भव आसक्ती ज्या यात्रेनं निवारली जाते ती वारीच खरी, असं हृदयेंद्रच्या मनात आलं. तो पुन्हा डब्यात गेला. वरच्या बर्थवर पहुडला. कानाला छोटा टेपरेकॉर्डर लावून तो सेना महाराजांचा अभंग पुन्हा ऐकू लागला..
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा। आनंदें केशवा भेटतांचि।। या सुखाची उपमा नाही त्रिभुवनीं। पाहिलीं शोधोनी अवघीं तीर्थे।। ऐसा नामघोष ऐसे पताकाचे भार। ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठें।। ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक। ऐसा वेणुनादीं काला दावा।। ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर। ऐसें पाहतां निर्धार नाहीं कोठें।। सेना म्हणे खूण सांगितली संतीं। यापरती विश्रांती न मिळे जीवा।।
अभंग ऐकता ऐकता हृदयेंद्रची भाववृत्ती उचंबळून आली. डोळ्यात पाणी तरळलं. त्यातूनच धूसरशा प्रतिमा साकारल्या.. त्याच्या मित्रांच्या, बुवा आणि नाना यांच्या.. त्या दिवशीच्या चर्चेची आवर्तनं पुढे सुरू झाली..
हृदयेंद्र – खरंच बुवा.. नित्य प्रेतावस्था लागलेल्या या देहाचा खरा लाभ हाच की भवसागरातून तारणाऱ्या सद्गुरूचं दर्शन होणं! असं दर्शन झालं तरच ती वारी खरी..
बुवा – सेनामहाराजही काय म्हणतात? या सुखाची उपमा त्रिभुवनात नाही.. मी अनेक र्तीथ हिंडलो पण हे सुख कुठेच नाही.. खरंच हो, मी जर मनानं दगड असेन तर तीर्थस्थळातील मूर्तीही मला फक्त दगडाचीच भासेल.. त्या मूर्तीतलं चैतन्य मला जाणवणारही नाही..
हृदयेंद्र – गोंदवल्याच्या रामाच्या मूर्तीसमोर उभं राहाताना हे अगदी तीव्रपणे जाणवलं.. श्रीमहाराज असताना याच मूर्तीच्या डोळ्यातून एकदा अश्रुधारा वाहिल्या होत्या, पण तिचं दर्शन घेताना आमच्या डोळ्यात टिपूस तरी येतो का? मग तिच्यातलं चैतन्य कुठून उमगावं?
बुवा – मला सांगा ज्या काळी साईबाबा होते, गोंदवलेकर महाराज होते, गजानन महाराज होते.. त्या काळी काय कमी तीर्थक्षेत्रं होती का? तरी जो आनंद शिर्डीत प्रत्यक्ष बाबांना भेटून, गोंदवल्यात महाराजांना भेटून, शेगावी गजानन महाराजांना भेटून, अक्कलकोटास स्वामी समर्थाना पाहून मिळत होता तो अन्य ठिकाणी होता का? कारण हा आनंद प्रत्यक्ष भेटीचाच होता.. ज्ञानाचा रोखठोक व्यवहार होता..
हृदयेंद्र – अगदी खरं आहे.. मला एक गोष्ट आठवते. ब्रिटिश राजवटीत विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणून एक विद्वान मुंबईत होऊन गेले. त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती. त्यामुळे अक्कलकोटच्या राजेसाहेबांनी त्यांना व्याख्यानांसाठी आमंत्रित केलं होतं. तेव्हा स्वामी समर्थाचीही ख्याती होती, म्हणून बुवा त्यांच्या दर्शनास आले. त्यांनी महाराजांची परीक्षा पहावी, या हेतूने त्यांना परब्रह्म म्हणजे काय आणि ब्रह्मस्थिती कशी व्हावी, वगैरे प्रश्न विचारले. त्यावर स्वामीसमर्थ खो-खो हसले फक्त. बोलले काहीच नाहीत. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशीही हाच प्रकार घडला. बुवांच्या मनात समर्थाविषयी तर्कवितर्क सुरू झाले.. त्या रात्री त्यांना स्वप्न पडलं. शंभर इंगळ्या त्यांच्या अंगावर चढत होत्या. त्यातली एक त्यांना डसली. तोच ते ‘‘मेलो मेलो’’ करत ओरडत उठले.. दुसऱ्या दिवशी स्वामी समर्थाकडे गेले तेव्हा रात्रीचा प्रकार ते विसरले होते. स्वामींना त्यांनी पुन्हा विचारलं की ब्रह्मस्थिती कशी असते ती कशी लाभते? आपला अनुभव काय? त्यावर स्वामी समर्थ जोरात म्हणाले, ‘‘स्वप्नात इंगळ्या डसल्या तर घाबरतोस आणि इथे ब्रह्मस्थितीच्या गप्पा ठोकतोस! चालता हो इथून!!’’ बुवा बिऱ्हाडी परतले, पण निर्धारानं स्वामी समर्थाकडे परतले आणि शरणागत भावानं त्यांची करुणा भाकली.. स्वामींनीही त्यांना आपलसं केलं आणि अध्यात्मात अधिकारीही बनवलं..
बुवा – म्हणजे बघा.. कोरडय़ा मनानं तीर्थस्थळी जाऊन हे अंतरंगातलं जागणंस हा अंतरंगातला पालट साधला नसता.. उलट कोरडय़ा मनानं जा की भारल्या मनानं जा, साक्षात्कारी पुरुष तुम्हाला जागं केल्याशिवाय आणि तुमच्यात पूर्ण पालट घडविल्याशिवाय राहाणारच नाहीत.. पंढरीत तर त्या काळी संतांचीच मांदियाळी होती.. त्यामुळे पंढरीचा विठ्ठल त्या संतांच्याच मुखातून जणू बोलत होता.. त्या संतांच्याच डोळ्यांनी जणू पाहात होता.. त्या संतांच्याच हातांनी जणू वात्सल्य वाटत होता.. त्या संतांचा संग सेना महाराजांना प्रत्येक वारीत लाभत होता.. तो आनंद अवर्णनीयच होता..
ल्ल चैतन्य प्रेम