29 September 2020

News Flash

यातून सर्वानीच मार्ग काढावा

अग्रलेखातून राहुल गांधी यांच्या उद्दामपणाचा जो पंचनामा केला आहे तो परखड व समयोचित आहे. या परिस्थितीत मनमोहन सिंग यांनी घरीही न जाता उर्वरित आयुष्य अमृतसरला

| October 1, 2013 01:29 am

अग्रलेखातून राहुल गांधी यांच्या उद्दामपणाचा जो पंचनामा केला आहे तो परखड व समयोचित आहे. या परिस्थितीत मनमोहन सिंग यांनी घरीही न जाता उर्वरित आयुष्य अमृतसरला जाऊन सुवर्णमंदिरात करसेवाच करावी. कारण, उर्वरित आयुष्य त्यांनाच काय पण त्यांच्या कुटुंबीयांसाठीही फारच अवमानास्तव होणार आहे. या सर्व प्रकरणांत सोनियाजींची भूमिका काय आहे, हे स्पष्ट झाले नाही. मुलाची बाजू घ्यावी की सहकारी असलेल्या मनमोहन सिंग यांची बाजू घ्यावी, हा पेच त्यांच्या मुलानेच त्यांच्यासाठी निर्माण केला आहे. मुलापेक्षा देशाच्या प्रधानमंत्र्यांची अब्रू वाचवणे आवश्यक आहे, ती हिंमत त्यांनी दाखवली तर देश त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. पण तत्पूर्वी वटहुकूम मागे घेऊन जनतेची माफीही त्यांनी मागितली तरच हे होईल. अन्य प्रमुख पक्षांनी (विशेषत: भाजपने) राजकारण बाजूला ठेवून देशहिताचा निर्णय घ्यावा. त्यासाठी राष्ट्रपतींनी पुढाकार घेतला तर अधिक बरे होईल. अलीकडच्या घडामोडींवरून राष्ट्रपतींनाही काँग्रेसची चाल आवडली नाही हे लक्षात आले आहे. भाजपसह सर्वच पक्षांची आरोप असलेल्या लोकप्रतिनिधींनी गोचीच केली आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर केला तर पाहुण्याच्या काठीने साप मारल्यासारखे होईल. लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने योग्य ते पाऊल उचलले तर गेल्या काही दिवसांत त्यांच्यावर झालेली आगपाखडही जनता विसरून जाईल.
– श्रीनिवास जोशी, डोंबिवली (पूर्व)

राजकीय रॅगिंग
कीव येते.. घरी जा! हा अग्रलेख (३० सप्टेंबर) वाचला. ‘विद्या विनयेन शोभते’ असे अतिशय विद्वान व नम्र मनमोहन सिंग यांची केविलवाणी परिस्थिती पाहता विद्वान व्यक्ती भारतीय राजकारणात येण्यापासून परावृत्त झाली नाही तरच नवल. ज्यांना कधी जबाबदारी या शब्दाचा अर्थ माहीत नाही त्या राहुलबाबांच्या बेभरवशी राजकीय टपल्या काँग्रेसला पुढील निवडणुकीपर्यंत आणखी खाईत घेऊन जाणार, असे चित्र सध्या दिसत आहे. ज्या विद्वान अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे राजकीय शिष्टाचार बाजूला ठेवून कोणत्याही भेटीच्या वेळी मानसन्मान देतात. त्यांचीच देशांतर्गत प्रतिमा अशा प्रकारे कोण्या एकाने ज्यांनी आपला राजकीय जबाबदारी, समंजसपणा कधीच सिद्ध केलेला नाही त्यांच्याकडून तरी मलिन करून घेऊ नये. सध्या सोनिया गांधींची अवस्था पाहता आपल्या प्रतापी कारवायांमुळे संजय गांधी यांनी इंदिरा गांधी यांची केलेल्या राजकीय कोंडीची आठवण येते. देशाचे ‘पंतप्रधान’ म्हणून मनमोहन सिंग यांनी निवडणुकीला काही महिने बाकी असताना या कष्टाविना सत्ता आणि अधिकार मिळालेल्या राहुलबाबास जाहीर राजकीय समज देणे आवश्यक आहे. असे केले नाही तर काँग्रेस पक्षास मनमोहन सिंग यांच्यासारख्या हुशार व्यक्तीचे राहुलबाबांनी असे केलेले राजकीय रॅिगग महागात पडेल.
प्रवीण आंबेसकर, ठाणे

सत्तेची चटक
‘कीव येते.. घरी जा! अग्रलेख वाचला (३० सप्टेंबर) जनतेला काहीही वाटले तरी सोनियामाईच्या कृपेने ज्यांना इतकी वर्षे सत्ता उपभोगायला मिळाली, त्यांना आता पंतप्रधानपदाची चटक लागली आहे असे दिसते! काय वाट्टेल ते झाले तरी ‘अपमान पचास तो खुर्ची सलामत’ असे त्यांनी निर्लज्जपणे ठरवलेले दिसते. उच्चविद्याविभूषित आणि एके काळी देशाला आíथक संकटातून बाहेर काढणारे डॉ. मनमोहन सिंग यांनी दोन महत्त्वाचे निर्णय सोनियाजींच्या दबावाखाली घेऊन देशाला पुन्हा ‘जैसे थे’ अशा स्थितीत आणून ठेवले आहे. सत्तावस्त्रे खुंटीवर टांगण्याऐवजी लाज, शरम, विवेक, स्वाभिमान ही वस्त्रेच खुंटीवर टांगली आहेत.
डॉ. सुप्रिया तडकोड, मुंबई

मानीव अभिहस्तांतरण दिवास्वप्न ठरू नये
मानीव अभिहस्तांतरणाविषयीचे वृत्त वाचले. (३० सप्टेंबर) मानीव अभिहस्तांतरणाबाबतच्या सरकारच्या सर्व उपाययोजना या मगरीचे अश्रू या नौटंकी प्रकारात मोडणाऱ्या ठरतात. मुळातच सदनिकेची किंमत ठरवताना भूखंडाच्या किमतीचा अंतर्भाव केलेला असतो, त्यामुळे सर्व सदनिकाधारकांचा त्यावर आपसूकच हक्क असतो, परंतु बिल्डरधार्जण्यिा नियमांमुळे त्यापासून नागरिक वंचित राहतात. महाराष्ट्रातील जवळपास ९० हजार सोसायटय़ांची प्रलंबित नोंदणी त्याचीच परिणती आहे.
सरकारला सदनिकाधारकांच्या हक्काची खरंच चाड असेल, तर त्यांनी वर्तमान सर्व इमारतींची सोसायटी म्हणून आपसूकच नोंदणी होईल, असे आदेश काढावेत (उदा. १ जानेवारी २००० पर्यंतच्या सर्व झोपडय़ा कायदेशीर ठरविणाऱ्या अध्यादेशाप्रमाणे). अन्यथा स्वार्थी बिल्डर भविष्यातील एफएसआयच्या अपेक्षेपायी सोसायटी नोंदणी   हा उपक्रम दिवास्वप्नच ठरविणार, ही काळ्या दगडावरची   रेघ होय.
सुधीर दाणी

मागास मानसिकतेतून बाहेर पडणे गरजेचे
नांदेड-लातूर-कुर्ला रेल्वगाडी सुरू होणार ही मराठवाडावासीयांसाठी सुखद बातमी. पण आम्ही मागास मराठवाडय़ातील या बातमीनंतरसुद्धा रेल्वे कुठून सोडावी हा हेका धरतोच आहोत. वास्तविक सध्या सुरू असलेल्या साप्ताहिक, द्विसाप्ताहिक ट्रेन पुण्यासाठी नियमित कराव्यात यासाठी आंदोलन करीत नाही. नांदेड, लातूर, परळी, उदगीर या भागातून व्यापार, लघुउद्योगांसाठी पुण्यासाठी एस. टी. व खासगी आराम बस रोज किमान ३००० प्रवाशांची वाहतूक करते. मूलभूत सुविधा सुधारण्याऐवजी स्पेशल पॅकेज देण्यावर शासनसुद्धा बोळवण करते. आपण मात्र रेल्वेगाडी लातूर येथून की नांदेड येथून यासाठी भांडत राहतो. आणि अप्रगत मानसिकतेवर स्वत:च शिक्कामोर्तब करतो.
सूर्यकांत  धारूरकर, लातूर.

सरकारी खैराती : इथेही अन् तिथेही
सरकार आता अनेक योजना जाहीर करीत आहे, उदा. अन्नसुरक्षा, आधार कार्ड योजना, जमीन अधिग्रहण कायदा, सातव्या वेतन आयोगाची घोषणा इत्यादी. आणि विरोधी पक्ष त्यांची निवडणूक नौटंकी किंवा चाल म्हणून संभावना करीत आहेत. यानिमित्ताने एका घटनेची आठवण होते.
रुग्ण संरक्षण आणि अल्पदरातील रुग्णसेवा कायदा (पेशंट प्रोटेक्शन अ‍ॅण्ड अफोर्डबल केअर अ‍ॅक्ट) यावर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी २३ मार्च २०१० रोजी सही केली. आरोग्य विमा सेवेचा दर्जा वाढविणे, रुग्णसेवेचे दर आवाक्यात आणणे, असे या कायद्याचे उद्देश आहेत. या उपायांमुळे विमाबाहय़ रुग्णसेवेचे दर कमी होतील आणि औषधोपचारांचे खर्च कमी होणार आहेत. व्याप्ती वाढवून रुग्णसेवा झेपेल अशी बनविणे यासाठी अनेक तरतुदी आहेत. आधीचे कोणतेही रोग असतील तरीही किमान दर्जाच्या योजनांचे आणि समान दर असण्याचे संरक्षण देणे, ही विमा कंपन्यांची जबाबदारी असेल. दि. ६ नोव्हेंबर २०१२ रोजी अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि ही योजना मंजूर करणारे ओबामा पुन्हा निवडून आले.
सर्व काही ओळखीचे वाटते? सवलतींची खैरात भारतापुरती मर्यादित नाही.
राजीव जोशी, पुणे

त्यांच्याविषयी घृणा तेव्हाच वाटू लागली
‘कीव येते.. घरी जा’ या अग्रलेखात (३० सप्टेंबर) बहुसंख्य नागरिकांच्या भावना समर्पक शब्दात प्रभावीपणे मांडल्या आहेत. नकार देण्याची िहमत मनमोहन सिंग यांच्याकडे नव्हती आणि नाहीही असे आपण एका ठिकाणी म्हटले आहे. प्रश्न पडतो ही िहमत का नव्हती? भारतीय नागरिकांना याचे कारण कळू शकेल काय? माहितीच्या अधिकारात हेही यावे. नव्वदीच्या जवळ आल्यावरही व्यक्तीला भीती कसली वाटते? सीमेवर पाक सन्याच्या गोळीबाराला तोंड देणाऱ्या जवानांच्या हिमतीच्या तुलनेत एखाद्या गरनिर्णयाला नकार देण्याची ही हिंमत किती किरकोळ आहे? तरीही ते या पदावर राहिले तर कणवेचे रूपांतर घृणेत व्हायला वेळ लागणार नाही, असे अग्रलेखाच्या शेवटी म्हटले आहे. राहुल गांधींसाठी पंतप्रधानपदाची खुर्ची खाली करायची आपली केव्हाही तयारी आहे हे जेव्हा मनमोहन सिंग यांनी जाहीर बोलून दाखवले तेव्हाच खरे तर त्यांच्याविषयीच्या कणवेचे घृणेत रूपांतर झाले आहे. पंतप्रधानपदावरल्या व्यक्तीबाबत असे बोलणे सभ्यपणाचे ठरणार नाही म्हणून हे कोणी जाहीर बोलत नाही, एवढेच.
अवधूत परळकर, माहीम, मुंबई

राष्ट्रवादीची काय प्रतिक्रिया?
राहुल गांधींचं वक्तव्य जितकं निषेधार्ह आहे, त्या मानाने फारच सौम्य शब्दात आपण अग्रलेख लिहिला आहे. काँग्रेस ज्यांच्या हातात देशाचं नेतृत्व देऊ पाहत आहे, त्यांची राजकीय समज किती तोकडी आहे, हे उघड झाले आहे.  हा पंतप्रधान आणि देशाचा अपमान आहे. राष्ट्रवादीचे पवारसाहेब आणि त्यांचे बोलघेवडे नेते आता चूप का आहेत?     – उमेश मुंडले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 1:29 am

Web Title: keep politics aside and take the decision benefited to country
Next Stories
1 लाचखोरी व हलगर्जीपणामुळे दुर्घटना
2 मानाने निवृत्त होण्यातच शहाणपणा
3 हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व!
Just Now!
X