एक्स्प्रेस हायवेवरील अपघातांच्या कारणांबाबत ‘लोकसत्ता’च्या पहिल्या पानावरील वृत्ताचे प्रयोजन कळत नाही. (लोकसत्ता, ३ फेब्रु.) भूगर्भीय लहरी आणि त्याचा महामार्गावरील अपघाताशी संबंध लावणे योग्य नाही. त्यांनी सांगितलेल्या लहरी (तरंग) म्हणजे वास्तुशास्त्र व त्यातील अनेक गोष्टींशी संबंधित आहे का? हे तरंग कुठून आणि कसे येतात याचा काही उल्लेख नाही. या तरंगांची इतर शास्त्रीय महती काय आहे? हे तरंग कसे उत्पन्न होतात? याला काही वैज्ञानिक आधार आहे? यासाठी कुठले उपकरण वापरले जाते का? याचा काहीही उल्लेख नाही. पिंपळीकर व खरात यांनी अपघातग्रस्त चालकांची तपासणी केली आहे का? त्यांचे रक्तदाब व नाडी तपासली आहे का? या संशोधनात कुणी वैद्यकीय माणूस होता का? अशा बातमीवरून एक जुनी आठवण सांगतो. एका विवाहित जोडप्याला संतती होत नव्हती. त्यांना एका वास्तुतंत्रज्ञाने घरात बांधकामात काही बदल सुचविले आणि आता संतती होईल, असे सांगितले. त्याप्रमाणे त्या पती-पत्नी यांनी घरात काही हजार रुपये खर्च करून तसे बदल करून घेतले. अनेक वष्रे झाली तरी अजून तेथे बाळ आले नाही. आता वयानुसार त्या पत्नीला संतती होणे संभवत नाही. काही लोक आपली टिमकी वाजवायला अनेकदा बादरायण संबंधांचा उपयोग करतात, कारण झटपट प्रसिद्धी मिळते. हा असाच प्रकार आहे. या अपघातात एक प्रमुख कारण म्हणजे यातील काही भाग concrete चा आहे. अशा रस्त्यावर अति वेगाने वाहन चालविल्यास घर्षण होऊन उष्णता निर्माण होते व बरेच वेळा टायर फाटतो. बाकी अनेक कारणे असू शकतात, पण वरील तरंग हे कारण नाही. मी भूकंप विषयात गेली चाळीस वष्रे संशोधन करत आहे, भूगर्भातील विविध तरंगांचा अभ्यास केला आहे, पण असे  तरंग असल्याचे माल माहीत नाही व संदर्भग्रंथात दिसत नाही. ‘लोकसत्ता’त असा लेख बघून आश्चर्य वाटले. समाजात गरसमज पसरणार नाहीत, याची काळजी सर्वानीच घेतली पाहिजे.
डॉ. अरुण बापट

केवळ चच्रेला गती नको
द्रुतगती मार्गावरील अपघातांबद्दल ‘लोकसत्ता’तील बातमीत बरंच विचारमंथन केलं गेलं आहे. त्यात भूगर्भीय लहरींबद्दलचा अभ्यासही पुढे आणला आहे, पण शेवटी मुद्दा मानवी मनावरच्या नियंत्रणाचा उरतोच ना! हे खरं आहे की, द्रुतगती मार्गावर असे बरेच पट्टे आहेत की, तिथे मानवी श्रांत मन विश्रामावस्थेत पोहोचू पाहातं, स्टीअिरगवरचं आणि गाडीच्या वेगवर्धकावरचं नियंत्रण ढिलं पडू लागतं, वेग १००च्या पुढे केव्हा गेला हे छोटय़ा गाडय़ांच्या चालकांच्याही लक्षात येत नाही. सरळ लांबलचक मार्गावरती काहीच करायचं नसल्यानं अन्य विचारात गढून जाऊन म्हणा किंवा पेंग येऊन म्हणा चालकाचं नियंत्रण गेलं, की आधीच थिरकणारी छोटी गाडी नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. मग भूगर्भीय म्हणा, मनगर्भीय म्हणा, कुठल्याही हालचाली पुरतात तिला मार्ग सोडून भरकटायला. ‘आरंभशूर’ शासनयंत्रणा मग आपल्या स्पीडगनवरची धूळ झटकणार आणि एके दिवशी संपूर्ण वर्षभराची वसुली करणार. मग ‘येरे माझ्या मागल्या’. हे सारं टाळायचं असेल तर चालकांनीच काळजी घ्यावी. आपल्या गाडीच्या कुवतीप्रमाणे वेगावर नियंत्रण ठेवावं, टायर तपासावेत, योग्य ते निर्देश इतर गाडय़ांना योग्य वेळी आणि आपल्या हालचालीपूर्वी देण्याची खबरदारी घ्यावी, एखाददुसऱ्या चालकाचं चालवणं अर्निबध वाटत असेल तर त्याचा नंबर गाडीतील प्रवाशांनी टिपून जवळच्या मदतकेंद्रावर द्यावा आणि पुढच्या टोलनाक्यावरच्या किंवा मदतकेंद्राच्या पोलिसांना त्यावर कारवाई करण्याची विनंती करावी. शेवटी ‘अपुले जीवन अपुल्या हाती’ हेच खरं.
श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे</p>

अडगळ दूर झाली, तर मराठी समृद्ध होऊही शकेल
अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ‘समृद्ध अडगळ’ दर तीन वर्षांनी घ्यावी, ही ‘लोकमानस’मधील पत्रलेखकाची सूचना ताबडतोबीने मान्य करावी अशीच आहे. (२ फेब्रु.) प्रचंड खर्चाचे हे संमेलन, खऱ्या अर्थाने मराठीच्या विकासातील अडगळ ठरू पाहत आहे. हा खर्च वाचला तर, त्यायोगे काही तरी योजना काढून, वाचकांना स्वस्तात मराठी पुस्तके देत येतील का ते बघावे. वाचनसंस्कृती वाढली तरच मराठीचे खरे भले होईल, हे उघड आहे. अशा मोठय़ा संमेलनातून नेमके हाती काय लागते, हा खरोखर वादाचा विषय बनला आहे. शरद पवारांचे भाषण ऐकण्यासाठी संमेलनाला कशाला जायला हवे? अमुक एखाद्या संमेलनातून एखादा नवीन प्रतिभावान लेखक, कवी उदयाला आलाय, असे घडणे आपल्या व्यवस्थेत सध्या शक्य नाही. मोठय़ा संमेलनाला नुसतीच गर्दी असते. त्यातून लेखक, वाचक संवाद वगैरे कोणत्याही गोष्टी संभवत नाहीत. संमेलनाध्यक्ष निवडणूक प्रक्रिया एवढी बालिश नि हास्यास्पद आहे की, वाचक, रसिकांना हवा असलेला साहित्यिक निवडून येणे केवळ दुरापास्त आहे. अशा स्थितीत संमेलन तीनच नव्हे, तर दर पाच वर्षांनी एकदा भरवले जावे. अध्यक्षाला काम करायचेच असेल तर पुरेसा वेळ तरी मिळेल. शासनाचे अनुदान व वाचलेला निधी, संमेलन टाळल्याने यातून मराठीचे भले करण्याच्या अनेक योजना राबविता येतील. तरुण, होतकरू लेखकांची पुस्तके छापण्यासाठी निधी द्यावा. कर्नाटकात बिदर येथे बस स्थानकावर तिथल्या सरकारने सुसज्ज ग्रंथालय उभारले आहे. कन्नड भाषेतली पुस्तके, लेखकांची छायाचित्रे, परिचय तिथे बघायला मिळतो. महाराष्ट्रातही किमान जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी तरी, बस स्थानकात मराठी भाषेतली अशी पुस्तकालये उभारावीत.
अ‍ॅड.  प्रभाकर येरोळकर, लातूर</p>

वेगावर र्निबध का?
‘भूगर्भीय लहरींमुळे एक्स्प्रेस वेवर अपघात’ हे वृत्त वाचले. त्यातल्या शास्त्रीय, तांत्रिक निष्कर्ष याव्यतिरिक्त माझ्या मते मुख्य कारणे वेगळीच आहेत. टायरची स्थिती, गाडी हाकण्याच्या तंत्रशुद्ध शिक्षणाचा अभाव, अनुभवाचा अभाव, रस्त्यांच्या निगेचा अभाव ही ती कारणे आहेत. हा रस्ता झाला तेव्हा यावर ८०च्या खाली वेग ठेवता येणार नाही असे सांगितले होते. हे र्निबध का? हाच वेग ठेवायचा तर एक्स्प्रेस वे एवढा टोल भरून वापरायचाच कशाला? परदेशात बससुद्धा ११०-१२० ने चालवतात. तेव्हा ८०चे र्निबध ही चेष्टा आहे. ‘आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी’.
राम गोगटे (वांद्रे-पू)

‘पाशवी’ कशाला ठरवायचे?
‘पाशवी बलात्काराबद्दल फाशी’ ही बातमी वाचून वाटले की, आपले कायदे मुद्दामच काही त्रुटी ठेवूनच बनवले जातात. फाशीच्या शिक्षेसाठी बलात्कार हा पाशवी होता असे सिद्ध करण्याची जबाबदारी फिर्यादी पक्षावर येणार. बातमीमध्ये म्हटल्याप्रमाणे सामूहिक बलात्कारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद केली आहे. म्हणजे एकटय़ाने केलेला बलात्कार हा कमी गंभीर मानला आहे. शिवाय जर ‘पाशवी’ हा शब्द पशुतुल्य या अर्थाने वापरला असेल तर तोही आक्षेपार्ह आहे, कारण पशू बलात्कार करीत नाहीत. फाशीची शिक्षा हा विषय त्यातल्या राष्ट्रपतींकडे करता येणाऱ्या दयेच्या अर्जाच्या तरतुदीमुळे आणि त्या अर्जावर विचार करायला लागणाऱ्या अनाकलनीय दिरंगाईमुळे हास्यास्पद बनला आहे. आजन्म सश्रम कारावास (ज्यात इतर कैद्यांना मिळणाऱ्या सुट्टीची सवलत वगळून) जास्त चांगली शिक्षा आहे.
सुभाष मयेकर, अंधेरी (पश्चिम)

यात बातमीमूल्य किती?
मुशर्रफ यांची भारतीय हद्दीत घुसखोरी ही माहिती बातमी म्हणून पाहिल्या पानावर झळकल्याचे पाहून आश्चर्य वाटले. (लोकसत्ता- २ फेब्रु.) मुळात ही बातमी एका वृत्तवाहिनीच्या स्रोताच्या आधारे दिली आहे. मुशर्रफ यांच्या माजी सहकाऱ्याने असा गौप्यस्फोट केल्याचे बातमीत नमूद करण्यात आले आहे.  एखाद्या वाहिनीच्या चर्चात्मक कार्यक्रमात अशा प्रकारे समोर आलेली माहिती कितीही चटपटीत आणि आकर्षक वाटली तरी त्यातील सत्यता आणि वास्तव तपासणे हे अवघड असते आणि असे ते तपासता आले नाही, तर ती माहिती बातमीच्या आणि किमान ठळक बातमीच्या निकषाला उतरत नाही असे मला वाटते. भारतीय हद्दीत ११ कि.मी. मुशर्रफ यांचा प्रवेश हा आपल्या संरक्षण खात्याच्या कार्यक्षमतेविषयी शंका निर्माण करतो आणि एवढय़ा अपुऱ्या पुराव्यावर असा संशय निर्माण होऊ देणे हे त्यांच्यावर अन्यायाचे ठरेल हेही भान बाळगले पाहिजे.
डॉ. केशव साठय़े, पुणे

ये तो होना ही था!
जाहिरातबाजीचा स्टंट! ‘तू मला मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो.’ मग आपण दोघेही आनंदाने खेळू. वादाच्या वादळातून ‘विश्वरूपम’ सुखरूप बाहेर येणारच होता, कारण कोर्टकचेऱ्या हा सर्व जाहिरातबाजीचा स्टंट होता. ‘ये तो होना ही था भाई’. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता व कमल हासन यांच्यातील हा खेळ चांगलाच रंगला, कारण दोघेही नाटकी-सिनेमावाले. कोणीही वेडा भारत सोडून जाणार नाही. भारत सोडून जाण्याची यांच्यात हिंमतच नाही, कारण येथे यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागायला मिळते, करोडो रुपये बेहिशेबी कमवायला मिळतात, काळय़ा पैशाची नदी नव्हे समुद्र भारतात वाहात आहे, मग हे कशाला भारत सोडतील! आता या जाहिरातबाजीनंतर कदाचित ‘विश्वरूपम’ अलोट गर्दी खेचेलही, पण विश्वरूप पाहणाऱ्यांची प्रतिक्रिया काय होईल ते लवकरच कळेल.
गोपाळ द. संत, पुणे.