30 September 2020

News Flash

पुणे स्टेशनवरचा कुंभमेळा

आम्ही दोघे गेल्या महिन्यात सोलापूरहून इंद्रायणी एक्स्प्रेसने पुण्यास आलो. प्रवास व्यवस्थित झाला. संध्याकाळी सहाच्या सुमाराला पुण्यात आलो.

| December 2, 2013 12:10 pm

आम्ही दोघे गेल्या महिन्यात सोलापूरहून इंद्रायणी एक्स्प्रेसने पुण्यास आलो. प्रवास व्यवस्थित झाला. संध्याकाळी सहाच्या सुमाराला पुण्यात आलो. गाडीतून उतरल्यावर तीन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून स्टेशनच्या बाहेर पडण्यासाठी पुलावरून एक नंबरच्या प्लॅटफॉर्मकडे येणे भाग होते. जवळची लहानशी चाकावरची बॅग व एक पिशवी असे सामान घेऊन आम्ही उतरणीवरून (रॅम्प) पुलावर चढू लागलो. गर्दी जरा जास्त होती. आम्ही थोडा वेळ तीन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरच थांबायला हवे होते असे नंतर वाटले. पुलावर चढून गेल्यावर तर माणसांचा भयानक गठ्ठा झाला. विविध दिशांनी आलेले लोक एकमेकांना भिडून कुणालाही कुठेच जाता येईना. त्यातच काही लोक गाडी पकडायला जाण्याचा प्रयत्न करीत होते. माझ्याजवळच्या एका बाईने तिच्या पाच-सहा वर्षे वयाच्या मुलाचा हात धरला होता, तो सुटला व गर्दीत तो मुलगा दिसेनासा झाला. ती बिचारी पुन:पुन्हा हात उंचावून त्याला हाका मारीत होती. एक खाकी कपडय़ातला पोलीस व्यवस्था लावण्यासाठी येत होता. त्यालाही पुढे येता येत नव्हते. तो तिथे विनोदी दिसत होता, कारण नुसते हातवारे करीत होता. सगळे जण आपापल्या पिशव्या सांभाळत एकमेकांना खेटून उभे होते. अखेर एकमेकांना जरा ढकलत, कशी तरी वाट काढत आम्ही एक नंबर प्लॅटफॉर्मच्या दिशेने सरकलो. एकाच वेळी विनोदी व भयावह असा तो अनुभव होता. पाच सात मिनिटे आम्ही कुंभमेळ्याच्या गर्दीचा अनुभव घेतला. नंतर  काही लोकांची गाडी पुणे स्टेशनवरील गर्दीमुळे चुकली, तर कुणाचा चष्मा त्या गर्दीत पडून फुटला, असे समजले. स्टेशनवरील माझ्याजवळच्या बाईला तिचा मुलगा सापडला असेल असे मी समजते. कारण तो अगदी लहान नव्हता, बोलू शकत होता.  
पुणे स्टेशनवर एकच पूल अनेक प्लॅटफॉर्मना जोडतो. गर्दीच्या वेळी तिथे भयावह स्थिती असते. असा अनेक प्लॅटफॉर्मना जोडणारा निदान आणखी एक तरी पूल अत्यावश्यक आहे, हे           रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाही का? की कुंभमेळ्यात होतात तशी एखादी भयंकर दुर्घटना झाली, तरच त्यांना हे पटेल?
-मंगला नारळीकर, पुणे

खटला कुठेही चालवल्याने काय फरक पडणार?
तरुण तेजपाल याने अटकेपूर्वी जो थयथयाट चालवला होता तो निश्चितच पत्रकार म्हणून घेणाऱ्याला शोभत नाही. त्याने गोवा पोलिसांवर केलेले आरोप, शनिवापर्यंत गोव्याला येणे शक्य नाही असे मस्तवालपणे पोलिसांना कळवणे, खटला गोव्यात नको तर गोव्याबाहेर (म्हणजेच काँग्रेसशासित राज्यात?) चालवण्याची मागणी करणे आणि त्याचे हे वर्तन बघून न्यायालाने त्याला देश न सोडण्याचे दिलेले आदेश ही खरे तर लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे त्यावरचे जे गंभीर आरोप झाले आहेत त्याला अधिक पुष्टीच मिळत आहे. जर तुम्ही निर्दोष आहात तर घाबरायचे काय कारण?
खटला कुठेही चालवला तरी काय फरक पडणार आहे? सरकारने जर त्याची ही मागणी मान्य केली तर लोकांचा सरकारवरचा उरलासुरला विश्वासही उडेल. कारण हा दंगलीचा किंवा खोटय़ा चकमकीचा प्रश्न नाही, तर बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्य़ाचा प्रश्न आहे. हे असे सभ्यतेचा बुरखा पांघरून घेऊन बसलेले नराधम जर मोकाट सुटले तर आधीच असुरक्षित असलेल्या स्त्रिया अधिकच असुरक्षित होतील. सरकारने त्या पीडित महिलेला न्याय मिळवून द्यावा आणि महिलांच्या सुरक्षेबाबत कटिबद्ध असावे हीच अपेक्षा आहे .
अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण (प.)

भाजपला खूश करण्यासाठी?
‘करुण निस्तेजपाल’ हा अग्रलेख      (२९ नोव्हे.) वाचून डोळ्याचे आणि बुद्धीचे पारणे फिटल्यासारखे झाले. अत्यंत परखड, अभ्यासपूर्ण व खूप मेहनत घेऊन केलेल्या लिखाणाबद्दल अभिनंदन! खरे म्हणजे असल्या बौद्धिक चिरफाडीची वाट असंख्य वाचक पाहत होते, ती पूर्ण झाली. एक गोष्ट मुद्दाम उल्लेख करावी अशी आहे. ती म्हणजे हा अग्रलेख भाजपला खूश करण्यासाठी तर लिहिला नाही ना, अशी शंका काहींच्या डोक्यात गोंधळ घालेल हे नक्की. पण जे काही मांडले आहे ते कोणालाही खोडून काढता येईल असे वाटत नाही. तेजपालबरोबरच ‘महानगर’कर यांचाही हिशेब चुकता केला एवढे म्हणून थांबता येणार नाही.
 अग्रलेखाच्या शेवटी सर्वच संस्था आपल्या नियत कर्तव्यापासून दूर जात आहेत हे लक्षात आणून दिले, तेही बरोबर आहे. त्यातून संबंधितांनी बोध घ्यावा. कारण ते समाजहितासाठी आवश्यक आहे.  
श्रीनिवास जोशी, डोंबिवली (पूर्व)

पाप कशाला म्हणायचं?
सर्वोच्च न्यायालयानं ‘सहजीवन हे पाप किंवा गुन्हा नाही’ असं सांगितल्याची बातमी (२९ नोव्हें.) वाचली. शारीरिक आकर्षणापोटी लग्नबंधनाशिवाय सहजीवन चालू करायचं आणि मग आपापल्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी पुरुषानं दुसऱ्या स्त्रीशी संग करायचा, तो त्याचा जन्मजात हक्क असल्यासारखा, हे पाप नाही का? तसंच स्त्रीनंही त्या पुरुषाकडून काही खास ‘अपेक्षा’ पूर्ण झाल्या आणि इतर आíथक/ वैचारिक बाबीत मतभेद झाले की दुसरा घरोबा करण्याचं टोकाचं पाऊल उचलणं, प्रसंगी त्यासाठी सहजीवनात उपभोगलेल्या क्षणांना बलात्काराचं रूप देणं हे पाप नाही का? अशा अल्पजीवी सहजीवनातून जन्मलेल्या अपत्यांना आश्वस्त नातेसंबंधांना पारखं करणं हे पाप नाही का? थोडक्यात, सहजीवन आणि स्वैराचार यातल्या सीमारेषा पुसट व्हायला लागल्या तर आपल्याकडची त्यातल्या त्यात सुरक्षित कुटुंबपद्धती धोक्यात येणार नाही का?  सहजीवनातल्या जोडीदारांचा भावनांचा गुंता सोडवणं आणि स्वैराचाराला आळा घालणं हे लग्नसंस्थेशिवाय कुठला कायदा प्रभावीपणे करू शकेल, हा प्रश्नच आहे.
श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे

तो उल्लेख कवित्वाबद्दल
‘व्यापिले जल-भूमी-आकाश’ या पत्रातील प्रा. यशवंत वालावलकर यांचे म्हणणे ग्राह्य धरायला हरकत नसावी. ह. भ. प. सोनोपंत दांडेकर आणि मुंबई विद्यापीठ (केळकर-मंगरूळकर) या प्रतींमधले त्या ओवीचे अर्थ अगदी निरनिराळे आहेत. स्तंभातील लेखाचा उद्देश बघता ज्ञानेश्वरांना कामिनीच्या कटाक्षाचे कवित्व परिचित होते, एवढेच सांगायचे होते.
रविन थत्ते

उपदेश करणे सोपे आहे
‘लोकमानस’मधले देवयानी पवार यांचे पत्र (२९ नोव्हें.) तहलकाप्रकरणी महत्त्वाचे आणि चर्चा करण्याजोगे आहे. ‘गोवा पोलीस सावधानता दाखवत आहेत’ हे पवार यांचे विधान मात्र समजले नाही. इथे कोणाच्या अटकेचा प्रश्न नाही. संशय असलेल्या व्यक्तीला पोलीस अधिकारी चौकशीच्या निमित्ताने कधीही बोलावू शकतात. पण आíथक स्तर कमी असणाऱ्या समाजातल्या संशयित गुन्हेगारांबाबतचे हे पोलिसांचे धोरण प्रसिद्ध व्यक्तींबाबत अवलंबिले जाताना दिसत नाही.
माध्यमप्रमुखांना देवयानी पवारांनी जो उपदेश केला आहे त्याबद्दल दोन शब्द सांगायला पाहिजेत. एकतर सर्व क्षेत्रांत हे प्रकार घडतात. खासगी कंपन्या आणि संस्थांहून प्रसार माध्यमे वेगळी आहेत असा विचार करणे आपण आता सोडले पाहिजे. सत्तास्थाने तर प्रत्येक संस्थांत आहेत.
आपले कोणीही काही करू शकत नाही असे सत्तेवर असलेल्यांना वाटते हे खरे आहे. पण त्याचबरोबर त्यांचे कोणीही काही करू शकत नाही हेही खरे आहे. आपण हे अनेक वष्रे पाहत आलो आहोत. एखादा सापडतो. त्यालाही शिक्षा होते की नाही आणि ती कधी होते हा मुद्दा अलाहिदा. तेव्हा कोणीही काहीही करू शकत नाही हा उच्चपदस्थांचा भ्रम नसून ते वास्तव आहे. महिलांनी पुढे येऊन तक्रार करावी हे म्हणणे सोपे आहे.  पण यात अनेक गुंते असतात. आíथक आणि मानसिक, सामाजिक अशी अनेक प्रकारची दडपणे असतात. आपण मालकाच्या मर्जीतून उतरू, आपली बदली होईल या भीतीने कार्यालयातला स्टाफ नेहमी मालकाच्या बाजूने साक्ष देतो आणि पीडित महिलेला एकाकी पाडतो. तहलकाप्रकरणी ज्यांनी राजीनामा दिला त्या पत्रकार स्त्रियांइतक्या समाजातल्या सर्व स्त्रिया सुस्थितीत नसतात. अशी कितीतरी प्रकरणे आसपास पाहायला, अनुभवायला मिळतात; ज्यात व्यवस्था गुन्हेगाराच्या बाजूने उभी राहिली आहे. खटले जेव्हा उभे राहतात तेव्हा त्या ‘स्त्रीचा यात दोष नसेलच कशावरून’ अशी कुजबुज समाजात चालते. खटला जसा लांबेल तशी कुजबुज वाढत जाते आणि घटना समाजाच्या करमणुकीचा विषय होऊन बसते. एकूण सारे प्रकरण आपल्याला वाटते इतके सोपे नाही. उपदेश करणे त्यामानाने सोपे आहे.
-अवधूत परळकर, माहीम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2013 12:10 pm

Web Title: kumbh mela on pune station
Next Stories
1 राजकारणाची मराठीला देणगी..
2 हे नवे दत्ता सामंत..
3 विश्लेषणाची गरज कशी चुकीची ठरेल?
Just Now!
X