याचा, भक्ती करण्याचा हक्क प्रथमच सर्वसामान्यांना प्राप्त झाला. त्यामुळे नामदेव शिंपी, सेना न्हावी, रोहिदास चांभार, बंका महार, चोखामेळा, संत सखुबाई, संत कान्होपात्रा, भागू महारीण असे किती तरी संत सर्व जातीजमातींतून निर्माण झाले व त्यांनी अभंग रचना केल्या. संतांनी लोकांना असा उपदेश केला की, ‘लोकहो ईश्वरप्राप्तीसाठी काहीही कर्मकांड नको व कुणी मध्यस्थ, पुरोहित नको. तुम्ही स्वत: देवाचे नामस्मरण करा व विठ्ठलाची भक्ती करा.’ त्यामुळे संतसंप्रदाय हा महाराष्ट्रात अस्पृश्यांसह सर्व बहुजन समाजाचा मुख्य धर्म बनला. पण समतेला विरोध असलेले सनातनी शास्त्रीपंडित जे स्वत:लाच पृथ्वीवरचे देव समजत होते ते संतांपासून दूर राहिले, बहुजन समाज मात्र विठ्ठलभक्तीत सुखसमाधान मानू लागला.
शिव व पार्वती या मूलत: आर्येतरांच्या देवता आहेत. ‘शैवपंथ’ हा शिवाला ‘ईश्वर’ मानणारा पंथ. या पंथामध्ये अनेक उपपंथ असून ‘नाथपंथ’ हा त्यापैकीच एक शैवपंथ आहे, परंतु तो ‘योगप्रधान शैवपंथ’ आहे. ज्ञानेश्वरांनी मात्र ‘योगा’ऐवजी ‘भक्ती’वर भर दिला. तसेच विठ्ठलाची भक्ती ही मूलत: ‘विष्णुभक्ती’ आहे, कारण विठ्ठल (पांडुरंग) हा कृष्ण या विष्णू अवताराने घेतलेला अवतार आहे असे मानले जाते. ज्ञानेश्वरांनी शंकराचार्याचे अनुकरण करून ‘शिवभक्ती’ व ‘विष्णुभक्ती’ एकरूप केली. तसेच त्यांनी ज्ञानमार्ग (निर्गुणोपासना) व भक्तिमार्ग (सगुणोपासना) हे दोन्ही मार्ग तत्त्वत: एकच आहेत, असे सांगितले. संत नामदेव, एकनाथ, तुकाराम, जनाबाई व संत चरित्रकार महिपती यांनी विठ्ठलाला ‘बुद्धरूपात पाहिले’ आहे, असे उल्लेख त्यांच्या वाङ्मयात आहेत. त्यामुळे वारकरी पंथावर आणि एकूणच भक्तिसंप्रदायावर, बुद्ध विचारांचा प्रभाव आहे, या मताला पुष्टी मिळते.
ज्ञानेश्वर व सगळेच संत मोठे बंडखोर होते. त्यांनी मंत्रतंत्र, भूतपिशाच, गंडेदोरे, चमत्कार वगैरे अनेक अंधश्रद्धा नाकारलेल्या आहेत. ‘मंत्राने जर शत्रू मरत असेल तर तलवार कशाला पाहिजे?’ असे ज्ञानेश्वर म्हणतात. (तरी आजही कित्येक तथाकथित सुशिक्षित लोकसुद्धा मंत्रसामर्थ्यांवर विश्वास ठेवतात!) खरे तर ज्ञानेश्वर व इतर संतांचे थोरपण एवढे स्पष्ट होते की, त्यांच्या नावाशी काहीही ‘चमत्कार’ जोडण्याची जरूर नव्हती. पण त्यांचे भक्त म्हणविणाऱ्यांनी तेही केले. ज्ञानेश्वरांनी निर्जीव भिंत चालविली व रेडय़ाच्या तोंडून वेद वदविले असे सांगितले जाते. तर तसे करायला ते काय कुणी जादूगार होते काय? पण ज्यांना त्यांचे थोरपण कशात होते ते कळत नाही व ज्यांना अशा अफवा पसरविण्यात आनंद होतो असे लोक अशा थापा मारतात आणि मग भोळे लोक त्यावर विश्वास ठेवतात.
या प्रकरणाच्या अखेरीस हाही एक फरक लक्षात घेऊ या की, युरोपातील प्रबोधनाच्या चळवळीने बुद्धिप्रामाण्य, तर्कशुद्ध विचारसरणी, वस्तुनिष्ठ निरीक्षणाची आवश्यकता इत्यादी गुणांना जसे किंवा ज्या प्रमाणात प्रोत्साहन दिले तसे किंवा त्या प्रमाणात, याबाबतीत तरी, ज्ञानेश्वरीने काही केलेले दिसत नाही. दुसराही एक मुद्दा आहे. इ.स. १२९० मध्ये ज्ञानेश्वरी लिहिली गेली. त्यानंतर तीनच वर्षांनी अल्लाउद्दीन खिलजीची देवगिरीच्या यादव राजांवर पहिली स्वारी झाली. इ.स. १२९६ मध्ये ज्ञानेश्वरांनी आळंदीस जिवंत समाधी घेतली. त्यानंतरही उत्तरेतील मुसलमान आक्रमकांचे महाराष्ट्रात व दक्षिण हिंदुस्थानावर हल्ले व अत्याचार होतच राहिले. परंतु गीतेने अर्जुनाला जसे भर देऊन युद्ध लढायला प्रवृत्त केले, तसे ज्ञानेश्वरीने येथील जनतेला युद्धप्रवृत्त केले असते, तर येथील सामान्य लोकांनी, आक्रमकांपुढे मान खाली घालण्याऐवजी, जोरदार प्रतिकार करून, दक्षिण हिंदुस्थानात तरी हल्लेखोरांची राज्ये होऊ दिली नसती, असे आपले माझ्या अल्पमतीला वाटते.

Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
kolhapur lok sabha marathi news, hatkanangale marathi news
सन्मान नाही तोवर प्रचार नाही; संजय पाटील यांची धैर्यशील माने यांच्यावर नाराजी