आरोग्याच्या क्षेत्रात एक उद्योजक म्हणून जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने ज्यांनी भारताचे नाव जगाच्या नकाशावर नेऊन ठेवले, त्या डॉ. किरण शॉ मझुमदार यांना अलीकडेच फिलाडेल्फिया येथे केमिकल हेरिटेज फाउंडेशनचे ऑथमर सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. हे पदक मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या महिला व पहिल्या भारतीय व्यक्ती आहेत. जेम्स वॉटसन व रॉबर्ट लँगर यांच्यासारख्या महनीय व्यक्तींना हा पुरस्कार यापूर्वी मिळालेला आहे. यावरून किरण शॉ मझुमदार यांनी भारताला औषध संशोधनाच्या माध्यमातून केवढा मोठा बहुमान प्राप्त करून दिला आहे याचा प्रत्यय यायला हरकत नाही.
 किरण शॉ मझुमदार यांनी त्यांच्या जैवतंत्रज्ञानातील ज्ञानास उद्योजकतेची जोड दिली व जे सर्वजण करतात, त्यापेक्षा वेगळी वाट धरून बायोकॉन ही भारतातील पहिली जैवतंत्रज्ञान कंपनी स्थापन केली. त्या भारतातील एक श्रीमंत महिला आहेत. त्यांची संपत्ती २०१० मध्ये ९० कोटी डॉलर होती.  त्यांची बायोकॉन कंपनी आता जगातील हजारो रुग्णांना दुर्धर आजारांवर औषधे पुरवीत आहे.  ही जगातील सर्वाधिक इन्शुलिन निर्मिती करणारी कंपनी आहे. ‘पिशिया’वर आधारित मानवी इन्शुलिन त्यांनी ४० देशांत उपलब्ध करून दिले.
किरण शॉ मझुमदार यांचा जन्म बंगळुरू येथे २३ मार्च १९५३ रोजी झाला. त्यांनी प्राणिशास्त्रात बी.एस्सी. केल्यानंतर पदव्युत्तर पदवी किण्वन विज्ञान म्हणजे फर्मेटेशनमध्ये घेतली. १९७८ मध्ये त्यांनी बायोकॉन ही कंपनी स्थापन करून औद्योगिक वितंचकांच्या निर्मितीत प्रथमच भारतात वेगळी कामगिरी करून दाखवली. त्यानंतर त्यांनी कर्करोग, मधुमेह व इतर अनेक रोगांवर उपचारांसाठी औषधांची निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यांना सरकारने पद्मश्री, पद्मभूषण हे नागरी सन्मान देऊन गौरवले आहे. ‘फोर्बस’ नियतकालिकाने १०० शक्तिशाली महिलांत, ‘टाइम’ मासिकाने १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये, तर ‘फायनान्शियल टाइम्स’ने पहिल्या ५० यशस्वी उद्योजक महिलांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला होता.  जैवतंत्रज्ञानात संशोधनाला उद्योजकतेची जोड मिळाली, तर किती उत्तुंग काम करता येते याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. बंगळुरू येथे नारायण हृदयालय व कर्करोग उपचार केंद्र सुरू करण्यास त्यांनी मदत केली आहे. अलीकडेच अल्झुमब हे जुनाट सोरायसिसवरचे औषध त्यांनी उपलब्ध करून दिले, त्याला भारतात विक्रीस परवानगीही मिळाली आहे. त्यांच्या कंपनीचा इन्शुलिन निर्मिती प्रकल्प लवकरच मलेशियात सुरू होत आहे. रुग्णांना परवडतील अशी औषधे तयार करण्याचे श्रेय त्यांना जाते. प्रयत्नांना दिशा असेल, तर अपयशातूनही मार्ग काढत यशस्वी होता येते हेच त्यांचे कर्तृत्व आपल्याला सांगते.