आपण पाकिस्तानचे तारणहारच आहोत, असे मुशर्रफ यांचे अध्यक्षपदावरूनचे वागणे होते. न्यायालयाची खोडी काढून मुशर्रफ यांनी तेव्हा फेकलेले अस्त्र आता त्यांच्यावरच उलटले आहे. आगामी निवडणुकीत लष्कर तटस्थ राहिले आणि निवडणुका ठरल्याप्रमाणे पार पडल्या तर मुशर्रफ बाराच्या भावात जातील, याबाबत शंका नाही..
देश म्हणून पाकिस्तानचा बट्टय़ाबोळ झाला आहे. माजी अध्यक्ष, लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांना तुरुंगात डांबण्याचा आदेश देऊन या दिशेने न्यायालयाने आणखी एक पाऊल टाकले. जनरल मुशर्रफ यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या काळात जे काही पेरले ते आता न्यायालयात उगवू लागले असून त्याचाच पहिला फटका त्यांना बसला. मुशर्रफ यांनी सत्तेवर असताना अनेक न्यायाधीशांना तुरुंगात डांबले होते. त्यांची मजल सरन्यायाधीशांना तुरुंगात टाकण्यापर्यंत गेली होती. त्याविरोधात निदर्शने करणाऱ्या वकील आदींना मुशर्रफ यांच्या सैनिकांनी सामान्य निदर्शकांसारखे बडवले होते. न्यायव्यवस्थेवर त्यांनी त्या वेळी जे काही फेकले ते आता उलटून मुशर्रफ यांच्यावर येऊ लागले आहे. अर्थात या सगळ्यात मुशर्रफ यांची बाजू घ्यावी असे काहीही नाही. लष्कराच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्यावर मुशर्रफ यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याविरोधात उठाव करून १९९९ साली सत्ता हस्तगत केली. त्याआधी त्याच वर्षी मे महिन्यात कारगिलची कागाळी काढण्याचा अगोचरपणाही त्यांच्याच काळात झाला. मुशर्रफ यांचा आगाऊपणा असा की तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना त्याची कल्पनाही त्या वेळी त्यांनी दिली नाही. शेवटी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी डोळे वटारल्याने मुशर्रफ यांना नाक कापले गेलेल्या अवस्थेत माघार घ्यावी लागली. वास्तविक या युद्धाने पाकिस्तानी अर्थव्यवस्थेची अपरिमित हानी झाली. मुळात फक्त भारताशीच स्पर्धा करणे हा एकमेव कार्यक्रम असलेला पाकिस्तान आर्थिकदृष्टय़ा मागासच होता आणि आहेही. तरीही पोकळ अभिमानातून कारगिल प्रकरण घडले आणि त्यास केवळ जनरल मुशर्रफ हेच जबाबदार होते. या आणि अन्य कारणांमुळे त्यांचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी खटके वाढतच गेले. शरीफ यांनी अखेर मुशर्रफ यांच्या बडतर्फीचा आदेश काढला. तेव्हा पाकिस्तानात लष्करप्रमुखांनी आतापर्यंत अनेकदा केले तेच मुशर्रफ यांनी केले. त्यांनी सत्ताच हस्तगत केली. सर्वच लष्करशहा आपल्या प्रेमात असतात. मुशर्रफ तसेच होते आणि अजूनही आहेत, असेच म्हणावयास हवे. व्यवस्थेचा भाग म्हणून केवळ होयबाच आसपास असल्याने लष्करशहांना दुसरे ऐकून घेण्याची सवय नसते. त्यामुळे आपले जे काही चालले आहे ते उत्तम आहे या भ्रमात ते होते. आपण सत्ता हाती घेऊन पाकिस्तानचे भले केले आहे, असा एकंदर त्यांचा आव होता. लष्करी अधिकाऱ्यांचा म्हणून एक रुबाब असतो. त्याचे म्हणून कौतुक आणि मान असला तरी त्या देखाव्यास किती किंमत द्यायची ते कळावे लागते. मुशर्रफ यांच्याबाबत ते अनेकांना समजले नाही. अत्यंत दिखाऊ पोशाखीपणा आणि वागण्याबोलण्यात लष्करी शिस्तीतून आलेले मार्दव यामुळे जनरल मुशर्रफ यांचा प्रभाव चांगला पडत असे. आपण कोणी पाकिस्तानचे तारणहारच आहोत, असे त्यांचे वागणे होते. त्यास भलेभले फसत. त्यास भारतीय प्रसारमाध्यमांचाही अपवाद नाही. आपल्याकडे चर्चा करण्यासाठी आले असता जनरल मुशर्रफ यांची तुलना पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी करण्याचा निर्लज्ज निर्बुद्धपणा आपल्याकडे अनेक माध्यमतज्ज्ञांनी केला. मुशर्रफ यांचे कैसे चालणे, कैसे बोलणे अशी आरती ओवाळण्यात मश्गूल झालेल्या या माध्यमतज्ज्ञांनी त्या वेळी वाजपेयी यांच्या वयाचीदेखील काहीशी खिल्लीच उडवली होती. परंतु पुढील काळात ही माध्यमतज्ज्ञ मंडळी किती पोकळ आहेत हे जनरल मुशर्रफ यांनी आपल्या वागणुकीने दाखवून दिले. सर्व लष्करशहांना स्वत:च्या सहिष्णुतेविषयी भलताच भ्रम असतो. या भ्रमात आपण पाकिस्तानात लोकशाहीच आणली आहे, असे जनरल मुशर्रफ दाखवत. परंतु तो देखावाच होता आणि कोणत्याही लष्करशहाविरोधात नंतर जनमत संघटित होऊ लागते तसे ते जनरल मुशर्रफ यांच्याविरोधातही होऊ लागले होते. मुशर्रफ यांच्याच काळात माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची हत्या झाली आणि न्यायव्यवस्था बरखास्त करीत देशात आणीबाणी जारी करण्याचा निर्णयही मुशर्रफ यांचाच. सत्तेवरून पायउतार झाल्यावर मुशर्रफ यांचा स्वत:विषयीचा लोकप्रियतेचा बुडबुडा फुटला. त्यांना देशत्यागच करावा लागला.
त्यानंतर लंडन आणि दुबईत चार वर्षे लपून राहिल्यानंतर गेल्या महिन्यात जनरल मुशर्रफ पाकिस्तानात परतले ते ११ मे या दिवशी होणाऱ्या निवडणुकांवर डोळा ठेवून. आपल्या काळात पाकिस्तानची भलतीच भरभराट झाली असा त्यांचा समज होता आणि त्यामुळे पाकिस्तानी भूमीत पाऊल टाकल्या टाकल्या आपल्याभोवती जनसागर जमा होईल असे त्यांना वाटत होते. प्रत्यक्षात झाले उलटेच. सामान्य जनतेने उलट जनरल मुशर्रफ यांना अनुल्लेखानेच अधोरेखित केले. एव्हाना त्यांचा आपण कसे पाकिस्तानचा उद्धार करणार आहोत असा समज दूर झाला असण्याची शक्यता आहे. कारण आल्या आल्या पहिल्यांदा त्यांना निवडणूक आयोगाने दणका दिला. त्यांचे उमेदवारी अर्जच फेटाळण्यात आले. खरे तर यावरून काय तो बोध घेऊन मुशर्रफ यांनी निवडणूक प्रक्रियेतून काढता पाय घेतला असता तर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली नसती. परंतु मुशर्रफ अतिशहाणपणा करावयास निघाले. तेव्हा त्यांना पुढचा फटका बसला. त्यांना मायदेश सोडण्याची परवानगी नाकारण्यात आली. म्हणजे परतीचे दोरही खुंटले. त्याच वेळी त्यांच्या हडेलहप्पी कारभाराचा फटका बसलेल्या वकिलांनी मुशर्रफ यांच्याविरोधात न्यायालयीन मोर्चेबांधणी केली आणि त्यांना वेगवेगळ्या आरोपांखाली खटल्यात गोवले. त्याच्याच सुनावणीच्या वेळी शुक्रवारी न्यायालयाने जनरल मुशर्रफ यांच्या अटकेचा आदेश काढला. त्या वेळी एखाद्या सामान्य आरोपीसारखी न्यायालयातून पळून जाण्याची नामुष्की या माजी लष्करप्रमुखावर आली. हे पलायन फारसे काही यशस्वी झाले नाही. त्यांना थोडय़ाच वेळात अटक झाली. जे झाले ते उत्तमच झाले.
परंतु त्यामुळे काही प्रश्न निर्माण होतात आणि ते आपल्यासाठी अधिक गंभीर आहेत. यातील महत्त्वाचा मुद्दा असा की, न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्वसत्ताधीश लष्कर आणि न्यायव्यवस्था यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची दाट चिन्हे आहेत. काहीही झाले तरी आपल्या एका माजी प्रमुखावर तुरुंगात राहण्याची वेळ आल्यामुळे लष्कर बिथरणार नाही आणि शांत राहील असे मानणे अवघड आहे. कारण हे असेच सुरू राहिले तर आज जनरल मुशर्रफ यांच्यावर जी वेळ आली ती अन्य कोणा लष्करप्रमुखावरदेखील येऊ शकते. पाकिस्तानी अर्थव्यवस्थेत सध्या सर्वात मजबूत कोणता घटक असेल तर तो लष्कर. त्यामुळे आपल्या हितसंबंधांना बाधा येईल असे काही झाले तर ते खपवून घेणे लष्करासाठी अवघड जाईल. तेव्हा लष्कर या संघर्षांत मुशर्रफ यांच्या बाजूने मध्ये पडले तर पुढच्या महिन्यातील निवडणुकांचा बोजवारा उडेल यात शंका नाही. तसे झाले तर आपणास अधिक जागरूक राहावे लागेल.
आणि समजा तसे झाले नाही, लष्कर तटस्थच राहिले आणि निवडणुका ठरल्याप्रमाणे पार पडल्या तरी मुशर्रफ हे बाराच्या भावात जातील, याबाबतही शंका नाही. या निवडणुकांत मुशर्रफ यांना आणि त्यांच्या पक्षाला काहीही पाठिंबा नाही. निवडणुकीनंतर नवाझ शरीफ यांच्या मुस्लीम लीगची सत्ता येईल अशीच चिन्हे असून तसे झाले तरी ते मुशर्रफ यांना या वेळी मोकळे सोडणार नाहीत, हेही उघड आहे. वास्तवाचे भान सुटले आणि अतिशहाणपणा करावयास गेले की असेच होते. गणवेशात असतानाही त्यांनी मूर्खपणा केला आणि साध्या वेशातही त्यांच्याकडून तेच घडले. आपल्याच मायदेशाला मूर्खाचे नंदनवन मानून जे पराक्रम मुशर्रफ यांनी केले, ते पाहता त्यांना या नंदनवनाचे राजेच म्हणावे लागेल.