चित्रकलेच्या प्रेक्षकांना उपयोगी पडणारे महत्त्वाचे विचार मराठीत अनेकदा व्यक्त झाले आहेत. तरीही नग्नचित्रं पाहताना मात्र प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया अशाही असू शकतात की, यांना आस्वाद आणि भोग यांमधला फरक समजत नाही का, असा प्रश्न पडावा..
चित्रकार महेंद्र दामले हा आता कलाशिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करू पाहतो आहे.  कलासमीक्षक या नात्यानं त्याची कारकीर्द तुलनेनं कमी काळाची, पण भरीवच होती. चित्राकडे पाहण्याची नवी जाणीव मराठी वर्तमानपत्रांत १९९०च्या दशकात सशक्तपणे आणली, ती या महेंद्रनं. त्याच्या लिखाणातून जे शिकायला मिळालं, त्यात ल्युसियन फ्राइड या ब्रिटिश चित्रकाराची मानवी देहाकडे (नग्नदेहाकडे) पाहण्याची दृष्टी, हा एक भाग होता. पण त्याहीआधी एकदा कधीतरी ‘सुधाकर लवाटे यांच्या या न्यूडसचे देह रसरशीत फळांसारखे आहेत’ असं काहीसं वाक्य महेंद्रनं लिहिलं होतं तेव्हा ‘अच्छाऽऽ रसरशीत काऽय? फळासारखे काऽय?’ असं त्याला चिडवल्यावरही तो प्राध्यापकाला शोभणाऱ्या गांभीर्यानंच म्हणाला, ‘होय. स्टिल लाइफमध्ये फळाचा रसरशीतपणा दाखवण्यासाठी जी तंत्रं वापरतात, तसंच रेन्डरिंग (इथं अतिसोपा अर्थ- रंगकाम) लवाटेसरांनी केलं होतं त्या चित्रांमध्ये.’ मग ‘जेजे’तून आणि पुढे स्वत:च्या क्लासातून विद्यार्थी घडवणाऱ्या लवाटे यांच्या त्या चित्रांमधली बाह्यरेषा कशी सलग आहे आणि गोलाईचं अगदी हुकमी दर्शन घडवणारा प्रकाश त्यांनी कसा वापरला आहे, हे आपणही पाहिल्याचं आठवलं होतं.. आणि आपल्याला हे महेंद्रसारखं पाहता आलं नाही, याची जाणीवही झाली होती.
याच महेंद्रनं दहा-बारा वर्षांपूर्वी त्याचे अनेक लेख ‘हेतू काय?’ हा सवाल चित्रकारांना करण्यावर खर्ची घातले होते. तुम्ही तुमचं चित्र घडवता ते तुम्ही चित्रातून तुमचा असा काही दृश्य-शोध घेत असता म्हणून की केवळ जास्तीतजास्त लोकांनी वाहवा करावी म्हणून (किंवा अशी चित्रं हल्ली (बाजारात) चालतात म्हणून) हा प्रश्न महेंद्रनं धीटपणे वृत्तपत्रीय आठवडी चित्रसमीक्षेच्या कॉलमात आणला होता. हे आज कुण्णाच्याही लक्षात नाही, याचे पुरावे तुम्हाला दर आठवडय़ाला कुठल्या ना कुठल्या चित्रप्रदर्शनात दिसू शकतातच. ‘चित्रं हेतुपूर्ण असतील आणि चित्रामागचा दृश्य-हेतू साधारण काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचत असेल, तर लोकांची चित्रकलेविषयीची अनास्था कमी होईल’ असं थेट कधी न लिहिता, हा धडा मराठीत अगदी अलीकडच्या काळात महेंद्र दामलेनं घालून दिला.
‘करून पाहणं आणि पाहून करणं’ असा एक निराळा (सूत्रबद्ध) धडा, अमूर्तचित्रकार प्रभाकर कोलते यांनी घालून दिला होता. त्यामागचं म्हणणंही हेच आहे. चित्रकारानं चित्र ‘घडवणं’ म्हणजे त्यानं/तिनं काहीतरी नवा दृश्य-शोध घेणं आणि त्या अर्थानं ‘करून पाहणं’. हुबेहूब चित्रं काढणारे हे ‘पाहून करण्या’च्या जातकुळीतले असतात, असा सूचक अर्थही त्यात आहे.
कोलते यांनी प्राध्यापक म्हणून (आणि नंतरही) सुमारे दोन पिढय़ांची जडणघडण केली. त्याहीआधी तेदेखील वर्तमानपत्रात आठवडी चित्रसमीक्षा करत, हा योगायोग. परंतु इथे आपण लक्षात ठेवायचं ते हे की, देह पाहण्यामागे कुणा प्रेक्षकाचा हेतू अगदी ‘आंबटशौकीन’ वगैरे असला, तरीही चित्रकाराचा हेतू मात्र दृश्य घडवण्याच्या प्रक्रियेसाठी विशिष्ट तंत्र दृश्यरूपाचाच शोध (म्हणजे एका अर्थानं ‘दृश्यशोध’) घेण्याचा असू शकतो.
ल्युसिअन फ्राइड (१९२२-२०११) या ब्रिटिश चित्रकाराचं चित्र सोबत पाहता येईल. या फ्रॉइडनं (मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्राइडचा हा नातू) एकदा म्हणे म्हटलं होतं, ‘अ‍ॅज फार अ‍ॅज आय अ‍ॅम कन्सन्र्ड द पेन्ट इज द पर्सन’ मग दुसऱ्यांदा कधीतरी, ‘आय वाँट पेन्ट टु वर्क अ‍ॅज फ्लेश’! ‘माझ्याबाबतीत तरी, व्यक्ती म्हणजे रंगच’ आणि ‘मांसाचं काम रंगानं करावं, हेच मला हवं असतं’ असं या वाक्यांचं शब्दश: भाषांतर करता येईल आणि मुख्य म्हणजे, त्याचं प्रत्यंतर या सोबतच्या चित्रातही पाहता येईल. इथल्या चित्रात एक पुरुष आहे, तो नग्न असावा परंतु त्याचं टक्कल, खांदे, दंड, कोपर, हात, पाठ, मांडय़ा, ढोपर आणि पोटरी एवढेच (हाफपँट- सँडो बनियन घातलेल्या कुणाचेही दिसू शकतात तितकेच) अवयव दिसत आहेत. याच फ्रॉइडच्या अन्य अनेक चित्रांत अगदी सर्व लैंगिक अवयव दिसू शकतात, पण त्यातलं एकही चित्र अश्लील वाटू शकत नाही. एकतर, त्यानं निवडलेली माणसं (स्त्रिया आणि पुरुष) पाहून कुणाला कामेच्छा व्हावी, अशी अजिबात दिसत नाहीत. त्या पोजमध्ये ती नाहीत. कदाचित त्यांची नैसर्गिक-अनैसर्गिक कामतृप्ती झालीही असेल पण त्याच्याशी फ्राइडला चित्रकार म्हणून काही देणंघेणं नाही. त्याच्या चित्रचौकटीत त्याचे रंग एवढंच दाखवतात की ही जिवंत मांसलता या रंगाच्या कुडीत राहते आहे.
फ्राइडबद्दल कुणालाही इंटरनेटवर बरंच वाचता येईल. आपलं कलाभान खास महाराष्ट्रीय वा मराठी भाषकांसाठी आहे. तेव्हा आपण आत्ता जे फ्राइडचं चित्र पाहात आहोत ते, हे चित्र पाहून महेंद्र दामले आणि कोलते या (चित्रकार, समीक्षक व कलाशिक्षणकार) अशी तिहेरी भूमिका निभावणाऱ्यांनी मराठीतच जे काही सांगून ठेवलेलं आहे, त्याची आठवण करण्यासाठी.
चित्रकारानं चित्र ‘करून पाहावं’ ही अपेक्षा, त्याचा हेतू दृश्यशोधाचा असावा अशी कळकळ, हे सगळं मराठीत झालेलं आहे. कोलते यांनी जाहीर कार्यक्रमांतदेखील ही अपेक्षा मांडली आहे, दामले यांनी वृत्तपत्रात लिखाण केलंय, म्हणजे हे काही कुठेतरी खबदाडीत नव्हते.. आपल्याला त्यांचं म्हणणं ऐकूच गेलं नाही.
स्त्रीदेहाच्या चित्राकडे पाहताना तंत्रशुद्धपणेच रसरशीत फळाची आठवण होणं, हेही आपल्या मराठीत जरा कमीच घडतं. लिहिणारे बरेच लोक त्याच चित्राकडे पाहून बाईच्या देहाला रसरशीत फळाची ‘उपमा’ देतील; पण ‘रसरशीत फळ खायचं असतं. ते फळ दुसऱ्याच्या मालकीचं असेल, तर आपल्याला ते खावंसं वाटू नये. तसं वाटलं, तर ते पाप’- अशी भावना त्या उपमेमागे असू शकते त्याचं काय? पुरुषी वर्चस्ववाद, आपापल्या धर्मानी आपल्याला दिलेल्या पापपुण्य कल्पना, धर्म टिकवून ठेवण्याचा अट्टहास करणाऱ्यांनी (पाद्री, मुल्ला, पंडित इत्यादी अनेकांनी) ‘आस्वाद’ आणि ‘भोग’ या दोन क्रियांमध्ये केलेली गल्लत.. असं सारं ओझं खूप जणांवर (फक्त मराठी वा भारतीय नव्हे) असू शकतं. लेखकांवर आणि चित्रकारांवरही असू शकतंच. पण नग्न स्त्रीचं चित्र समोर आलं रे आलं की लगेच चित्रकारावर आरोप करायचे किंवा आरोप न करता, हे अश्लील काहीतरी आपल्याला चित्रकलेच्या नावाखाली सरेआम पाहायला मिळतंय म्हणून आला क्षण भोगून घ्यायचा, हे कशाचं लक्षण आहे?
भोगलालसा शिकवावी लागत नाही. दृश्यशोध मात्र (चित्रकारांनी तरी) शिकावा अशी अपेक्षा चुकीची नाही.  काही चित्रकारांवर अशा रीतीनं हेतूंचा संस्कार होतो. पण तथाकथित ‘सामान्य माणूस’ प्रत्येक नग्न चित्राकडे भोगलालसेच्याच हेतूनं पाहू शकते/शकतो का? तसं होऊ नये, याची काळजी ल्युसिअन फ्रॉइड घेऊ शकला नि इतिहासात अमर झाला.
पण चित्रं किंवा शिल्पंच काय, गाणं, टीव्ही मालिका, नाटक, सिनेमा यापैकी कलाप्रत्ययाच्या शक्यता असलेला जो काही प्रकार समोर येईल तो जणू काही ‘आत्ता आपला वेळ छान जावा म्हणून’ समोर आलाय, असं पाहणाऱ्या सर्वाची भोगलालसाच काम करत असते. आस्वाद घेणं निराळं असतं, त्यासाठी थोडं शिकण्याची, कुणाचा क्लासबीस लावून न शिकता आला क्षणच समजून घेण्याची तयारी हवी. आमचा तो आस्वाद आणि तुमचा तो भोग असं हिणवण्याचा हेतू या लिखाणामागे अजिबात नाही. पण आस्वादाच्या शक्यता आसपास असताना आपण ‘तेवढा वेळ नाही’ किंवा ‘टाइमपास मस्तच होतो’ याच लंबकावर कसे काय घोटाळत असतो?