‘खैरलांजी ते खर्डा’ ही अत्याचाराची न संपणारी मालिका हेच सांगते की, आम्ही कितीही महासत्तेच्या गप्पा मारीत असलो, जातीयता संपली, असे बोलत असलो तरीही या समाजव्यवस्थेने दलितांच्या पदरात जे निखारे टाकले आहेत त्याचे चटके आजही जाणवतात. तसेच  जग बदलू लागले आहे आणि जात आता अस्ताला चालली आहे असे कितीही वाटले तरी तसे घडत मात्र नाही..
घटना बरोबर पंचवीस वर्षांपूर्वीची आहे. वसमत तालुक्यातल्या कुपटी या गावी नारायण धुळे या व्यक्तीबाबतीत घडलेली. धुळे यांच्याकडे शेळ्या होत्या. शेळ्यांची संख्या शंभर-सव्वाशेवर झाल्यानंतर त्यांना वाटले किती दिवस शेळ्यांमागे पायपीट करायची. आपण हक्काची जमीन घेऊ. त्यांनी सगळ्या शेळ्या विकल्या आणि गावातलीच चौदा एकर जमीन विकत घेतली. काल-परवापर्यंत जो माणूस कोणाच्या बांधावर शेळ्या चारताना दिसायचा तो जमिनीचा मालक बनला, पण हीच गोष्ट डोळ्यातल्या कुसळासारखी गावातल्या काहींना सलली. धुळे यांनी जमीन विकत घेतल्यानंतरही त्यांच्यामागे कोर्टकचेऱ्या सुरू झाल्या. शेवटी जिल्हा न्यायालयाने निकाल दिला. नारायण धुळे यांना जमीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. जिल्हा न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागला आहे, आता फक्त तहसीलदारांची भेट घ्यायची आणि जमिनीवर ताबा मिळवायचा. त्यासाठीच नारायण धुळे आपल्या कुपटी या गावाहून पायी निघाले. शिरळी स्टेशनवरून त्यांना वसमतला रेल्वेने जायचे होते. धुळे जमिनीचा ताबा घेण्यासाठी तहसीलदारांना भेटायला जात आहेत हे माहीत असल्याने त्यांच्यावर टपून बसलेल्यांनी नेमका डाव साधला. झुडपातून पुढे येत एकाने त्यांची गच्च कंबर धरली आणि डोक्यात दुसऱ्याने जोराचा घाव घातला. खाली कोसळल्यानंतर नारायण धुळे यांचे दोन्हीही डोळे चाकूने काढण्यात आले. त्यानंतर त्यांच्यासमोर जो अंधार झाला तो कायमचाच.
साधारण दहा वर्षांपूर्वी वसमतला जेव्हा नारायण धुळे यांची भेट झाली तेव्हा त्यांना कारण विचारले, चक्क दोन डोळे काढून तुम्हाला आयुष्यातूनच संपविण्याचा प्रयत्न या लोकांनी का केला असेल? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांना १६ ऑगस्ट १९८८ सालची घटना आठवली. डोळ्यांसमोर(?) पटच तरळला त्यांच्या. ज्या प्रसंगात त्यांचे डोळे गेले तो प्रसंग सांगताना त्यांच्या हाता-पायाला जाणवत असलेली थरथर स्पष्टपणे दिसत होती. शेवटी घटनेच्या गाभ्यापर्यंत जाणारे कारण सांगितले त्यांनी, ‘‘मी जोवर शेळ्या सांभाळत होतो तोवर कोणासंगंच दुष्मनी नव्हती. रोज एकाच्या बांधाला जायचो, पण जमीन घेतली अन् दुष्मन वाढले. आता हा आपल्या बरोबरीला यायला बघायलाय, असं लोक बोलायला लागले. जमीन घेतली अन् या लोकांच्या डोळ्यांत सलायला लागलो मी..’’ धुळे सांगत असताना एक जीवघेणी विसंगती चटके बसावेत तशी जाणवू लागली. धुळे यांची जमीन ज्यांच्या डोळ्यांना सलत होती त्यांचे काहीच झाले नाही आणि यांना मात्र आपले डोळेच गमवावे लागले. धुळे यांचा गुन्हा काय? तर ते दलित. गावात जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार कितीही होतात, ते कोणालाच खटकत  नाहीत. हे व्यवहार विनाबोभाट चाललेले असतात, पण दलिताने जमीन घेतली ही गोष्ट मात्र खटकणार, कारण काय तर तो आपली बरोबरी करतोय, त्याने आपल्या पायरीनेच राहावे.
..आता खेडय़ात कुठे जातीयता शिल्लकराहिलीय? आता कुठे अस्पृश्यतेचे चटके बसतात? असा प्रश्न विचारणाऱ्यांनी या घटनांकडे जरा संवेदनशीलतेने पाहावे. दहावी-अकरावीच्या शाळकरी वयात केवळ गावातल्या एका वरच्या जातीतल्या मुलीशी बोलण्याची सजा ही एखाद्या विद्यार्थ्यांच्या जिवंतपणी मरणयातना देऊन त्याला आयुष्यातूनच संपविण्यापर्यंत जाऊ शकते. याचेही कारण तेच. नितीन आगे हा दलित आहे. त्याने आपल्या पायरीने राहावे, तो आमच्या मुलींशी बोलतो म्हणजे काय? असा पीळ या घटनांमागे आहे. ‘खैरलांजी ते खर्डा’ ही अत्याचाराची न संपणारी मालिका हेच सांगते की, आम्ही कितीही महासत्तेच्या गप्पा मारीत असलो, जातीयता संपली, असे बोलत असलो तरीही या समाजव्यवस्थेने दलितांच्या पदरात जे निखारे टाकले आहेत त्याचे चटके आजही जाणवतात. कुठे गायरान जमिनीवरून तणाव, तर कुठे पिण्याच्या पाण्यावरून राडा. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत हे सुरूच आहे. नागभूमी असलेल्या विदर्भात, सत्तेची केंद्रे एकवटलेल्या पश्चिम महाराष्ट्रात आणि संतांची भूमी असलेल्या मराठवाडय़ात सगळीकडे कुठे ना कुठे अशा घटना घडत राहतात. कुठे जिवे मारले जाते, कुठे स्त्रियांची विटंबना होते, कुठे वस्तीच पेटविली जाते, तर कुठे बहिष्कार घातला जातो. आरोपी उजळ माथ्याने पुन्हा समाजात वावरतात. गावपातळीवरील सत्तावानांचा दरारा असा की, कोणी साक्ष देत नाही आणि अत्याचारित कुटुंबीयांचीच नावे जर साक्षीदार म्हणून असतील तर ती टिकत नाहीत. अशा प्रकरणांचे ‘निकाल’ लागतात, ‘न्याय’ मिळतोच असे नाही.
घटना घडतात तेव्हा काही दिवस वृत्तपत्रांतून बातम्या येतात, क्वचित अशा वेदनांना कलात्मक रूपही लाभते. नारायण धुळे यांच्यावरही ‘झुम कम्युनिकेशन’ने ‘अछूत’ या नावाचा लघुपट दिल्ली दूरदर्शनासाठी काढला होता. वसीम अहमद दहलवी आणि उर्दू मासिक ‘बानो’च्या संपादिका सादिया दहलवी यांची ती निर्मिती होती. हे झाले पडद्यापुरते, पण वास्तवात नारायण धुळे यांचे डोळे काढणारे आरोपी जामिनावर सुटल्यानंतरही धुळे यांना मात्र त्यांची हक्काची जमीन मिळाली नव्हती.
जग बदलू लागले आहे आणि जात आता अस्ताला चालली आहे असे कितीही वाटले तरी तसे घडत मात्र नाही. अशा वेळी कुठे तरी ऐकलेले आठवत जाते, ‘आधी लोक शिवाशिव करूद्यायचे नाहीत, पण जगू द्यायचे, आता शिवाशिव करू देतात, पण जगू देत नाहीत.’ यातली शाब्दिक कसरत एक वेळ बाजूला ठेवू, पण जातीयता आधीही होती आणि आताही आहे. ज्यांना गावातच राहायचे आणि गावातल्याच जातीयतेच्या धगीचे चटके सहन करायचे त्यांच्या प्रतिक्रिया खूप भेदक असतात. एकदा बहिष्काराची झळ सहन करणाऱ्या एका वयोवृद्ध दलिताला विचारले, आता गावात राहताना काय वाटते? जराही वेळ न लावता ते म्हणाले, ‘‘उशाखाली ‘सरप’ घेऊन झोपल्यासारखं वाटतंय.’’ ‘सरप’ म्हणजे साप. जातीयतेचे चटके सहन करणाऱ्यांना कोणती जोखीम घेऊन जगावे लागते त्याचा हा जिवंत उद्गार! किती तरी प्रश्नांना नव्याने जन्म देणारा..

Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
Vanchit Bahujan Aghadi Changes Lok Sabha Candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 Election
‘वंचित’ चा फेरबदल कोणाच्या फायद्याचा? कोणाच्या सांगण्यावरून?