‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ असे आपण नुसते म्हणतो, पण हे वचन जिने प्रत्यक्षात आणले आहे ती भारतीय वंशाची अमेरिकी किशोरवयीन मुलगी नेहा गुप्ता हिला यंदाचा आंतरराष्ट्रीय ‘बाल शांतता’ पुरस्कार नुकताच नेदरलँड्समधील हेग येथे नोबेल पुरस्काराचे मानकरी डेस्मंड टूटू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली अमेरिकी मुलगी आहे. भारतातील व जगातील अनाथ मुलांसाठी तिने मोठे काम केले आहे.

नेहा ही खूप श्रीमंत घरातली मुलगी नसली तरी घरातली खेळणी विकून तिने अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचा प्रकाश फुलवला आहे. एकदा ती आजोळी भारतात आली असता येथील मुलांची स्थिती पाहून तिला असे वाटले की, मुलांना या स्थितीतून बाहेर काढले पाहिजे व तोच एक ध्यास घेऊन ती अमेरिकेला परत गेली, तिथून तिने अनाथ मुलांसाठी बरेच काम केले आहे. नऊ वर्षांपूर्वी तिने सुरू केलेले काम आता आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या मान्यतेचे झाले आहे.
नेहा अमेरिकेतील फिलाडेल्फियाची. गेल्या वर्षी पाकिस्तानची बाल शिक्षण हक्क कार्यकर्ती मलाला युसुफझाई हिला मिळालेला पुरस्कार यंदा तिला मिळाला आहे. तिने कलावस्तू विकून मुलांसाठी पैसा जमवला, कंपन्यांकडून देणग्या घेतल्या. ‘एम्पॉवर ऑर्फन्स’ ही ना नफा ना तोटा तत्त्वावरील संस्था तिने सुरू केली. ही संस्था अमेरिका व परदेशातही काम करते. मुलांना वर्गखोल्या बांधून देणे, पुस्तके देणे, संगणक प्रयोगशाळेस मदत करणे, आरोग्य चाचण्यांचा खर्च करणे, मुलींना शिवण मशीन देणे अशी अनेक कामे करते. आता तिच्या संघटनेचे कार्यकर्ते अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर व भारतात काम करीत आहेत. विशेष म्हणजे युवकांनी चालवलेली ही संघटना आहे.
नेहाचे आजीआजोबा उत्तर भारतातले आहेत. ती न्यूझीलंडमध्ये जन्मलेली भारतीय मातापित्यांची कन्या आहे. उत्तर भारतातील शिवशक्ती स्कूलच्या वाचनालय व संगणक प्रयोगशाळेला तिने मदत दिली आहे, त्यामुळे मुले तेथे संगणक प्रशिक्षण घेत आहेत. संगणक विज्ञानात मेरीलँड विद्यापीठातून पीएचडी केलेली नेहा संशोधन साहाय्यक म्हणून एका प्रयोगशाळेत काम करते. कारण ती एम.डी.सुद्धा आहे. तिचे भारतातील शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठ व इंडिया इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग या संस्थांत झाले. बंगळुरूला तिने सॅमसंग कंपनीतही काम केले आहे. तिने तिच्या कामातून १३ लाख अमेरिकी डॉलर मदत गोळा करून किमान २५ हजार मुलांना मदत केली. मुलांसाठी चांगले जग निर्माण करणे हे छोटेसे स्वप्न घेऊन ती आत्मविश्वासाने काम करते आहे. ब्लॉक फेलोशिप, टेड फेलोशिप, ग्रेसहॉपर फेलोशिप तसेच अनेक पुरस्कार तिला मिळाले.