अमेरिकेचे माजी परराष्ट्र उपमंत्री आणि गोल्डमन सॅक्स या बँकेचे माजी अध्यक्ष ही जॉन व्हाइटहेड यांनी भूषविलेली सर्वोच्च पदे होती. मात्र अन्य अनेक पदे त्यांच्याकडे चालत आली, ती त्यांनी स्वीकारली आणि कामही करून दाखविले. त्यामुळेच  वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाल्यानंतर अनेक स्तरांतील लोकांनी त्यांना आदरांजली वाहिली. रोनाल्ड रेगन या अमेरिकी अध्यक्षांचे एक सहकारी किंवा गोल्डमन सॅक्ससारख्या गुंतवणूक बँकेचे अध्यक्ष यापेक्षा कॉपरेरेट जगात राहूनही समाजभावी काम करणारे सहृदय नेते ही त्यांची ओळख अधिक झळाळून उठली.
‘संधीची वाट पाहायची नसते, ती आपणच हेरायची असते’ हे गोल्डमन सॅक्सद्वारे अनेक कंपन्या विकत घेणाऱ्या वा दुसऱ्या कंपनीत विलीन करणाऱ्या व्हाइटहेडना माहीत होतेच. ‘कोणकोणत्या कंपन्यांना विलीन होणे बरे वाटेल, अशांची यादीच करून ठेवावी आपण आपल्याकडे’ असे या ‘मर्जर-किंग’ ठरलेल्या व्हाइटहेड यांनी तरुण सहकाऱ्यास सांगितल्याची नोंद ‘हार्वर्ड बिझनेस स्कूल’कडे आहे. पण व्हाइटहेड यांनी स्वत:च्या तरुणपणी संधी साधली, ती देशसेवेची. दुसऱ्या महायुद्धाचा अखेरचा अध्याय ठरलेल्या ‘नर्ॉमडी लँडिंग’मधील एक विमान उतरविणारे वैमानिक, असा त्यांचा लौकिक आहे. महायुद्ध संपल्यावर अमेरिकेचे वाढते व्यापारी महत्त्व जाणून त्यांनी हार्वर्डमध्ये प्रवेश घेतला. तेथून ते गोल्डमन सॅक्सच्या चाकरीत लागले, तेव्हा त्यांचा पगार होता वर्षांला ३६०० डॉलर. तेव्हा या बँकेत एकंदर कर्मचारी होते ३००. याच संस्थेत १९४७ पासून ३८ वर्षे ते होते.  १९८० च्या दशकात त्यांना न्यूयॉर्क शेअर बाजाराच्या कार्यकारी मंडळाचे सदस्यपद, अमेरिकी ‘फेड’च्या १२ राज्यशाखांपैकी सर्वात बलाढय़ अशा ‘फेडरल रिझव्‍‌र्ह बँक ऑफ न्यूयॉर्क’चे अध्यक्षपद अशी पदेही मिळाली. मात्र आर्थिक विश्वातील एवढी महत्त्वाची पदे काबीज करणाऱ्यांच्या स्वभावातील चढेलपणा व्हाइटहेड यांच्याकडे नव्हता. ‘एशिया सोसायटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि अमेरिकेचे आशिया खंडाशी नाते समृद्ध करणाऱ्या संस्थेचे ‘तहहयात (किंवा ‘सुप्रतिष्ठ’) अध्यक्ष’ असे एक पद त्यांच्याकडे होते. या संस्थेचे ते एक महत्त्वाचे देणगीदार आणि विश्वस्तही होते. पत्नी नॅन्सी हिचे स्मरण म्हणून वॉशिंग्टनच्या बेघरांसाठी एक भलेमोठे वसतिगृह त्यांनी बांधले. ‘९/११’च्या स्मृती समितीला त्यांचे नेतृत्व आणि देणग्याही लाभल्या. हा दानशूरपणा तरुणांमध्ये यावा, यासाठी अनेक व्याख्यानेही त्यांनी दिली होती.