मानवी ज्ञानशीलता ही शास्त्रे, कला, उपयोजन अशा विविधांगांनी फळत-फुलत असते. या ‘फळां’ची योग्य राखण व्हावी, यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध तरतुदी आहेत. पेटंट, कॉपीराइट, ‘जीआय’ टॅग, ट्रेड मार्क, इंडस्ट्रियल डिझाइन-मार्क अशा इंग्रजी नावांनीच जगभर ओळखल्या जाणाऱ्या या तरतुदींच्या खाचाखोचा वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नव्या सदराचा हा परिचय-लेख..
‘ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते’ असे पुराणकाळापासून मानत आलेला आपला भारत देश. आपले ज्ञान निरपेक्षपणे वाटणाऱ्याला गुरुस्थानी मानणारा आपला भारत देश. विवेकनिष्ठ विचारांपेक्षा भावनाप्रधानतेला sam06अधिक महत्त्व देणाऱ्या या देशाला आपल्या बुद्धिमत्तेची केलेली गुंतवणूक हीसुद्धा एक मालमत्ता असू शकते ही कल्पना कशी झेपावी? त्यामुळेच बौद्धिक संपदा किंवा ‘इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी’च्या संरक्षणाबाबत आपण नेहमीच अनभिज्ञ आणि म्हणूनच कदाचित फार बेफिकीर राहिलेले आहोत. आपण लावलेले शोध, केलेले लिखाण, उत्पादनाची ओळख म्हणून वापरत असलेले एखादे चिन्ह, आपले पारंपरिक ज्ञान, हजारो वर्षांपासून प्रचलित असलेली एखादी हस्तकला ही आपली बौद्धिक संपदा आहे, तिच्यावर आपला हक्क आहे, दुसऱ्या कुणाला आपल्या अपरोक्ष ती वापरू न देणे हा आपला अधिकार आहे, याबाबत आपण बरेचदा अजाण असतो. याबाबत थोडी जनजागृती करण्यासाठी, या बाबतीतली भारताची आणि इतर देशांची धोरणे कोणती, त्यातला संघर्ष कोणता याचा ऊहापोह करण्यासाठी हा लेखनप्रपंच! या लेखमालेतून पुढील वर्षभर मी बौद्धिक संपदा कायद्यातील अनेक गोष्टी आणि काही सुरस कहाण्याही तुम्हाला सांगणार आहे.
आपल्या बुद्धीची गुंतवणूक करून केलेली कोणतीही निर्मिती, मग ते एखादे संशोधन असेल, एखादे सुंदर चित्र किंवा शिल्प असेल, एखाद्या उत्पादनाचे कल्पक नाव असेल किंवा चिन्ह (ट्रेड मार्क), एखाद्या कारचे डिझाइन असेल किंवा एखादे पीक घेण्याची पारंपरिक पद्धत.. ही सगळी असते आपली मालमत्ता : बौद्धिक मालमत्ता किंवा बौद्धिक संपदा. घर, जमीन, शेती ही जशी आपली स्थावर मालमत्ता आहे किंवा पसा, सोने नाणे, चांदी ही जशी आपली जंगम मालमत्ता आहे तशीच. आपली बाकीची संपत्ती आपण किती जपतो.. तिची आपण किती काळजी घेतो..मग आपली बौद्धिक संपदा ही तेवढीच मूल्यवान आहे याची जाणीव आपल्याला होणार तरी कधी?
पण आपली स्थावर-जंगम मालमत्ता आणि बौद्धिक संपदा यात थोडा फरक आहे. एक म्हणजे बौद्धिक संपदा आपल्याला कधीही मोजता येत नाही. जमीन किती एकर आहे किंवा सोने किती तोळे हे सहज मोजता येते आणि त्यानुसार त्याची किंमतही ठरवता येते. पण बौद्धिक संपदेची मोजदाद करणे किंवा तिची किंमत ठरवणे हे फार कठीण काम आहे.
या दोन मालमत्तांमधला दुसरा फरक म्हणजे बौद्धिक संपदा चोरण्यापासून लोकांना थांबवणे फार कठीण आहे. तुम्ही सोने नाणे बँकेत ठेवाल, तुमच्या जमिनीभोवती कुंपण घालाल.. पण तुम्ही तुमच्या कल्पनांभोवती कुंपण कसे घालणार? त्यांची चोरी कशी थांबवणार? त्या वापरण्यापासून कुणाला कसे रोखणार?
या दोन्ही मालमत्ता एकमेकीपासून आणखी एका बाबतीत वेगळ्या आहेत. माझ्या सोन्याची चोरी झाली किंवा माझ्या जमिनीवर कुणी कब्जा केला तर माझी संपत्ती कमी होते आणि चोरणाऱ्याची ती वाढते..पण एकाची बौद्धिक संपत्ती दुसऱ्याने वापरली तर मात्र ती कमी होत नाही. ‘न चोरहार्यम। न च राजहार्यम। न भ्रातृभाज्यम। न च भारकारी’ असे हे बुद्धिधन. थॉमस जेफरसनने म्हणून ठेवले आहे :  He who receives an idea from me, receives instruction himself without lessening mine; as he who lights his taper at mine, receives light without darkening me.
अशा रीतीने बौद्धिक संपदा ही इतर संपदांपेक्षा वेगळी आहे. तिचे संरक्षण करणे हे म्हणून एक आव्हान आहे. आपल्या या संपत्तीचे संरक्षण म्हणूनच एकटय़ाने करणे आपल्याला फार कठीण जाते आणि ते करण्यासाठी आपल्याला त्या त्या देशाच्या बौद्धिक संपदा कायद्याची मदत घ्यावी लागते.
बौद्धिक संपदा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आणि त्या प्रत्येकीचे संरक्षण करणारे वेगवेगळे कायदे असतात. कुठल्याही कलाकृतीवरचा बौद्धिक संपदा हक्क म्हणजे कॉपीराइट- यात साहित्य, सर्व कला, चित्रपट यांचा समावेश होतो. एवढेच नाही तर संगणकाच्या सॉफ्टवेअर्सवरसुद्धा कॉपीराइटच दिला जातो.
एखाद्या उत्पादनाचे किंवा सेवेचे चिन्ह, त्याचे बोधवाक्य, त्या उत्पादनाचे नाव हीसुद्धा एक बौद्धिक संपदा आहे.. आणि त्यावर दिला जातो तो ट्रेड मार्क, उदा. मर्सिडीजचा स्टार किंवा कोका कोला हे नाव किंवा ‘जिंदगी के साथ भी..जिंदगी के बाद भी’ यासारखी घोषवाक्ये, इतकेच नव्हे तर चिन्हाचा रंग (रिलायन्स ग्रीन), किंवा आवाज म्हणजे अगदी ब्रिटानियाची ‘टिंग टिन टि टिंग’ ही धून या सगळ्यावर ट्रेड मार्क मिळू शकतो. थोडक्यात, एखाद्या उत्पादनाच्या किंवा सेवेच्या दर्जाची ओळख ग्राहकाला पटवून द्यायला ज्या ज्या गोष्टी मदत करतात, त्या सगळ्यावर ट्रेड मार्क घेता येतो.
कुठल्याही क्षेत्रातील नवा शोध मग ते उत्पादन असेल किंवा प्रक्रिया.. त्यावर दिले जाते ते पेटंट. पण हे संशोधन निव्वळ शुद्ध वैज्ञानिक संशोधन नको तर त्याला काही तरी औद्योगिक किंमत असली पाहिजे. म्हणजे न्यूटन वा आइन्स्टाइन यांचे सिद्धान्त हे कितीही महान शोध असले तरी पेटंट मिळू शकत नाही; कारण त्यांना औद्योगिक उपयुक्तता नाही. वेगवेगळी औषधे, मोबाइल फोन, कार आणि इतर वाहनातले छोटे छोटे भाग या सगळ्यांवर पेटंट दिली जातात. एखाद्या कंपनीला कुण्या संशोधकाचे असे पेटंटेड संशोधन विकत घेऊन बाजारात आणावेसे वाटले तर या पेटंटचे मोल अगणित असू शकते आणि अशा वेळी एखाद्या संशोधकाचा अक्षरश: रंकाचा राव होऊ शकतो.
औद्योगिक वापरासाठी असलेल्या एखाद्या वस्तूमधल्या एखाद्या कलापूर्ण भागाला- आकार, रंग, रूप यांना इंडस्ट्रियल डिझाइन या बौद्धिक संपदेच्या प्रकाराने संरक्षण देता येते. एखाद्या कारमधले काम करणारे भाग, म्हणजे इंजिन किंवा टायर यावर पेटंटने संरक्षण घेतलेले असते तर तिचा आकार, रंग, रूप मात्र इंडस्ट्रियल डिझाइनने संरक्षित असतो. थोडक्यात- व्यापारीकरण झालेल्या वस्तूमधल्या सौंदर्यपूर्ण घटकांवर इंडस्ट्रियल डिझाइन मार्क दिला जातो तर कॉपीराइट मात्र फक्त शुद्ध कलाकृतींवर असतो.
भौगोलिक निर्देशक किंवा ‘जीआय’ (Geographical Indicator) हा बौद्धिक संपदेचा आणखी एक प्रकार. समृद्ध परंपरा आणि संस्कृती असलेल्या भारतासारख्या प्रत्येक देशासाठी अतिशय महत्त्वाचा. ‘कोल्हापुरी’ मिसळ ही तेथील उपाहारगृहांनी जर अशी संरक्षित केली तर पुण्यात ‘येथे स्पेशल कोल्हापुरी मिसळ मिळेल’ अशी पाटी लावणे हा गुन्हा ठरेल.
याशिवाय ट्रेड सिक्रेट हीसुद्धा एक बौद्धिक संपदा आहे. ट्रेड सिक्रेट सोडून इतर सर्व संपदा संरक्षित करण्यासाठी आधी घोषित कराव्या लागतात. म्हणजे उदा. संशोधनाला पेटंट हवे असेल तर ते संशोधन काय आहे ते आधी घोषित करावे लागते. पण कधी कधी मात्र काही माहिती आपल्याला कायम गुप्त राहायला हवी असते आणि तरीही तिला संरक्षण मिळायला हवे असते. उदा. कोका कोलाचा फॉम्र्युला. अशा वेळी तिला ट्रेड सिक्रेटने संरक्षित करता येते.
याशिवायही बौद्धिक संपदांचे अजून काही प्रकार आहेत. या पुढील सर्व लेखांमध्ये माझा भर असेल बौद्धिक संपदांबाबतच्या त्याच गोष्टींवर, ज्या आपल्या जगण्यावर परिणाम करतात..चांगलाही आणि वाईटही. आपल्या हक्कांच्या संरक्षणाबरोबरच दुसऱ्याच्या हक्कांची पायमल्ली होऊ न देणे हे आपले कर्तव्य आहेच. आणि आपल्या या हक्कांचे संरक्षण करणे हे आपल्या कायद्याचे आणि सरकारचेही कर्तव्य आहे..पण खरा संघर्ष निर्माण होतो तेव्हा, जेव्हा हा हक्कजपताना याहून अधिक महत्त्वाचा किंवा अधिक मूलभूत हक्क नाकारला जाऊ लागतो..आणि त्याबाबत जागरूकता निर्माण होणे ही मग काळाची मोठी गरज होऊन बसते.
या बौद्धिक संपदा हक्कांचे एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांची स्थानिकता..आपला हक्क जगभर संरक्षित व्हायला हवा असेल तर प्रत्येक देशात जाऊन वेगवेगळे संरक्षण घ्यावे लागते, कारण प्रत्येक देशाचा कायदा वेगवेगळा असतो आणि त्यामुळे अनेक संघर्ष निर्माण होतात. बौद्धिक संपदा हक्कांच्या या स्थानिकतेबद्दल बघू या पुढच्या लेखात..
*लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.
मृदुला बेळे – mrudulabele@gmail.com

3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
New standards for facilities safety in nurseries
पाळणाघरांतील सुविधा, सुरक्षिततेबाबत नवीन मानके
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण