इन्फोसिसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य संचालक या पदावर डॉ. विशाल सिक्का यांची नियुक्ती झाली या बातमीने आनंद साजरा करावा की, इन्फोसिस हे आपले मधले अपत्य असे  मानणारे एन. आर. नारायण मूर्ती कंपनीच्या कार्यकारी संचालकपदावरून पायउतार झाले म्हणून खेद व्यक्त करावा, अशा दुविधेत या कंपनीतील कर्मचाऱ्यांबरोबरच इन्फोसिसच्या यशाचे चाहतेही असतील. एक मात्र खरे की, भारतातील संगणकीय क्रांतीच्या आघाडीवर असलेल्या या कंपनीला गेल्या काही वर्षांपासून ग्रहण लागले आहे, ते सिक्का यांच्या आगमनाने सुटेल असे सर्वानाच वाटत आहे. सिक्का हे संगणक शास्त्रज्ञ. या पूर्वी     त्यांनी सॅप एजी या बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीच्या उत्पादन विभागाचे नेतृत्व केले आहे. सॅपच्या यशातील त्यांचा वाटा मोठा आहे. त्यांच्या नियुक्तीची माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत नारायण मूर्ती यांनी, सिक्का म्हणजे भरपूर पसे अशी  त्यांची ओळख करून दिली. हे लक्षणीय आहे. याचा अर्थ इन्फोसिस अगदी खड्डय़ात वगरे चालली आहे, असा नाही. परंतु समस्या होत्या. म्हणून तर वर्षभरापूर्वी नारायण मूर्ती यांना आपली निवृत्तीची वसने उतरवून पुन्हा इन्फोसिसचे चक्र हाती घ्यावे   लागले होते. ते आल्यानंतर परिस्थिती सुधारली. एका वर्षांत कंपनीचा महसूल दुप्पट झाला. नवे २३८ ग्राहक मिळाले. टीसीएस आणि विप्रो या स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत हे कमीच होते. परंतु नारायण मूर्ती यांनी कंपनी सावरली, हे आकडेच सांगत होते. परंतु हे पुरेसे नव्हते. इन्फोसिसची समस्या होती ती ही, की आता तेथे माणसे टिकत नव्हती. मूर्ती जून २०१३ला परतले तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीला १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राम राम ठोकला आणि मध्यम स्तरावरील तर ५००हून अधिक अधिकारी       सोडून गेले, अशी मोजदादच एका आर्थिक वृत्तपत्राने केली आहे. ज्या कंपनीत नोकरी मिळावी म्हणून एकेकाळी आयटीतले अव्वल मोहरे जीव टाकत होते, तेथे अशी परिस्थिती निर्माण होणे याचा सोपा अर्थ हाच होता, की कंपनीपुढे नेतृत्वाची समस्या होती    आणि मूर्ती हे या कंपनीकडे केवळ कौटुंबिक पद्धतीने पाहत होते. परतताना आपल्याबरोबर कार्यकारी सहायक म्हणून आपल्या मुलाला आणणे हा त्याचाच भाग. परतून आल्यानंतर त्यांनी इन्फोसिसला बाजारातला वाटा मिळवून दिला, हे खरे. परंतु त्याचा दुसरा अर्थ हा, की या कंपनीला चालवायचे तर चालकाच्या  जागेवर नारायण मूर्तीच हवेत. संस्थापकांशिवाय अन्य कोणाच्या हाती चाके गेल्यास ती खड्डय़ाकडेच वळणार. याला व्यावसायिक पद्धतीचे व्यवस्थापन म्हणत नाहीत. इन्फोसिसमध्ये नेमका त्याचा अभाव दिसला. या पाश्र्वभूमीवर सिक्का यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे या पदावर इन्फोसिसच्या संस्थापकांपकीच कोणा एकाला नेमण्याचा रिवाजही संपुष्टात आला, हे एक बरे झाले. यामुळे कंपनीत व्यावसायिकतेचे नवे वारे वाहण्यास मदतच होईल. मूर्ती यांनी ती गरज ओळखली यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत. त्यांच्याबरोबरच कार्यकारी उपाध्यक्ष एस. गोपालकृष्णन हेही येत्या शनिवारी सूत्रे खाली ठेवतील. मूर्ती यांचे चिरंजीव रोहन हेही यापुढे कंपनीत नसतील. एकंदर सिक्का यांना आपला व्यावसायिक धाक निर्माण करण्यासाठी पूर्ण मोकळीक असेल. त्यांचा िपड संशोधकाचा. सॅपमध्येही ते नव्या उत्पादनांच्या निर्मितीत अधिक रमत. आता मात्र त्यांना आपली व्यवस्थापन कौशल्येही परजावी लागतील. त्यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी यशस्वी व्हावी, इन्फोसिस नावाचा सिक्का जगात पुन्हा चमकावा, अशीच सर्वाची भावना असेल. याचे कारण इन्फोसिस म्हणजे केवळ एक संगणक कंपनी नाही. तो भारतातील संगणकीय क्रांतीचा शुभंकर आहे.