आपण समाजवादी आहोत हे दाखवण्यात ज्या देशाचे राज्यकर्ते धन्यता मानतात, त्याच फ्रान्सचे ज्याँ तिरोल यांना यंदा अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. मग पहिल्याच छोटेखानी मुलाखतीत, फ्रेंच सरकारने खासगीकरणाची कास धरून सरकारी अवडंबरे आवरावीत असे तिरोल यांनी सुचवले. तिरोल यांनी दिलेल्या या मुलाखतीतून जणू अर्थशास्त्राच्या नोबेलमागील राजकारणच उघडे झाले, असे सूर लागतीलही. परंतु एक तर ही भूमिका तिरोल यांनी नोबेल मिळण्याअगोदरही वारंवार घेतली आहे आणि दुसरे म्हणजे, फ्रेंच सरकार दाखवीत असलेला समाजवादी पुळका हा राजकारणप्रेरित आणि स्वत:ची प्रतिमा जपण्यापुरताच असल्यामुळे- एक प्रकारे सरकारात समाजवादापेक्षा वैचारिक अस्मितावादच ओतप्रोत असल्यामुळे- अर्थशास्त्रज्ञांनीच काय, पण बातम्यांकडे सजगपणे पाहणाऱ्या जगानेही वेळोवेळी टीका केलेली आहे. आर्सेलर-मित्तल कंपनीने तोटय़ातील उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला तेव्हा लक्ष्मी मित्तल यांना फ्रान्सद्रोही ठरवण्याचा पवित्रा घेऊन या फ्रेंच राज्यकर्त्यांचे समाधान झाले नव्हते. फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वां ओलांद यांनीच केलेला हस्तक्षेप आणि कामगारांना काम नसूनही कायम ठेवण्याचे कंपनीकडून आश्वासन, हा २०१२ च्या अखेरीस घडलेला घटनाक्रमही जगाच्या टीकेस पात्र ठरला होता. फ्रान्समध्ये आर्सेलर-मित्तल वा अन्य कंपन्यांशी वागण्यात सरकार कमी पडले, याचा अनिष्ट परिणाम अनेक कंपन्यांच्या ताळेबंदांवरही दिसू लागला आहे आणि ही स्थिती देशाचेही आर्थिक आरोग्य बिघडवणारी आहे. हे आर्थिक आरोग्य टिकवण्यासाठी देशाने काय करायचे, याची दिशा तिरोल यांनी दाखवली. आत्ता नव्हे, नेहमीच दाखवली. इथे ज्याँ तिरोल यांचा अभ्यास कामी येऊ शकतो, म्हणून त्यांचे म्हणणे महत्त्वाचे. जगभर पसरलेल्या कंपन्या कोणत्याही देशात कशा वागतात? कोणकोणते व्यवहार करताना फायद्याचा कसकसा विचार करतात आणि ‘फायद्याचा विचार कंपन्यांनी करणे चुकीचे नाही’ या सर्वमान्य नियमाला अपवादच ठरणारी, आक्षेपार्ह नफेखोरी कंपन्या कसकशी करू शकतात? या अशा नफेखोरीला आळा घालण्यासाठी सरकारांनी काय करावे? अशा प्रश्नांचा अभ्यास तिरोल गेली सुमारे साडेतीन दशके जगापुढे मांडत आले आहेत. दूरसंचारसारख्या एखाद्या क्षेत्रात पाच-सहाच कंपन्या असतात तेव्हा कॉपरेरेट कंपूशाहीद्वारे नफा ओरपला जातो, विलीनीकरणासारखे मार्ग वाटतात तितके साधे नसतात, हे सारे खरे. यावर सरकारी अंकुश  ठेवायचा, यासाठी कायदे करण्यापूर्वी कंपन्यांच्या चालींचा आणि वर्तणुकीचा जो अभ्यास चोख हवा, त्याची दिशा दाखवणारे काम तिरोल यांनी केलेले आहे. ‘थिअरी ऑफ इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन’ हे त्यांचे पुस्तक १९८८ पासून अमेरिकी विद्यापीठांतील पाठय़पुस्तक म्हणून वापरले जाते. सरकारने कंपन्यांचे नियंत्रण करताना किंवा कंपन्यांकडून माल सरकारीच दराने खरेदी करताना बडगा उगारण्यापेक्षा प्रोत्साहनपर लालुच दाखवणे कसकसे उपयुक्त ठरलेले आहे, याचा     सप्रमाण सिद्धान्तही त्यांनी १९९३ मधील पुस्तकातून मांडला. वित्तीय क्षेत्राबद्दलचे त्यांचे पुस्तक २००६ सालचे आहे, त्याच्या प्रस्तावनेतच त्यांनी ‘वित्तीय भरभराटीचे वा व्याजदरांचे फुगे फुगविले जातात, त्या फुग्यांचा अभ्यास येथे करण्यात       आलेला नाही’ अशी स्पष्ट टीपही जोडली होती.. ती का, हे २००८ साली फुगा फुटल्यानंतर समजलेच. परंतु अशा पराकोटीच्या घटनांपेक्षा, नित्यक्रम अभ्यासणे आणि तो सुधारण्याचे मार्ग सुचवणे हा तिरोल यांच्या अभ्यासाचा पाया आहे. थोडक्यात, भांडवलशाहीची अटळता स्वीकारून तिला वठणीवर आणण्यासाठी, वळण लावण्यासाठी तिरोल यांच्यासारख्यांचे अभ्यास महत्त्वाचे आहेत.