काझुओ इशिगुरो या लेखकाच्या नव्या कादंबरीचं स्वागत जगभरात होत आहे. भारतीय इंग्रजी प्रसारमाध्यमांनी या नव्या पुस्तकाकडे लक्ष दिलेलं नसलं, तरी ते वाचण्याचं आवाहन स्वीकारायला हवंच! का? – हे सांगणारा लेख..  

नावाने जपानी आणि लेखनकर्तृत्वाने ब्रिटिश असलेला कझुओ इशिगुरो त्याच्या दोन बुकर पुरस्कृत आणि इतर चार बहुचर्चित कादंबऱ्यांमुळे लोकप्रिय असला, तरी वाचायला जराही सोपा नाही. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळातील जपान (द आर्टिस्ट ऑफ द फ्लोटिंग वर्ल्ड), त्याच काळातील ब्रिटन (द रिमेन्स ऑफ द डे), अलीकडच्या काळात अज्ञात युरोपीय शहरात घडणारी संगीतज्ञाची गाथा (द अनकन्सोल्ड) आणि भविष्यातील ब्रिटनमध्ये घडणारी लहान मुलांची भीषण विज्ञानकथा (नेव्हर लेट मी गो) असा त्याच्या लोकप्रिय कादंबऱ्यांचा कालपट मोठा आहे आणि कथाजगतही वैविध्यपूर्ण आहे. पण त्या जगांच्या वैविध्यातही मानवाची आत्मविघटनाची ओढ, भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यातील अंधाऱ्या जागा आणि स्मरण-विस्मरणाच्या खेळामध्ये जगणारी मानवी ‘सभ्यता’ आदी संकल्पनांची पुनरावृत्ती हा सातत्याचा धागा आहे.
शब्दरूपातून जवळपास स्वप्नवत पाश्र्वभूमीला जिवंत करण्याचे सामथ्र्य इशिगुरोमध्ये आहे, पण अनाकर्षक, लांबडय़ा परिच्छेदांचे डोंगर उभे करणाऱ्या या लेखकाचे धोपट शैलीशी वैर नाही. त्यामुळे समजण्यासाठी साधे असले तरी परिच्छेद, पानांची पुन:पुन्हा उजळणी करीत त्याच्या ‘बृहद्कथे’शी एकरूप होणे ही वाचकाची कसोटी असते. तरी त्याच्या साहित्याच्या अनुयायांची संख्या मोठी आहे, कारण त्यात हाताळलेले कथापटल त्या त्या विश्वाची पूर्वपीठिका बदलून टाकते. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जपानवर आधारलेल्या शेकडो साहित्यकृती आणि कलाकृती देऊ शकणार नाहीत, अशी वेगळीच अनुभूती त्याच्या त्याच विषयावरील एका कादंबरीतून येऊ शकते. ‘नेव्हर लेट मी गो’मधून विज्ञानकथाप्रेमींना चकवणारा विज्ञानकथेचा नवाच आराखडा तो उभारू शकतो, तसेच हेरकथेलाही ‘व्हेन वी वेअर ऑर्फन’मधून वेगळ्या पद्धतीने सादर करू शकतो. म्हणूनच शब्दांचा संयतोत्सव साजरा करणाऱ्या ‘इशिगुरोएस्क’ स्थितीला पोहोचण्यासाठी वाचकही त्याच्या कादंबऱ्यांतून मिळणारे आवाहन (आव्हानच!) दर वेळी स्वीकारतात.
 ‘नेव्हर लेट मी गो’नंतर तब्बल दशकभरानंतर दीड आठवडय़ापूर्वी प्रसिद्ध झालेली त्याची नवी कादंबरी ‘द बरीड जायंट’ त्याच्या मूलभूत संकल्पनांना पुन्हा आणत असली, तरी कादंबरीच्या आवाहनाचा आवाका मोठा आहे. त्यात इतिहास असला, तरी कादंबरी ‘ऐतिहासिक’ लेबलाच्या व्याख्येत मावणारी नाही. ब्रिटनच्या एका अपरिचित काळाशी कथानकाचा निव्वळ धागा जोडण्यात आला आहे. रोमन साम्राज्याच्या अस्तानंतरचा म्हणजेच किंग आर्थरच्या मृत्यूनंतरचा सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीचा ब्रिटन यात आला आहे. या काळात भूषणावह किंवा दूषणावह असे काहीच घडले नव्हते. त्या काळातील लढाहीन, कणाहीन समाजव्यवस्थेचा तुकडा इशिगुरोच्या कथेने अधोरेखित झाला आहे. सिनेमा, टीव्हीने आज बऱ्यापैकी सुस्पष्ट केलेल्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’, ‘लॉर्ड ऑफ द िरग्ज’ आदी मिथक कथांच्या जवळ जाऊनही त्यातील भव्यदिव्यता, शूर-क्रूरतेला लांब ठेवण्याची कसरत करणारी वैशिष्टय़पूर्ण कथाभूमी इशिगुरोने नव्या कादंबरीत विकसित केली आहे. ग्रिमबंधूंच्या परिकथांसारख्या राक्षस, ड्रॅगन्स, अतिमानवीय शक्तींचा अंतर्भाव करूनही रोमहर्षक लढाया, सुष्ट-दुष्टांच्या अपेक्षित संघर्षगाथा आदींचे आकर्षक रूप यात नाही. ही खास ‘इशिगुरोएस्क फॅण्टसी’ आहे. परीकथेच्या त्याने स्वत: केलेल्या नियमांनी वाचकाला कादंबरीच्या विश्वात ओढले जाण्याचे (किंवा लांब जाण्याचे) स्वातंत्र्य घेऊ देणारी.
कादंबरीचा काळ आधीच सांगितल्याप्रमाणे इसवीसनाच्या सहाव्या किंवा सातव्या शतकात घडणारा आहे. हा काळ इशिगुरोच्या कथेत निराळेच रहस्य घेऊन अवतरतो. कादंबरी सुरू होते, तेव्हा एकमेकांचे पक्के वैरी असलेल्या ब्रिटिश आणि सॅक्सन (जर्मनीच्या पश्चिमेकडले लोक) यांच्यातील युद्ध जवळपास संपुष्टातच आले आहे.. लोक विचित्रशा मुर्दाड व्यवस्थेत जगण्यात धन्यता मानत आहेत. कारण ‘शी-ड्रॅगन’नामक राक्षसी प्राण्याच्या श्वासाने निर्माण झालेल्या किरमिजी वातावरणामुळे लोक ‘विस्मृतिरोगा’चे शिकार बनलेले आहेत! महिनाभरापूर्वी, काही दिवसांपूर्वी आणि अगदी काही तासांपूर्वी घडणाऱ्या घटनाही लोक विसरून जात असल्याने, त्यांच्या सर्व भावनांवर एक प्रकारचे आत्मनियंत्रण आलेले आहे (किंवा आणखी मराठीत बोलायचे तर, या लोकांची ‘अस्मिता’ त्यांना कृतीकडे घेऊन जातच नाही). याच काळात अ‍ॅक्सल आणि बिएट्रिस या मरणपंथाला टेकलेल्या वृद्ध जोडप्याच्या अंधूक स्मृती पुन्हा जाग्या होतात. आपल्या दूरदेशी राहणाऱ्या मुलाची त्यांना आठवण येते आणि उतारवयामुळे सामाजिक बहिष्काराची नवनवी रूपे अनुभवणारे हे मरणासन्न दाम्पत्य दूरदेशाच्या प्रवासाला निघण्यास सज्ज होतात. मुलाविषयीच्या अतिसूक्ष्म स्मृतीने मिळालेल्या छोटुकल्या बळावर त्यांचा सुरू झालेल्या  या प्रवासात त्यांना  भेटतो एक सॅक्सन लढवय्या. या लढवय्याने राक्षसापासून वाचविलेला लहान मुलगा, किंग आर्थरचा पुतण्या ‘गवैन’ नामक सरदार यांना सोबत घेऊन हा प्रवास सुरू राहतो, पण तो अधिकाधिक कठीण बनत जातो. विस्मृतिरोगाच्या प्रदेशात प्रवास करणाऱ्या या प्रत्येकाचा हेतू भिन्न असतो. सॅक्सन लढवय्याला ड्रॅगिनिणीला ठार करून त्या प्रदेशातील सर्व लोकांच्या स्मृती पूर्ववत करायच्या असतात. अ‍ॅक्सल आणि बिएट्रिसचे प्रवासातील राक्षस आणि अतिमानवीय प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी तो त्यांच्यासोबत आलेला असतो. त्याच्यासोबत चर्चेनंतर वृद्ध दाम्पत्यही ड्रॅगनणीला मारण्याच्या मोहिमेत ओढले जाते. ‘गवैन’ हा ब्रिटिश सरदारही त्याच हेतूने प्रवासात दाखल होतो, पण त्याचा अंत:स्थ हेतू वेगळाच असतो.  
किरमिजी वातावरण आणि पात्रांच्या विस्मृतीभरल्या धूरकट आठवणींनी येथील प्रत्येक पात्र काही अंशी हतबल झालेले दिसते. वृद्ध दाम्पत्य आपल्या मुलाविषयीच्या आठवणींतून त्याचे कुठलेच चित्र रंगवू शकत नाही. त्याच्या नावापासून तो राहत असलेल्या गावाविषयी त्यांच्याकडे कोणताच तपशील नसतो. सॅक्सन लढवय्या या ब्रिटिश दाम्पत्याला मदत करीत असला, तरी ब्रिटिशांनी रणमैदानात आणि गावातील निष्पाप सॅक्सन्सवर केलेल्या भीषण अत्याचाराच्या तुटक स्मृती त्याच्या मनातून संपलेल्या नसतात. ड्रॅगिनिणीच्या हल्ल्यातून वाचविलेल्या सॅक्सन मुलामध्ये तो त्या स्मृतिप्रवाहाला परावर्तित करतो. ‘गवैन’ सरदारही स्मृतिभ्रंशाच्या मात्रेतून आर्थरचे वारसदारपण मिरवत असतो. त्यामुळे प्रत्येकाला अपेक्षित प्रवासाचा अंतिम टप्पा कुठला असेल, याची उत्सुकता कादंबरीच्या मध्यापर्यंत जोर घेते.
कादंबरी तीन पातळ्यांवरून सुरू राहते. पहिली पातळी ही लहान मुलांना आवडणाऱ्या ‘फॅण्टसी’ची. नायक आणि नायिका असलेल्या वृद्ध दाम्पत्याचा जंगलातून, डोंगरामधून, नदीकिनाऱ्यावरून प्रवास सुरू असतो. प्रवासात त्यांना भेटणाऱ्या अतिमानवी शक्ती, राक्षस, विचित्र प्राणी, चर्चमधील क्रूरकर्मी संन्याशी आणि विस्मृतिबाधेमुळे अनाथ झालेले लहान मुलांचे कुटुंब आदी कथाघटकांमधील अवघड वळणे ही (मर्यादित तरी) चमत्कृतींनी भरली आहेत. दुसरी पातळी आहे स्मृती आणि विस्मृतीचे माणसाच्या आयुष्यातील स्थान दर्शविणारी. लोक स्मृतींवर जगू शकतात तसेच विस्मृतीही मानवी संस्कृतीच्या अस्तित्वाशी निगडित आहे. सॅक्सन आणि ब्रिटनमधील युद्ध थांबण्यासाठी, तेथे भयकारी शांतता निर्माण होण्यासाठी विस्मृतिबाधा कारणीभूत असते. जर ती पसरविण्यास कारणीभूत ठरलेल्या ड्रॅगनचा खात्मा करणे म्हणजे पुन्हा कटुस्मृती, पुन्हा सूड, पश्चात्ताप, रक्ताचे दुष्टचक्र सुरू करणारी परिस्थिती येऊ शकते, याची कल्पना वृद्ध दाम्पत्यापासून इथल्या प्रत्येक प्रमुख पात्राला आहे, पण तरीही स्मृतिजतनाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. कादंबरीची तिसरी पातळी आहे मानवी नातेसंबंधांची. बिएट्रिस आणि अ‍ॅक्सल हे दाम्पत्य विस्मृतीमुळे आपल्या कटू भूतकाळाला विसरून एकत्र आहेत, की खरोखरीच दोन व्यक्ती प्रेमाच्या आदर्श संकल्पनांचे आयुष्यभर वाहक बनले आहेत, याची त्यांनाही खात्री नाही. ड्रॅगनला मारल्यानंतर होऊ शकणाऱ्या स्मृतींच्या पुनर्जन्मामुळे आत्ता आहे, तेच प्रेम, एकमेकांविषयी वाटणारी भावना उद्या राहील, की पूर्वायुष्यातील कटू स्मृती त्या भावनांना नष्ट करतील, याची भीतीही त्यांना कायम आहे. ताटातुटीचे विविध प्रसंग, दंतकथा आणि वाटेतील अडथळ्यांमधून ही पातळी गडद होणारी आहे.
 बऱ्याच संकल्पना, कथानक-उपकथानक, मिथकं आणि ब्रिटिश इतिहास यांचा समावेश असला, तरी त्याच्यात हा लेखक फार अडकून पडत नाही. त्यामुळे वाचन आव्हान स्वीकारण्याचे ठरविलेल्या प्रत्येकाला हे सगळे फार अवघड वाटणार नाही. वृद्ध दाम्पत्याच्या, मुलाला शोधण्यासाठी सुरू झालेल्या प्रवासाला निश्चित वळण आहे. शी-ड्रॅगन नावाच्या महाकाय प्राण्याशी सामना आणि स्मृती जतनासाठीची या पात्रांची एकमेकांशी रहस्यानिशी सुरू असलेली धडपड इशिगुरोच्या नियम आणि गतीनुसार चालते. संयत शब्दोत्सव पचविण्याची ताकद असेल, तर इथल्या इशिगुरोएस्क अवस्थेशी एकरूप होणे सहज जमू शकते.
 सुरुवात करायची झाल्यास किंवा पहिल्या वाचनात पचत नसल्यास इशिगुरोच्या ‘नॉक्टर्नल’ या कथासंग्रहाकडे वळावे. लांब पल्ल्याच्या नसल्या तरी त्या कथांच्या वाचनातून त्याच्या धष्टपुष्ट कादंबऱ्यांना समजून घेण्याची पूर्वतयारी होऊ शकते. कथा-कादंबऱ्यांच्या वाचनाला ऊठसूट नावे ठेवण्याच्या आजच्या लोकप्रिय ट्रेण्डमध्ये वाचकाला जाणीवसमृद्धीच्या प्रदेशात नेऊन सोडणाऱ्या मोजक्या कथालेखकांमध्ये इशिगुरोचे नाव हक्काने घेतले जाते. पुढेही ते घेतले जाईल, अशी त्याची ताजी कादंबरी आहे.

* द बरीड जायंट .
 लेखक : काझुओ इशिगुरो
प्रकाशक : फेबर अँड फेबर
पृष्ठे : ३४६ किंमत : ७९९
लेखकाबद्दल,  इतरत्र..
ज्यांच्या पुस्तकांच्या दहा लाखांहून अधिक प्रती खपल्या असतील, तर लेखकांवर ‘लोकप्रिय’ असा शिक्काच मारला जातो आणि सहसा अशा लेखकाला लोकोत्तर वगैरे मानायचं नाही, समीक्षकांनी अशा लेखकांची sam07दखलच घेणं टाळायचं, हे सर्रास चालतं. पण काझुओ इशिगुरो यांच्या दोन पुस्तकांनी दहा लाखांहून अधिक खपाचा आकडा ओलांडूनसुद्धा त्यांना समीक्षकांमध्ये मोठा मान आहे. ‘अंडरस्टँडिंग काझुओ इशिगुरो’ या पुस्तकानं तर, ‘जोसेफ कॉनरॅड, ई. एम. फॉर्स्टर, जेम्स जॉइस या ब्रिटिश-आयरिश लेखकांची परंपरा पुढे नेणारे’ असा इशिगुरोंचा उल्लेख आहे. इशिगुरो यांची महत्ता मानवी संस्कृतीवरल्या आणि मानसिकतेवरल्या त्यांच्या संयत टीकेमध्ये आहे, असं सांगणाऱ्या या पुस्तकाचे लेखक आहेत ब्रायन श्ॉफर. याच श्ॉफर यांनी, सिंथिया वाँग यांच्यासह  ‘कन्व्हर्सेशन्स विथ काझुओ इशिगुरो’ या पुस्तकाचं संपादनही केलं आहे. इशिगुरो यांच्या पाच वाङ्मयीन मुलाखती (म्हणजे वृत्तपत्रीय अथवा अन्य प्रसिद्धीसाठीच्या मुलाखती नव्हे), विख्यात जपानी कथाकार केन्झाबुरो ओए यांच्याशी त्यांचा झालेला संवाद आणि संपादकद्वयीने घेतलेली त्यांची नवी मुलाखत, या सर्वातून मानवी स्वभावाची पक्की जाण इशिगुरो यांना असल्याचं दिसतं.
कॉनरॅड, फॉर्स्टर, जॉइस यांनी राजकीय वा सामाजिक भाष्य थेटपणे केलं नाही. पण आयरिश असणं म्हणजे ब्रिटिश असणं नव्हे, ही राजकीय भूमिका जॉइसच्या कादंबऱ्यांतून जशी ‘अप्रत्यक्षपणे तरीही ठामपणे’ मांडली गेली होती, तसा राजकीय आशय इशिगुरोही सांगतात, असं  या दोन पुस्तकांमधून लक्षात येईल.
इशिगुरो यांच्या अन्य काही मुलाखती इंटरनेटवरही उपलब्ध आहेत. त्यापैकी एका मुलाखतीमध्ये, रवांडा किंवा सर्बियातले लोक कोणत्या राजकीय जाणिवांनिशी जगत असतील, असा प्रतिप्रश्न इशिगुरो करतात. राजकीय भूमिका म्हणजे ‘आपल्या’च भूमिका, असं ते कदापिही मानत नाहीत, याची ही पहिली खूण. फ्राइडच्या मानसशास्त्रातली ‘स्व’कल्पना (इड, इगो, सुपरइगो) यांच्याशी इशिगुरो यांच्या लिखाणाचं नातं आहे, असं अन्य काही समीक्षकांचं मत आहे. इशिगुरो यांच्या नव्या कादंबरीतही ‘इगो’ आणि ‘सुपरइगो’ हे स्मृतीवर अवलंबून असतात, असा मतप्रवाह संथपणे वाहतो आहेच. स्मृतीचा लोप, ही कल्पना राजकीय-सामाजिक स्थितीसाठी इशिगुरो लागू करतात, त्यामुळे  ही कादंबरी म्हणजे रूपक आहे का? असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.   (प्रतिनिधी)