समाजाचे भले करण्याच्या नावाखाली जगभर वेगवेगळ्या स्वरूपात साम्राज्यवाद फोफावत असताना आणि धार्मिक वंशवादाचा पाया पक्का होत असताना संयुक्त राष्ट्रांचे सीरियातील दूत लखदर ब्राहिमी यांचा राजीनामा हा मुत्सद्दी जगताला एक धक्काच आहे. तसे या महिनाअखेर ते निवृत्त होणार होते तरी सीरियातील स्थिती पूर्ववत करण्यात अपयश आल्यावरून स्वत:हून पदत्याग केल्याने त्यांची प्रतिमा अधिकच उजळली आहे. त्यांचा पदत्याग हे आपलेच अपयश आहे, या संयुक्त राष्ट्र सरचिटणीस बा की मून यांच्या प्रतिक्रियेतच त्यांच्या कर्तृत्वाचे प्रतिबिंब उमटले आहे. अफगाणिस्तान आणि इराकसारख्या दहशतवादाने पोखरलेल्या देशांमधील स्थित्यंतरात संयुक्त राष्ट्रांचे विशेष दूत म्हणून बजावलेली कामगिरी आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेची वैचारिक जडणघडण या दोनच गोष्टी ब्राहिमी यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतील. ‘अशांत’ जगात ते पाय रोवून उभे राहिले आणि त्यासाठी त्यांचे अरब असणे जितके उपयोगी ठरले तितकाच त्यांचा राजकीय अनुभवही उपयुक्त ठरला.
अल्जेरियात १९३४ मध्ये ब्राहिमी यांचा जन्म झाला तेव्हा अल्जेरियातील फ्रान्सच्या राजवटीने शतक पार केले होते. फ्रान्सच्या राजवटीने नागरिकांचे आर्थिक आणि सामाजिक अधिकार हिरावले होते तरी सांस्कृतिक पोषण मात्र साधले होते. कायदा आणि राज्यशास्त्राचा अभ्यास करतानाच ब्राहिमी अल्जेरियाच्या स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले. अल्जेरियात स्वातंत्र्य आंदोलनाची हिंसक ठिणगी पडली ती १९५४ मध्ये आणि त्या चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या ‘नॅशनल लिबरेशन फ्रन्ट’चे कार्य ब्राहिमी यांनी १९५६ पासून सुरू केले. १९६२ मध्ये अल्जेरिया स्वतंत्र झाला. तेव्हापासून १९७९ पर्यंत त्यांनी विविध देशांत राजदूत म्हणून अल्जेरियाचे प्रतिनिधित्व केले. अरब लीगच्या कामकाजातही त्यांचा ठळक सहभाग होता. या सर्व कालावधीत अल्जेरियातही अनेक सामाजिक व राजकीय बदल घडत होते. औद्योगिकीकरणाच्या जोडीने इस्लामी अस्मितेची पुनर्बाधणी सुरू होती. या खडतर काळात १९९१ ते १९९३ मध्ये परराष्ट्रमंत्री या नात्याने त्यांनी जागतिक पातळीवरही देशाचे हित जोपासले. याच सुमारास संयुक्त राष्ट्रांच्या कार्यातही ते अधिक सक्रिय झाले आणि जगाला अरब चेहरा असलेला एक शांतताप्रेमी मुत्सद्दी लाभला.
अनेक देशांत शांतता प्रस्थापित करण्याचे अतिशय गुंतागुंतीचे कार्य त्यांनी ज्या चिकाटीने, लोकसहभागाने आणि धैर्याने पार पाडले, त्याची नोंद अमिटच राहील. प्रत्यक्ष मुत्सद्दी म्हणून ते कार्यरत राहणार नसले तरी नेल्सन मंडेला यांनी स्थापलेल्या ‘द एल्डर्स’ या जागतिक समंजस नेत्यांच्या गटाचे सदस्य म्हणून ते जगाची समज वाढविण्याच्या कार्याची धुरा यापुढेही वाहणारच आहेत!