News Flash

ओढवून घेतलेली फसगत

इटलीच्या मरीनबाबत झालेली फसगत ही भारताने ओढवून घेतलेली आहे. केरळमधील समुद्रात दोन भारतीय मच्छीमारांना ठार करणाऱ्या या इटालियन नौसैनिकांबाबत भारताने पहिल्यापासून सबुरीचे धोरण का अवलंबिले

| March 14, 2013 02:22 am

इटलीच्या मरीनबाबत झालेली फसगत ही भारताने ओढवून घेतलेली आहे. केरळमधील समुद्रात दोन भारतीय मच्छीमारांना ठार करणाऱ्या या इटालियन नौसैनिकांबाबत भारताने पहिल्यापासून सबुरीचे धोरण का अवलंबिले हे कळण्यास मार्ग नाही. केरळजवळील समुद्रातील ही घटना घडल्याला वर्ष उलटून गेले तरी भारताची चालढकल सुरू राहिली. या दरम्यान हा खटला इटली सरकारच्या विनंतीनुसार केरळमधून सर्वोच्च न्यायालयात वर्ग केला गेला.  या सैनिकांवरील खटला चालविण्यासाठी विशेष न्यायालय नेमावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यावरही कार्यवाही झाली नाही. दरम्यान या सैनिकांची उत्तम बडदास्त ठेवण्यात आली. त्यांना निकटवर्तीयांना रोज भेटता येत होते. खास इटालियन भोजनाची सोय होती. पुढे तर तुरुंगात न ठेवता त्यांना गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले. निरपराध भारतीय मच्छीमारांचा खून करणाऱ्यांची अशी बडदास्त ठेवण्याची गरज काय? भारतीय कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई व्हावी, असा भारताचा आग्रह होता, तर त्यांना अन्य कैद्यांप्रमाणेच वागणूक मिळायला हवी होती. या संदर्भात सैनिकांना जशी मिळायला हवी तशी वागणूक आमच्या सैनिकांना मिळाली, याबद्दल इटलीने आभार व्यक्त केले.  सैनिकांनी नाताळसाठी इटलीत जाण्याची परवानगी मागितली. तीही देण्यात आली. त्या वेळी दिलेल्या वचनानुसार हे सैनिक परत आले, परंतु तोपर्यंत इटलीमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले होते व सैनिकांच्या विषयावरून काही पक्षांनी रान उठविले होते. इटलीतील ही बदलती परिस्थिती लक्षात घेऊन भारत सरकारने विशेष न्यायालय तातडीने बसवून खटला सुरू करायला हवा होता. ते झाले नाही व याबद्दल सर्वोच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली. मतदान करण्यासाठी पुन्हा इटलीत पाठविण्याची विनंती सैनिकांनी केली. त्याचाही जोरदार प्रतिवाद करण्यात आला नाही. वस्तुत: दिल्लीतील इटलीच्या वकिलातीत सैनिक मतदान करू शकले असते किंवा वरिष्ठ भारतीय पोलीस अधिकाऱ्यांबरोबर त्यांना इटलीत पाठविण्यात आले असते. काहीही काळजी न घेता या सैनिकांना सुखरूप इटलीत जाऊ देण्यात आले. दिलेल्या शब्दानुसार ते २२ फेब्रुवारीला परत येणे अपेक्षित होते. ते आले नाहीत याबद्दलही भारताने चौकशी केली नाही. सैनिकांना परत पाठविले जाणार नाही, असे इटलीतील नव्या सरकारने ११ मार्च रोजी स्वत:हून कळविले तेव्हा भारताला जाग आली व इटलीच्या विरोधात ओरड सुरू झाली. दरम्यानच्या काळात मच्छीमारांच्या कुटुंबांना इटलीकडून प्रत्येकी एक कोटी रुपयेही मिळाले. हा सर्व घटनाक्रम लक्षात घेतला, तर ‘इटलीला गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागेल’ ही पंतप्रधानांची भाषा कुचकामी ठरते. बारा वर्षांपूर्वी केरळच्याच किनाऱ्यावर हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या दोन फ्रेंच व्यक्तींनी अगदी याच प्रकारे पलायन केले. तेव्हा भारताने काही केले नाही व आताही काही करता येणार नाही. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताने ओरड केली तरी त्याला कोणी विचारीत नाही, कारण अजागळ कारभारच भारताला नडला आहे. हा अजागळपणा व्यवस्थेचा दोष आहे, की हेतूपूर्वक केला गेला, हा स्वतंत्र तपासाचा विषय होईल.
(पूर्ण)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 2:22 am

Web Title: italian navy merchants murdered indian fishermans
Next Stories
1 तिहारमधील हलगर्जी
2 बेळगावचे प्रत्त्युत्तर
3 चौकशीची टाळाटाळ
Just Now!
X