विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग हे त्यांच्या आयुष्यात एकदा वैज्ञानिक गप्पांच्या ओघात मारलेली पैज हरले होते, त्या वेळी ठरल्याप्रमाणे त्यांनी कीप थॉर्न यांच्या पत्नीला एक वर्षांची पेंटहाऊस मासिकाची वर्गणी देण्याचे कबूल केले होते. त्याप्रमाणे त्यांनी केलेही. हॉकिंग यांच्याशी असाच एका भौतिक शास्त्रज्ञाचा वादविवाद झाला होता. अर्थात तोही कृष्णविवरांबाबतच होता, पण त्यातून पुढे कृष्णविवराच्या अभ्यासाबाबत एक क्रांतिकारी सिद्धांत या वैज्ञानिकाने शोधून काढला होता. या वैज्ञानिकाचे नाव जेकब बेकेनस्टेन.
जेरुसलेम येथील हिब्रू विद्यापीठात ते मायकेल पोलॉक अध्यासनाचे प्रमुख होते व सैद्धांतिक भौतिकशास्त्रात संशोधन व अध्यापन करीत होते. १९७०च्या सुमारास डॉ. बेकेनस्टेन यांनी कृष्णविवर या विषयातील तज्ज्ञ वैज्ञानिक हॉकिंग यांच्याशी वाद घातला होता. बेकेनस्टेन यांनी त्यांच्या डॉक्टरेट प्रबंधात कृष्णविवराची वाया जाणारी ऊर्जा (एन्ट्रॉपी) ही कृष्णविवराच्या गोलाकार पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाच्या समप्रमाणात असते, असे म्हटले होते. त्या वेळी ते आव्हान होते, पण बेकेनस्टेन यांचेच म्हणणे खरे ठरले. हॉकिंग यांनी सुरुवातीला कृष्णविवरांना एन्ट्रॉपी नसते व त्यांना तपमानच नसते, परिणामी त्यांच्यातून कुठलीही प्रारणे बाहेर पडत नाहीत, असे म्हटले होते. १९७४ मध्ये डॉ. हॉकिंग यांनी बरीच आकडेमोड केली व बेकेनस्टेन यांचे म्हणणे मान्य केले. कृष्णविवरातून प्रारणे बाहेर पडतात असे स्पष्ट केले. या प्रारणांनाच पुढे बेकेनस्टेन-हॉकिंग प्रारणे असे म्हटले जाऊ लागले. डॉ. बेकेनस्टेन यांना २०१२ मध्ये वुल्फ पारितोषिक व अलीकडे आइनस्टाइन पारितोषिक मिळाले. त्यांचा जन्म मेक्सिको सिटी येथे १ मे १९४७ रोजी झाला.  प्रिन्स्टन विद्यापीठात त्यांनी कृष्णविवराचा शोध लावणारे जॉन व्हीलर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट केली होती. डॉ. व्हीलर यांनी एकदा बेकेनस्टेन यांना एक प्रश्न विचारला होता, की कृष्णविवरात उकळता चहा फेकला तर काय होईल? या प्रश्नाचे उत्तर शोधताना बेकेनस्टेन यांनी नवीन शोध लावला. डॉ. बेकेनस्टेन यांनी अत्यंत नम्रपणे असे सांगितले होते, की हे विश्व ही परमेश्वराची निर्मिती आहे, पण ते कसे काम करते याचा शोध घेणे हे माझ्यासारख्या वैज्ञानिकाचे काम आहे. साध्या गोष्टीही कशा नियमानुसार काम करतात हे मला माहिती आहे, त्यामुळे मला या जगात सुखावह वाटते तसेच एकदम कुठल्या गोष्टीचे आश्चर्य वाटून धक्का बसत नाही. बेकेनस्टेन त्यांचे आनंदनिधान असलेले हे जग सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेले आहेत.