नेमाडे यांना ज्ञानपीठ मिळणे ही बाब मराठी साहित्यविश्वाला दिलासा आणि चेतना देणारी आहेच. परंतु केवळ या सन्मानामुळे नेमाडे नायक ठरतात, असे नव्हे.. त्यांचे स्थान त्यांच्या लिखाणातून, त्यामागच्या दृष्टीतून आणि चिंतनातून स्पष्ट झालेले होतेच!
पटोत किंवा न पटोत. भालचंद्र नेमाडे हे टाळता येण्याजोगे लेखक कधीच नव्हते आणि नाहीत. नेमाडे यांना अगदी नेमाने धुत्कारणारे लोक अनेक आहेत त्यांनाही नेमाडे काय म्हणताहेत हे ऐकावेसे वाटतेच. एवढे मोठेपण नेमाडे यांच्या कादंबऱ्यांनी आणि जाहीर वक्तव्यांनी त्यांना दिलेले आहे. या सर्वामागे आहे नेमाडे यांची समज आणि ती वाढवणारा अभ्यास. तो अभ्यास ज्यांना झेपत नाही, ते एकतर नेमाडपंथी होतात किंवा मग दुसरे टोक गाठून नेमाडेविरोधक. नेमाडे या दोहोंची – म्हणजे स्वपंथीयांची सुद्धा- फार फिकीर करीत नसावेत. एकांडेपणाचे वलय हे काही माध्यमांनी नेमाडे यांच्याभोवती आखलेले नाही. त्या वलयात नेमाडे यांनीही अनेक रंग भरलेले आहेतच. उदाहरणार्थ, साहित्य संमेलनांना न जाण्याचा रंग, वर्तमानपत्रे वाचत नाही असा दुसरा रंग आणि पुरस्कारांनी फार दिपून जाण्याचे कारण नाही असा तिसरा. यापैकी तिसरा रंग शुक्रवारी जरा विटलाच. ज्ञानपीठ सन्मान त्यांना मिळाला. ही बातमी आनंदाची आहे. नेमाडे यांना ज्ञानपीठ मिळणे ही बाब मराठी साहित्यविश्वाला दिलासा आणि चेतना देणारी आहे. तेव्हा भारतीय साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा हा पुरस्कार मिळण्याच्या आधीपासूनच नेमाडे यांची साहित्यिक उंची कशी वाढत गेली होती, हे येथे सांगणे इष्ट ठरेल. नेमाडे हे सहसा प्रतिनायक मानले जातात आणि ज्ञानपीठने जणू त्यांना नायकत्व मिळवून दिले असाही एक सूर निघेल. परंतु नेमाडे यांची – किंवा कुणाचीही- प्रवृत्ती यापैकी एकाच साच्यात चपखल बसेल अशी असू शकत नाही.
कोसला ही आजदेखील तरुणांना वाचावीशी वाटणारी कादंबरी नेमाडे यांनी लिहिली, त्याआधी- म्हणजे महाराष्ट्र राज्यनिर्मिती नुकती झालेली असताना नेमाडे लघु अनियतकालिकांच्या चळवळीत जोमदारपणे उतरले होते. पु. ल. देशपांडे यांनी कोसलाबद्दल, या कादंबरीने मराठी वाङ्मयाला पेंगताना पकडले असे म्हटल्याचे प्रसिद्धच आहे. पेंगताना पकडणाऱ्याकडे जी जाग आणि चपळाई असावी लागते, ती साठच्या दशकातील लघू अनियतकालिकांच्या चळवळीत होती. आपण चळवळीत आहोत हे भान ठेवूनच नेमाडे आदींची अनियतकालिके सुरू होती. याच चळवळीतील अन्य सहकाऱ्यांनी पुढे औरंगाबादेत आपापले बंगले बांधले आणि नेमाडे मात्र मुंबई, गोवा अशा ठिकाणी शिकवीत राहिले. या फिरस्तीनेच लंडनच्या पौर्वात्य अभ्यासशाळेत मास्तरकीचा मान त्यांना मिळाला. पण बिढार जे पाठीवरच राहिले, ते मुले मोठी होईपर्यंत. यापैकी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनुभवांचा भाग बिढार, जरीला, झूल, हूल या कादंबऱ्यांत आला आहे आणि कोसलामध्ये पुण्याचे अनुभव आहेत. परंतु या आत्मपर कादंबऱ्या म्हणाव्यात, तर तसेही नाही. या कादंबऱ्या सामाजिक स्थितीचे आणि शैक्षणिक- सांस्कृतिक क्षेत्रांतील व्यंगांचे दर्शन घडवतात. तरुण हे जग पुढे नेणाऱ्या बदलांचे केवळ ‘अँटेनी’ असतात का? मुसलमानांत एकीची भावना आजही मध्ययुगीन कशी? आदी प्रश्न नुसतेच उपस्थित करून सोडूनही देतात. अशा प्रश्नांची उत्तरे वगैरे मिळवायची नसतात, पण लेखकाच्या ‘स्थिती’त समाज असतोच असतो. यापुढील हिंदू, हे आणखी निराळे प्रकरण आहे.
हिंदू समजून घेण्यासाठी आधी नेमाडे यांचा देशीवाद समजून घेतलेला बरा. देशीवादाविषयी मराठीत नेमाडे मुलाखती आणि भाषणांतून बोलले आहेत, इंग्रजीतील द क्वेस्ट या निस्सीम ईझिकेल संपादित द्वैमासिकात दोन लेख लिहून नेमाडे यांनी ४० वर्षांपूर्वी देशीवाद मांडला आहे. या देशीवादी चिंतनातून भारतातील बहुसंख्य समाजाकडे त्याच्या जाति-वास्तवासकट स्वच्छपणे पाहण्याची नेमाडे यांची दृष्टी वाचकाला मिळू शकते. ती मिळाली तर मग, जात हे मानववंशशास्त्रीय वास्तव आहे हे- सामाजिक वास्तवाच्या पुढले- विधान किंवा प्रादेशिक अस्मितांबद्दलचे नेमाडे यांचे विचार पटण्या न पटण्याचा प्रश्न येतो. प्रादेशिक अस्मिता असणे गैर नाही, पण तिचा वापर करणे मात्र अयोग्य, अशा रेषा नेमाडे यांनी आखल्या आहेत. आपली ती अस्मिता आणि इतरांचा तो अतिरेक असे कधी नसते, हे त्यांना माहीत आहे. हिंदू असा उल्लेख होणारा जो समाज येथे आहे, त्याने बौद्धांचे सुधारकी वळण कसे पचवले, फटकून असणाऱ्या महानुभावांनाही कसे आपलेसे केले आणि बंडखोर संतांपासूनच संप्रदाय कसे सुरू केले, हे नेमाडे जाणतात. त्यामुळे ‘हिंदू’मध्ये अशा अनेक अस्मिता अंगभूतपणे असणारी अनेक माणसे वाचकाला भेटतात. हिंदू या कादंबरीत एका शिवराळ वृद्धेचे जे पात्र नेमाडे यांनी अवघ्या दीड पानांत उभे केले आहे.. ते आजच्या ‘एआयबी’ वगैरे वादांबाबत भूमिका घेताना आपणही अस्मितेचा वापर करतो आहोत की काय याचा पडताळा घेण्यासाठी उपयुक्त ठरावे असे आहे. इथे नेमाडे कादंबरीच लिहितात. पात्रेच उभी करतात. परंतु सांगतात मात्र समाजाच्या असण्याबद्दल. त्या असण्यामध्येच ऐतिहासिक वास्तवाची वीण नेमाडे यांना दिसू लागते. जावळ काढण्यासारख्या लहानशा प्रसंगातून या विणीचे धागेदोरे काढून ते वाचकापर्यंत भिडवणे नेमाडे यांना जमते. यातून होते असे की, सखोल संदर्भानिशी सारेच असणे पाहिल्यावर काहीही परके वाटत नाही. काहीही विपरीत भासत नाही किंवा कशात उणेपण दिसत नाही. हिंदूमधला खंडेराव हा नायक त्याच्या घरात वा गावात लहानपणी पाहिलेल्या काही स्त्रियांबद्दल ओघाने सांगतो, तेव्हा नेमाडे यांच्याच आधीच्या कादंबऱ्यांतील चांगदेव पाटील या- स्त्रीच्या अंत:स्थ ओलाव्याने स्तिमित झालेल्या- नायकापेक्षा तो नक्कीच पुढले सांगत असतो. स्त्रिया म्हणजे नुसत्याच ‘तारुण्यसुलभ लैंगिकदृष्टय़ा आकर्षक अशा’ नसतात, उलट भारतीय समाजातील आणि म्हणून साहित्याच्याही नजरेने स्त्रियांकडे पाहिले की नातेसंबंधांनी स्त्रियांना दिलेले व्यक्तित्वही दिसू लागते, याची जाणीव नेमाडे यांना आधीपासून असलेली दिसते. आधीपासून म्हणजे, ते कविता लिहीत होते तेव्हा. मात्र इतिहास आजही आपल्या असण्यामध्येच अंतर्भूत आहे हे दाखवून, म्हणजे जगण्याची समृद्ध अडगळ केवळ मांडून हिंदू ही कादंबरी थांबते. ती इतिहासाला प्रश्न विचारत नाही.
नेमाडे यांच्या कविता तिशीनंतर जवळपास थांबल्याच. टीका मात्र थांबली नाही. इंग्रजी, भाषाविज्ञान यांचे विद्यार्थी असलेले नेमाडे टीकात्म निबंध लिहू लागले. ही केवळ समीक्षा नव्हती. टीका मराठीत फारशी होतच नाही आणि आपण करतो आहोत ती काही सैद्धान्तिक बैठक असलेली ‘टीका’च असायला हवी, असा नेमाडे यांचा आग्रह कायम राहिला आहे. मराठीमधील साहित्य व्यवहाराबद्दल नापसंतीचा त्यांचा सूर या टीकानिबंधांतून अत्यंत स्पष्टपणे दिसू लागला. या निबंधांच्या टीकास्वयंवराला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, त्याला २५ वर्षे होतील. त्या संग्रहातील ‘लेखकाचा लेखकराव होतो तो का?’ या निबंधाचे केवळ शीर्षकच लक्षात ठेवून, नेमाडेच आता लेखकराव कसे झाले वगैरे शेरेबाजी अधूनमधून होत असते. पण नेमाडे साहित्य अकादमीसाठीच ईशान्य भारतातील गारो वा खासी किंवा तत्सम भाषांतील मौखिक वाङ्मयाचे दस्तावेजीकरण करण्यात.. किंवा सिमल्यातील प्रगत अध्ययन संस्थेसाठी सैद्धान्तिक अभ्यास करण्यात स्वतला व्यग्र ठेवतात. बरेच लिहिले आहे, संपादन करून पक्का खर्डा करायचा आहे.. असे काही तरी हिंदूच्या दुसऱ्या भागाबद्दल सांगत राहतात.
नेमाडे यांचे एके काळचे मित्र आणि मराठीतील महत्त्वाचे कवी-कादंबरीकार रा. विलास सारंग यांचा शब्दप्रयोग उसना घ्यायचा तर, नेमाडे हे ‘लिहिते लेखक’ आहेत. तेव्हा उदाहरणार्थ ज्ञानपीठ वगैरे पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांच्यात फार मोठा फरक पडणार आणि नेमाडे यांना लोक अचानक ऋ षितुल्य वगैरे मानू लागणार, असे होणार नाही व होऊही नये. ज्ञानपीठाची प्रतिष्ठा मोठी आहे आणि हा पुरस्कार मिळाल्याने जागतिक तसेच भारतीय संदर्भात लेखक अधिक महत्त्वाचा मानला जातो, हे खरे आहे. परंतु अखेर संदर्भच हे सारे.. त्यांमध्ये लेखकाने स्वतला बांधून घ्यायचे नसते, हे एकदा ठरले की मग महत्त्वाची संदर्भवृद्धी करणारे सन्मानही समृद्ध अडगळीसारखे नुसत्या असण्यावर थांबतात.