News Flash

जयसिंगराव दळवी

कोल्हापुरी चित्रकला-परंपरा महाराष्ट्राला जवळची वाटतेच आणि ही चित्रेही आपलीच वाटतात, याचे कारण म्हणजे जयसिंगराव दळवींसारखी वडीलधारी माणसे.

| May 19, 2014 02:04 am

कोल्हापुरी चित्रकला-परंपरा महाराष्ट्राला जवळची वाटतेच आणि ही चित्रेही आपलीच वाटतात, याचे कारण म्हणजे जयसिंगराव दळवींसारखी वडीलधारी माणसे. जयसिंगरावांचे वडील दत्तोबा दळवी हे कोल्हापूरदरबारी नेमलेले चित्रकार. दत्तोबांचे नातू अजय हेही चित्रकार. आणि या पिढय़ांतील महत्त्वाचा दुवा ठरलेले जयसिंगराव हे केवळ कलावंतच नव्हेत, तर प्रसिद्ध ‘दळवीज् आर्ट इन्स्टिटय़ूट’चे माजी प्राचार्य आणि कोल्हापूरच्या सर्व चित्रकारांना आपले मानणारे एक केंद्रस्थानही ठरले. वयाच्या ९३व्या वर्षी जयसिंगरावांचे शुक्रवारी (१६ मे) झालेले निधन, हे परंपरा जिवंत ठेवणाऱ्या एका दुव्याचे निखळणे आहे.
पृथ्वीराज कपूर मोठे नट असूनही त्यांच्या नावाचा वापर न करता उमेदवारी करणाऱ्या राज कपूर यांचे कौतुक ज्या काळात झाले, तोच काळ तितक्याच कौतुकासह जयसिंगरावांच्याही उमेदीचा आहे. वयाच्या २३व्या वर्षी १९४५ मध्ये ‘दळवीज आर्ट इन्स्टिटय़ूट’मध्ये जयसिंगराव शिक्षक म्हणून परतले, ते काही संस्थापकांचे चिरंजीव म्हणून नव्हे.. पुण्यात आणि मुंबईच्या ‘जेजे’त कला पदविका आणि कलाध्यापन पदव्युत्तर (आर्ट मास्टर्स) अभ्यासक्रम पूर्ण करून मगच ‘दळवीज’मध्ये ते आले. तिथेही दोनच वर्षे राहून त्यांनी १९४८ साली दिल्लीत इंटिरिअर डिझायनर म्हणून फ्रिट-व्हॉन ड्रायबर्ग या जर्मन तज्ज्ञाकडे काम केले. दोन वर्षांनी ते नाशकात त्या वेळच्या ‘बॉइज टाऊन हायस्कुला’त कलाशिक्षक बनले, तर १९६०च्या दशकापासून दिल्ली येथील भारत सरकारच्या मुद्रण संस्थेत लेआऊट आर्टस्टि या पदापासून सुरुवात करून पुढे ते मुद्रण तंत्रातीलही जाणकार बनले. १९८२ साली, निवृत्तीनंतर ‘दळवीज्’ कलासंस्थेच्या आणि कोल्हापुरातील कलाक्षेत्राच्या घडामोडींत त्यांनी पुन्हा लक्ष घालावयास सुरुवात केली.  व्यक्तिचित्रांची अनेक महत्त्वाची कामे त्यांनी केली. परंतु अपारदर्शक रंगांतून प्रकाश दाखवणाऱ्या निसर्गचित्रांची दत्तोबांपासूनची परंपरा जयसिंगरावांनी राखली आणि शिल्पकलेचीही भर या परंपरेत घातली. महात्मा गांधी, बसवेश्वर, रंगाअण्णा वैद्य, उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती, बाबूराव पेंटर, दत्तोबा दळवी यांच्यासह अनेक दिग्गजांच्या शिल्पकृती त्यांनी तयार केल्या. त्यांना अगदी नव्वदीतही अ‍ॅनिमेशन शिकायचे होते.. ते मात्र राहिले.
‘नाशिक कलानिकेतन’च्या जीवनगौरव पुरस्कारात स्वत:ची भर घालून नाशकात शिष्यवृत्ती सुरू करणाऱ्या जयसिंगरावांनी, कारकिर्दीचा काही काळ घालवलेल्या त्या शहराचे ऋ ण फेडले. पण कोल्हापूरकरांसाठी ते ‘पपा’च असल्याने, या शहराशी त्यांचे ऋ णानुबंध दुहेरी आणि अमीट आहेत. त्यांनी स्थापलेली आर्टिस्ट गिल्ड, त्यांच्या प्रयत्नांमुळे उभे राहिलेले कोल्हापूरकर चित्रकारांचे पुतळे.. हे सारे त्यांची आठवण कायम ठेवणारे आहे.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 2:04 am

Web Title: jaysingrao dalvi painting artist
Next Stories
1 लखदर ब्राहिमी
2 लेफ्ट. जनरल दलबीरसिंग
3 मुकुल सिन्हा
Just Now!
X