01 June 2020

News Flash

१८८. निर्झरु

अनंत वासनांच्या अतृप्त भुकेमुळेच जन्म-मरण आणि पुन्हा जन्म अशी वणवण सुरू आहे! आता हा वासनापुंज कुठे असतो? तो अंत:करणातच असतो ना? चित्तातच असतो ना?

| September 24, 2014 12:24 pm

अनंत वासनांच्या अतृप्त भुकेमुळेच जन्म-मरण आणि पुन्हा जन्म अशी वणवण सुरू आहे! आता हा वासनापुंज कुठे असतो? तो अंत:करणातच असतो ना? चित्तातच असतो ना? आता इथे भुकेची उपमा वापरल्याने पोटाचा उल्लेख आला पण ‘त्याच्या पोटात काय आहे कोण जाणे,’ ‘पोटात एक आणि मुखावाटे एक’ असंही आपण म्हणतोच. म्हणजेच अंत:करणालाही आपण ‘पोटा’ची उपमाही सहजतेनं देतो. मग याच चित्तात, याच ‘पोटा’त माउली म्हणतात त्याप्रमाणे, जैसा अमृताचा निर्झरु। प्रसवे जयाचा जठरु। तया क्षुधेतृषेचा अडदरु। कंहींचि नाहीं।। त्याच पोटात अमृताचा निर्झर प्रकटला तर? प्रत्येक शब्द कसा चपखलपणे आला आहे! पोटातच गर्भ वाढतो. अतृप्त वासनांचा गर्भही या ‘पोटा’तच वाढतो. तोच प्रसवतो आणि मग त्या इच्छांच्या पालनपोषणात जन्म सरून जातो. पण त्याच ‘पोटा’त अतृप्त इच्छांऐवजी ‘अमृत’ प्रकटलं आणि ‘अमृत’च प्रसवू लागलं तर? मग तिथे क्षुधा म्हणजे भूक आणि तृषा म्हणजे तहान यांचा ‘अडदरू’ म्हणजे धाक, भीती, दडपण, ओझं काहीच उरणार नाही! आता हे ‘अमृत’ कोणत? ही ‘क्षुधातृष्णा’ कोणती आणि  हे ‘अडदरू’ कोणतं? क्षुधातृष्णा म्हणजेच वासनेची तहानभूक, हे उघड आहेच. आता आपल्या अतृप्त इच्छा आपल्या मनाला किती अस्थिर करतात, किती नाचवतात, किती अशांत करतात. हाच ‘अडदरू’. याच वासनांच्या ओढीनं आपण अखंड धडपडत असतो, पण त्या धडपडीनंतरही आपल्या प्रयत्नांना यश येईल की नाही आणि आपल्या इच्छेची पूर्ती होईल की नाही, हे अज्ञातच असतं. माणसाला या अज्ञाताचीच भीती असते! उद्या काय होईल, हे माहीत नसल्यानं उद्याच्या काळजीनं आपलं आजचं जगणंही अशांत होतं, इतकी या भीतीची पकड मोठी असते. मग याच अंत:करणात अतृप्त वासनांच्या ओढीच्या गर्भाऐवजी ‘अमृत’ प्रसवलं तर? आता अमृतचा शब्दश: अर्थ जे मृत नाही वा कधीच मृत होत नाही ते, असा आहे. अर्थात अमर. तसं पाहाता आपल्या वासना, इच्छाही अमरच तर असतात! त्या कधीच नष्ट होत नाहीत. त्यांची कधीच तृप्ती होत नाही. इथे ‘अमृत’  या शब्दांतून त्या इच्छा अभिप्रेत नाहीत. कारण त्या अमर पण अपूर्ण इच्छा माझं जगणं समृद्ध करीत नाहीत, परिपूर्ण करीत नाहीत, जीवनाचा खरा हेतू साधून देत नाहीत. मग हे ‘अमृत’ काय आहे? तर ते असं अमृत आहे ज्याच्या प्रसवण्यानं माझ्या चित्तातील क्षुधातृष्णांच्या पूर्तीची भीती नष्ट होते, अर्थात त्या क्षुधातृष्णेचा माझ्या अंत:करणावर असलेला प्रभाव, पगडाच ओसरतो. हे अमृत म्हणजे शाश्वताचं अखंड भान, शाश्वताचं अखंड प्रेम, शाश्वताचं अखंड स्मरण, शाश्वताचं अखंड अनुसंधान! हे अमृत नुसतं प्रकटत नाही त्याचा निर्झरच असतो! नीर झर.. सतत झरत राहणारं पाणी. जीवनाचे प्रापंचिक आणि पारमार्थिक हे दोन्ही किनारे समृद्ध करीत अवघं जीवनच संपन्न करणारं पाणी! शाश्वताच्या अखंड अनुसंधानरूपी अमृताचा निर्झरच जेव्हा अंत:करणातून प्रसवू लागतो तेव्हा भौतिकाची, अशाश्वताची कुठली तहान आणि कुठली भूक?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2014 12:24 pm

Web Title: insatiable desires
Next Stories
1 सुतावरून युती
2 दिखाऊ फिजी लोकशाही..
3 तिढा सुटला, तेढ कायम
Just Now!
X