भगवद्भावानं सदोदित व्याप्त असे जे श्रीसद्गुरू आहेत त्यांचा संग म्हणजे भगवंताचा संग आहे. पण याचा अर्थसुद्धा नेमका समजला पाहिजे. शरीरानं त्यांच्या सहवासात असणं, हा सामान्य अर्थ झाला पण त्यांच्या बोधानुरूप जीवन जगणं, हा खरा शुद्ध संग आहे. जसा त्यांचा विचार तसा माझा विचार होणं, जे त्यांना आवडतं ते मला आवडू लागणं, जशी त्यांची इच्छा तशी माझी इच्छा होणं, हा खरा संग आहे. तो संगही सोपा नसतोच कारण तो माझ्या मनाच्या आजवरच्या ओढीच्या अगदी विरुद्ध असतो. तो सत्संग साधला तर आसक्ती आणि मोहाच्या जखडणीतून मी निस्संग होतो. शंकराचार्यानीही त्यालाच ‘सत्सङ्गत्वे नि:संगत्वं’ म्हंटलं आहे. श्रीसद्गुरूंचा विचार शाश्वताचा असतो, त्यांना एकरसात निमग्न राहणं आवडतं, त्यांची इच्छा शाश्वताशी जोडली असते. माझ्या जगण्यातली अशाश्वताची ओढ संपून मला जेव्हा शाश्वताची गोडी लागेल तेव्हाच तो संग खऱ्या अर्थानं घडेल. ती स्थिती यावी, यासाठीच तर ते मला बोध करीत असतात. त्यांचा समस्त बोध, त्यांची सर्व शिकवण ही अशाश्वतात अडकलेल्या मला शाश्वताकडे नेण्याचीच तर असते. तेव्हा प्रपंचात असताना मी जेव्हा त्यांचा संग साधण्यासाठी प्रयत्न करू लागेन तेव्हा प्रपंच नेमकेपणाने होईल आणि त्यातूनच परमार्थाचा मार्गही मोकळा होत होत व्यापक होत जाईल. त्यासाठी माझा प्रपंच आणि माझा परमार्थ या दोन्हींचे ते धुरीण आहेत, हे मला मनापासून वाटलं पाहिजे. जीवन भगवंतमय कसे असते, भगवंताच्या प्रेमाचं महत्त्व काय आहे, हे श्रीगोंदवलेकर महाराज यांनी अनेक बोधवचनांतून सांगितले आहे. पण आपली स्थिती अशी असते की आपल्याला दृश्य जग हे अदृश्य परमात्म्यापेक्षा खरे वाटते! त्यामुळे भगवंताला आपण मानत असलो तरी भगवंत आहेच, अशी ठाम अनुभवसिद्ध खात्री नसल्याने भगवंताविषयीचा सारा बोध हा मनोहारी देखाव्याच्या चित्रासारखा सुखद वाटतो पण त्याची वास्तविक अनुभूती नसल्याने तो हृदयापर्यंत पोहोचत नाही. भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होणं, त्याच्या कृपेचं आकलन होणं आणि त्याच्या भक्तीसाठी जीवन समर्पित होणं साधावं यासाठी आधी श्रीमहाराजांच्या बोधानुरूप जगायचा प्रयत्न करणं, हाच उपाय आहे. हा प्रयत्न जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा आपलं आत्ताचं जगणं आणि आपलं ध्येयकल्पित जीवन यातला आंतरविरोध आपल्याला जाणवू लागतो. आत्ताचं जगणं सोडता येत नाही (ते शक्य नाही आणि त्याची जरुरीही नाही) आणि ध्येयकल्पित जीवन जगण्याचे प्रयत्नही साधत नाहीत. या संघर्षांत नेमकं काय करावं, तेही सुचत नाही. तेव्हा आत्ताचं जे जगणं आहे तिथूनच म्हणजे प्रपंचापासूनच आपल्याला सुरुवात केली पाहिजे. आपण गेले काही भाग प्रपंच या विषयाच्याच उंबरठय़ावर घुटमळत आहोत. आता तो उंबरठा ओलांडून त्या विषयाच्या चिंतनात खोल प्रवेश करू. पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं याद्वारे जगाकडे असलेली ओढ म्हणजे प्रपंच, हा प्रपंच शब्दाचा व्यापक अर्थ सोडून घरादाराच्या चौकटीतल्या प्रपंचाचा प्रथम विचार करू.