पाश्र्वगायिका म्हणून प्रसिद्धी, यश आणि नाव मिळाल्यानंतरही अशा प्रकारचे ‘मार्केटिंग’ न करणारे, प्रसिद्धीच्या नशेत वाहवत न जाणारे आणि आपल्यातील साधेपण व माणूसपण जपणारे फारच थोडे असतात. पाश्र्वगायिका कृष्णा कल्ले हे असेच एक व्यक्तिमत्त्व. कानपूरमध्ये वाढलेल्या, शालेय स्पर्धातही गायनाची पारितोषिके पटकावलेल्या कृष्णा कल्ले पुढे आकाशवाणीच्या ‘अ’ दर्जाच्या कलाकार झाल्या. १९६५ साली, अरुण दाते यांच्या सांगण्यावरून त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन ‘गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया’ हा किताबही मिळवला आणि मग संगीतकारांकडून त्यांच्या आवाजाला मागणी वाढली. त्यांनी गायलेली अनेक चित्रपटगीते आणि भावगीते आजही रसिकांच्या ओठावर आहेत.
 ‘परिकथेतील राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशील का’ (अनिल मोहिले), ‘गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी’ (पं. हृदयनाथ मंगेशकर), ‘मन पिसाट माझे अडले रे’ (पं. यशवंत देव), ‘ऊठ शंकरा, सोड समाधी’ (दत्ता डावजेकर), ‘तू माझ्या स्वप्नांची कल्पना’ (ओम दत्ता), मैना राणी चतुर शहाणी’, ‘देश हीच माता, देश जन्मदाता, घडो देशसेवा ऐसी, बुद्धी दे अनंता’, ‘रामप्रहरी रामगाथा’, (श्रीनिवास खळे),  ‘पुनवेचा चंद्रम आला घरी चांदाची किरणं दर्यावरी’ (संगीतकार बाळ पार्टे), ‘फुलं स्वप्नाला आली गं’ (सुधीर फडके), ‘बिब्बं घ्या बिब्बं शिक्ककाई गल्लीबोळातनं वरडत जाई’ (राम कदम) ही वेगवेगळ्या शैलींतील गाणी त्यांनी गायली.
त्यांनी जास्त गाणी श्रीनिवास खळे यांच्याकडे गायली आहेत. सुधीर फडके, मन्ना डे, उषा मंगेशकर यांच्यासह कल्ले यांची काही द्वंद्वगीतेही आहेत. हिंदीत मोहम्मद रफी यांच्यासमवेत त्यांनी ‘गाल गुलाबी नैन शराबी’ हे गाणे गायले. ‘रास्ते और मंझिले’, ‘जमाने से पूछो’, ‘प्रोफेसर और जादूगर’, ‘टारझन और जादुई चिराग’ आणि अन्य काही हिंदी चित्रपटांसाठीही कल्ले यांनी आवाज दिला; पण हे कमी बजेटचे आणि पौराणिक व स्टंट चित्रपट होते.  
कृष्णा कल्ले यांची कोणाबद्दल कसलीही तक्रार नाही. त्यांच्या संगीत प्रवासाचा आढावा घेणारे ‘गायिका कृष्णा कल्ले – एक कृतार्थ जीवन’ (वसुधा कुलकर्णी) हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.  रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळविलेल्या गायिका कृष्णा कल्ले यांचा मुंबईत शुक्रवारी सन्मान होत आहे. ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर’ पुरस्कार रवींद्र नाटय़ मंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार पं. यशवंत देव यांच्या हस्ते कल्ले यांना प्रदान केला जाणार आहे.