सद्गुरुंना जे आवडतं, तेच मला आवडू लागणं म्हणजे त्यांची आवड निर्माण होणं. श्रीगोंदवलेकर महाराजांना नामाइतकं काहीच आवडत नाही, तेव्हा नामाची आवड आपल्या मनात उत्पन्न होणं म्हणजेच त्यांची आवड निर्माण होणं, असं हृदयेंद्रही म्हणाला. त्यावर योगेंद्रनं एक शंका उपस्थित केली..
योगेंद्र – दादा सद्गुरुंची आवड ती माझी होणं हे समजू शकतं. आता ‘नाम’ आणि ‘स्मरण’ अशी सकृतांची जोडी नामधारकासाठी योग्य असेलही, पण समजा मी योगमार्गी असेन, आणखी कोणी ज्ञानमार्गी असेल, तर त्यांची ‘सकृतांची जोडी’ ही नाम आणि स्मरण कशी असेल?
अचलदादा – तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे, पण त्याचे उत्तर दोन पातळीवरचे आहे. अहो, नाम फार सूक्ष्म आणि प्रभावी आहे. नाम म्हणजे सामान्य शब्द नव्हे. नाम म्हणजे मंत्रच! आता ‘मंत्र’ म्हणजे काय? तर मन अधिक त्र, म्हणजे मंत्र! त्रिगुणात अडकलेल्या  मनाला त्रिगुणाच्या प्रभावातून सोडवतो तो मंत्र!! आता असं पहा, कोणा श्रेष्ठ योगीपुरुषावर तुमची आंतरिक श्रद्धा आहेच ना?
योगेंद्र – हो तर..
अचलदादा – मग त्यांच्या नावाचा नुसता उल्लेखही तुमच्यासाठी मंत्रवत् नाही का? त्यांचं नाम मनात उमटताच स्मरणही आपोआप होतं आणि लगेच तुम्ही तुमच्या जीवनाच्या हेतूबद्दल सतर्क होता ना? अगदी त्याचप्रमाणे ‘कृष्णमूर्ती’ काय किंवा ‘निसर्गदत्त महाराज’ काय, नुसतं त्यांचं नाव घेताच त्यांना मानणाऱ्याच्या अंतरंगात शाश्वताचं भान येतंच ना?
हृदयेंद्र – पण तरीही दादा, नामधारक नसलेल्या आणि अन्य मार्गानं उपासना करीत असलेल्या साधकांसाठी ‘सकृतांची जोडी’ ती काय?
अचलदादा – तुम्ही कोणतीही उपासना करा, मग ते नामस्मरण असो, योगसाधना असो, ज्ञानोपासना असो.. या सर्वाला एकच शब्द आहे, ‘नित्यनेम’! कोणत्याही उपासनेचा हेतू काय असतो? अनित्याच्या प्रभावात अडकलेल्या मनाला नित्याकडे वळवत राहणे. ‘ज्ञानेश्वरी’च्या सहाव्या अध्यायात जो योग सांगितला आहे तो दाही दिशांना भरकटणाऱ्या मनाला स्थिर करण्यासाठीच ना?
योगेंद्र – हो.. आणि अभ्यासास काहीही दुष्कर नाही, असं भगवंत स्पष्ट सांगतात..
अचलदादा – मग कोणतीही साधना ही साधकासाठी प्राथमिक टप्प्यावर अभ्यासच असते ना? तो अभ्यास हाच नित्यनेम असतो. जे नित्य आहे ते जीवनात उतरवण्याचा नेम हाच नित्यनेम! जे नित्य आहे त्याचं विस्मरण होतं तेव्हाच अनित्याच्या भ्रामक जाळ्यात माणूस फसतो. नित्याचं स्मरण जागं ठेवण्यासाठीच नित्याचा नेम आहे.
हृदयेंद्र – दादा, श्रीगोंदवलेकर महाराजांचं प्रवचनही आहे ‘नित्यनेम म्हणजे काय?’
अचलदादा – बरोबर! बरं, जो ज्ञानमार्गी आहे, त्याला तर नित्यनेम अखंड सांभाळावा लागतो! साधनचतुष्टय़ात पहिलंच साधन आहे ‘नित्यानित्यवस्तुविवेक’. ज्ञानोपासना ही देखील याच विवेकाच्या पायावर उभी नाही का? नित्य काय आणि अनित्य काय याचा विवेक! तेव्हा जे नित्य आहे त्याचं स्मरण आणि त्याचा नेम हीच योगसाधक आणि ज्ञानसाधकासाठी ‘सकृतांची जोडी’ आहे. नित्य काय आणि अनित्य काय, याची चर्चा करणं फार सोपं, पण प्रत्यक्ष जगण्यात ज्ञान उतरणं फार कठीण..
योगेंद्र – रमण महर्षिच्या कुटीत एके रात्री चोर शिरले. त्यांना मारण्यासाठी शिष्य सरसावले तर महर्षी काय म्हणाले? चोरांना चोरांचं काम करू द्या, तुम्ही तुमचं काम सोडू नका! साधकाचं काम काय? तर भगवद्चिंतन!
कर्मेद्र – हे अतिच झालं! चोर आले तर त्यांचा जमेल तसा प्रतिकार करणं हेच कुणाचंही पहिलं काम आहे..
अचलदादा – (हसतात) अहो जरुर तसं करा.. दुसऱ्यानं चोरू नये, असं ज्याच्याकडे काही असतं तो चोराचा जमेल त्या मार्गानं प्रतिकार करतोच की, पण इथे तर महर्षी स्वत:ला लुटून द्यायला बसले होते! जिथं अस्सल सोनं फुकट मिळतं तिथं आपण हिंगजिरंच चोरू पाहतो! आणि खरं सांगू का, हे बाहेरचे चोर दिसतात तरी, आतले चोर कळतात का? जन्मभर चोरी सुरू आहे, तिची जाणीव तरी आहे का?
चैतन्य प्रेम