‘राजकीय टीकेचा मृदंग घुमतच राहतो’ या शीर्षकाचे प्रसाद भावे यांचे पत्र वाचले. लोकशाहीत मत मांडायचा अधिकार प्रत्येकाला आहे हे मान्य. आणि केजरीवाल यांच्या बाबतीत प्रसारमाध्यमांनी ‘बाप लेक आणि गाढव’ या गोष्टीची प्रचीती आणून दिली हेही मान्य. केजरीवाल यांच्याबद्दल मत-मतांतरे असू शकतात. पण लिहिण्याच्या ओघात भावे यांनी ‘नरसिंह राव किंवा मनमोहन सिंग यांनी व्यवहार सांभाळला, देवाणघेवाण केली म्हणून अल्पमतातील सरकार स्थापूनही कालावधी पूर्ण करू शकले म्हणून त्यांना कर्तबगार म्हणायचे की काय,’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. मनमोहन सिंग आणि केजरीवाल यांची नरसिंह राव यांच्याशी तुलना केवळ अशक्य आहे. रावांच्या कारकिर्दीत काही मोठय़ा चुका (उदा: बाबरी पतन) झाल्या हे मान्य. पण पंतप्रधान म्हणून भारत घडवण्यात नरसिंह राव यांचे योगदान मोठे आहे हे मान्य करावेच लगेल. रसातळाला गेलेली भारतीय अर्थव्यवस्था किमान एकशे वीस अंशांच्या कोनात वळवून मार्गी लावण्याचे मोठे कार्य राव यांनी करून दाखवले. त्या वेळी राव यांच्या राजकीय खमकेपणामुळेच अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग आपला ठसा उमटवू शकले. आज अर्थतज्ज्ञ म्हणून आíथक पातळीवर मनमोहन सिंग साफ अपयशी ठरलेले दिसतात, याचे कारण म्हणजे त्यांच्यामागे असलेली नरसिंह राव यांची अनुपस्थिती. राव यांनी घेतलेल्या निर्णयांचे स्वागत कसे झाले हे जाणून घ्यायचे असेल तर १७ फेब्रुवारीला प्रकाशित झालेल्या ‘हिरव्या संस्कृतीचे रक्षक’ या लेखाला प्रतीकात्मक मानावे लागेल. राजीव गांधींनी आणलेल्या माध्यम क्रांतीला जसा विरोध झाला तसाच विरोध रावांच्या जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या धोरणाला झाला होता. तत्कालीन सरकारला या सुधारणांबद्दल देशद्रोही म्हणण्याइतपत विरोधकांची मजल गेली होती. एन्रॉन कंपनी ही त्या असंतोषाचे प्रमुख प्रतीकात्मक लक्ष होते. ‘आपल्या देशाला वाचवायचे असेल तर एन्रॉनला समुद्रात बुडवा’ अशा घोषणा आणि वाचननामे तत्कालीन विरोधकांनी दिले होते. पुन्हा एकदा देशात ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य येणार, असा लोकांचा समज करून दिला गेला. ( प्रत्यक्षात मात्र सत्तेवर आल्यावर विरोधकांनी सुधारणेचाच कार्यक्रम पुढे रेटला होता.) या सर्व मतभिन्नतेला टाळून रावांनी आíथक धोरणे राबवली, त्याचेच सकारात्मक परिणाम तेव्हाचा मध्यमवर्ग असलेला आणि आता वरच्या वर्गात गेलेला समाज आणि आताचा नवमध्यमवर्ग उपभोगतो आहे. रावांनी पुढे रखडलेली लोकशाही विकेंद्रीकरणाची प्रक्रिया ७३ व ७४वी घटनादुरुस्ती करून मार्गी लावली. पुढे भारताला पूर्वेकडे पाहा अशा आशयाचे धोरण देऊन पुढील परराष्ट्र धोरण आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सुबत्तेची मुहूर्तमेढ रोवली. त्यालाच नंतर वाजपेयी सरकारने पुढे रेटले.
रावांच्या कारकिर्दीत चुका जरूर झाल्या. पण म्हणून त्यांना कर्तृत्ववान म्हणणे अस्थानी होणार नाही. त्यांनी सोसलेला विरोध आणि उचललेली जबाबदारी केजरीवालांसारख्या भंपक नेत्याला जमणारही नव्हती म्हणून त्यांनी शेकडो आश्वासने देऊन एका मुद्दय़ावर पळ काढला.
‘कार्यक्षमता’ आणि बढतीतील आरक्षण
राकेश मारिया यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी अखेर वर्णी लागल्याने शर्यतीत असलेल्या विजय कांबळे आणि जावेद अहमद यांच्या नाराजीचा घेतलेला समाचार वाचला. (अन्वयार्थ- ‘अशोभनीय नाराजी प्रदर्शन’ – १७ फेब्रुवारी) अत्यंत उच्च आणि महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या ज्येष्ठता न बघता क्षमतेच्या बळावर करायला हव्यात, असा युक्तिवाद त्यात आहे. परंतु असे करीत असताना आपण आय. पी. एस. अधिकारी विजय कांबळे आणि जावेद अहमद यांच्या क्षमतेविषयीच थेट प्रश्नचिन्ह उभे करीत आहोत का? बरे सत्यपाल सिंग यांच्यासारखे पोलिसी वेशात थेट माध्यमासमोर अहमद किंवा कांबळे यांच्यापकी अजूनही कोणी नाराजी व्यक्त करीत गेलेले नाही. त्यातच ‘आता कांबळे थेट रामदास आठवलेंच्या संपर्कात’ वगरे अफवांनी कांबळे यांचे नुकसानच केले. गेली १५ दिवस आघाडी सरकार ‘कोल्हापूर’च्या जागेसारखा हा तिढा सोडवीत राहिले याचा खरपूस समाचार लेखात दिसला नाही. जनतेसाठी प्रशासन काहीही झाले तरी सज्ज झाले पाहिजे, हे मान्य केले तरी केवळ मारियाच ‘लायक’ हा युक्तिवाद पटला नाही.
१९९३ बॉम्बस्फोट मालिका तसेच २००३ च्या ‘गेट वे ऑफ इंडिया’ स्फोटांची उकल करण्यात मारिया यांचा वाटा मोठा आहे; परंतु अलीकडच्या काळात मारिया यांची कामगिरी कशी आहे हे महत्त्वाचे. मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्याबाबत साऊथ चॅनलवरील कॉल रेकॉर्डमध्ये फेरफार करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप शहीद अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता यांनी केला. (लोकसत्ता २५ एप्रिल २०१३). म्हणजेच ‘कामा’ इस्पितळाजवळ शहीद करकरे, कामटे आणि साळसकर यांच्या झालेल्या हत्येच्या घटनाक्रमाबाबत कामटे यांना शंका आहे. मारिया त्यावेळी कंट्रोल रूमची जबाबदारी सांभाळत होते. आता मारिया यांच्या आयुक्तपदी झालेल्या नियुक्तीवर आक्षेप घेतानाच श्रीमती कामटे यांनी २६/११ च्या कंट्रोल रूमची चौकशी मारिया प्रभावित करतील, अशी शंका व्यक्त केली आहे. भरदिवसा घडलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास अलीकडेच ‘एटीएस’प्रमुख पदी असताना मारिया यांनी कोणत्या दिशाहीन मार्गावर नेला हे जगजाहीर आहे. सहा महिन्यानंतरदेखील दाभोलकर यांचे मारेकरी अजूनही मोकाट आहेत. हे प्रकरण ‘एटीएस’ आणि पर्यायाने मारिया यांच्या कारकिर्दीतला मानाचा तुरा नक्कीच नाही.
विजय कांबळे तसे फारसे मारियांइतके प्रसिद्ध नाहीत. कदाचित मारिया यांच्याप्रमाणे, एखाद्या  चित्रपटात कांबळे यांची व्यक्तिरेखा साकारल्या गेली नसेल, परंतु कांबळे क्षमता असल्याशिवाय या पदापर्यंत पोहोचू शकत नसावेत. आपल्यावर अन्याय झाला ही त्यांची भावना आतापर्यंत अव्यक्त असली तरी नसíगक आहे. माजी आयुक्त अरूप पटनाईक यांच्या बदलीस कारणीभूत ठरलेले मराठी हृदयसम्राट राजसाहेब ठाकरे ‘मराठी’ कांबळेंबद्दल चकार ही काढत नाहीत.
अ. जा./अ. जमाती यांच्या बढतीत आरक्षण देण्याचे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले परंतु लोकसभेत अडकून आहे. या आरक्षणाचे विरोधक असे म्हणतात की बढतीत दिलेल्या आरक्षणामुळे उच्चवर्णीय ज्येष्ठ अधिकारी डावलले जाऊन तुलनेने कनिष्ठ मागासवर्गीय अधिकारी बढती घेतील. कार्यक्षम मागासवर्गीय प्रमोट होणार असतील तर ‘ज्येष्ठता’ हा निकष आणि ज्येष्ठ मागासवर्गीय प्रमोट होणार असतील तर ‘कार्यक्षमता’ हा निकष लावायचा – म्हणजेच दोन्ही प्रसंगी बढतीचे निकष आपल्या सोयीनुसार मागासवर्गीयांविरुद्ध वापरायचे अशी ही अन्यायकारक ‘युक्ती’ आहे. देशात लायक असलेल्या मागासवर्गीय व्यक्ती उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्य सचिव, आयुक्त, राजदूत अशा पदांवर बोटावर मोजण्याइतक्या का असाव्यात, हे मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या निवडीतून दिसून येते.
या पत्राचा उद्देश आयुक्त राकेश मारिया हे कार्यक्षम नाहीत हे सिद्ध करणे नसून विजय कांबळे किंवा जावेद अहमद हे इतर पात्र अधिकारी क्षमतावान नसावेत, हे सुचविण्याचा जो प्रकार सुरू आहे त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न आहे.
रविकिरण शिंदे, पुणे
हे टाळताही आले असते..
‘कुडमुडे कुडतोजी’ या अग्रलेखातील (१७ फेब्रुवारी)  ‘अरिवद केजरीवाल हे अत्यंत भंपक गृहस्थ आहेत, असे आमचे मत या आधीही होते’ या पहिल्याच वाक्याने  Give dog a bad name and shoot या वाक्प्रचाराची आठवण होऊन लेखाचा अंदाज आला. भ्रष्टाचारविरोधी आंदोलन करताना पहिल्यापासून कोणतीही तडजोड न करणारे, सत्तेचा हव्यास नसलेले, आपल्या ध्येयाशी प्रामाणिक असलेले केजरीवाल यांच्या राजकीय अपरिपक्वतेमुळे काही चुका झाल्या असतीलही. पण त्यांच्याबद्दलच्या विश्लेषणात पूर्वग्रहदूषित आकस नको होता. दोषांबरोबर, त्रुटी आणि गुणांचाही उल्लेख करणे उचित झाले असते. केजरीवाल यांच्या आवेशाला माथेफिरूपणा म्हणताना, मोगलांवर धावलेल्या सात वीर मराठय़ांच्या ‘वेडे’पणावर कविवर्य कुसुमाग्रजांनी ‘क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा, अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात’ असे म्हणत त्यांच्या हौतात्म्याला मनाचा मुजरा केला आहे, हे विसरून त्यांचा अधिक्षेप करणे टाळता आले असते.   
– चिदानंद पाठक, पाषाण, पुणे.