मंगळवारी पेशावरमध्ये जे घडले ते निंदनीय आहे, मात्र पाकिस्तानविषयी या संदर्भात सहानुभूती बाळगताना वास्तवाचे भान बाळगणे गरजेचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पाकिस्तानच्या आपल्याबाबतच्या दृष्टिकोनात आताही काही फरक पडणार नसेल आणि तेथील लष्कराची पकड आणखी घट्ट होणार असेल, तर ते भारताच्या हिताचे असू शकणार नाही.

अंगणात साप पाळायचे आणि त्यांनी फक्त शेजारच्यांनाच चावावे अशी अपेक्षा बाळगायची हे मूर्खपणाचे आणि त्याहूनही अधिक धोकादायक असते, असे अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन पाकिस्तानसंदर्भात म्हणाल्या होत्या. मंगळवारी पेशावर येथील शाळेत जे घडले त्यावरून हिलरी यांच्या विधानाची प्रचीती खुद्द पाकिस्तान आणि त्यामुळे इतरांनाही आली असणार. तालिबानी अतिरेक्यांनी अत्यंत अमानुष अशा स्वरूपाच्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी लष्करावरचा राग लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलाबाळांवर काढला आणि अत्यंत नृशंसपणे शेसव्वाशे अश्रापांचे शिरकाण केले. उत्तर वझिरिस्तान भागात पाक लष्कराने तालिबान्यांच्या विरोधात गेले काही महिने मोठी आघाडी उघडलेली आहे. त्यात लष्कराने शेकडो तालिबान्यांना कंठस्नान घातले. त्यामुळे अर्थातच तालिबानी आणि संबंधित इस्लामी दहशतवादी संघटना लष्करावर संतापलेल्या आहेत. मंगळवारी शाळेवर झालेला दहशतवादी हल्ला हा लष्कराच्या या कारवाईविरोधाचा सूड होता. तारुण्याच्या उंबरठय़ावर असलेल्या अनेकांना तालिबानी दहशतवाद्यांनी त्यांच्या शाळेच्या वर्गात घुसून टिपले. ती दृश्ये हृदय पिळवटून टाकणारी होती. सकाळी गणवेशात शाळेत गेलेला आपला मुलगा, भाऊ वा नातू अचानक रक्तबंबाळ अवस्थेत निश्चेष्ट गतप्राण होऊन पडल्याचे पाहायची वेळ ज्यांच्यावर आली असेल त्यांच्या मनाची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाही करता येणार नाही. जे काही झाले तशी वेळ जगातील कोणत्याही व्यक्तीवर कधीही येऊ नये, असेच मत कोणाही सहृदयी व्यक्तीचे होईल यात शंका नाही. या आणि अशा दहशतवादाचा अनुभव भारताने आतापर्यंत अनेकदा घेतलेला आहे. त्यामुळे दूरचित्रवाणीवरून पाकिस्तानातील ती दृश्ये पाहून अनेकांच्या मनात आपल्याकडील दहशतवादी हल्ल्यांच्या जखमांच्या खपल्या निघाल्या असतील यात शंका नाही. तथापि पाकिस्तानविषयी या संदर्भात सहानुभूती बाळगणे वेगळे आणि वास्तवाचे भान बाळगणे वेगळे. जे झाले ते दुर्दैवीच. पण म्हणून त्यामुळे येणाऱ्या सहानुभूतीच्या पुरात काही मुद्दय़ांकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही.

फोटो गॅलरी : निष्पाप जीवांना विद्यार्थ्यांची श्रध्दांजली!

फोटो गॅलरी : काय घडले पेशावरमधील ‘त्या’ शाळेत?

त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मंगळवारच्या घटनेने पाकिस्तानच्या आपल्याबाबतच्या दृष्टिकोनात काहीही फरक पडण्याची सुतराम शक्यता नाही. पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मंगळवारच्या घटनेवर जी काही प्रतिक्रिया दिली, ती या संदर्भात सूचक म्हणता येईल. या दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानचा तालिबान्यांविरोधातील लढा असाच चालू राहील, असे शरीफ म्हणाले. ते योग्यच. पण शरीफ यांनी हा लढा पाकिस्तान आपला शेजारी अफगाणिस्तानच्या मदतीने लढेल, असे स्पष्ट केले. याचा अर्थ भारताला या संदर्भात पाकिस्तान आपला साथीदार मानत नाही ही बाब लक्षात घेण्यासारखी. मंगळवारच्या शिरकाणानंतर भारतात आपण आणि पाकिस्तान दोघेही कसे दहशतवादाचे बळी आहोत, अशा स्वरूपाची प्रतिक्रिया व्यक्त झाली. ती तशी होणे हे नसíगकच. परंतु पाकिस्तानची भावना या संदर्भात महत्त्वाची. कारण पाकिस्तानच्या मते या दहशतवादापेक्षा भारत हा त्यांचा अधिक मोठा शत्रू आहे. पाक परराष्ट्र मंत्रालयानेदेखील अशाच स्वरूपाची प्रतिक्रिया नोंदवली. इस्लामविरोधात सुरू असलेला हा दहशतवाद आम्ही आमच्या देशातून नेस्तनाबूत करू असे पाक परराष्ट्र मंत्रालयाचा प्रवक्ता म्हणाला.म्हणजे या दहशतवादी हल्ल्याकडे पाकिस्तान फक्त धार्मिक नजरेनेच पाहतो आणि तो फक्त आपल्या भूमीतून परागंदा व्हायला हवा, इतपतच रस त्या देशास आहे. याचाच दुसरा अर्थ असा की या दहशतवादास आम्ही अन्यत्र वळवू, असे पाकिस्तान म्हणू पाहते आणि पाकिस्तानच्या मते अन्यत्र म्हणजे फक्त भारत. पाकिस्तानला सर्वच नाही तरी निदान शेजारी देशांतील दहशतवाद तरी नेस्तनाबूत व्हावा असे वाटत नाही.
याचे महत्त्वाचे कारण हे की, या दहशतवादाची सूत्रे ही पाकिस्तानी लष्कराच्या हाती आहेत आणि देशाची सूत्रेही आपल्याच हाती असावीत असा या लष्कराचा प्रयत्न आहे. या संदर्भातील दोन घटनाक्रम महत्त्वाचे. एक म्हणजे नवाज शरीफ यांचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार स्थिर होऊ नये यासाठी पाक लष्कराने सातत्याने केलेले प्रयत्न. शरीफ हे निवडून आल्यावर पाकिस्तानचे भारताबरोबरील संबंध सौहार्दाचे व्हावेत आणि उभय देशांतील व्यापार-उदिमास गती यावी यासाठी प्रयत्नशील होते. त्यात पाक पंतप्रधानांना यश येईल अशी शक्यता निर्माण झाल्या झाल्या लष्कराने आपले उद्योग सुरू केले. त्यातील लक्षात येईल इतका मोठा मुद्दा म्हणजे इम्रान खान यांच्या पक्षास देऊ केलेली छुपी रसद. आज इम्रान यांचा राजकीय पक्ष लष्कराच्या हातातील मोठे खेळणे बनले असून त्याचा वापर हा शरीफ यांच्या विरोधात केला जात आहे.

पाकिस्तानात सध्या राजकीय आघाडीवर अशांतता दिसते ती यामुळेच. इम्रान यांच्या पक्षाचे प्राबल्य पाकिस्तानातील काही प्रदेशांत आहे. तेथून पंतप्रधान शरीफ यांना पद्धतशीर विरोध सुरू असून त्यामागे निर्वविादपणे लष्कर आहे. लष्कराच्या हातातील दुसरे बाहुले म्हणजे ताहिर उल काद्री हा धर्मगुरू. हे काद्रीमहाशय इतके दिवस कॅनडात होते. तेथून ते मायदेशी परतले असून शरीफ सरकार उलथून पाडणे हे त्यांचे ध्येय आहे. याच हेतूने त्यांनी अलीकडे इम्रान खान यांच्याशी हातमिळवणी केली. देशभरातील विविध मशिदी आणि त्यांच्याशी संबंधित धर्मगुरू यांचे जाळेच या काद्रीबाबाने विणलेले असून सरकारच्या विरोधात देशव्यापी निदर्शने करून त्यांनी आपण काय करू शकतो याची चुणूक गेल्या वर्षी दाखवून दिलीच होती. आता इम्रानशी हातमिळवणी केल्यामुळे त्यांची उपद्रवक्षमता दुप्पट झाली आहे. या दोघांनाही पाक लष्कराची भक्कम साथ आहे कारण या सर्वाची नजर आहे ती भारतावर. तेव्हा मंगळवारी जे काही झाले त्यामुळे या मंडळींना फटका बसेल असे कोणास वाटत असेल तर ते होण्याची सुतराम शक्यता नाही. उलट जे काही झाले त्याचा परिणाम म्हणून पाक लष्कराविषयी अधिक सहानुभूती निर्माण झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

याचे कारण म्हणजे पाकिस्तानात एकूणच लष्कराविषयी आदरभाव आहे. पाकिस्तानी राजकारणी हे एकापेक्षा एक असे नग असल्याने सर्वसाधारण जनतेस लष्कर अधिक जवळचे वाटते. त्यात मंगळवारच्या हल्ल्यात बळी पडली ती लष्करी अधिकाऱ्यांची मुले. तेव्हा लष्कराच्या बाजूने तेथील जनमत तयार होण्याची लक्षणे असून त्याचा मोठा धोका आपणास संभवतो. तो असा की या वातावरणाचा परिणाम म्हणून पाक लष्कर आपली तालिबान्यांविरोधातील कारवाई काहीशी सल करण्याची शक्यता आहे. हे तालिबानीदेखील अलीकडेपर्यंत पाक लष्कराच्या संगनमताचेच भाग होते. तेव्हा त्यांच्याशी असलेले आपले जुने संबंध नव्याने स्थापित करणे लष्करास सहज शक्य    होईल. हे अर्थातच उघडपणे होणार नाही. त्याचा दृश्य परिणाम असेल तो म्हणजे तालिबान्यांच्या पाकिस्तानातील कारवाया लक्षणीयरीत्या कमी  होतील. तसे झाल्यास तालिबान्यांवर नियंत्रण मिळवल्याचा दावा पाकिस्तान करू शकेल. यामुळे होईल ते एकच.

ते म्हणजे तालिबानी वा तत्समांच्या भारताविरोधातील कारवायांत लक्षणीय वाढ होईल. कारण तालिबानी आणि पाकिस्तानी लष्कर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्याकडे काही भाबडे आणि बावळट यांच्या मनात पाकिस्तान म्हटले की शांततेचा गहिवर येतो. त्यास काहीही अर्थ नाही. तो देश विनाशाच्या मार्गाने विघटनाकडे निघालेला आहे याचे भान असलेले बरे.