23 February 2019

News Flash

कलाभान : काय म्हणजे भारतीय?

पाश्चात्त्यांची कॉपी केल्याचा आरोप आधुनिक भारतीय चित्रकलेवर नेहमी केला जातो. आपल्या आसपास अस्सल कला कुठे दिसत नाही, जनसामान्यांचं दृश्यकलेशी नातं नाही, याचंही कारण भारतीय

| January 21, 2013 12:07 pm

पाश्चात्त्यांची कॉपी केल्याचा आरोप आधुनिक भारतीय चित्रकलेवर नेहमी केला जातो. आपल्या आसपास अस्सल कला कुठे  दिसत नाही, जनसामान्यांचं दृश्यकलेशी नातं नाही, याचंही कारण भारतीय कलाकार पाश्चात्त्यांचं अंधानुकरण करतात, असंच दिलं जातं. पण कलेतलं आधुनिक भारतीयत्व शोधण्याचे प्रयत्न गांभीर्यानं झालेले आहेत.. अशा प्रयत्नांच्या खुणा आपण  पाहिल्या तर रूपनिर्मिती वा तंत्रापेक्षा त्यांचा आशय अस्सल भारतीय असल्याचं लक्षात येतं..
भारताचा ६४ वा प्रजासत्ताक दिन येत्या शनिवारी साजरा होईल. प्रजासत्ताक लोकशाही देशात माणसांनी स्वतंत्रपणे जगावे, ही अपेक्षा कितपत पूर्ण झाली, याची तपासणी करण्याचा दिवस म्हणून हा राष्ट्रीय सण साजरा केला जातो. अपेक्षापूर्ती झालेलीच आहे, याचे सुंदर दर्शन राजपथावरच्या संचलनातून घडते. तरीही रुखरुख राहते. काही क्षेत्रांबद्दल काही प्रश्न तसेच कायम आहेत, याची जाणीव होते. असे चित्रकलेबद्दलचे प्रश्न अर्थातच भरपूर आहेत. चित्रकलेने- एकंदरीत दृश्यकलांनी- कला म्हणून गेल्या १०० वर्षांत इतकी प्रगती केली असताना या कलेची कोणती फळे भारतीयांपर्यंत गेली? संगीताने सिनेसंगीताची वाट धरून घराघरांत प्रवेश केला. फक्त रेडिओपासून ते मोबाइलपर्यंतच्या तांत्रिक साधनांमुळे नव्हे, लोकांशी नाते जोडणारी काही तरी कलात्मता होती म्हणून भारतीय रागदारीसुद्धा जनसंगीताचा साज लेवून ओठाओठांवर पोहोचली.. असे दृश्यकलांनी काय केले? लोकांच्या घरोघरी, गल्ल्यागल्ल्यांत, चौकाचौकांत जी दृश्यकलेची फळे आज दिसताहेत ती काय आहेत? पट्कन आठवून पाहा : कसलीमसली कॅलेंडर्स, स्वस्तात मिळाले नि आवडले म्हणून घेतलेले एखादे पोस्टर, भेट मिळालेली एखादी निसर्गदृश्याची फ्रेम, गणपती.. मग गल्लीत फ्लेक्सबोर्ड आणि चौक फारच जुना, मोठा, महत्त्वाचा वगैरे असला, शहरातला असला, तर तिथे एखाद पिढीपूर्वीचा एखादा पुतळा! हे एवढेच? आणखी काय आठवतेय?
आठवणार नाही, कदाचित. चित्रकलेने संधी असूनही लोकांशी नाते जोडले नाही. लोकांपर्यंत जी काही दृश्ये पोहोचली, ती केवळ तंत्रामुळे. उदाहरणार्थ, भगवान रामपुरेंनी घडवलेल्या गणपतींचे ‘मास प्रॉडक्शन’ होऊन तो गोलसर गणपती ‘गिफ्ट शॉप’द्वारे घरोघरी पोहोचला. मग मॉलमध्ये तुमचा फोटो काढून जणू काही पेनाने वा पेन्सिलीच्या रेषांनी रेखलेल्या व्यक्तिचित्रात त्याचे डिजिटल रूपांतर करणारी संगणकीय तंत्रे आली, पण एखादा चित्रकारच एखाद्या तंत्रावर स्वार झालाय आणि लोकांना ‘कलावंत’ म्हणून लक्षात राहतोय, असा मान छपाईच्या शिळाप्रेस तंत्रावर मांड ठोकणाऱ्या राजा रविवर्मानंतर कुणालाही महाराष्ट्राने दिला नाही. (भारतानेही नाही, असे नाही म्हणता येत. बंगालात अपवाद आहेत. कसे ते नंतर पाहू).. एकदा का तंत्रच पोहोचणार असे ठरले की, कोण दृश्यकलावंत नि कसले काय!
भारतीय चित्रकलेला एक याहीपेक्षा भारी (किंवा सर्वापेक्षा भारी) प्रश्न छळतोय. गेली शंभरहून अधिक वर्षे त्याचे उत्तर शोधण्यात गेलीत. प्रश्न कसला, कूटप्रश्नच तो. हा प्रश्न असा :
‘आत्ताच्या भारतीय दृश्यकलेत भारतीय काय आहे?’
आता तर असे झालेय की, एक तर तो प्रश्न तरी जरा बाजूला ठेवावा आणि जागतिकीकरण साजरे करावे किंवा मग असे मानावे की, या प्रश्नाचे उत्तर दररोज नवे-नवे मिळतच असते वगैरे. हे दोन्ही मार्ग चटकन पटणारे नाहीत. त्यामुळे सदरहू प्रश्न कायमच!
भारतीय कलेतले भारतीयत्व शोधणाऱ्या (किंवा ‘शोधा तुम्हीच’ असा काखा वर करण्याचा पवित्रा घेऊन, हल्लीची भारतीय कला म्हणजे केवळ पाश्चात्त्यांची कॉपी- तीही भ्रष्टच, असे मानणाऱ्या) लोकांनी खरे म्हणजे कुठल्याही कलेबिलेबद्दल बोलण्याआधी आजच्या भारतीय स्वैपाकघरात डोकवावे. खाण्याचे पदार्थ भारतीय आहेत, बनवण्याची रीतही भारतीयच आहे- म्हणजे नारळ बारीक करून घ्यावा आणि तो आमटीत, भाजीत घालावा हे आजही पाळले जाते, पण ‘कोळशावरचा स्वैपाक तो कोळशावरचाच स्वैपाक’ .. ‘चुलीवरच्या लाकडांची चव उतरते हो भाकरीत’ हे कितीही मान्य केले तरी घरात गॅसनंतर मिक्सर, मग फ्रिज, मग पैसा असल्यास मायक्रोवेव्ह, अशी ‘पाश्चात्त्य आक्रमणे’ होतच असतात. स्वैपाक मात्र भारतीयच राहतो.
अशी कैक आक्रमणे भारतीयांनी आपलीशी केलेली आहेतच. पाश्चात्त्य गेल्या फार तर साडेतीनशे वर्षांतले आणि त्यांचीही स्वैपाकघरे सुधारली ती गेल्या शंभरेक वर्षांतच.
हेच- नेमके हेच- चित्रकलेच्या इतिहासाबद्दल घडलेय.
त्यामुळे दुसऱ्या प्रश्नाच्या संदर्भात, ‘भारतीय आशय’ हीच उत्तराची किल्ली असू शकते.
आशय की रूप, असा एक वाद साधारणपणे प्रत्येक कलेत कमीअधिक फरकाने असतो. उत्तर भारताच्या अभिजात संगीतात राग ही रूपाची चौकट आहे आणि त्या चौकटीत आशय भरणाऱ्या बंदिशी बांधल्या गेल्या आहेत. तो न्याय भारतीय चित्रकलेला पुरेसा लावताच येणार नाही, अशा उलथापालथी गेल्या दीडशे वर्षांत घडल्या आहेत किंवा त्याही अगोदरच चित्रकलेत-दृश्यकलेत तरी नक्कीच घडल्या होत्या. भारतीय कलेतली ‘मुघल लघुचित्र शैली’ तरी भारतीय कुठेय? ती तर तुर्कस्थानी! अगदी फार फार मागे गेले तर मोहंजोदडोची ती हातभर बांगडय़ा घातलेली नर्तिकाच पाहावी लागेल ‘भारतीय कलेचा नमुना’ म्हणून. शिवाय, ती मोहंजोदडोच्या उत्खननात सापडलेली नर्तिका ४५०० वर्षांपूर्वीच घडवली गेलेली असली तरी, ती सापडली १९२६ साली! म्हणजे तोवर, ‘मी जेजे स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी.. ग्लॅडस्टन सॉलोमनसाहेब होते आम्हाला शिकवायला’ असे म्हणणाऱ्या भारतीयांची बॅच मुंबईत आजही अव्वल मानल्या जाणाऱ्या कला-महाविद्यालयातून शिकून बाहेरही पडली होती. त्याआधी १८६५ पासून लॉकवूड किपलिंग आणि जॉन ग्रिफिथ्स हे ब्रिटिशच ‘जेजे’चे प्रमुख होते. कोलकात्यातही हेच झाले. ब्रिटिशांनी भारतीयांना पाश्चात्त्य कला पाश्चात्त्य पद्धतीने शिकवायचे ठरवूनच कोलकात्यातही १९६४ पासूनच तंत्रशाळेच्या जोडीला आर्ट स्कूलही उघडले होते, पण कोलकात्यात टागोर म्हणून एक जे जोराशांकोच्या ठाकुरबाडीत राहणारे मुळातूनच आंग्लाळलेले कुटुंब होते, त्यातल्या तरुणांनी काही ब्रिटिशांना जुमानले नाही. अवनींद्रनाथ टागोरांनी पौर्वात्य कलेतली रूपनिर्मितीची तंत्रे (पाण्यावर जलरंग सोडून हवा तितकाच रंग कागदासरसा राहू देणारे ‘वॉश टेक्निक’ हे त्यातले महत्त्वाचे) शिकून घेऊन, लघुचित्रांच्या विविध परंपरा पाहून मग आपली चित्रकला ‘भारतीय’ आणि तरीही जे आधीच झालेय त्याचे अनुकरण न करता पुढे जाणारी, अशी करण्याचा प्रयत्न केला. मग १९०१ मध्ये शांतिनिकेतनच निघाले खरे, पण तिथे नंदलाल बोस, बिनोदबिहारी मुखर्जी अशी समविचारी चित्रकार मंडळी भेटल्यावर मग १९१९ साली शांतिनिकेतनचे कलाभवन सुरू झाले.
हे कलाभवन म्हणजे, ‘आम्हाला भारतीय आधुनिक कलेचा शोध नित्यनेमाने घ्यायचाय. आजची भारतीय कला आम्ही घडवू. अशा कलेचा आविष्कार करणारे विद्यार्थी आम्ही घडवू,’ असं जाहीरपणे म्हणू शकणारे एकमेव कॉलेज होते, त्या वेळच्या भारतातले!
मुंबईत टागोरबिगोर नव्हते कुणी. टागोरांएवढे मोठे घर मुंबईत असणारे सगळे दानशूर पारशी. ते ब्रिटिशांनाच पैसा देऊन म्हणायचे, आता भारतासाठी नीट काम करा. इतका भोळेपणा चालत नाही.. लोक नाडले जाणारच अशाने.. तशा आपल्या आधीच्या पिढय़ा, अत्यंत अभावितपणे नाडल्याच गेल्या एका परीने. त्यांना वाटत होते की, आपले भले होतेय, हा त्यातला आजही चटका लावणारा भाग.
इथे सोबत जी दोन चित्रे आहेत, ती या सगळ्या संदर्भानिशी बघून पाहा.. ‘भारतमाते’चे अवनींद्रनाथ टागोरांनी १९०५ साली ‘वॉश टेक्निक’ने रंगवलेले चित्र आहे.. त्या चित्रातली माता अजिबातच रणरागिणी नाही. ऋषितुल्य असे काही तरी आहे तिच्या व्यक्तिमत्त्वात. ब्रिटिश वाईट, आपण चांगले असे वाद घालत बसण्याऐवजी आपण आधीपासूनच खूप चांगले होतो हे लक्षात ठेवून आपले आपले काम नीट करायचे, ही टागोर घराण्याची जीवन सत्कारणी लावण्याची रीत या भारतमातेतही उतरली आहे.
दुसरे शिल्प आहे, १९६५ सालचे. ‘खुरपंधारी स्त्री’- आदि दाविएरवाला. हे जे शिल्पकार दाविएरवाला होते, त्यांनी रूप-निर्मितीची शैली म्हणाल तर फेकून देण्याजोग्या लोखंडी ‘स्क्रॅप’ (औद्योगिक भंगार) वापरून ते शिल्पे घडवायचे. ही पद्धत म्हणजे एक प्रकारे, पिकासोबिकासोंनी चावून चोथा केलेल्याची कॉप्पी! पण तरीही दाविएरवाला थोरच आणि भारतीयच शिल्पकार, कारण त्यांनी भारतीय आशय नेमका आणला.. खुरपंधारी स्त्री साकारताना त्यांनी अशी काही किमया केली की, बस्तरच्या ओतीव लोखंडी शिल्पांची आठवण पाहणाऱ्याला यावी आणि मध्य-पूर्व भारतात जो झारखंड, छत्तीसगड, ओडिशा अशा राज्यांचा पट्टा आहे त्यातल्या कृश, पण उत्साही स्त्रिया आठवाव्यात आणि हो, ही खुरपंधारी स्त्री पाहून कुणाला मोहंजोदडोची ती नर्तिका आठवली, तर तो केवळ योगायोग कसा समजायचा?
अशी जाणीव पाहताना होणे, हा तर ‘भारतीय’-योग म्हणायला हवा! 

First Published on January 21, 2013 12:07 pm

Web Title: kalabhanwhat means indian
टॅग Drawing