पतंजली मुनींनी कधीही कुंडलिनी शक्तीचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी प्रतिपादलेली ‘प्रेरक चेतना’ कुंडलिनीसंबंधी आहे हे कदाचित मान्य केले तरी त्या अनुषंगाने मानवी शरीरात कुंडलिनी, तीन नाडय़ा व सात चक्रे असे संबंधित एकूण ११ अवयव प्रत्यक्षात आहेत हे सिद्ध कसे व्हावे? शिवाय, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य देशांत गूढवादी अनुभव आणि विचार सारखेच आहेत, मग होणारे साक्षात्कार परस्परभिन्न कसे?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इ. स. पू. दुसऱ्या शतकात होऊन गेलेला पतंजली मुनी हा महान ऋषी, योग विद्येचा पहिला सर्वमान्य ‘संकलनकार’ होता (उद्गाता नव्हे); व त्याने आठ अंगांच्या (अष्टांग) स्वरूपात सांगितलेल्या योगसाधनेचे १) बहिरंग साधना, २) अंतरंग साधना व ३) अंतरात्मा साधना असे तीन मुख्य भाग मानले जातात. बहिरंग साधनेत ‘यम, नियम व आसन’ अशी तीन अंगे आहेत. (?) यम म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचर्य व अपरिग्रह (साठा न करणे), असे नैतिक आचरणाचे पाच नियम होत. (?) ‘नियम’ म्हणजे शौच (शुद्धता), संतोष, तपस्, स्वाध्याय (वेदाध्ययन) व पाचवा ईश्वर-प्रणिधान (ईश्वर-शरणता) हे पाच आत्मशुद्धीकरणाचे नियम होत. या यम-नियमांच्या पालनाचे चित्त शुद्ध होऊन, मन ‘वासनारहित’ होऊ शकते. यम-नियम पालनानंतर (?) तिसरे अंग आहे ‘आसन’, म्हणजे शरीराची विशिष्ट स्थिती. अशा या बहिरंग साधनेनंतर ‘प्राणायाम’ व ‘प्रत्याहार’ या ‘अंतरंग’ साधनेच्या दोन पायऱ्या होत. प्राणायाम म्हणजे श्वास व उच्छ्वासाचे लयबद्ध नियंत्रण; आणि प्रत्याहार म्हणजे बाह्य़ विषयांच्या व आपल्या इंद्रियांच्या प्रभावापासून मनाला मुक्त करणे होय. त्यानंतर शेवटच्या ‘अंतरंग साधनेत, शेवटची तीन अंगे असतात. ती म्हणजे, धारणा, ध्यान व समाधी ही होत. धारणा म्हणजे चित्त एकाग्र करणे, ध्यान म्हणजे एकाच विषयाचे सतत चिंतन करणे व समाधी म्हणजे साधक व परमात्मा (हा ध्यानविषय) यांची एकरूपता अनुभवण्याची स्थिती. पतंजली मुनीने सांगितलेली अष्टांग साधना या एवढय़ाशा लेखात एवढय़ा तपशिलात सांगण्याचा एक हेतू असा की, त्यात त्याने ‘कुंडलिनी जागृती’चे काही वर्णन केलेले नाही हे दाखविणे हा होय.
मुळात भारतीय तत्त्वज्ञानात योगसाधनेला फार महत्त्व आहे आणि पतंजलीपश्चात् झालेल्या योगविद्येच्या अभ्यासात ‘कुंडलिनी’ या पारिभाषिक संज्ञेचा वारंवार उपयोग केला जातो. याबाबत कुंडलिनी समर्थकांचे पटण्याजोगे स्पष्टीकरण असे आहे की, पतंजलीने वापरलेला ‘प्रत्यक चेतना’ हा व त्याच्या पूर्वीच्या श्वेताश्वेतरोपषिदाने वापरलेला ‘देवात्म शक्ती’ हा, हे दोन्ही शब्द व त्यांच्या प्रक्रिया या कुंडलिनी शक्तीच्याच सूचक असाव्यात. तर एवढे मान्य करून आपण पुढे जाऊ या.
प्राणायामात श्वास आत घेण्याला ‘पूरक’, तो कोंडून ठेवण्याला ‘कुंभक’ व तो हळूहळू सोडण्याला ‘रेचक’ म्हणतात. यात ‘कुंभक’ सर्वात कठीण असून, त्याच्यासह या तिन्ही क्रिया व्यवस्थित केल्या तर कुंडलिनी ‘जागृत’ होते असे मानले जाते. आपल्या पाठीच्या कण्याजवळ इडा, पिंगला व मधली सुषुम्ना अशा तीन पोकळ नाडय़ा असून, जागृत झालेली कुंडलिनी, आपले तेज सुषुम्ना नाडीत ओतते, त्यामुळे तिला कंप येऊन, सूं सूं असा मंद आवाज निर्माण होतो ज्याला ‘अनाहतनाद’ असे म्हणतात. सुषुम्नेच्या शेजारी मूलाधार चक्र असून, सुषुम्नेला प्राप्त झालेल्या तेजाच्या साहाय्याने ती त्या मूलाधार चक्राचा व त्याच्यावरील आणखी पाच चक्रांचा भेद करून ती ते तेज मस्तकांतील सहस्रार या सातव्या चक्राला नेऊन भिडविते व त्यामुळे साधकाला समाधी लागू शकते, त्याला प्रातिभ ज्ञान व आत्मज्ञान प्राप्त होते आणि त्याला अतिमानुषी शक्ती वा सिद्धी प्राप्त होतात व ईश्वरदर्शनही होऊ शकते, असे मानले जाते. चित्शक्तीचे ‘मनुष्य देहांतर्गत स्वरूप’ व ‘तेजाची खाण’ असलेला कुंडलिनी हा अवयव आपल्या पाठीच्या कण्याच्या, म्हणजे मेरुदंडाच्या खालील भागात, माकडहाडाच्या शेजारी प्रत्यक्षात आहे असे मानले जाते. तिचे वर्णन ‘लाल रंगाच्या सर्पाच्या पिल्लाप्रमाणे, साडेतीन वेटोळी घालून तोंड खाली करून झोपलेली’ असे केले जाते. झोपलेली ही कुंडलिनी जागृत करणे हे योगसाधनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट मानले जाते; आणि वर सांगितल्याप्रमाणे कुंडलिनी या अवयवाच्या वर, तीन नाडय़ा व सात चक्रे शरीरात प्रत्यक्ष आहेत असेही मानले जाते. योगविद्येच्या सिद्धान्तानुसार सिद्धी म्हणजे अतिमानुषी शक्ती-प्राप्तीचे कार्य कुंडलिनीच्या जागृतीमुळे होते. सध्याचे योगशास्त्र, कुंडलिनी व तिच्या कार्यपद्धतीवरच आधारलेले आहे असे दिसते.
भारतात योगविद्या प्राचीन उपनिषदांच्या किंवा त्याही पूर्वीच्या काळात म्हणजे अर्थात पतंजलीच्या पुष्कळच अगोदरच्या काळापासून प्रचलित होती यात काहीच संशय नाही. परंतु आजच्या योगशास्त्रातील कुंडलिनीविषयक संशोधन (?) व उल्लेख हे दशोपनिषदांच्या, पतंजलीच्या व गीतेच्याही नंतरच्या काळातील आहेत. कुंडलिनीच्या समर्थकांचा दावा असा आहे की, मानवी शरीरात कुंडलिनी, तीन नाडय़ा व सात चक्रे असे संबंधित एकूण ११ अवयव प्रत्यक्षात आहेत. हे जर खरे म्हणायचे, आपल्या संबंध शरीराची चिरफाड करू शकणाऱ्या आधुनिक शस्त्रवैद्यांना (सर्जनना) या अकरापैकी एकही अवयव शरीरात दिसत नाही ते का? आत्म्याप्रमाणे हे अकराही अवयव ‘अदृश्य’ आहेत का? की ते केवळ कल्पनाविलास आहेत? आणि आम्ही सामान्यजनांनी असल्या या दिव्यज्ञानावर का म्हणून विश्वास ठेवावा? आपले ‘मन’ दिसत नसूनही आपण ते खरे मानतो, कारण त्याचे अस्तित्व सिद्ध करता येते. पण या ११ अवयवांचे तसेही नाही.
शिवाय संपूर्ण ‘पाश्चात्त्य’ तत्त्वज्ञानात कुंडलिनी, तिचे मानवी शरीरातील अस्तित्व, तीन नाडय़ा, सात चक्रे, कुंडलिनीची जागृती तिचे कर्तृत्व याबद्दल काहीही उल्लेख नाहीत. कुंडलिनीसमर्थकांचे याबाबत असे म्हणणे आहे की, जरी पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात हे उल्लेख नाहीत तरी, पाश्चात्त्य देशांमध्येसुद्धा अनेक ‘साक्षात्कारी संत’ होऊन गेलेले आहेत व त्यांचे गूढ अनुभवसुद्धा योगांनी प्राप्त होणाऱ्या सिद्धींसारखेच आहेत. दोन्हीकडच्या साक्षात्कार होतानाच्या मानसिक स्थितीही सारख्याच आहेत. त्या अशा :- नाना प्रकारचे गूढ आवाज ऐकू येणे (अनाहतनाद), मन वासनारहित होणे, प्रचंड तेज दिसणे, भयंकर अंधार दिसणे, शरीरातून विजेसारखा प्रवाह वाहत आहे असे भासणे, दिव्यदर्शन होणे वगैरे. भारतातील योगविद्येप्रमाणे हे सर्व अनुभव कुंडलिनी जागृत झाल्यावर येतात. शिवाय साक्षात्कार होण्यासाठी फक्त योगप्रक्रियाच वापरली पाहिजे असा काही नियम भारतीय योगशास्त्रातसुद्धा नाही. त्यामुळे कुंडलिनीसमर्थकांना वाटते की हा फक्त परिभाषेतला फरक आहे. मला वाटते की, ‘पौर्वात्य आणि पाश्चिमात्य देशात गूढवादी अनुभव आणि विचार सारखेच आहेत’ यात काही आश्चर्य नाही व ते तसे असल्याने काहीही सिद्ध होत नाही व ते सत्य ठरत नाहीत. शिवाय अशा प्रकारे होणाऱ्या साक्षात्कारांना जर खरे म्हणायचे तर वेगवेगळ्या संतांना, वेगवेगळे व परस्परभिन्न साक्षात्कार का होतात याचे पटण्याजोगे उत्तर द्यावे लागेल.
महावीरांना आत्मक्लेशाने व गौतम बुद्धांना ध्यानमग्न अवस्थेत ‘ज्ञानप्राप्ती’ झाली व दोघांनीही ईश्वराचे अस्तित्व नाकारले. बुद्धांनी तर अमर आत्म्याचे अस्तित्वसुद्धा नाकारले. येशू ख्रिस्तांना चिंतनाने एकाएकी ज्ञानप्राप्ती होऊन त्याने सांगितले की, आकाशातील देव हा आपला ‘प्रेमळ बाप’ असून तो आपल्याला पृथ्वीवर एकच जन्म देतो. पुनर्जन्म देत नाही. (पुनरुक्तीबद्दल क्षमा मागून 🙂 प्रेषित महंमदांनी देवदूतांशी संभाषण केले. त्यांनी सांगितले की, आकाशातील अल्लाचे आपण बंदे आहोत व तो आपल्याला पृथ्वीवर एकच जन्म देतो. पुनर्जन्म देत नाही. आद्य शंकराचार्याना लहानपणीच आत्मसाक्षात्कार झाला आणि त्यांनी असे ठासून सांगितले की, ‘अनेक पुनर्जन्मांच्या साखळीतून गेल्यानंतरच आपल्याला मोक्ष मिळू शकतो व आपण ज्या सर्वव्यापी ईश्वराचे अंश आहोत त्या परमात्म्यात विलीन होऊ शकतो- जे आपले सर्वश्रेष्ठ ध्येय आहे. ईश्वरकृपेने आत्मसाक्षात्कार व ज्ञानप्राप्ती झालेल्या अशा मान्यवर महात्म्यांनी, प्रेषितांनी, परस्परविरोधी दिव्यज्ञानप्राप्ती झाल्याचे सांगितल्यावर आपल्यासारख्या सामान्य माणसाने करावे तरी काय? कुणाचा साक्षात्कार खरा मानायचा?
‘योगविद्या’- जी बौद्धांना व जैनांनाही मान्य आहे, ती एका वेगळ्या दृष्टीने विचार करता ‘मानसशास्त्रावर’ आधारित आहे असे दिसते. योगाभ्यासाने चित्तशुद्धी होते, मन:शांती लाभते व त्यामुळे शरीरप्रकृतीसुद्धा सुधारते यात काही शंका नाही. ते खरेच आहे. म्हणूनच तर ‘जगातील कित्येक पुढारलेल्या देशांतील मानसशास्त्रज्ञ व मनोरोगचिकित्सक, अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने योग या विषयावर फलदायी संशोधन करीत आहेत’ व ‘योगशास्त्र ही भारताची जगाला बहुमूल्यवान देणगी आहे’ अशी विधाने, लोकसत्तात २३ मार्च रोजी प्रकाशित झालेल्या, ‘विज्ञान’ या शीर्षकाच्या याच लेखमालेतील माझ्या लेखात आलेली आहेत. परंतु म्हणून ‘योगसाधना करणाऱ्याला कोणताही रोग होत नाही, वार्धक्य येत नाही, एवढेच नव्हे तर त्याला मृत्यूही येत नाही’ अशा दाव्यांवर आपण विश्वास ठेवू शकत नाही. ‘आद्य शंकराचार्य, ज्ञानेश्वर, रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद’ हे चौघेही चारित्र्यवान, ब्रह्मचारी, यम-नियमांचे काटेकोर पालन करणारे, योगी व सिद्धपुरुष होते, पण तरीसुद्धा त्यांना आधिव्याधी काही सुटल्या नाहीत. त्यामुळे योगविषयक सर्व दावे मान्य न करता, त्यातील जेवढे आपल्या बुद्धीला व विज्ञानाला पटेल तेवढेच आपण स्वीकारावे हे बरे.

More Stories onयोगाYoga
मराठीतील सर्व मानव-विजय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kundalini
First published on: 27-07-2015 at 01:11 IST